दिल्ली दंगलीच्या याचिकांची सुनावणी शुक्रवारी

दिल्ली दंगलीच्या याचिकांची सुनावणी शुक्रवारी

नवी दिल्ली : दिल्ली दंगलीला कारणीभूत ठरलेल्या भाजपच्या नेत्यांच्या चिथावणीखोर भाषणांसंदर्भातील हर्ष मंदर यांची याचिका सोडून अन्य सर्व याचिकांची सुनावण

रविदास मंदिर : मुस्लिम, दलितांचे १५ सप्टेंबरला आंदोलन
सरकारचं नवं हत्यार बुलडोझर !
दिल्ली दंगल : १०२ जणांना गोळ्या लागल्या

नवी दिल्ली : दिल्ली दंगलीला कारणीभूत ठरलेल्या भाजपच्या नेत्यांच्या चिथावणीखोर भाषणांसंदर्भातील हर्ष मंदर यांची याचिका सोडून अन्य सर्व याचिकांची सुनावणी दिल्ली उच्च न्यायालयाने एप्रिल महिन्यात नव्हे तर येत्या शुक्रवारी ६ मार्चला लगेचच घ्यावी असे आदेश बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली उच्च न्यायालयाला दिले. दंगलीसंदर्भातील याचिका एवढ्या लांब सुनावणीस घेणे अयोग्य असून तिची सुनावणी येत्या शुक्रवारी घ्यावे असे आम्हाला वाटते, असे मत सरन्यायाधीश बोबडे यांनी व्यक्त केले.  दिल्ली उच्च न्यायालयाने या विषयावर शांततापूर्ण तोडगा काढण्याचे प्रयत्न केले पाहिजेत, असेही सरन्यायाधीश म्हणाले.

दिल्ली दंगलीला कारणीभूत ठरलेल्या भाजप नेत्यांच्या चिथावणीखोर भाषणांवर आक्षेप घेत या नेत्यांविरोधात दिल्ली पोलिसांनी फिर्याद दाखल करावी अशी याचिका सामाजिक कार्यकर्ते हर्ष मंदर यांच्यासह दंगल पीडितांनी दाखल केली होती. या याचिका २७ फेब्रुवारीला दिल्ली उच्च न्यायालयापुढे सुनावणीस आल्या असता न्या. डी. एन. पटेल व न्या. सी. हरी शंकर यांच्या पीठाने या याचिकेवरची सुनावणी १३ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली होती.

हर्ष मंदर यांच्या वक्तव्यावर न्यायालयाने मागितला खुलासा

दरम्यान, या याचिकांवर सुनावणी सुरू असताना सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी जामिया विद्यापीठात सीएएविरोधी आंदोलनात हर्ष मंदर यांनी केलेले एक वक्तव्य न्यायालयाला सांगितले. या वक्तव्यात हर्ष मंदर यांनी आमचा सर्वोच्च न्यायालयावर विश्वास राहिलेला नाही पण आपल्यापुढे पर्याय नसल्याने तिकडे जावे लागेल. मात्र आपल्याला खरा न्याय रस्त्यावर मिळेल, असे म्हटले होते.

तुषार मेहता यांनी न्यायालयाला हे वक्तव्य सांगितल्यानंतर सरन्यायाधीशांनी हर्ष मंदेर यांचे वक्तव्य गंभीर असल्याचे सांगून ‘त्यांना जर सर्वोच्च न्यायालयाबद्दल असे वाटत असेल तर आम्हाला त्यांच्याबद्दल काय करावं लागेल ते ठरवावे लागेल, अशी प्रतिक्रिया दिली.

त्यावर मंदेर यांच्या वकील करुणा नंदी यांनी या विधानाच्या सत्यतेबद्दल शंका उपस्थित केली आणि अशा व्हिडिओबद्दल काही माहिती नाही असे स्पष्ट केले. मंदेर यांनी असे काही म्हटलेले नाही व तशा प्रती त्यांनी मला दिलेल्या नाहीत, असेही नंदी म्हणाल्या.

त्यावर न्यायालयाने या संदर्भात सॉलिसिटर जनरलनी मंदेर यांच्या विधानाची सत्यता दाखवणारे प्रतिज्ञापत्र दुपारी दोनपर्यंत दाखल करावे असे सरकारला सांगितले. तसेच व्हीडिओचे ट्रान्सस्क्रिप्टही सादर करण्यास सांगितले.

यावर करुणा नंदी यांनी आपले अशील मंदेर अमेरिकेत असून ते ८ मार्चला भारतात येणार असल्याचे न्यायालयाने सांगितले. नंदी यांच्या या म्हणण्याला आक्षेप घेत तुषार मेहता यांनी हा विषय अत्यंत महत्त्वाचा असून न्यायालयाच्या विरोधात अशी मते व्यक्त करून मंदेर अमेरिकेला गेले असे विधान केले.

त्यावर सरन्यायाधीशांनी मंदेर यांचे विधान गंभीर असून हे प्रकरण शुक्रवारी ६ मार्चला सुनावणीस घेण्यात येईल असे सांगितले. न्यायालयाने ६ मार्चला मंदेर यांची दिल्ली दंगलीसंदर्भातील याचिकेची सुनावणी अन्य याचिकांच्या सुनावणीत घेऊ नये असेही दिल्ली उच्च न्यायालयाला आदेश दिले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0