धुळ्याचे पक्षी नंदनवन – नकाणे तलाव

धुळ्याचे पक्षी नंदनवन – नकाणे तलाव

नकाणे तलावाचे बांधकाम तसे पार १७ व्या शतकामधले. इंग्रजांनी शहराला पाणीपुरवठा होण्यासाठी तो बांधला. पक्षी निरीक्षणाच्या दृष्टीने पाहायला गेलात तर नकाणेसारखे समृद्ध ठिकाण तुम्हाला मिळणार नाही.  

चिगा (सुगरण)
गुपित महाधनेशाचे
स्वर्गीय नर्तकाच्या पिल्लांचे पुनर्वसन

इंग्रजांच्या काळात बांधलेला हा तलाव पक्षी निरीक्षणाची सुयोग्य संधी उपलब्ध करून देतो. पाणथळ,गवताळ प्रदेश आणि निमसदाहरित वन ह्या तीनही अधिवसांच दुर्मिळ मेळ ह्या एकाच ठिकाणी पाहायला मिळतो. ह्यापैकीच काही दुर्मिळ पक्षी नोंदींचा लेखाजोखा लेखात मांडला जाणार आहे.

स्वर्गीय नर्तक.

स्वर्गीय नर्तक.

पहाटेची कोवळी सूर्यकिरण खिडकीच्या फटीतून माझ्या डोळ्यावर पडली. सूर्य उगवला होता.आज धुकं रोजच्या मानाने कमी होत. आईने बनवलेला चहा चटकन घेतला. झटक्यात तोंडावर पाणी मारून, दुर्बीण आणि कॅमेरा उचलला, गाडीला टाच मारली व धुळे शहराच्या ७ किमी अंतरावर असलेल्या नकाणे तलावाकडे कूच केली.

नकाणे तलावाचे बांधकाम तसे पार १७ व्या शतकामधले. इंग्रजांनी शहराला पाणीपुरवठा होण्यासाठी तो बांधला. पक्षी निरीक्षणाच्या दृष्टीने पाहायला गेलात तर नकाणेसारखे समृद्ध ठिकाण तुम्हाला मिळणार नाही. त्याचे कारण म्हणजे ही जागा फक्त एकाच प्रकारचे पक्षी अधिवास पुरवत नाही तर ३ अधिवासांचा दुर्मिळ मेळ ह्या ठिकाणी आढळतो.

१. मोठा विस्तीर्ण जलाशयाला बदक आणि पाणपक्षांच्या विविध जातींना आकर्षित करतो.

२. तलावाला लागून असलेल्या माळरानावर, गवताळ प्रदेशातील व कोरड्या खुरट्या वनातील पक्षी आढळतात.

३. धरणाच्या खालच्या सखल भागात निम्न सदाहरित वनातील वृक्षांचा दाट पट्टा आहे. ज्यात जांभूळ, केवडा, चिंच, आंबा, कौंट अशी अनेक जुनी जाणती झाड आहे. ज्यामुळे तेथे वनातील पक्षीही सहज दिसून येतात.

सुगरण.

सुगरण.

तेव्हा तलावावर पोहचताच सुरवातीला पाण गवताचा पट्टा लागतो. हा अधिवास एका महत्त्वाच्या आणि दुर्मिळ अशा बगळ्यांच्या जातींना आश्रय देतो तो म्हणजे तापस (bittern). आता असे विचित्र नाव का पडले असावे? तर एखाद्या तपस्वी ऋषीप्रमाणे स्थिर उभे राहून हे निष्णातपणे शिकार करतात आणि स्वतःला सरकांड्यांमध्ये बेमालूमपणे लपवतात. नकाण्याला काळा तापस, पिवळा तापस, बदामी तापस असे ३ प्रकार मिळतात. तसेच फटकडी परिवारातील तपकिरी फटकडी वा ब्राऊन क्रॅक इथे मिळते. मुनियचे किंवा मनोलीचे ५ प्रकार मोठ्या संख्येने इथे दिसून येतात ज्यात साधी मुनिया, लाल मुनिया, खवलेवली मुनिया, काळ्या डोक्याची मुनिया, पंढया बुडाची मुनिया यांचा समावेश होतो. आपल्या सगळ्यांच्या परिचित सुगरणींचे शेकडोच्या संख्येने थवे सायंकाळी आसमंत गलबलून सोडतात.

थोडं पुढे गेल्यावर पंपिंग स्टेशनच्या आधी मत्स्यपालन केंद्राच्या छोट्या छोट्या आयताकारी जलाशयांकडे मी आपला मोर्चा वळवला. ह्या बाजूला दाट झाडी आहे त्यामुळे माशीमर उदा. स्वर्गीय नर्तक, नीलमणी, टिकेल्सचा निळा माशीमर, राखी डोक्याचा कॅनरी माशीमर तसेच सुतार पक्षी यांची रेलचेल सुरू होती. पाणी आणि मासे यांच्या मुबलकतेमुळे पाण कावळे, पाण कोंबड्या, छोटा व

लाल मुनिया.

लाल मुनिया.

पांढऱ्या छातीचा धिवर, ढोकरी आणि काही शिकारी पक्ष्यांचा परिसरात वावर आहे. मोठ्या चिंचेच्या झाडावर कायम बसलेली दिसणारी मधघार वा मधुबाज पाहायची तीव्र इच्छा मला आजच का होत होती देव जाणे. म्हणून मी थोड अंतर पार करून मोठ्या जलाशयांकडे गेलो आणि नियमाप्रमाणे एक मोठा शिकारी पक्षी चिंचेवरून उडाला. पण हा थोडा वेगळा होता. पोट पांढरे वाटले मानही थोडी आखूड रंग नेहमीपेक्षा जास्त राखाडी! क्षणांसाठी राखी डोक्याचा गरुड डोक्यावरून गेल्याचा भास झाला पण ताडोबा, आसामचे विस्तीर्ण काझीरंगाचे जलाशय अशा मोठ्या ठिकाणी मी त्याचे दर्शन घेतले होते आणि या आधीही कधी धुळ्यात त्याचे दर्शन नाही त्यामुळे मी स्वतःच हा विचार खोडला. दुसऱ्या झाडावर भांडणाऱ्या त्या २ पक्षांचे छायाचित्र टिपून मी पुढे निघून गेलो.

छोटी आर्ली.

छोटी आर्ली.

तलावाचा बांध पार करून जलाशयाच्या काठावर बदकांची मोठी रांग पहुडलेली होती. दुर्मिळ नयनसरी, शेंडी बदक, थापट्या, तलवार, चक्रांग, भिवाई बदक तसेच कपाळावर टिळा असलेला विठोबा, चांदेर वारकरी ही बदके त्यात होती. किनाऱ्याला लागून विस्तीर्ण मैदान आहे काही ठिकाणी छोटी शेतं आहेत. ह्या मैदानात तुरेबाज चंडोल, मुरारी, डोंबारी, रणगोजे, तिरचिमण्या, धोबी, तित्तर, लावरी हे पक्षी दिसून आले. मधेच अचानक बदकांचा थवा उडाला, गोंधळ झाला आकाशात घिरट्या घालणारी दलदली ससाण्यांची जोडी शिकारीला निघाली होती. झपकन पाण्यात सूर मारून नदी सुरय मासे पकडत होत्या तर पाणभिंगऱ्या कोवळ्या उन्हात सूर्यन्हान घेत होत्या. पलीकडच्या किनाऱ्यावर रोहित पक्षांचा छोटासा थवा पंखात माना खुपसून बसला होता. गुलाबी रंगाचा मनमोहक रोहित पक्ष्याला आपल्या प्रदेशात पाहणे मोठे नशीबच…

टिबुकली.

टिबुकली.

तलावाच्या विरुद्ध दिशेला असलेल्या पोल्ट्री फार्म भागाकडे सागाची, लिंबाची आणि खैराची झाले खूप आहे. त्यामुळे लाल पागोटे धारक मराठा सुतार, क्वचितच दिसणारा मुंगश्या, लाल आणि काळ्या डोक्याचे भारिट, पांढऱ्या पोटाचा गोमेट नजरेस पडले. जवळच्या एक बंद खोलीत रान मांजरीने ३ पिल्ले दिली होती जी मस्ती करत होती.

सूर्य डोईवर आला होता. मी आपलं बिर्हाड आवडलं. कॅमेरा बॅगेत टाकला. रस्त्याला लागतो न लागतो तोच समोरच्या टॉवरवर बसलेला अजस्त्र बोनेलिजचा गरुड दिसला. ह्या गरूडांची एक जोडी मागे मैदानात सशाची शिकार करताना पाहण्याचे भाग्य आमच्या मित्रांना लाभले होते. शेवटी पाहिलेल्या पक्ष्यांची एकूण संख्या मोजली. साधारणतः ७५च्या जवळपास जाती आज पाहायला मिळाल्या. तसे पूर्ण दिवसात नकाणे तुम्हाला १०० पेक्षाही जास्त पक्षांचे दर्शन घडवू शकतो. मग घरी जाऊन मी दिनचर्येला लागलो. दिवस गेले महिना गेला मी काढलेले फोटो पुन्हा पहिलेच नाही.

मोठा रोहित.

मोठा रोहित.

नोकरीतून मिळालेल्या अर्ध्या दिवसाच्या सुट्टीत काढलेले फोटो चाळत बसलो. त्या न ओळखू आलेल्या पक्षाच्या ओळखीची खात्री करण्याची उत्कंठा मनात जागरूक झाली. पुस्तकानुसार तो मत्स्य गरुड वाटत होता. पण मन मानत नव्हते. शेवटी तज्ज्ञांना तो पाठवला. निर्वाळा झाला तो मत्स्य गरुड होता पण अपूर्ण वाढ झालेला (किशोर)! मी ब्रिटिशकालीन नोंदी तपासल्या. खान्देश विभागातून ह्या पक्षाची नोंद १९१४ सालाची तीही विशिष्ट धुळे भागात नाहीच. जवळ जळगाव जिल्ह्यात नोंद आढळली. असच नकाणे कायम नवीन आणि दुर्मिळ पक्ष्यांच्या आदरातिथ्यासाठी सज्ज असते. पक्षी निरीक्षणासाठी बाहेर गावातून पक्षी निरीक्षक येथे येतात. नकाणे म्हणजे खरंच छोटा पॅकेट आणि बडा धमाका असा आहे. गरज आहे ती केवळ तुमच्या एकाग्र चित्त निरीक्षणाची !

परंतु इतर नैसर्गिक स्थळांप्रमाणेच नकाण्याच्या जैवविविधतेलाही घरघर लागली आहे. तलावाच्या सभोवताली होणारं अतिक्रमण, वाळूचा अतिउपसा, जवळील शेतात कीटकनाशकांचा वाढणारा

वापर, जवळील वैद्यकीय महाविद्यालयातून फेकला जाणार कचरा, झाडांची कत्तल आणि पर्यटनाच्या नावाखाली होणारी स्वच्छतेसाठीची जाळपोळ हे काही मुख्य आव्हान तलावाच्या अधिवासासमोर आहे. यावर उपाययोजना तशी कठीण नाही. पण त्यासाठी शासन, नागरी समाज आणि खाजगी संस्थांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे आवश्यक आहे. तरच हा निसर्गाचा अनमोल ठेवा आपण पुढच्या पिढीपर्यंत सुखरूप पोहचवू शकतो.

हिमांशू टेंभेकर  मेकॅनिकल इंजिनीयर असून निसर्ग अभ्यासक, पक्षीनिरीक्षक, छायाचित्रकार आहेत. धुळे जिल्हा आणि मुंबई हे त्यांचे अभ्यास क्षेत्र आहे. पर्यावरण दक्षता मंच मासिक तसेच प्रमुख वृत्तपत्रात लिखाणाचा त्यांना अनुभव आहे.

(लेखाचे छायाचित्र – छोटा धीवर ) NatureNotes

ही मालिका ‘नेचर कजर्वेशन फाउंडेशन‘ द्वारे राबवलेल्या ‘नेचर कम्युनिकेशन्स‘ या कार्यक्रमाचा भाग आहे. सर्व भारतीय भाषांतून निसर्गविषयक लेखनास प्रोत्साहन मिळावे हा या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. पक्षी आणि निसर्गाविषयी लिहिण्याची तुमची इच्छा असल्यास हा फॉर्म भरा.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: