डिव्हायडेड स्टेट्स ऑफ अमेरिका !

डिव्हायडेड स्टेट्स ऑफ अमेरिका !

अमेरिकी जनतेने डेमोक्रॅट जो बायडन-कमला हॅरीस यांच्या पारड्यात मत टाकले. पण, त्यांनी ट्रम्प यांना सपशेल घरी बसवले असेही घडलेले नाही. याचा एक अर्थ, आजची अमेरिका विस्फोटाच्या तोंडावर उभी आहे. समाजातला वाढत चाललेला दुभंग यापुढील काळात मोठे आव्हान ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांना पाठीशी घालणाऱ्या अर्ध्याहून अधिक अमेरिकी मतदारांच्या मानसिकतेचा वेध घेणारा हा लेख...

६ नोव्हेंबरला अमेरिकेतील उत्कंठावर्धक आणि नाट्यमय अध्यक्षीय निवडणुकीत उपाध्यक्ष जो बायडन जिंकले, असा निकाल जाहीर झाला, तेव्हा एकट्या अमेरिकेनेच नव्हे तर सगळ्या जगाने सुटकेचा नि:श्वास सोडला. हा उत्कंठावर्धक निकाल जाहीर झाला, तेव्हा लोकांना झालेला आनंद त्यांनी उत्स्फूर्तपणे व्यक्त केला. पण ह्या आनंदात जरी सुटकेचा नि:श्वास होता आणि भावनिक निचरा झाल्याची जाणीव होती, तरीही त्याला दु:ख आणि निराशेची किनार होती. त्याचे कारण, अमेरिकेतील सगळ्यात विभाजनवादी अध्यक्षांना अर्ध्यापेक्षा किंचित कमी संख्येने नागरिकांनी ( अंदाजे ७ कोटी ) मत दिले होते.

ट्रम्प यांच्या उद्धट स्वभाव, तसेच त्यांनी केलेला भ्रष्टाचार आणि त्यांचे क्रूर, बेमुर्वतखोर आणि निर्ढावलेले वर्तन सगळ्या जगाने पाहिले आहे. “ट्रम्प हे वर्णद्वेषी, असहिष्णू कट्टर जातीवादी  व्यक्ती आहेत”, असे त्यांच्याच रिपब्लिकन पार्टीचे नेते लिंडसी ग्रॅहम (Lindsey Graham) एकेकाळी म्हणाले होते. असे असले तरीही ट्रम्प यांना मत देणारा एक मोठा वर्ग अमेरिकेत आहे हे जगातील उदारमतवादी लोकांना गोंधळात टाकणारे कोडे आहे. हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडा इतिहास, काही घटना आणि त्यांचा असंख्य अमेरिकन नागरिकांवर झालेला परिणाम समजून घ्यावा लागेल. त्याचबरोबर उजव्यांनी केलेला अपप्रचार, पसरवलेल्या खोट्या बातम्याही समजून घ्याव्या लागतील. तसेच ट्रम्प यांनी हे सगळे कसे मोठ्या कौशल्याने गळी उतरवले आणि हेच वास्तव आहे असा विश्वास कसा निर्माण केला, हेही समजून घ्यावे लागेल.

उत्पादन व्यवस्थेचा नाश 

असे म्हटले जाते, की अमेरिकेत गेल्या दोन दशकात ७५ लक्ष (एक तृतीयांश) उत्पादन रोजगार (manufacturing jobs ) हे नाहीसे झालेले आहेत. याची महत्त्वाची कारणे म्हणजे, बेफाम यांत्रिकीकरण तसेच तंत्रज्ञानातील सुधारणांमुळे कमीत कमी कामगार वापरून जास्तीत जास्त उत्पादन होत राहणे. तसेच इतर देशातून विशेषतः चीन या देशाकडून वाढलेली आयात हेही महत्त्वाचे कारण आहेच. चीनमधून केली जाणारी आयात ही २००१ मध्ये चीनने जागतिक व्यापार संघटनेत (WTO) प्रवेश केल्यापासून पाचपटीने वाढली आहे. कमी किमतीच्या आयातीमुळे उर्वरित कामगारांच्या वेतनावर त्याचा ताण आला आहे आणि वाढलेला नफा मालकांकडे आणि उच्चाधिकाऱ्यांकडे गेला असल्याने वेतनात अधिकच विषमता आणि दरी निर्माण झाली आहे. यामुळे कामगार वर्गात निराशा तसेच प्रचंड संताप दिसून येतो आहे. विशेषतः ‘रस्ट बेल्ट’मध्ये (rust  belt – अमेरिकेचा मध्य पश्चिमी आणि ईशान्य भाग) जो एकेकाळी  औद्योगिकीकरणाचा उच्चांक गाठणारा, अमेरिकेतील औद्योगिकीकरणाचा आत्मा असणारा असा समृद्ध प्रदेश होता.

ही सगळी परिस्थिती बदलण्यास भविष्यातील रोजगार, व्यवसाय यांच्यात खूप मोठी गुंतवणूक करावी लागणार आहे. कामगारांना नवीन कौशल्याचे प्रशिक्षण द्यावे लागणार आहे. मुख्यतः वाढत्या खर्चाची उदाहरणार्थ, खर्चिक आरोग्य व्यवस्थेची गंभीर समस्या प्राधान्याने सोडवावी लागणार आहे. हा डेमोक्रॅटिक पक्षाने उचलून धरलेला एक मोठा मुद्दा आहे.

ट्रम्प यांनी मात्र याबाबत कामगारांची दिशाभूल केली आहे. ट्रम्प यांनी चीन, मेक्सिको आणि कॅनडा या देशांशी नवे व्यवहार आणि करार करून आपण पुन्हा अमेरिकेत कारखाने आणि उद्योगधंदे उभे करू, असे फसवे आश्वासन दिले होते. मात्र त्यासाठी लागणारी ठोस, कष्टदायक आणि दीर्घकालीन पावले उचलली नाहीत. त्यामुळे, परिस्थिती सुधारली तर नाहीच उलट चिघळली आहे. असे असले तरी, अनेकांना ट्रम्प यांच्या आश्वासनाने दिलासा मिळाला आणि ग्लोबलायझेशनच्या रेट्यातही स्थानिक उद्योग-धंद्यांना चालना मिळून जरा बरी स्थिती येईल, अशी आशा वाटू लागली. परिणामी, त्यांना ट्रम्प हे त्यांचे तारणहार वाटू लागले, याचे अजिबात आश्चर्य वाटायला नको. पेन्सिल्वेनिया, मिशिगन आणि विस्कॉन्सिन ह्या प्रदेशांचा कामगार वर्ग ट्रम्प यांच्याकडे वळल्यामुळेच ते २०१६ साली अध्यक्ष झाले हे खरे.

सामाजिकसांस्कृतिक उलटपालट

गर्भपाताचा अधिकार, तसेच समलिंगी नागरिकांचे ( LGBTQ) हक्क आणि अधिकार हे सामाजिक-सांस्कृतिक मुद्दे अमेरिकेत मतदानाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. विशेषतः एकाच मुद्द्यावर मतदान करणाऱ्या पुराणमतवादी मतदारांसाठी हे कळीचे मुद्दे होत. कारण आपल्या एका मुद्यावर झटणाऱ्या नेत्याच्या ते पाठीशी उभे राहतात. गर्भपात हा इव्हान्जेलिक आणि कॅथॉलिक त्यातही विशेषतः श्वेतवर्णीयांसाठी अहंकार गोंजारणारा विषय आहे. जरी ७५ टक्के अमेरिकन लोक गर्भपाताला अनुमती मिळावी, या मताचे आहेत, तसेच ६९ टक्के नागरिक जरी समलिंगी समूहांतल्या लोकांना हक्क मिळवा, या मताचे असले, तरी ट्रम्प ह्यांना गोरे इव्हान्जेलिकल (७८ टक्के ) आणि गोरे कॅथॉलिक (५४ टक्के) ह्या वर्गांमध्ये ठोस आधार मिळाला.

हे दोन वर्ग मिळून मतदारांचा ३० टक्के भाग असल्यामुळे त्यांचा निवडणुकीवर मोठाच प्रभाव असतो. महत्त्वाचे म्हणजे, आढ्यतेखोर ट्रम्प यांनीदेखील या वर्गाची मते पक्की करून घेतली आहेत. त्यांनी धूर्तपणे (आणि रिपब्लिकनांनी पूर्वी रेटलेला मुद्दा धुडकावून) कट्टर पुराणमतवादी एमी कोनी बॅरेट यांची सुप्रीम कोर्टात न्यायाधीशपदी नियुक्ती केली. बॅरेट गर्भपाताच्या विरुद्ध आहेत. अशा प्रसंगी, रो विरुद्ध वेड (Roe vs Wade) खटल्यात गर्भपाताला अनुमती देणारा  ऐतिहासिक निर्णय यापुढील काळात बदलण्यात त्यांचे मत निर्णायक ठरू शकते.

वंशवादाची पडछाया 

जातीय आणि वांशिक संबंधांवर अमेरिकेचा अस्वस्थ करणारा इतिहास आहे. जरी १५५ वर्षांपूर्वी गुलामगिरी नष्ट झाली असली आणि कृष्णवर्णीयांना सामाजिक हक्क मिळून तब्बल ५६ वर्षे झाली असली, तरी ही लढाई सोपी  नव्हती. गुलामगिरी नष्ट करण्यासाठी मोठे नागरी युद्ध अमेरिकेत झाले, ज्यात ७ लाख ५० हजार नागरिकांनी जीव गमावले. नागरिक हक्क कायदा रोखण्यासाठी पुराणमतवादी नेत्यांनी सिनेटमध्ये ५४ दिवस filibuster (अडवण्यासाठी न थांबता भाषणे करणे ) केला होता. हा झाला इतिहास परंतु, अमेरिकेच्या दक्षिण भागात, जे एकेकाळी काळ्यांचा गुलामीचे गड होते, तिथे अजूनही गुलामगिरीचा प्रभाव आणि त्यातून आलेली विषमता ठळकपणे दिसून येते. उदाहरणादाखल, मतदारांच्या ओळखपत्रांचे जाचक कायदे, मतदार पुनर्वितरण, मतदान केंद्र कमी करणे, गोऱ्या पोलिसांनी कृष्णवंशीयांवर अत्याचार करणे इत्यादि. असे सगळे अनैतिक मार्ग अवलंबिण्याचा हेतू कृष्णवर्णीयांना मतदान करणे दुरापास्त व्हावे किंवा त्यांच्यावर अन्याय होत राहावा, हाच असतो. इतर वेळीसुद्धा रिपब्लिकन नेते, गौरवर्णीयांशी अल्पसंख्यांकांविषयी विशिष्ट सांकेतिक भाषेत बोलतात, ती भाषा भेदभावाची असते. सामाजिक विषमतेला खतपाणी घालण्याचाच हा एक प्रकार असतो.

ट्रम्प मात्र अल्पसंख्याकांविषयी उघडपणे आणि निर्लज्जपणे आक्षेपार्ह वक्तव्ये करतात. ट्रम्प यांचे बोलणे ऐकून, या वर्णवर्चस्ववादी गोऱ्या लोकांना पुन्हा “वर्णवर्चस्वाचे सुवर्णदिन परत येतील” असे वाटत असते. मुख्यतः वर्चस्ववादी मानसिकता असलेला हाच वर्ग ट्रम्प यांच्या “MAGA” (Make America Great Again) या नाऱ्याला भुलला होता आणि त्यांनी तो नारा उचलून धरला होता. ह्या वर्गाने म्हणजे कॉलेजमध्ये न शिकलेल्या अर्धशिक्षित गौरवर्णीयांनी ट्रम्प यांना, २०२० मध्येसुद्धा ६५ टक्के इतके मत दिले आहे.

चॉम्स्की यांचे निदान

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भाषा अभ्यासक, तत्वज्ञ नोम चॉम्स्की यांनी यासंदर्भात अचूकपणे भाष्य केले आहे. ते म्हणतात ” ट्रम्प यांनी अमेरिकन समाजातील मूलभूत विषारी प्रवाह ओळखून त्याचा वापर राजकीय फायद्यासाठी अतिशय चाणाक्षपणे केला.” यातील दुर्दैवी भाग म्हणजे, अमेरिका हा आता असा एक देश झाला आहे, ज्याचा सर्वोच्च नेता अल्पसंख्यांकांविषयी विद्वेष पसरवतो आणि तरीही लोकप्रियतेचे शिखर गाठतो.

स्थलांतरि लॅटिन नागरिक 

साधारणपणे एक तृतीयांश लॅटिन (किंवा हिस्पॅनिक) मतदारांनी ट्रम्प यांना मते दिली असे मानले जात आहे. एकंदरीत मतदारांपैकी साधारणपणे १३ टक्के लॅटिन लोक आहेत. आता इतक्या मोठ्या संख्येने लॅटिन अमेरिकींनी ट्रम्प यांना मत दिलेच कसे, हा प्रश्न पडतो. कारण, याच ट्रम्प यांनी लॅटिन लोकांना विशेषत: स्थलांतरित मेक्सिकन लोकांना जाहीरपणे बलात्कारी म्हटले, तसेच मेक्सिको सीमेवरून येणाऱ्या स्थलांतरितांच्या मुलांचा त्यांच्या पालकांपासून वियोग घडवला.

अशा या विभाजनवादी मानसिकतेच्या ट्रम्प यांनी, प्रतिस्पर्धी उमेदवार असलेले बायडन हे समाजवादी आहेत, ते तुम्हाला धोका ठरतील, असे म्हटले आणि ते या लॅटिन लोकांना पटले. याचे कारण हे आहे की, समाजवादी म्हटले की लॅटिन लोकांसमोर प्रतिमा येते, ती क्युबाच्या फिडेल कॅस्ट्रो यांची किंवा व्हेनेझुएलाच्या शावेझ  (Chávez) यांची. हे लॅटिन लोक तिथल्या कडेकोट व्यवस्थेला विटून पळून आले आहेत. ट्रम्प यांनी इथे बरोबर नेम साधला. स्थलांतरीत लॅटिन लोकांनी ट्रम्प यांच्या बायडन यांच्याविषयी दिशाभूल करणाऱ्या वक्तव्यांना बळी पडून, ट्रम्प यांना पाठिंबा दिला. हाच वर्ग ट्रम्प यांना फ्लोरिडा ह्या निर्णायक राज्यात ( swing state)  विजय देऊन गेला.

शहरगावे यांच्यातील भेद 

अमेरिकेत गावातील किंवा खेड्यातील आणि शहरी भागातील लोक हे वेगवेगळ्या मुद्द्यांवरून मतदान करतात. गावातील किंवा खेड्यातील मतदार हा रिपब्लिकन पक्षाचा बालेकिल्ला आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. कारण, ते कुटुंब तसेच सामाजिक मुद्द्यांच्या बाबतीत निमशहरी किंवा शहरी भागातील मतदारांच्या मानाने पुराणमतवादी आहेत. ते स्वयंरोजगार मिळवणारे आणि आत्मनिर्भर आहेत. म्हणजेच ते सरकारी मदत किंवा सरकारकडून कसली अपेक्षा करणारे नाहीत. त्यांना बंदूक अधिकारावर (Gun Control) दृढ विश्वास आहे. शेताच्या संरक्षणासाठी तसेच शिकारीसाठी पारंपरिकरित्या ते बंदुका बाळगतात.

अशा वेळी कमीत कमी सरकारी हस्तक्षेप, कमीत कमी कर आणि स्वसंरक्षणासाठी शस्त्रे बाळगण्याचा अधिकार ही रिपब्लिकनांची भूमिका आणि संदेश त्या लोकांना भावतो. मात्र, या लोकांना पुरोगामी, बंदूक नियंत्रणाचा तसेच सार्वजनिक आरोग्य विम्याचा आग्रह धरणारी डेमोक्रॅटिक पक्षाची समावेशक भूमिका सांगायला आणि पटवायला फार अवघड जाते. आपण लक्षात पाहिजे की, अमेरिकेतली १९ टक्के (साधारणपणे ६ कोटी ३० लाख) जनता ही गावात किंवा खेड्यात राहते. इथली बहुसंख्य जनता ही श्वेतवर्णीय आहे आणि मुख्यतः रिपब्लिकन पार्टीला मत देणारी आहे. उमेदवार ट्रम्प यांच्यासारखा आहे, ही त्यांच्यासाठी दुय्यम बाब आहे.

पुराणमतवाद्यांची नारेबाजी

दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेतली टीव्ही आणि इतर माध्यमे फेडरल कम्युनिकेशन्स कमिशनच्या ( Federal Communications  Commission) समानतेच्या तत्त्वप्रणालीला (Fairness Doctrine ) मानत. त्यानुसार ते कोणत्याही पक्षाच्या बाजूने न बोलता तटस्थ भूमिका घेत असत. १९८७ मध्ये रेगन यांनी मात्र समानतेच्या  तत्त्वप्रणालीला नख लावले. यासाठी त्यांनी कारण हे सांगितले, की केबल तंत्रज्ञान आल्याने आता पूर्वीसारखी airtimeची टंचाई राहिली नाही. यामुळे मीडिया परिदृश्य पूर्णपणे रूपांतरित होऊन एकतर्फी चर्चा कार्यक्रम वाढू लागले. अर्थात, यामुळे रुपर्ट मरडॉक यांचे पुराणमतवाद्यांचे मुखपत्र म्हणून “फॉक्स” साम्राज्य येईल, अशी सुतराम शंका अमेरिकी जनतेला आली नव्हती. फॉक्स टीव्हीने सत्य, वस्तुनिष्ठता यावर भर न देता सरळसरळ पुराणमतवादी दृष्टीकोनातून मते-मतांतराचा “गलबला” सुरू केला. एका अर्थाने ते पुराणमतवाद्यांचे “echo chamber” बनले. प्रेक्षकांमध्ये तसेही पुराणमतवाद्यांचा भरणा होताच. हे प्रेक्षक एकांगी आणि अतिरेकी निवेदकांनी म्हणजेच अगदी शॉन हँनिटीपासून टकर कार्लसन यांनी दिलेल्या अतिरंजित माहितीवर, बातम्यांवर अंधपणे विश्वास ठेवू लागले. आज फॉक्स चॅनेलला  सगळ्यात जास्त प्राईम टाइम प्रेक्षक  आहेत आणि ट्रम्प ह्यांचा मताधार वाढविण्यात ती प्रमुख भागीदार आहेत, असे म्हणण्यात जराही अतिशयोक्ती नाही.

ट्रिकल डाउन प्रोपगंडा 

शेवटी, हे लक्षात घ्यायला हवे की अमेरिकेतील सुपर रिच वर्गातले अनेक प्रभावी लोक पुराणमतवादी आर्थिक विचारधारेला मानतात. या विचारधारेच्या नेत्यांना खुला पाठिंबा देतात. या विचारधारेत करांना कात्री लावणे, लागू असलेले निर्बंध मागे घेणे आणि अर्थकारणाच्या तथाकथित ‘ट्रिकल डाउन इफेक्ट’ची भलामण करणे, हे सगळे अनुस्यूत आहे. हे लोक, उदाहरणार्थ चार्ल्स कॉकसारख्या (कॉक इंडस्ट्रिजचे प्रमुख) व्यक्ती पुराणमतवादी नेत्यांना PACs (Political action committee) द्वारे जिंकण्यास सढळहस्ते मदत करतात. जनमत आणि सरकारी धोरण बदलण्यासाठी पुराणमतवादी दबावगटाला  (conservative think tanks) आर्थिक मदत करतात. अधोरेखित करण्याच्या मुद्दा हा आहे, की असे प्रतिष्ठित नागरिक हेच पुराणमतवादी लोक अमेरिकेत आर्थिक धोरणाचे पुरस्कर्ते, पाईक आणि “लाभार्थी” आहेत आणि ट्रम्पसारख्या आक्रमक नि आक्रस्ताळी नेत्यालासुद्धा ते पाठिंबा देतात.

अमेरिकेच्या आजवरच्या इतिहासात हे स्पष्टच झाले आहे की, समानतेवर आधारित न्यायी समाज व्यवस्थेचा पुरस्कार करणाऱ्या (New Deal), समान नागरी हक्क (Civil Rights ), गर्भपात हक्क, विमुक्तीकरण (desegregation ), स्थलांतरितांचे हक्क आदी कलमांना विरोध करून इथल्या पुराणमतवादी मंडळींनी अमेरिकी समाजाची कमकुवत प्रतिगामी म्हणता येईल, अशी बाजू उघडकीस आणली आहे.

याचसोबत, एका बाजूला उत्पादन क्षेत्रातील बेरोजगारी, युनियनमधील रोजागार जाणे, अन्यायी कर आकारणी आणि अतिश्रीमंत, उच्च्भ्रू वर्गाची वर्धिष्णू आर्थिक सुबत्ता यामुळे अमेरिकन समाजात आता प्रचंड असमतोल, आर्थिक विषमता आणि त्यामुळे तीव्र संतापही दिसू लागला आहे. चाणाक्ष ट्रम्प ह्यांनी हा संताप अचूक ओळखला आणि त्याला अमेरिकी समाजातल्या विद्वेषी मानसिकतेची जोड देऊन आपला अनुयायी मतदार वर्ग उभा केला. या वर्गाला पुराणमतवादी संस्थांनी पूर्णपणे मदत केली.

एवढे सगळे घडूनही, २०२०च्या अध्यक्षीय निवडणुकीत ट्रम्प पुन्हा निवडून येऊ शकले नाहीत. पुराणमतवादी, विभाजनवादी शक्तींचा तूर्तास पाडावा झाल्याचे सिद्ध झाले. जो बायडन ह्यांनी विजय मिळवून जगाला आशा दिली. शेवटी, विन्स्टन चर्चिल यांचे अमेरिकेबद्दलचे म्हणणे अगदी खरे ठरले. ते म्हणाले होते- “you can bank on America to do the right thing – after she has exhausted all other options”

अर्थात, बायडन यांनी खात्रीपूर्वक विजय मिळवल्यानंतरही अमेरिकेत दोन गट संघर्षात किंवा युद्धात असल्याचा भास होतो. असे वाटते आहे, की दोन कट्टर प्रवृत्तीच्या “गट किंवा कंपूमुळे” हा देश दुभंगला आहे. अशा प्रसंगी, अब्राहम लिंकन यांनी या देशाला दिलेल्या इशाऱ्याची आठवण करून द्यावीशी वाटते. ते म्हणाले होते – ” स्वतःहून दुभंगलेले घर कधीच उभे राहू शकत नाही” -A house divided against itself cannot stand.

याचा एक अर्थ, बायडन यांना आता अमेरिकारुपी या दुभंगलेल्या घराला पुन्हा जोडायचे प्रचंड मोठे काम यापुढील काळात करायचे आहे.

(अनुवादः गायत्री चंदावरकर)

(मुक्त-संवाद, १ डिसेंबर २०२० मधून साभार)

COMMENTS