मोदींचे भाषण प्रसारित न केल्याबद्दल अधिकाऱ्याचे निलंबन

मोदींचे भाषण प्रसारित न केल्याबद्दल अधिकाऱ्याचे निलंबन

चेन्नई : गेल्या ३० सप्टेंबर रोजी आयआयटी चेन्नईमध्ये झालेल्या ‘सिंगापूर-इंडिया हॅकेथॉन-२०१९’ कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण डीडी पोडिगई या दूरदर्शनच्या वृत्तवाहिनीवर प्रसारित न केल्याबद्दल चेन्नई डीडी पोडिगईचे सहाय्यक संचालक आर. वासुमती यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. वास्तविक प्रसार भारतीने त्यांच्या निलंबनाचे नेमके कारण दिलेले नाही. पण आर. वासुमती यांना पाठवलेल्या पत्रात त्यांच्यावर नियमांचे उल्लंघन केल्याने तत्काळ निलंबित करण्यात येत असल्याचे म्हटले आहे.

‘न्यूज मिनिट’ने दिलेल्या वृत्तात आर. वासुमती यांनी जाणूनबुजून मोदींच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण केले नसल्याचे म्हटले आहे. प्रसार भारतीकडून थेट प्रक्षेपणाचे आदेश आले होते पण त्याकडे दुर्लक्ष करून आर. वासुमती यांनी भाषण प्रक्षेपित केले नाही असे ‘न्यूज मिनिट’ने म्हटले आहे. न्यूज मिनिटला एका सूत्राने वेगळी माहिती दिली आहे, त्यानुसार मोदी यांच्या भाषणाचे अधिकृत प्रसारण करण्याचे अधिकार डीडी पोडिगई वृत्तवाहिनीला दिले नव्हते. वास्तविक पंतप्रधानांच्या सर्व भाषणांचे प्रसारण हे डीडी नॅशनल या वाहिनीवरूनच केले जाते.

या संदर्भात द वायरने प्रसारभारतीचे सीईओ शशी शेखर यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता, त्यांनी हा अंतर्गत मामला असून त्याच्यावर प्रतिक्रिया देणे योग्य नाही, असे सांगितले.

मूळ बातमी

COMMENTS