होमोसेपिअन्सचे वारसदार..

होमोसेपिअन्सचे वारसदार..

आदिमानवांच्या दोन जाती होत्या. एक होमोसॅपियन्स आणि निॲण्डरथल. त्यातील होमोसॅपियन्स आजही तगून आहेत ते म्हणजेच आपण. पण निॲण्डरथल नामशेष झाले. त्याचं कारण निॲण्डरथल यांच्यात संवाद साधण्यासाठी भाषाकौशल्य विकसित झाले नव्हतं. त्यामुळे ते समूहाने जगू शकले नाही आणि ते निर्वंश झाले.

‘कोरोना फॅक्ट-चेक’ : अचूक माहितीचे जागतिक आव्हान !
शाळाबाह्य बालकांसाठी जुलैमध्ये ‘मिशन झिरो ड्रॉपआऊट’
राजस्थान काँग्रेस सरकारकडून प्रत्येक आमदाराला आयफोन

कुरिअर सर्विसचे विमान समुद्रात कोसळते आणि ‘कास्ट अवे’चा नायक चक हा कसाबसा एका निर्जन बेटावर पोहचतो. पुढे जगण्यासाठी कराव्या लागणाऱ्या सगळ्या खटापटी करत, स्वतःला तगवत असला तरी शरीर मनावर व्हायचा तो परिणाम होत असतो. दिवसेंदिवस कृश आणि हताश होत जातो. काही दिवसांनी कुरिअरचे काही बॉक्स तरंगत किनाऱ्यापाशी येतात. त्यात विविध गोष्टींबरोबर एक चेंडू, व्हॉलीबॉल असतो. मिळालेल्या काही सामानाला तोडून मोडून तो होडी बनवण्याचा प्रयत्न करत असताना त्यांच्या तळहाताला मोठी जखम होते. वैफल्यग्रस्त होऊन तो हाताला येईल ते इकडे तिकडे फेकू लागतो. तसा व्हॉलीबॉल पण फेकतो. शांत झाल्यावर त्याचं लक्ष व्हॉलीबॉल कडे जातं, तेव्हा त्याला काही तरी जाणवतं. जवळ घेऊन बघतो तर त्याच्या रक्ताळलेला पंजाचा ठसा व्हॉलीबॉलवर उमटला असतो. त्या ठशावर नाक, डोळे, ओठ काढून त्याला माणसाच्या चेहेऱ्याचं रूप देतो. त्याचं नाव विल्सन ठेवतो कारण विल्सन कंपनीचा तो व्हॉलीबॉल असतो. त्याच्यासाठी आता विल्सन नावाची एक व्यक्ती तयार झालेली असते. तो विल्सन बरोबर गप्पा मारतो. कुठलीही गोष्ट करताना आपण असं करूया का ? तुझं काय मत आहे? असे विचारत असतो. आता विल्सन त्याचा सहचर झालेला असतो. विल्सनमुळे त्याच्या मानसिक, शारीरिक प्रकृतीत फरक पडतो. जगण्याची एक उमेद निर्माण होते. एके दिवशी तो आणि विल्सन बोट बनवण्यात यशस्वी होतात..

माणसाला धीर, आधार वाटण्यासाठी, मोकळं होण्यासाठी किती छोटीशी गोष्ट पुरेशी होते. मोकळेपणाने बोला, व्यक्त व्हा असं सतत सांगितलं जातं. सध्या जीवनावश्यक गरजेइतकीच महत्त्वाची गरज निर्माण झाली आहे, ती म्हणजे व्यक्त होण्याची, बोलण्याची आणि ते कोणीतरी ऐकून घेण्याची..

आपण दुसऱ्यांना काही सांगत असतो तेव्हा बऱ्याच अंशी आपण नकळत स्व-संवादच साधत असतो. वरील गोष्टीत चकही तेच करत असतो. मानसशास्त्रज्ञचं असे मत आहे की अवघड परिस्थितीत आत्मसंवादात स्वतःला ‘मी’ ऐवजी आपल्या नावाने अथवा ‘तू’ असं कर, तुला हे करायलाचं हवं.. अशा सूचना दिल्यास जास्त चांगला फरक पडतो. आपल्याला दुसराच कोणी सूचना देत आहे, कोणीतरी आपल्यासोबत आहे ही भावना नकळत निर्माण होते.

दुसऱ्याला काही सांगणे हे अनेक प्रकारचे असते. मनाच्या तळाशी दडून बसलेल्या अनेक भावसंवेदनापासून, अगदी वरवरच्या, सहज, निरर्थक, अशा अनेक बाबीबद्दल आपण बोलत असतो. माणसे सतत इतरांना काही सांगू इच्छित असतात. कथा- व्यथा- आनंद- उद्रेक यांच्या लाटांची भरती ओहटी सुरूच असते. प्रत्येकाची ही आंतरिक भूक असते.

या आंतरिक भूकेचाही एक इतिहास आहे. आदिमानवांच्या दोन जाती होत्या. एक होमोसेपिअन्स आणि निॲण्डरथल. त्यातील होमोसेपिअन्स आजही तगून आहेत ते म्हणजेच आपण. पण निॲण्डरथल मात्र नामशेष झाले. त्याचं कारण वाचून थक्क व्हायला होतं कारण निॲण्डरथल यांच्यात संवाद साधण्यासाठी भाषाकौशल्य विकसित झाले नव्हतं. त्यामुळे ते समूहाने जगू शकले नाही. आणि ते निर्वंश झाले. होमोसेपिअन्स हे आरोळीने, वेगवेगळे आवाज काढून एकमेकांना सूचना देण्याइतके प्रगत झाले होते. ते एकमेकांशी संपर्क, संवाद साधू शकत होते, धोक्याच्या सूचना एकमेकांना देऊ शकत असल्याने, ते जगायला जास्त लायक ठरले. उत्क्रांतीच्या हा टप्पा विकसित होत गेला तसतसा मनुष्यचा मेंदू जास्त प्रगत होत गेला. शब्द, भाषा अक्षर असा हा प्रवास होत गेला पण त्या आधी माणूस विविध पद्धतीने आपल्या इतर बांधवांशी संपर्क साधून हावभावाच्या साह्याने व्यक्त होत राहिला.

मूकबधिर नायक नायिका असलेल्या ‘कोशिश’ या चित्रपटाची कथा निर्माता रमेश सिप्पी यांना ऐकवल्यानंतर, त्यांनी विचारले,

“जेव्हा मूक व्यक्ती एकमेकांशी खाणाखुणांनी संवाद साधतील तेव्हा खालच्या बाजूला सबटाईटल्स टाकायचे आहेत का?”

त्यावर गुलजार म्हणाले, “त्याची गरज भासणार नाही. उत्तम कलाकारांना सोबत घेऊन, हा मी चित्रपट बोलका करणार आहे.”

गुलजार यांचा माणसाच्या व्यक्त होण्याच्या अमर्याद कौशल्यावर पूर्णपणे विश्वास होता.

भावना व्यक्त करणे ही माणसाची आंतरिक उर्मी आहे. अगदी लहान मूलसुद्धा आपल्याला हातवारे करून, एखादा शब्द उच्चारून काही ना काही सांगत असतो. इतर कोणाला ते बाळ काय म्हणतंय ते कळत नसलं तरी त्याच्या घरच्यांना त्याची भाषा बरोबर समजत असते. भाषेचा अडसर दूर करण्यात माणूस पटाईत झाला आहे.

‘द टर्मिनल’ नावाचा एक फार हलका फुलका मस्त विनोदी सिनेमा आहे. तगून राहणाऱ्या आपल्या होमोसेपिअन्सचा वारसा सांगणारा.

द टर्मिनल

द टर्मिनल

भाषा येत नसताना अमेरिकन एअरपोर्टवर अडकून पडलेला नायक व्हिटर नवोरसकी हा आपल्या देशातून करकोझियातून पश्चिम अमेरिकेतील एअरपोर्टवर नुकताच उतरतो. तिकडे त्याच्या देशात करकोझियात राजसत्ता उलथून पडते आणि आणीबाणी घोषित होते. अशा संकटकाळात एअरपोर्टच्या नियमानुसार त्या देशावर फुली मारली जाते. त्यामुळे त्याचा देश तात्पुता हा अस्तित्वात उरलेला नसतो. म्हणून त्याला धड माघारी पण जाता येत नसतं आणि अमेरिकेतही प्रवेश करता येत नसतो. परिस्थिती बदलेपर्यंत त्याला एअरपोर्टवरच राहावे लागणार असत. त्याला इंग्रजी भाषा येत नसते तर त्याची भाषा कोणाला समजत नसते. त्या परिस्थितीत तो लोकांशी हातवाऱ्यांनी संवाद साधतो, अनेक अडचणी पार करतो. लोकांना मदत करतो. कमाईसाठी नाना क्लृप्त्या शोधतो. केवळ आपल्या वागण्याने लोकांचे मन जिंकतो. लोकांची मन जिंकणारी भाषा त्याला येत असते.

‘अगर अपना कहा खुद आपही समझे तो क्या समझे मजा तब है जब एक कहे, और दूसरा समझे..’ याचा आनंददायी प्रत्यय हा चित्रपट देतो. मनाची दार उघडायला भाषेचा अडसर येत नसतो. लोकांची मन जिंकायची जादू व्हिटरकडे असते.

अशीच भाषा जी सर्व जगाला समजेल, ती चेहेऱ्याची भाषा. चार्ली चॅप्लिन यांना ती भाषा उत्कृष्टपणे अवगत होती. चार्ली चॅप्लिन यांना तर संवादामुळे चित्रपटाची सर्व गंमतच निघून जाईल, अशी भीती वाटायची. ट्रम्प हा तर वैश्विक भाषेचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर.

आनंद

आनंद

“मुरारीलाल!” अशी वैश्विक हाक ‘आनंद’ सिनेमात ऐकायला येते. अनोळखी माणसाच्या पाठीवर मागून थाप मारणाऱ्या आनंदला हाकेला “अरे जयचंद ! ” असा त्याच्याच सारखा भन्नाट प्रतिसाद अवलिया इसाभाई ( जॉनी वॉकर) देतात. बोलक्या आनंदला त्याच्या सारखाच कलंदर खिलाडूवृत्तीचा मित्र गवसतो. अशी दिलखुलास हाक हल्लीच्या जगात कोण देत ? आणि त्या हाकेला प्रतिसाद देणारे बहारदार लोकं तरी कुठे सापडतात ?

कारण आपला मेंदू होमोसेपिअन्सच्या मार्गदर्शनाखाली विकसित झाला असला तरी मन बहुदा निॲण्डरथलच्या प्रमाणे होत चालले असावे, अशी शंका निर्माण होते.

पण येते अशीच हाक ‘लंचबॉक्स’ या चित्रपटात ऐकायला मिळते. ‘गर्दीतला एकटा’ साजन फर्नांडिस आणि घुसमटलेली इला याचं चिठ्यातून व्यक्त होणं, हे सोशल मीडियाच्या जगात हास्यास्पद वाटू शकले असते. पण व्यक्त होण्याची त्यांची प्रखर उर्मी आपल्यापर्यंत तितक्याच आत्मीयतेने पोहचते. त्यालाही कारण आहे. मनमोकळं करण्याची कुठलीच घाईगडबड तिथे दिसत नाही. त्यातील

लंचबॉक्स

लंचबॉक्स

मोकळे होण्याची प्रक्रिया ही प्रगल्भ आहे. इला एकदा आलेली चिठ्ठी वाचण्याच्या आधी घरातील काम उरकून घेते. स्वतःसाठी छानपैकी चहा बनवते. खुर्चीत आरामात बसून, चहाचा एक एक घोट मस्तपैकी पित चिठ्ठी वाचते. कोणतीच घाईगडबड न करता दुसऱ्याला समजून घेण्यासाठी योग्य वेळ द्यावी लागते. स्वतःच्या फुरसतीने जरी असली, तरी दुसऱ्याला समजून घेण्यासाठी आधी स्वतः स्वस्थ असावे लागते.

सध्या इमोजीची भाषा विकसित झाली आहे. झाला आनंद, द्या आनंदी स्मायली. दुःख झाले, द्या रडकी इमोजी ..  अशा इमोजी भाषेतून व्यक्त होणं, म्हणजे आपला निॲण्डरथलच्या वाटेवरचा प्रवास सुरू झाला आहे, याची खूण आहे.

कॉलेजच्या मित्रांशी संपर्क साधण्यासाठी तयार केलेल्या एका टेक्नॉलॉजीने महास्वरूप घेतलं आहे. सोशल मीडियाचा हा भस्मासूर जवळची नाती गिळंकृत करत सुटला आहे. आभासी जगात रमणारा माणूस तितकाच आभासी व्यक्त होत असतो. ज्या भावना व्यक्त करून मनाला निरोगी ठेवायचे असतं, त्या भावना कधी व्यक्तचं करता येत नाही. वरवरची मलमपट्टी आपल्याला निॲण्डरथलच्या दिशेने नेते. त्यामुळे एकाकीपणा वाढत चालला आहे. मानसशास्त्रज्ञांना बोला, मोकळं व्हा ! असे सतत सांगावे लागत आहे.

ओ. हेन्रीची एक कथा आहे. एका माणसाचा एक शत्रू असतो. त्या माणसाचे आयुष्यातील ध्येय एकच असते की आपल्या या शत्रूला संपवायचे. तो शत्रू एका अनोळखी गावात राहायला जातो. त्याच्या मागावर हा ही लगेच त्या गावात दाखल होतो. तो सतत एक धारदार चाकू स्वतःजवळ बाळगून असतो. संधी मिळताच शत्रूचा खातमा करायचा. असे खूप दिवस जातात. शत्रू काही नजरेस पडत नाही. परक्या गावात हा माणूस एकाकी पडतो. त्यामुळे रागात अजून भर पडते. एक दिवस तो शत्रू समोरून येताना दिसतो. त्याला बघताच हा माणूस पळत आपल्या शत्रूला गाठतो आणि मिठी मारतो. शत्रू प्रचंड गोंधळात पडतो. तो माणूस म्हणतो,” या गावात मला कोणी ओळखत नाही. फक्त तूच मला ओळखतो. खरं तर तू माझा शत्रू पण मी तुझ्याशी बोलू शकतो.’

माणूस हा निसर्गतः दुबळा प्राणी आहे. मनुष्याला आपल्या अस्तित्वाची पुष्टी इतरांच्या सानिध्यात मिळत असते. त्यामुळे बोलणं, व्यक्त होणं ही मानवाची जीवनावश्यक गरज झाली आहे.

मनाला निॲण्डरथल होणं परवडणार नाहीये. म्हणून मोकळं व्हा. जगणं तगवणाऱ्या या उर्मीना मोकळा श्वास घेऊ द्या. मनाची ‘स्वस्थ बसे तोचि फसे’ ही अवस्था होऊ देऊ नका.

निर्जन बेटावरचा एकाकी चक हा विल्सनमुळे तगला आणि त्याने त्या बेटावरून सुटकाही करून घेतली..

आपण माणसांच्यात जगत आहोत. ‘मुरारीलाल !’ अशी हाक मारल्यावर एखादा इसाभाई आपल्या हाकेला ‘ओ’ देऊ शकतो. किंवा अशी हाक आपल्याला ऐकू आली तर आपण ही ‘जयचंद’ म्हणून ‘ओ’ देऊ शकतो..

आपल्या सोबत्यांशी संवाद साधून आपण जीवनातल्या अडथळ्यांवर मात करू शकतो, हे आदिमानवाला चांगलंच उमजलं होतं.

त्यामुळे घाबरू नका, आपण होमोसेपिअन्सचे वारसदार आहोत…. 

देवयानी पेठकर, या शॉर्टफिल्म लेखिका व दिग्दर्शिका आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0