घाई करू नका, सर्वांना लस मिळेल – उद्धव ठाकरे

घाई करू नका, सर्वांना लस मिळेल – उद्धव ठाकरे

सर्वांना लस मिळेल. १ मेपासून पहिली लस दिली जाईल, शेवटची नाही. त्यामुळे नागरिकांनी घाई आणि गर्दी करू नये असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला आणि लसीकरणाची वस्तुस्थिती स्पष्ट केली. ते म्हणाले ४५ वयाच्या वरच्या १ कोटी ५८ लाख नागरिकांना आत्तापर्यंत लस देण्यात आली आहे.

एकूण ६ कोटी नागरिकांना लस द्यायची आहे. त्यासाठी १२ कोटी डोस लागणार आहेत. राज्यापुढे आर्थिक अडचण आहेच. मात्र एकरकमी पैसे देऊन लस विकत घेण्याची ताकद राज्याने ठेवली आहे. पण लस पुरवठा होण्यास मर्यादा आहेत.

१८ ते ४४ या वयोगटासाठी मे महिन्यामध्ये १८ लाख डोस मिळणार आहे. आत्तापर्यंत ३ लाख डोस आलेले आहेत. ४५ वयावरील लोकांसाठी नियमितपणे लस पुरवठा होत राहील अशी आशा आहे. देशामध्ये सध्या केवळ २ कंपन्या लस उत्पादन करीत आहेट. मात्र परदेशातून स्पुतनिक लस घेण्यासंदर्भातही बोलणी सुरू आहेत.

महाराष्ट्र विकास आघाडी सरकार जनतेसाठी लस देण्यासाठी सर्व प्रयत्न करीत आहे. मात्र १ मेपासून सुरू होणाऱ्या लसीकरणासाठी नागरिकांनी गर्दी करू नये. अन्यथा लसीकरण केंद्रे ही संसर्गाची केंद्रे होतील. नागरिकांनी संयम दाखवावा. जून जुलैपासून उत्पादन वाढेल, असेही ठाकरे यांनी सांगितले.

कोविन हे केंद्र सरकारचे अॅप बंद पडले होते. त्याचा उल्लेख करून ठाकरे म्हणाले, की प्रत्येक राज्यासाठी वेगळे अॅप तयार करण्याची परवानगी केंद्र सरकारकडे मागितली आहे.

पुढचे १५ दिवस निर्बंध लागू राहतील, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, की देशात इतर चित्र पाहता, लॉकडाऊन लागल्याचा सकारात्मक परिणाम दिसत आहे.

कोणाचेही नाव न घेता ठाकरे म्हणले, की मध्ये काही जणांनी लोकांना भडकवण्याचा प्रयत्न केला. पण राज्यकारभार करताना मी राजकारण करीत नाही. त्यासाठी वेगळ्या सभा घेऊ.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी काही आकडेवारी सांगितली. ते म्हणाले की कोरोना चाचण्यांचे अहवाल तपासण्यासाठी आज ६०९ प्रयोगशाळा आहेत. साडेपाच हजार चाचणी केंद्रे आहेत. दररोज ४ लाख चाचण्या केल्या जात आहेत. ८६ हजार ऑक्सीजन बेड, २८ हजार ९३७ आयसीयू बेड, ११ हजार ७१३ व्हेंटीलेटर्स असून सध्या राज्यामध्ये दररोज १७ शे मेट्रिक टन ऑक्सीजन उपलब्ध होत आहे. राज्याची क्षमता दररोज १२ शे मेट्रिक टन इतकी असून, ५०० मेट्रिक टन ऑक्सीजन ज्यादा बाहेरून आणण्याची केंद्राने परवानगी दिली आहे. ती आपण बाहेरुन आणतो आहोत. त्यासाठी मोठा खर्च होत आहे.

रेमडेसिव्हीर या इंजेक्शनची दररोज ५० हजार इतकी गरज आहे.  मात्र त्यांचे नियंत्रण केंद्राकडे आहे. ४३ हजार इंजेक्शन दररोज देणार असल्याचे केंद्राने सांगितले आहे. ३५ हजार इंजेक्शन्स प्रत्यक्षात मिळत आहेत. त्यांनी आवाहन केले, की रेमडेसिव्हीरचा अनावश्यक वापर करू नका. अन्यथा त्याचे दुष्परिणाम होताना दिसतात.

सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये ऑक्सीजन प्रकल्प उभे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले असून, त्या प्रकल्पांना कार्यान्वीत होण्यासाठी अजून २० ते २५ दिवस लागतील. त्यामुळे तिसरी लाट आलीच तर त्यासाठी आपण सज्ज आहोत.

लिक्विड ऑक्सीजं वाहून नेता येतो. मात्र आता वायु स्वरूपातील ऑक्सीजन वाहून नेता येत नाही. त्यासाठी जिथे अशा स्वरूपातील ऑक्सीजन उपलब्ध आहे, तिथेच कोविड सेंटर उभे केली जात आहेत.

मात्र आता रुग्णसंख्या स्थिरावली आहे, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

COMMENTS