नवी दिल्ली : शहरातील मौजपुरा भागात सोमवारी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात व समर्थनात दोन गट एकमेकांसमोर आल्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात तीन नाग
नवी दिल्ली : शहरातील मौजपुरा भागात सोमवारी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात व समर्थनात दोन गट एकमेकांसमोर आल्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात तीन नागरिकांसह एक हवालदार ठार झाला. हिंसाचारात ठार झालेल्या हवालदाराचे नाव रतन लाल असून त्यांच्या डोक्यात दगड बसल्याने ते जबर जखमी झाले व नंतर त्यांच्या इस्पितळात उपचारादरम्यान मृत्यू झाला तर मरण पावलेल्या तीन नागरिकांमधील एकाचे नाव मोहम्मद फरक्वान असल्याची माहिती मिळाली आहे.
मौजपुरा भागात १४४ कलम लावण्यात आले असून जाफ्राबाद, मौजपुर-बाबरपूर, गोकुलपुरी, जोहरी एन्क्लेव्ह, शिव विहार, जाफ्राबाद, उद्योग भवन, पटेल चौक, सेंट्रल सेक्रेटेरियेट, जनपथ मार्ग बंद करण्यात आले आहे.
रविवारी भाजपचे नेते कपिल मिश्रा यांनी सीएएच्या विरोधातील मौजपुरा व चांदबाग येथील आंदोलकांना त्यांचे आंदोलन मागे घेण्यास दिल्ली पोलिसांनी भाग पाडावे असा इशारा दिला होता. त्यानंतर सोमवारी दोन्ही बाजूंनी जबर दगडफेक व हिंसाचार झाला. दरम्यान कपिल मिश्रा यांनी एक ट्विट करून हिंसा हा कोणत्याही वादावरचा तोडगा होऊ शकत नाही. सीएएच्या विरोधात किंवा बाजूने हिंसा बंद केली पाहिजे असे म्हटले आहे. शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांनीही शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
दिल्ली सरकारने खबरदारीचे उपाय म्हणून ईशान्य दिल्लीतील सर्व शाळा मंगळवारी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मंगळवारी दिल्ली बोर्डाच्या होणाऱ्या परीक्षाही पुढे ढकलाव्यात अशी विनंती सिसोदिया यांनी केंद्र सरकारला केली आहे.
COMMENTS