केंद्रस्थानी देवेंद्रच!

केंद्रस्थानी देवेंद्रच!

इडी, पोलीस अशी भिती दाखवत एका बाजूला विरोधी पक्षांना नामोहरम केले आणि दुसऱ्या बाजूला पक्षातील विरोधकांची आणि ‘फडफड’ करणाऱ्यांची तिकिटे कापून तर काहींना उपकाराच्या ओझ्याखाली दाबून, देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रामध्ये आपली मांड पक्की केली आहे.

शिवसेना संसदेत विरोधी बाकांवर
पाकिस्तान चीनच्या ‘विषारी वायूं’मुळे हवेचे प्रदूषण: भाजप नेता
आपण इतके रक्तपिपासू का होतोय?

कोणताही मुख्यमंत्री आपले स्थान बळकट करण्याचा आणि विरोधकांना राजकीयदृष्ट्या संपविण्याचा प्रयत्न करीत असतो. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये यशवंतराव चव्हाण, शरद पवार यांना ही कला यशस्वीपणे साधली होती. गुजरातमध्ये नरेंद्र मोदी यांनीही हेच केले आणि आता तीच कला देवेंद्र फडणवीस यांना साधली आहे.

महाराष्ट्राच्या विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी, सर्व उमेदवाऱ्या जाहीर झाल्या असून  भाजप-सेना युती एकत्रपणे मित्रपक्षांना घेऊन महायुती म्हणून लढणार असून, त्याची एका संयुक्त पत्रकार परिषदेत घोषणा करण्यात आली. त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रामध्ये भाजप हाच मोठा पक्ष असल्याचे आणि आपण सर्व शक्तीमान असल्याचे दाखवून दिले. त्यांचे बोलणे आणि देहबोलीही तेच सांगत होती.

उद्धव ठाकरे यांनी ५० – ५० टक्क्यांचा फॉर्म्युला कितीही ताणला, तरी फडणवीस यांनी त्यांना १२४ जागांवरच गप्प बसायला लावल्याचे स्पष्ट झाले आहे. इतके दिवस शिवसेना स्वतःला मोठा भाऊ समजत होती. आज मात्र कोणी मोठा आणि छोटा भाऊ नाही, तर आम्ही भाऊ भाऊ आहोते, असे उद्धव ठाकरे याना म्हणायला फडणवीस यांनी भाग पडले आणि प्रत्यक्षात कमी जागा दिल्या. आदित्य ठाकरे या उद्धव यांच्या मुलाला उपमुख्यमंत्री पद देण्याबाबत शिवसेना नेते कितीही बाहेर वल्गना करीत असले, तरी त्याबाबत फडणवीस यांनी बोलायचे टाळले.

नाशिक, पुणे, नवी मुंबई अशा महत्त्वाच्या शहरांमध्ये शिवसेनेला एकही जागा देण्यात आलेली नाही आणि याबाबत शिवसेनेमध्ये कितीही धुसफूस असली तरी त्याचा निकाल उद्धव ठाके यांच्यावर सोडून, फडणवीस यांनी शिवसेनेचा वाघ १२४ गजांच्या पिंजऱ्यात बंद केला आहे. आता शिवसेना आपल्या जागा किती निवडून आणते, याच्यावर आदित्य ठाकरे यांना कोणते पद मिळणार हे ठरणार आहे.

गृह निर्माण मंत्री प्रकाश मेहता, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, उर्जामंत्री चंद्रकांत बावनकुळे आणि भाजपमधील ज्येष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचे आणि इतर १४ विद्यमान आमदारांची तिकिटे फडणवीस यांनी बिनदिक्कतपणे कापली आहेत.

आपण मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत आहोत आणि आपण कसे बहुजन समाजाचे आहोत, असे सतत सांगणाऱ्या एकनाथ खडसे यांचे भोसरी येथील, जमीन घोटाळा प्रकरण आधी काढण्यात आले, त्यांचे मंत्रीपद काढून घेण्यात आले आणि आता त्यांचे तिकीट कापण्यात आले आहे.

आपण किती ‘संघा’च्या जवळचे आहोत आणि ‘अभाविप’मधून आलो आहोत असे सतत सांगणाऱ्या विनोद तावडे यांनी भाजपची सत्ता आल्यानंतर आपणच कसे महत्त्वाचे मंत्री आहोत, हे दाखवण्याचा, पत्रकारपरिषदा घेण्याचा सपाटा लावला होता. त्यांचे ज्ञानेश्वर विद्यापीठाचे प्रकरण अचानक बाहेर आले आणि तावडे शांत झाले. आता त्यांना थेट घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

प्रकाश मेहता यांच्यामुळे मुख्यमंत्री दोनदा अडचणीमध्ये आले होते. एकदा सावित्री नदीवरील पूल वाहून गेला तेंव्हा मेहता यांचे वक्तव्य आणि कृती सरकारला भोवली होती. त्यानंतर मुंबईतील एका विकसनाच्या संदर्भात मेहता यांच्यामुळे मुख्यमंत्री अडचणीत आले होते. मेहता हे गुजराती मतदारांचे लाडके आणि भाजपच्या वरिष्ठांच्या मर्जीतील आहेत. त्यांच्या मतदारसंघामध्ये पराग शहा यांना उमेदवारी देऊन मुख्यमंत्र्यांनी मेहता यांना घरी बसवले आणि वरिष्ठांनाही इशारा दिला.

बावनकुळे यांनाही शेवटपर्यंत हवेवर ठेवण्यात आले आणि शेवटी त्यांनाही घरी बसविण्यात आले. त्यांना पक्षात जबाबदाऱ्या देणार का, हेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले नाही.

तावडे, बावनकुळे, हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जवळचे मानले जातात आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे, ही गडकरी यांची इच्छा लपून राहिलेली नाही. आजच्या या तिकीट कापाकापितून फडणवीस यांनी अनेकांना इशारे आणि काटशह दिले.

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची अवस्था ना घर का घाटका अशी फडणवीस यांनीच केली आहे. ना त्यांना पक्षात घेत आणि ना त्यांना दुसरीकडे जाऊ देत. त्यांच्या मुलाला नितेश राणे यांना कणकवली इथे तिकीट देण्यात आले आहे, पण तिथे शिवसेनेचे आव्हान उभे ठेवण्यात आले आहे.

स्वतःच स्वतःला मुख्यमंत्री पदासाठी पुढे आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या पंकजा मुंडे यांचे चिक्कीचे प्रकरण अचानक पुढे आले आणि त्या केवळ परळीपुरत्याच मर्यादित करण्यात आल्या असून, आता त्यांना भगवानगडाच्या राजकारणात अडकवून ठेवण्यात आले आहे.

चंद्रकांत पाटील, हे पक्षाचे प्रदेश अध्यक्ष असले, तरी सर्वकाही मुख्यमंत्रीच ठरवतात, हे आता उघड झाले आहे. स्वतः पाटील यांची उमेदवारी सुद्धा फडणवीस यांच्या दयेवरच अवलंबून होती. पाटील हे अमित शहा यांच्या जवळचे मानले जात असले, तरी पाटील स्वतः कुठूनही निवडून येऊ शकत नाहीत, त्यामुळे त्यांना सुरक्षित मतदारसंघ देऊन फडणवीस यांनी उपकाराचा हात कायम ठेवला आहे आणि जास्त पुढे जाऊ नका, असा संदेशही दिला आहे. फडणवीस यांना माहित आहे, की तिकीट कापल्या गेलेल्या मेधा कुलकर्णी काहीच करणार नाहीत.

छगन भुजबळ, रमेश थोरात यांची प्रकरणे काढून अजित पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांना संदेश देण्यात आला. राज्य सहकारी बँक प्रकरण पुढे आले. सिंचन घोटाळ्याची टांगती तलवार कायम ठेवली. अनेक फाईल तयार करण्यात आल्या आणि त्यातून पक्षांतरे घडविण्यात आली. त्या सगळ्यांना तिकिटे देऊन फडणवीस यांनी आपले स्थान पक्के केले आहे. त्यात मराठा आरक्षणाचे कार्ड हा महत्त्वाचा पत्ता आहे.

पत्ते सरळ पडत असतानाही, भाजपच्या वरिष्ठांनी उगाचच शरद पवार यांचे नाव ‘इडी’ प्रकरणात आणले आणि फडणवीस यांना इशारा देऊन अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. पवार यांनी महाराष्ट्रामध्ये सहानुभूतीची लाट निर्माण केली आणि भाजप मागे केली. पण अजित पवार यांनी राजीनामा देऊन, सगळे मुसळ केरात घातले.

संघाच्या जवळचे असणाऱ्या फडणवीस यांनी हिंदुत्त्वाचा हवा तेवढा आधार घेतला. कोणतीही आकडेवारी न देता विकासाचा डोलारा दाखविण्यात ते यशस्वी ठरले. लोकांनी कितीही टीका केली, तरी पत्नी अमृताच्या सर्व कृतींचा एका वर्गाची मते मिळविण्यासाठी त्यांना फायदाच होऊ शकतो, म्हणून त्यांनी त्याचाही उत्तम उपयोग करून घेतला असून, एक तरुण आणि उदारमतवादी मुख्यमंत्री म्हणून प्रतिमा ठसविण्यात ते यशस्वी झाले आहेत.

एक चालकानुवर्ती आणि पक्षातील एकमेव नेता असे संघाची परंपरा सांगणारे, नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणेच आपले स्थान महाराष्ट्रात निर्माण करण्यात फडणवीस यशस्वी झाले आहेत. राज्यात फक्त मी आहे आणि बाकीच्यांनी फक्त सहाय्यकाची भूमिका करावी, असा त्यांचा उघड संदेश आहे. आजतरी पक्षापेक्षा देवेंद्र फडणवीस हेच महत्त्वाचे झाले आहेत. देशामध्ये भाजप म्हणजे नरेंद्र मोदीच, तसे महाराष्ट्रामध्ये भाजप म्हणजे देवेंद्र फडणवीस अशी आज स्थिती झाली आहे.

शिवसेना आणि भाजप युतीमध्ये असूनही एकमेकांना निवडणुकीमध्ये शह देण्यात दोन्ही पक्ष किती यशस्वी होतात, यावर पुढचे राजकारण ठरणार असले, तरी आज मात्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात आपणच वाघ असल्याचे दाखवून दिले आहे.

……………

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: