चार भिंतीच्या आत दडलेला ‘विषाणू’

चार भिंतीच्या आत दडलेला ‘विषाणू’

'लॉकडाउन संपेपर्यंत माझ्या घराऐवजी दुसरीकडे कुठेतरी राहण्याची माझी सोय करा,' असा इ-मेल एका महिलेने राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांना

देशात कोरोनाचे ११४ रुग्ण
महंत नृत्यगोपाल दास कोरोनाबाधित
महाराष्ट्रासह देशभरात कोविड संसर्गामध्ये जोरदार वाढ

‘लॉकडाउन संपेपर्यंत माझ्या घराऐवजी दुसरीकडे कुठेतरी राहण्याची माझी सोय करा,’ असा इ-मेल एका महिलेने राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांना केला आणि लॉकडाऊनमधील सुखी कुटुंबाचे भारतीय वास्तव उघड झाले. ‘घरातल्या मारहाणीला मी  कंटाळले आहे. पोलिसांकडे तक्रार करूनही काही उपयोग नाही. कारण, पोलिसांनी नवऱ्याला पकडून नेलं, तरी सासरचे लोक माझावर अत्याचार करतीलच. त्यापेक्षा मीच घरात थांबत नाही…’, असं या तक्रारीत तिने म्हंटलं आहे.

खरंतर या अशा गोष्टी कोरोना येण्याच्या आधीही होत होत्याच. काही महिला घर सोडून जाण्याचा प्रयत्नही करत. माहेरी जाऊन राहत. पण कोरोनाच्या साथीमुळे काही महिलांना घरीच थांबून, नवऱ्याचा अत्याचार सक्तीने सोसावा लागतोय. जाणार तरी कुठे? तोंड दाबून बुक्क्यांचा मार!

असंच एक उदाहरण स्वातीचं. घरोघरची कामं करून दोन पैसे कमावणारी स्वाती. नवरा हॉटेलात कामाला. कोरोनामुळे या दोघांचंही काम बंद झालं आणि दोघांना घरी राहावं लागलं. काही दिवसांतच तिला नवऱ्याची मारहाण सुरु झाली. पूर्वीही तो कधीतरी हात उचलायचा. पण आता तर रोजच. रोजचा मार आणि शिवीगाळ. स्वातीचं जगणं असह्य झालंय. स्वतीच्याच शब्दात सांगायचे, तर ‘सरकारला काय जातंय म्हणायला, की लोक घरी बसून आनंदात चहा पितायेत. रामायण बघतायेत. कधीतरी माझ्या घरी येऊन बघा- रोजचं एक रामायण चालू असल्याचं दिसेल.

कोरोना आणि त्यामुळे सुरु झालेल्या लॉकडाउनच्या काळात वाढलेला महिलांवरील घरगुती हिंसाचार, याविषयी वाचायला, शोधायला सुरुवात केली आणि अस्वस्थता आणि विषण्णता हरेक पावलागणिक वाढत गेली. वेगवेगळे आर्थिक-सामाजिक स्तर, जगण्याच्या अत्यंत भिन्न रीती असं सगळं एकीकडे असतानाही घराच्या चार भिंतींच्या आत बाईवर होणारा अत्याचार मात्र जवळपास सगळीकडे एकसारखाच आहे. एरवी एखादी मोलकरीण आणि आयटी क्षेत्रात काम करणारी एखादी संगणक अभियंता यांच्यात काय साम्य असणार आहे?… पण, हे दोन एकमेकांशी कधीही जोडले न जाणारे बिंदूही कोरोनामुळे मात्र जोडले गेल्याचं दिसून आलं, ते माझ्याच एका मैत्रिणीमुळे. आयटीत काम करणारी ही मैत्रीण. लॉकडाऊनमध्ये ‘वर्क फ्रॉम होम’ करून आपला जॉब सांभाळतेय. घरी नवरा, सासु, सासरे, मुलं या सगळ्यांची कामं सुद्धा एकटीनेच करतीय. सर्वांच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत सगळी कामं आणि त्यापुढे रात्री उशिरापर्यंत जागून ऑफिसचंही काम. एवढं करून सकाळी उठायला थोडाही उशिर झाला, की घरातल्यांची कुरकुर सुरु. या रोजच्या मानसिक त्रासाचा निचरा तिने कुठे करायचा?… इथे शिकलेली असो किंवा न शिकलेली, प्रत्येकीची अवस्था हीच आहे.

खरंतर, अनेक महिलांना घराच्या चार भिंतींच्या आत घुसमट, हिंसाचार नेहमीच सोसावा लागतो, मात्र लॉकडाऊनमध्ये हे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. काही महिलांना रोज गुरासारखे मारले जात आहे. आपल्या मुलीच्या अफेअरबदल कळल्यावर तिला तिचा ‘सुशिक्षित’ बाप दररोज मानसिक आणि शारीरिक त्रास देत आहे. भारतातच नव्हे, तर दूर फ्रान्समध्ये राहणाऱ्या मारियावर रोजच्या रोज स्वतःच्या पतीकडून बलात्कार होत आहे. ही काही प्रातिनिधिक आणि वास्तवातली उदाहरण आहेत.

लॉकडाउनच्या निवांत काळात सिरीयात आणि अगदी तिकडे अमेरिकेत, ऑस्ट्रेलियात आणि आपल्या आजूबाजूलासुद्धा अशी शेकडो, हजारो उदाहरणं रोज घडत आहेत. ‘हरकत नाही लॉकडाउन झालं तरी. निदान त्या निमित्ताने घरातले सगळेजण एकत्र तरी आलेत. छान वेळ तरी घालवतील…’, “त्यानिमित्ताने सगळे कुटुंब एकत्र असेल’, कुटुंब व्यवस्था मजबूत होईल’, अशी गोडगोड स्वप्नही अनेकांनी पहिली आणि सोशल मिडीयावरून फिरवलीही! पण बाहेर सर्वांच्या जीवावर कोरोना उठला असून, काही घरांमध्ये मात्र बायकांच्या जीवावर पुरुष उठले आहेत, हे भयावह वास्तव आपल्या पुढ्यात आहे.

कोरोनाच्या या काळात महिलांवर केला जाणारा हिंसाचार, हा फक्त अशिक्षितांमध्ये नाही तर सुशिक्षितांमध्येही तेवढ्याच प्रमाणात बघायला मिळतोय. मग ती रोजंदारीवर काम करणारी लोकं असो, व्यसन केल्याशिवाय झोप न येणारं कुणी असो किंवा मग उच्चभ्रू कुटुंबातील ‘महिलांनी आपली मतं मांडू नयेत’, असा विचार असणारा कुणी, हे सारेच महिलांवर घरी बसून राग काढणं, त्यांना मारणं हा आपला जन्मसिद्ध अधिकार समजत असल्याचं पाहायला मिळतंय.

राष्ट्रीय महिला आयोगाने मार्च २०२० च्या पहिल्या आठवड्यात घरगुती हिंसाचारासंबंधी अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात महिलांच्या तक्रारींत दुपटीने वाढ झाल्याचं दिसून आलं. तक्रारींचा आकडा ११६ वरून २५७ वर पोचल्याचं त्यात म्हटलंय. त्यातही अधोरेखित करावी अशी बाब म्हणजे लॉकडाउनच्या पहिल्या दहा दिवसांतच वाढलेल्या या केसेस आहेत. त्यात ६९ केसेस महिला हिंसाचाराच्या आहेत
गेल्या आठवड्यात संयुक्त राष्ट्रांच्या महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी देखील लॉकडाऊनच्या काळात महिलांवर होणाऱ्या घरगुती हिंसाचारावर चिंता व्यक्त केली. ‘महिलांना जिथे सर्वाधिक सुरक्षित वाटायला हवं अशी जागा म्हणजे त्यांचं घर. पण, आपल्या स्वतःच्या घरातच सर्वाधिक असुरक्षित वातावरणाचा आणि भीतीचा सामना बहुतांश मुलींना आणि महिलांना करावा लागतो, हे आजचं कटू आणि विसंगत वास्तव आहे,’ असं त्यांनी म्हटलंय. त्यांनी सर्व राष्ट्रांना महिलांवरील हिंसाचार रोखण्यासाठी आणि त्याचं निवारण करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर नियोजन करण्यास सांगितलंय. त्यावर काही ठोस उपाय योजायला सांगितले आहेत.

लॉकडाउनमध्ये महिलांवर वाढलेला अत्याचार ही समस्या शब्दशः जागतिक आहे. कोरोनाने सर्वाधिक मानवी मृत्यू झालेल्या देशांपैकी एक असणाऱ्या इटलीतही महिला सुरक्षित राहिलेल्या नाहीत. इटली हा एक पुढारलेला समाज म्हणून ओळखला जातो. पण तिथेही महिलांना पुरुषांच्या अत्याचाराला सामोरे जावं लागतंय. यावर उपाय म्हणून आता इटाली सरकारने एक अँप लाँच केलंय, जिथे फक्त महिला मेसेज करून तक्रार नोंदवू शकतात. जो पुरुष घरातल्या महिलेवर हिंसाचार करेल त्याला घराबाहेर जावं लागेल आणि ती महिला आपल्या मुलांबरोबर घरी थांबेल, अशी व्यवस्थाच तिथल्या सरकारने केलीय. एका वर्षाच्या तुलनेत इटलीमधील स्ट्रेस कॉल २० टक्याने अधिक वाढले आहेत आणि व्हॉट्सअ‍ॅपवर महिलांकडून पाठविल्या जाणाऱ्या समस्यांच्या संदेशांत देखील २० टक्के वाढ झाली आहे, असं इटली सरकारने प्रसिध्द केलंय.
स्पेनमध्ये पोलिसांनी घरी अडकलेल्या महिलांसाठी व्हॉट्सअ‍ॅप सेवा सुरू केली आहे. नवरे घरी असताना त्यांच्याबाबतच्या तक्रारी फोन कॉल करण्याची आवश्यकता न पडता नोंदवता याव्यात, यासाठी महिलांकरिता असणारी ही सुविधा तयार करण्यात आली आहे. स्पेनच्या पोलिसांच्या म्हणण्यानुसार (समतेसाठी कार्यरत असणारे मंत्रालय) लॉकडाऊन सुरू झाल्यापासून त्यांच्या कामाची व्याप्ती, समुपदेशन आणि स्त्री-पुरुष समतेच्या प्रश्नांच्या सल्लामसलतीत तब्बल २७० टक्क्यांनी वाढ झाली आहे. स्पेनमधीलच प्रसिद्ध अशा ‘मुखवटा’ मोहिमेप्रमाणेच, घरगुती हिंसाचाराला बळी पडलेल्यांना मदत मागता यावी यासाठी आणि त्यांच्या शेजार्‍यांना व अधिकाऱ्यांना सतर्क करण्यासाठी पीडितांच्या तळहातावर लाल ठिपका काढण्यास सांगितलं आहे.

फ्रान्समध्येही महिला हिंसाचार ३० टक्क्यांनी वाढला आहे. त्यावर उपाय म्हणून फ्रान्स सरकारने तिथे मोठ्या प्रमाणात समुपदेशन केंद्रे सुरु केली आहेत. हिंसाचार पीडित महिलांसाठी तेथील हॉटेलांत वीस हजार बेडची सोय करण्यात आली आहे. महिलांसाठी फार्मसीत जाऊन तक्रार करता येण्याची सुविधाही आहे.  तर, जिथे कोरोनाची सुरुवात झाली, अशा चीनमध्ये कोरोनानंतर घटस्फोटाच्या प्रमाणात मोठी वाढ झाल्याचं दिसून येत आहे. तिथल्या हुबेई शहरात घरगुती हिंसाचारात लॉकडाऊन दरम्यान तिप्पटीपेक्षा अधिक केसेस नोंदल्या गेल्या असल्याचं पोलिसांनी सांगितलं. दक्षिण-पश्चिम चीनमधील सिचुआन प्रांतातील दाझौ येथे विवाह नोंदणी व्यवस्थापक लू शिजुन म्हणाले, की २४ फेब्रुवारीपासून घटस्फोटासाठी ३०० हून अधिक जोडप्यांनी मागणी केली आहे.

ब्रिटनच्या गृहमंत्री प्रीती पटेल यांनी हिंसाचाराला बळी पडणाऱ्या महिलांना लॉकडाऊनच्या काळातही घर सोडण्याची मुभा दिली आहे आणि महिला हिंसाचाराच्या विरुद्ध उभं राहणाऱ्या स्थानिक स्वयंसेवी संस्थाना मदत करण्याचीही घोषणा केली आहे. जपान सरकारने अत्याचारपीडित महिलांसाठी स्वतंत्र अपार्टमेंटची सोय केली आहे, जिथे त्या राहू शकतात किंवा काम करू शकतात. महाराष्ट्रातही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वाढत्या महिला हिंसाचाराविरुद्ध कठोर पावलं उचलत असल्याचे सांगितले आहे. पुणे जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी तर म्हटलंय, की  घरात बायकोला छळणाऱ्या नवऱ्याला थेट इन्स्टिट्युशनल क्वारन्टाईन केलं जाईल.

चीनमधलीच एक बातमी सध्या खूप व्हायरल होतीय, ती आहे लेले नावाच्या एका २६ वर्षीय महिलेविषयी. लेले आणि तिच्या नवऱ्यात होणारा वाद गेल्या काही दिवसांत फारच विकोपाला पोचला होता. १ मार्चच्या दिवशी लेलेने आपल्या ११ महिन्यांच्या मुलीला हातात घेतले असताना तिच्या नवऱ्याने लेलेला खुर्चीने मारहाण करण्यास सुरवात केली. तो तिला मारतच राहिला. ती म्हणते, की त्या मारहाणीत तिच्या एका पायाची संवेदनाच गमावली आणि ती जमिनीवर पडली. पडतानाही तिने आपल्या बाळाला आपल्या हातात घट्ट धरलं होतं. या घटनेनंतर तिने काढलेल्या छायाचित्रात जमिनीवर उंच खुर्चीचे तुकडे पडलेले आढळले आहेत. खुर्चीचे धातूचे पाय, पार तोडून टाकल्याचे त्यात दिसतात. नवऱ्याने तिच्यावर किती ताकदीने खुर्ची फेकून मारली असेल, हे त्यात स्पष्ट जाणवतं. दुसर्‍या एका छायाचित्रात लेलेच्या जखमा दिसतात. तिच्या पायांना झालेल्या जखमा फार खोल असल्याचं लगेचच कळून येतं. लेले म्हणते की, तिच्या पतीने त्यांच्या सहा वर्षांच्या नात्यात तिच्यावर नेहमीच अत्याचार केला. पण कोविड-१९ च्या उद्रेकानंतर त्यात फारच वाढ झाली. त्याचंच हे मारहाणीचं एक पराकोटीचं रूप.

अशी अंगावर काटा आणणारी उदाहरणं अनेक आहेत. महिलांच्या बाबतीत होणाऱ्या घरगुती हिंसाचारासाठी कायदा काय करू शकतो, हेही पाहणं महत्त्वाचं आहे. भारतीय दंड विधानातील कौटुंबिक हिंसाचार कायद्यातील कलम ३ नुसार ‘कौटुंबिक हिंसाचारा’ची व्याख्या चार प्रकारांत करण्यात आली आहे. १) शारीरिक गैरवर्तन २) लैंगिक गैरवर्तन ३) शाब्दिक व भावनिक गैरवर्तन ४) आर्थिक गैरवर्तन, हे ते प्रकार. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेनुसार २४% महिला आपल्या आयुष्यात कधी न कधी हिंसाचाराच्या बळी ठरलेल्या आहेत. यात बऱ्याचशा उच्चभ्रू महिलांचा समावेश नाही, ज्या आपल्या कुटुंबाची प्रतिष्ठा जपण्यासाठी हिंसाचाराच्या तक्रारी नोंदवतच नाहीत. वर्ल्ड बँकेच्या एका अहवालानुसार महिला सबलीकरणासाठी विविध प्रकारचे कार्यक्रम राबविण्यात येत असले, तरीही अत्याचार रोखण्यात हवं तसं यश अजूनही येत नाही. आजही ३५% स्त्रिया लैगिक शोषणाच्या बळी जात आहेत आणि ते ही आपल्या साथीदारांकडून! एक लाखात जवळपास ६० हजार महिला ह्या घरगुती हिंसाचाराच्या बळी असतात, ही सांख्यिकी नुसती बघितली तरी या समस्येची तीव्रता लक्षात येईल. यात बदल घडण्यासाठी अर्थातच, कायद्याची अंमलबजावणी आणि महिलांमधील जागरूकता अशा दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या ठरतील.

‘अमर उजाला’च्या एका मुलाखतीत बोलताना राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा म्हणाल्या, “महिलांना बऱ्याच वेळेला कळत नाही की त्यांच्यावर हिंसाचार होतोय. अजूनही आपल्या देशातल्या  बऱ्याच महिला आमच्यापर्यंत पोहचू शकत नाहीत. आम्ही त्यांच्यासाठी एक वॉट्सअप नंबर सुरु केला आहे. त्या नंबरवर महिला आम्हाला डायरेक्ट मेसेज करू शकतात. हा नंबर सुरु केल्यापासून दररोज आमच्याकडे १० केसेस येत आहेत.”  तर, जेष्ठ वकील व महिला हक्क कार्यकर्ती वृन्दा ग्रोवर यांच्या म्हणण्यानुसार देशभरात लॉकडाऊन केल्यामुळे महिलांवरील हिंसाचार वाढण्यात भर पडली आहे. त्या पुढे म्हणतात, की तुम्ही एकीकडे महिलांना व्हायरस पासून वाचवताय पण दुसरीकडे त्यांना एका वेगळ्या हिंसाचाराला सामोरं जायला भाग पाडत आहात. तक्रार करण्यासाठी पोलिस हा महिलांसाठी पहिला पर्याय नसायला हवा, असं त्यांना वाटतं. महिला हिंसाचारासाठी वेगळा पर्याय काढावा लागेल, असंही वृंदा म्हणतात.

महिलांच्या या समस्यांवर काम करायचं असेल, तर सगळ्यात आधी महिलांनी स्वतःहून पुढे येऊन त्यांच्यावर होणाऱ्या हिंसाचाराच्या तक्रारी नोंदवाव्या लागतील. आजही महिलांना त्यांच्यावर हिंसाचार होतोय हे कळत नाही. अनेक घरांत नवऱ्याने मारलेली एक थोबाडीत म्हणजे हिंसाचारच आहे, हेच कित्येक जणींना कळत नाही. एक थोबाडीत ही हिंसाचाराची सुरुवात आहे, हे जेव्हा महिलांना कळेल आणि पटेल, तेव्हा बदलाची सुरुवात होईल.
महिला अत्याचारांत होणारी वाढ थांबवायची असेल, तर पुरुषांचं समुपदेशनही तेवढंच महत्त्वाचं आणि गरजेचं. आजही पुरुषांची मानसिकता बदलण्यासाठी, त्यांना महिलांच्या विषयी अधिकाधिक सजग करण्यासाठी फारसे कृतीशील प्रयत्न होताना दिसत नाहीत. संपूर्ण समाज म्हणून आपण त्याकडे कसं पाहतो, यावर या प्रश्नावर उत्तरं मिळण्याचा वेग ठरणार आहे . महिलांचं आर्थिक-सामाजिक स्वावलंबत्व, पुरुषांचं महिलांच्या अस्तित्वाविषयी आणि हक्कांविषयी जागृत झालेलं भान आणि या दोहोंना परस्परांच्या विषयी असणारा आदर, ही त्रिसूत्री आकारात आली तरच कदाचित या चार भिंतीच्या आत दडलेल्या या हिंसाचाररुपी ‘विषाणू’वर  काही उपाय निघू शकेल.

लेखाचे छायाचित्र orfonline.org च्या सोजन्याने साभार.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0