देशोधडी : उपऱ्या विश्वातील निरंतर संघर्षाचे वास्तव कथन

देशोधडी : उपऱ्या विश्वातील निरंतर संघर्षाचे वास्तव कथन

नाथपंथी डवरी गोसावी या भटक्या जमातसमूहात जन्माला येऊन देशोधडीचे अनुभवत घेत प्राध्यापक होण्यापर्यंतचा नारायण भोसले यांचा जीवन प्रवास या पुस्तकात आहे. नाथपंथी डवरी गोसावी जमातीच्या पूर्वापार चालत आलेल्या विदारक कष्टप्रद जीवनाचे चरित्र त्यातून उलगडते. लेखकाने आपल्या आयुष्याच्या विविध टप्प्यांविषयी कथन करत असताना जीवनाला आहे त्या स्वरूपात समजून घेण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो.

कोविड-१९ निर्बंधः विविध बाबींचे स्पष्टीकरण
प्रताप भानू मेहता यांचा अशोक विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा राजीनामा
झुबैर अटक प्रकरणः तक्रारदाराचे ट्विटर अकाउंट गायब

युरोपात प्रबोधन काळापासून आत्मकथनात्मक लेखनाला विशेष महत्त्व आणि वेगळे संदर्भ प्राप्त झाले. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून मराठीमध्येही आत्मकथने लिहिली गेली. साठोत्तरी काळात असे लेखन हे ‘स्व’ पलीकडे जाऊन समष्टीच्या जीवनानुभवाला व्यक्त करणारे राहिले. अशा आत्मकथनांनी आधुनिक काळातील साहित्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अलीकडे मात्र यशोगाथा सांगणारे आणि जीवनानुभवाला बाजरकेंद्री स्वरुपात सादर करणारे लेखन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. परिणामी वाचकांमध्ये आत्मकथनपर लेखन वाचण्याबाबत काहीसा अनुत्साह वाढला. शिवाय त्यामुळेच असे लेखन  गांभीर्याने घ्यावे असे वाटत नाही. आत्मकथनपर लेखनाला असे काही समकालीन संदर्भ असतानादेखील मराठीमध्ये काही चांगले आत्मचरित्रात्मक लेखन प्रसिद्ध होत आहे, ही बाब आत्मकथनांच्या परंपरेत महत्त्वाची आहे. त्या दृष्टीने डॉ. नारायण भोसले यांच्या त्रिखंडात्मक आत्मकथनातील  ‘देशोधडी : आडं, मेडी, बारा खुट्याची’ हा पहिला भाग लक्षवेधी आहे. मराठीमध्ये आजवर भटक्या-विमुक्त जमातीतील अनेक महत्त्वपूर्ण आत्मकथने प्रसिद्ध झालेली आहेत. त्या पार्श्वभूमीवर नाथपंथी डवरी गोसावी जमातीतून आलेल्या नारायण भोसले यांचे हे आत्मकथन लेखन अनेक संदर्भांनी वैशिष्ट्यपूर्ण आहे.

डॉ. नारायण भोसले हे मुंबई विद्यापीठातील इतिहास विभागात सहायक प्राध्यापक पदावर कार्यरत आहेत. जातवर्गलिंगभाव दृष्टीकोनातून इतिहासाचे लेखन करणारे ते अभ्यासक आहेत. त्यांची आजवर अनेक संशोधनपर पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यामध्ये ‘डॉ. आंबेडकर आणि अब्राह्मणी इतिहासमीमांसा’, ‘महाराष्ट्रातील स्त्रीविषयक सुधारणावादाचे सत्ताकारण’, ‘भटक्या-विमुक्तांची ‘पितृसत्ताक जातपंचायत : परंपरा आणि संघर्ष’ , उठ मर्दा तोड ही चाकोरी’, breaking Free, ‘जातवर्गलिंगभाव इतिहासमीमांसा’, ‘अब्राह्मणी स्त्रीवाद’, विमुक्त प्रबोधन’, डॉ. आंबेडकरांनी केलेली इतिहासमीमांसा’, ‘वाचा एक तरी चरित्र – आत्मचरित्र’, अविस्मरणीय चरित्र -आत्मचरित्रे’, ‘विमुक्तांचे स्वातंत्र्य’, ‘महाराष्ट्रातील भटके विमुक्त : सद्यस्थिती आणि आव्हाने’ या महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासाचे बंध उकलणाऱ्या महत्त्वाच्या पुस्तकांचे लेखन व संपादन त्यांनी केले आहे. अनेक पुरोगामी संस्था आणि संघटनांचे ते सक्रीय कार्यकर्ते आहेत. आजवरच्या संशोधनपूर्ण आणि चिकित्सक लेखनामुळे नारायण भोसले यांचे आत्मकथन वाचनीय बनले आहे. त्यामध्ये जीवनाकडे बघण्याचा चिकित्सक दृष्टीकोन आहे. तसेच घटना-प्रसंग आणि व्यक्ती वर्तनाचे संदर्भांसहित आकलन करण्याची अन्वयार्थक दृष्टीसुद्धा आहे. सामाजिक दस्तऐवज म्हणून या लेखनाला दर्जा आहे. व्यापक भानातून आलेले सामाजिक चिंतनसुद्धा त्यातून व्यक्त होते. एका व्यक्तीच्या जीवनप्रवासाच्या निमित्ताने भटक्या जमातीचे आणि तिच्याशी व्यवहार करणाऱ्या ग्रामीण आणि नागरी समुदायाचे चरित्रही त्यातून उलगडत जाते. सामाजिक संरचनेत व्यक्तीच्या अस्तित्वाला मिळणारा आकार आणि ओळख  यांसह त्याच्याशी जखडल्या जाणारे त्याचे जीवनसंदर्भ या लेखनातून प्रकर्षाने पुढे येतात.

आपण ज्या सामाजिक स्थानावर असतो, त्या ठिकाणावरून आपण जगाचे आणि स्वत:चे आकलन करीत असतो. आपल्या अनुभवाला आपल्या सामाजिक स्थानाचे संदर्भ असतात. त्यामुळे बरेचदा आपल्याला होणारे आकलन मर्यादित असते. अशावेळी विविध सामाजिक स्थानांवरून व्यक्त होणारी शब्दरूपे जगण्याला अधिक सर्वसमावेशक पद्धतीने समजून घेण्यास महत्त्वाची ठरतात. देशोधडीतील जीवनानुभव वाचकांसाठी यादृष्टीने वाचनीय ठरतात.

नारायण भोसले

नारायण भोसले

नाथपंथी डवरी गोसावी या भटक्या जमातसमूहात जन्माला येऊन देशोधडीचे अनुभवत घेत प्राध्यापक होण्यापर्यंतचा नारायण भोसले यांचा जीवन प्रवास या पुस्तकात आहे. नाथपंथी डवरी गोसावी जमातीच्या पूर्वापार चालत आलेल्या विदारक कष्टप्रद जीवनाचे चरित्र त्यातून उलगडते. लेखकाने आपल्या आयुष्याच्या विविध टप्प्यांविषयी कथन करत असताना जीवनाला आहे त्या स्वरूपात समजून घेण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो.

लेखक स्वत: इतिहासाचे अभ्यासक आहेत. तसेच परिवर्तनवादी विचारप्रवाहांशीदेखील निगडीत आहेत. त्यातून आलेल्या व्यवस्थात्मक पातळीवरील सुस्पष्टतेतून ते स्वत:कडे, कुटुंबियांकडे, नातलगांकडे आणि जातिबद्ध समाजाकडे; त्यातील वर्गीय आणि पितृसत्ताक अंतर्विरोधाकडे अधिक चिकित्सकपणे पाहतात. त्यामुळे स्वत:विषयी अतिभावुकता जपण्याचा जो धोका आत्मकथनात्मक लेखनात असतो, तो या आत्मकथनात  टळला आहे. नारायण भोसले यांनी आपल्या लेखनात माणसाचे वर्तन घडवणाऱ्या पर्यावरणाचा तर्कसंगत आणि सहृदय शोध घेतला आहे. त्यामुळे त्यातील कथन कृत्रिम जाणवत नाही. त्यातील गांभीर्य आणि संवेदन थेट भिडते.

बरेचदा आत्मकथनात्मक लेखनामध्ये स्वत:ला निर्दोष, निष्पाप, निरागस ठरवून इतरांना आणि परिस्थितीला दोषी किंवा खलनायक ठरवण्याचा प्रघात असतो. खरेतर व्यक्तीच्या दु:खाला काही व्यवस्थात्मक संदर्भ असले तरी व्यक्तीचे स्वत:चे वर्तन आणि भूमिकादेखील त्यास जबाबदार असतात. मात्र बरेचदा त्याकडे दुर्लक्षित केले जाते. लेखकाने मात्र असे न करता आपल्या लेखनात आत्मटीकेला अवकाश दिला आहे. परिणामी आत्मकथनात आपण आणि आपले कुटुंबीय, आपला समाज याविषयीचा एक वृथा अभिमान बाळगून त्यांचे नायकत्व प्रस्थापित करण्याचा अभिनिवेश बळावण्याची जी शक्यता असते, त्यापासून हे आत्मकथन कटाक्षाने अंतर बाळगते. म्हणूनच वडील आणि आई यांच्या वर्तनातील वैशिष्ट्ये, मर्यादा यांसह त्यांतील अंतर्विरोध बारकाईने लेखक नोंदवतात. विविध नात्यांमधील वाद दर्शवून त्यामागील कारणांना स्पष्ट करतात. तसेच विविध नात्यांमधील संघर्षामागे दडलेल्या घुसमटीचे संदर्भ दर्शवितात. आपल्या जमातीतील पुरुषांच्या दमन झालेल्या लैंगिकतेची होणारी अभिव्यक्ती दर्शवितात. त्यावर भाष्य करतात. जमातीत जाणवणारे इतर अनेक दोष दर्शवितात. जातपंचायतीची चर्चा करून त्यावर प्रखर लेखन करतात. जमातीच्या पुढाऱ्यांच्या चुकीच्या वर्तनाचा परामर्श घेतात. संघर्षात्मक परिस्थिती घडणारे मानवी वर्तन त्यातील प्रेम, वात्सल्य, द्वेष, इर्षा, मत्सर इत्यादींविषयी लेखकाने केलेले भाष्य मौलिक आहे. यादृष्टीने काही विधाने बघण्यासारखी आहेत. कौटुंबिक ताणतणावात पारुआक्काच्या सासरच्या व्यक्तींकडून घडणाऱ्या वर्तनाच्या निमित्ताने निरीक्षण मांडताना लेखक म्हणतात, हे भिक्षेकरी असलेले आमचे पै-पाहुणे बाबूच्या (जमातीबाहेरचा परका माणूस) कुत्र्याला सलाम ठोकून ‘साहेब’ म्हणतील आणि जमातीच्या साहेबाला मात्र ‘कुत्रा’ समजतील असे होते! भिक्षेत असताना कोणी त्रास दिला तर पळून जाणारी आमची जमात. पण जमातीच्या कोण्या व्यक्तीकडून साधी आगळीक झाली, तर जातपंचायत भरवून आकाश-पाताळ एक करतील!(पृ.क्र. २८) तर याच संदर्भात जातपंचायतीच्या व जमातीच्या नियमांच्या निमित्ताने लेखक म्हणतात,“परित्यक्ता आयाव स्त्रीला आमच्या जातपंचायतीनुसार दुसरा विवाह करण्यास मनाई असे; पण ही मनाई पुरुषांना मात्र नव्हती.” ((पृ.क्र. २८) अशा अनेक विधानांमधून  मांडलेली मते महत्त्वाची आहेत.

गत आयुष्याकडे बघताना लेखकाची स्थिती काही प्रसंगी हळवी असली तरी त्यामुळे त्यातून तर्क हरवत नाही, हे विशेष. कार्यकारणभावाचे सूत्र कधी सुटत नाही. त्यामुळे बहुपदरी वास्तवाचे चित्रण लेखक परिणामकारकतेने करतो.

भटक्या जमातींचा जीवन प्रवास हा पूर्वापार तुटलेपण अनुभवणारा आणि संघर्षमय राहिलेला आहे. भिक्षेसाठी विविध पद्धतींचा अवलंब करताना त्यांवर घातक प्रसंग ओढवले  जातात.  सतत भटकेपणा वाटेला आल्याने विविध प्रदेशात वावरताना कायमचे उपरेपण त्यांना तीव्रतेने जाणवते. अशावेळी स्थानिकांकडून होणारी मानहानी त्यांना सहन करावी लागते. जगण्यासाठी आत्मसन्मानाच्या मार्गांची अनुपलब्धता आणि जमातीचा व्यवसाय म्हणून पारंपरिक भिक्षेचा मार्ग अवलंब यांमुळे व्यवस्थेच्या पातळीवर याचकाची भूमिका त्यांना देण्यात येते. सतत अनोळखी प्रदेशात आणि असुरक्षित जागांवर राहताना हिंसेला त्यांना सामोरे जावे लागते. दहशत आणि कायमचे भेदरलेपण यांचे अनुभव ते घेत असतात. या सर्वातून मार्ग काढताना वाट्याला येणारे मानखंडनेचे अनुभव भयंकर असतात. त्याचे विदारक चित्रण लेखकाने केलेले आहे. त्यातील एखाद्या प्रसंगी जरी आपण स्वत:ला उभे करून बघितले तरी आपल्याला मरणयातनांचा अनुभव आल्यावाचून राहत नाही. आजोबांचे रेल्वे खाली चिरडले जाणे, रेल्वे प्रवासात तिकीटाअभावी टीसीकडून पत्नी, मुलांसमोर अवमानित होणे, दूरवरच्या प्रदेशात बाहेर रात्रीला थांबताना स्थानिक गुंड प्रवृत्तीच्या माणसांकडून जमातीतील स्त्रियांना सहन करावा लागणारा त्रास अशा अनेक बाबींची लेखकाने मांडणी केली असून, ती वाचकांमध्ये या अमानुषतेबद्दल चीड निर्माण करते. ज्यांना आपला प्रदेश, आपली जमीन आहे, अशांच्या सुख-दु:खांपेक्षा अनेक पटींनी वेगळे आणि हादरून सोडणारे प्रसंग यात लेखकाने मांडले आहेत.

जीवनातील संघर्षाचे, खिन्नतेचे, वैफल्याचे, पराभूत होण्याचे आणि अवमानित होण्याचे अनेक प्रसंग लेखकाने मांडले आहेत. भूक, दारिद्र्य, चिंता, भीती इत्यादींच्या निमित्ताने लेखकाने स्वगत स्वरूपात मांडलेले विचार वाचकांना अंतर्मुख करतात. त्यांना हेलावून सोडतात. पीडितांना पिडणाऱ्या पीडेचे अनेक अदृश्य संदर्भ लेखकाने यानिमित्ताने दृश्यमान केले आहेत. हे सर्व करीत असताना दु:ख उगाळण्याचा भाव खचितच नाही. परिस्थितीच्या अजस्त्र जबड्यात असतानाही जगण्याचा ध्यास बाळगणारी माणसे आणि त्यांचा जीवनसंघर्ष ही केवळ इतिहासकालीन बाब नसून विकासाच्या स्वप्नात हरवलेल्या वर्तमानाचे वास्तव आहे, हे आपणास पुस्तक वाचताना पानापानावर जाणवते.

नारायण भोसले यांचे हे आत्मकथन एकप्रकारे घडत्या वर्तमानाचे दस्तऐवजीकरण म्हणावे लागेल. त्यातील तपशीलवार मांडणी, समाज, संस्कृती, शिक्षण, प्रशासन, खान-पान पद्धती, वेशभूषा, इत्यादींबाबतची मांडणी वेधक आहे. त्यातून नाथपंथी डवरी गोसावी समाजाच्या वास्तवाचे एकप्रकारे दस्तऐवजीकरण झाले आहे. अशा विविध घटकांच्या निमित्ताने त्यांनी केलेले भाष्य भटक्या जमातींच्या संदर्भात ध्येयधोरणे ठरवताना विचार करावा, असेच आहे.

जातीय भेदभाव आणि पितृसत्ताक व्यवहाराविषयी लेखकाने नोंदवलेले अनुभव आणि निरीक्षणे  महत्त्वपूर्ण आहेत. खाजगी मालमत्तेच्या विकासक्रमात वा स्तरानुसार वर्तनात येणाऱ्या बदलांची सूक्ष्म निरीक्षणे लेखकाने मांडली आहेत. कुटुंबातील पितृसत्ता आणि सार्वजनिक जीवनातील पितृसत्ता यांचे संदर्भ पुढे करताना समाजातील असमान सत्तासंबंधाचे जाळे कसे विणल्या गेलेले आहे तसेच त्यातून घडणारे व्यवहार व्यक्तीला कसे दास्यत्व देतात, याची अनेक अनुभव रूपे लेखकाने मांडली आहेत. लेखकाने जातीय भेदभावाचे अनुभव मांडताना काही बाबींचा, काही प्रसंगांचा निर्देश केला आहे. मात्र त्यावर दीर्घ भाष्य करणे टाळले आहे. त्या तुलनेत भटके विरुद्ध स्थिर जीवन जगणारे समूह यांच्यातील भेदभाव हा अधिक प्रकर्षाने मांडले आहेत. विविध जातींमधील व्यक्तींकडून आलेल्या चांगल्या अनुभवांची मांडणी लेखकाने केली आहे.

खडतर जीवनप्रवासात विविध प्रसंगी भेटलेल्या व्यक्तींविषयी विधाने करताना लेखक वास्तवाची मांडणी करतात. तेव्हा त्यात द्वेष आणि नकारात्मक भाव नाही. विशिष्ट प्रसंगाविषयी, व्यक्तीविषयी सांगताना लेखकाने नोंदवलेली निष्कर्षांत्मक विधाने महत्त्वपूर्ण आहेत. अशावेळी चिंतनशिलतेतून येणाऱ्या ओळी, विधाने काही प्रसंगी सुभाषितांप्रमाणे जाणवतात. त्यातून भटक्या जमातीची अनुभूती व्यक्त होते. तसेच वेदनांचे अनेक संदर्भ अधोरेखित होतात.

उदा. :

१) “तसे भटके नसतातच कोणाचे. जिवंत असले तरी आणि मृत्यू पावले तरी. वाऱ्यासारखे शोधत राहतात अवकाश व्यापून टाकतात जागा दारिद्र्याची. स्वतःवर करत राहतात असले जीवन-मृत्यूचे प्रयोग. मरेपर्यंत फिरत राहतात. उभं-आडवं तिडवं. पाण्यासारखी कुठूनही वाट काढत राहतात. वाऱ्यासारखं उडत राहतात आणि उडवत राहतात उभं आयुष्य, गुलाल-खोबरं उधळावं तसं! कोणत्याही दिशेला तोंड करून चालत राहतात. वाफ होऊन उडून जातात ही भटकी बिऱ्हाडं. अन् बरसतात अवकाळी पावसाच्या सरीप्रमाणे या वस्तीवर, त्या खेड्यात… कधी उकीरंड्यावर, तर कधी कचऱ्यासारखं उडत राहतात वावटळीबरोबर.. कचरा बनून शहराशहरांत डंप होतात डंपिंग ग्राउंडमध्ये.” ( पृ.क्र. ३७)

२) “चांगल्या जागेवर आम्हाला कोण पाल रोऊन देते! भीतीच्या जागेतच आम्ही भीत-भीत राहतो. त्या परमुलखात खूप प्रकारची भीती वाटत होती. चोरांची भीती, गुंडांची भीती, विनयभंगाची भीती, हरवण्याची भीती, पोलिसांची भीती, पोलीस पाटलाची भीती, चोरीची भीती, भुताची भीती, हिंस्र प्राण्या-पशूंची भीती, साप-विंचवासारख्या कृमी-कीटकांची भीती, भुकेची | भीती, कोणीतरी रस्ता चुकण्याची, हरवण्याची भीती, कोणीतरी इथून उठवण्याची भीती, अनोळख्या अंधारात नैसर्गिक विधीसाठीची भीती.” ( पृ.क्र. ५३)

अशी अनेक विधाने या आत्मकथनामध्ये आहेत. एखादा विशिष्ट शब्द आणि त्याच्या निमित्ताने नोंदवलेला अनुभव यांतून निरीक्षणाची विलक्षण गतिशील मांडणी आढळून येते.

भटक्या अवस्थेत फिरताना स्थिर जीवन जगणाऱ्या ग्रामीण आणि नागरी समाजाकडून येणाऱ्या अनुभवांना लेखकाने दिलेली  शब्दरूपे अंतर्मुख करणारी  आहेत. आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडणारी आहेत. त्यातील काही विधाने अशी आहेत.

“अनोळखी माणसांवर कुत्र्यापेक्षा माणसेच जास्त भुंकतात !” (पृ.क्र.६३)

“गयावया करणारे उपरे जितके जास्त गयावया करत तितके जास्त ही गावकरी टारगट मुलं त्रास देत.”( पृ.क्र.६४)

“आमची कोणतीही वस्तू या व्यवस्थेला खटकतच होती ! नवं कापड, नवं भांड, नवं दावंही खटकत होतं !” (१८७)

अशा अनेक विधानांमुळे हे आत्मकथन अधिक परिणामकारक झालेले दिसून येते. त्यातील जीवनानुभव अधिक भिडणारा ठरतो.

या आत्मकथनाची रचनाही वैशिष्ट्यपूर्ण आहे. काय सांगायचे, किती सांगायचे आणि कसे सांगयचे याबाबतीतील सुस्पष्टता असल्यामुळे आत्मकथनाची रचना प्रवाही आहे. त्यातील घटनाप्रसंगांचा क्रम, त्यासाठी लेखकाने वापरलेली उपशीर्षे  वेधक आहेत. भाषादेखील प्रवाही आहे. जमातीच्या दररोजच्या बोलण्यात येणाऱ्या अनेक शब्दांचा प्रमाण लेखनात चपखल उपयोग लेखकाने केला आहे. मराठी भाषेची संपन्नता ही बोलीतील अशा शब्दांमुळे त्याच्या अर्थ छटांमुळे अधिक प्रकर्षाने जाणवते. काही ठिकाणी घटना-प्रसंगाची मांडणी करताना दिलेले उपशीर्ष आणि त्या अंतर्गत केलेली मांडणी उपशिर्षापलीकडे जाणारी ठरते. त्यामुळे वाचकाचा काही प्रसंगी निराशा होण्याची शक्यता आहे. मात्र आत्मकथनपर लेखनात असे घडते. कथनात अधून-मधून येणाऱ्या आज्जीच्या ओळी आणि विधाने मौलिक आहेत.

लेखकाने महाविद्यालयीन जीवनात परिवर्तनवादी विचारांच्या सानिध्यात स्वत:ची वैचारिक जडणघडण करण्यावर भर दिला. विवेकवादी भूमिकेतून स्वत:च्या आणि पर्यायाने समष्टीच्या जीवनाचा शोध घेतला. महाविद्यालयीन जीवनात शिक्षण घेताना, उदरनिर्वाहाची सोय करताना स्वत:च्या वैचारिक पोषणासाठी लेखक जागृत होते. त्यातूनच त्यांनी विविध ठिकाणी भटकंती केली. त्यातील काही मार्ग त्यांना निराश करणारे ठरले, तर काही मार्ग जीवनाला आकार देणारे ठरले. यामध्ये लेखक ‘छात्रभारती’ या विद्यार्थी संघटनेच्या सानिध्यात आले. तिथे समाजवादी विचारांशी त्यांचा परिचय झाला. पुढे महाविद्यालयीन जीवनात असताना कॉ. शरद पाटील आणि मार्क्सवाद-फुले-आंबेडकरवादी विचारप्रवाह यांच्या सानिध्यात आले. त्यातूनच ते प्रबोधन विचारांशी जुळले आणि प्रबोधन चळवळीत कायम टिकून राहिले. याविषयी लेखकाने मोजकी पण महत्त्वपूर्ण मांडणी केली आहे. आत्मकथने पुढे येण्यात चळवळीतून घडणारे आत्मभान महत्त्वाचे असते. नारायण भोसले यांच्या बाबतीत ही बाब महत्त्वाची ठरलेली जाणवते. मार्क्सवाद-फुले-आंबेडकरवादाची वैचारिक दृष्टी आणि प्रागतिक विचार-व्यवहार यांमुळे त्यांच्या आत्मकथनाची आशय अभिव्यक्ती निराळी जाणवते.

एकूणच परस्परांविषयी टोकाचे गैरसमज बाळगून खुनशीपणे वागणाऱ्या आणि आत्मकेंद्री जीवन जगणाऱ्या वर्तमान सामाजिक पर्यावरणात स्वत:सहित सभोवतालाला समजून घेण्यासाठी नारायण भोसले यांच्या त्रिखंडात्मक आत्मकथनाचा हा पहिला भाग अतिशय उपयुक्त आहे.  स्वत:वर अढळ विश्वास ठेवून निरंतर संघर्षरत राहून शिक्षणाचा मार्ग निवडून प्रयत्नवाद स्वीकारलेल्या व्यक्तीचे हे आत्मकथन विविध जाती आणि जमातींमधील गरीब कष्टकरी जीवनातून येणाऱ्यांना लढण्यासाठी बळ देणारे आणि आलेल्यांना स्वत:कडे व आपल्या माणसांकडे बघण्याची दृष्टी देणारे आहे.

(हा लेख सत्यशोधक प्रतिशब्दच्या फेब्रुवारी २०२२ च्या अंकात प्रसिद्ध झाला आहे.)

देशोधडी : आडं, मेडी, बारा खुट्याची
नारायण भोसले
मनोविकास प्रकाशन

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0