देवांगना कलिताचा जामीन फेटाळला

देवांगना कलिताचा जामीन फेटाळला

नवी दिल्ली : एनआरसी व नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात ‘पिंजरा तोड’ या चळवळीच्या माध्यमातून सरकारविरोधात निदर्शने करणार्या जेएनयूच्या विद्यार्थी देवांगना कलिता (३०) यांचा जामीन दिल्लीतील एका न्यायालयाने फेटाळला. देवांगना यांच्यावरचे आरोप यूएपीए अंतर्गत योग्य असल्याने त्यांचा जामीन नाकारत असल्याचे मत ऍडशिनल सेशन जज अमिताभ रावत यांनी व्यक्त केले.

देवांगना यांच्यावर अनेक गुन्हे असून त्यांच्यावर ईशान्य दिल्लीत दंगल भडकवल्याचा आरोप आहे. त्यांच्यावर यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असेच आरोप देवांगना यांच्या सहकारी नताशा नरवाल यांच्यावर आहेत आणि त्यांना जामीन नाकारताना न्यायालयाने असेच मत व्यक्त केले होते. या दोघींना फेब्रुवारी २०२०मध्ये दिल्ली दंगल कटकारस्थानाचा आरोप ठेवत अटक करण्यात आली होती. या दोघीही पिंजरा तोड या महिला अत्याचारविरोधी चळवळीतल्या कार्यकर्त्या आहेत.

न्यायालयाने देवांगना यांच्या जामीन अर्ज फेटाळताना असे स्पष्ट केले की, सीएए कायद्याचा विरोधाच्या आडून त्यांनी हिंसाचार उत्पन्न होईल असे आंदोलन केले, विरोध केला व त्याने दंगल घडून आली. त्यांचे वर्तन देशाच्या विरोधात होते. देवांगना यांच्या कटकारस्थानाची व्हीडिओ क्लिप नसणे हा महत्त्वाचा भाग नाही. कारस्थान गुप्तपणे रचली जातात, त्यामुळे अशा कट-कारस्थानांची व्हीडिओ क्लिप नसणे हे साहजिकच आहे. कलिता या प्रत्यक्ष दंगल झालेल्या ठिकाणी उपस्थित नसल्या तरी त्या कटात सामील नव्हत्या असे म्हणता येणार नाही, असे न्यायालयाने मत व्यक्त केले.

दिल्लीत दंगल व्हावी याचा कट डिसेंबर २०१९पासून सुरू झाला होता. तेव्हा रस्ते हेतूपुरस्सर बंद केले जात होते. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा रोखला जात होता. त्यामुळे फेब्रुवारी २०२०मध्ये दिल्लीत दंगल उफाळून आली. त्यामुळे देवांगना यांचे कृत्य ‘दहशतवादी कृत्यात’ समाविष्ट होते असे न्यायालयाने म्हटले.

नेमके प्रकरण काय?

गेल्या वर्षी २२ व २३ फेब्रुवारी रोजी जाफराबाद मेट्रो स्टेशनवर सीएएविरोधात निदर्शने झाली होती व रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात सुमारे ५०० आंदोलक उपस्थित होते. यातील बहुतांश आंदोलक महिला होत्या. त्यात देवांगना व नताशा उपस्थित होत्या.

जाफराबाद येथील या आंदोलनावरूनच भाजपचे नेते कपिल मिश्रा यांनी २३ फेब्रुवारी रोजी धार्मिक तेढ वाढवणारे वक्तव्य केले होते. जाफराबादमध्ये ठिय्या मारून बसलेले सीएएविरोधक तीन दिवसात येथून हटले नाही तर आम्ही या आंदोलकांकडे पाहून घेऊ असा इशारा त्यांनी दिल्ली पोलिसांना दिला होता आणि त्याच्या दुसर्या दिवशी ईशान्य दिल्लीत दंगल पेटली होती, ज्यात ५२ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता व शेकडो लोक जखमी झाले होते.

त्यानंतर मे महिन्यात दिल्ली पोलिसांनी देवांगना कलिता (३०) व नताशा नरवाल (३२) यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर आयपीसी कलम ३५३ लावले होते. या कलमात सरकारी कामात व्यत्यय आणणे व या कर्मचार्यांवर बळाचा प्रयोग करणे अशा तरतूदी होत्या.

नताशा नरवाल व देवांगना कलिता या जेएनयूच्या विद्यार्थीनी असून नताशा सेंटर फॉर हिस्टोरिकल स्टडीजमध्ये पीएचडी स्नातक असून देवांगना सेंटर फॉप वुमेन स्टडिजच्या एम.फील स्नातक आहेत.

या दोघी ‘पिंजरा तोड’ या सामाजिक चळवळीच्या संस्थापक सदस्य असून  त्यांनी २०१५मध्ये ही महिला संघटना स्थापन केली होती. जेएनयूमध्ये वसतीगृहात राहणार्या विद्यार्थ्यांवर सतत लावली जाणारी बंधने, स्त्री-पुरुष असा भेदभाव ठेवणारे कायदे-नियम व कर्फ्यू टाइमच्याविरोधात या संघटनेने आंदोलने केलेली आहेत.

मूळ बातमी

COMMENTS