पुण्यातले डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय

पुण्यातले डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय

पुण्यातल्या अगदी मध्यवर्ती भागात प्रख्यात शैक्षणिक संस्था सिम्बायोसिसमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिगत आयुष्यातील वस्तूंचे संग्रहालय आहे. शेकडो पुस्तके, वस्तू व इतिहासाचा मोठा दस्तावेज असलेल्या या संग्रहालयाची माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्युझिअम आणि मेमोरियलच्या संचालिका संजीवनी मुजुमदार यांनी ‘द वायर मराठी’ला उलगडून दाखवली. मुलाखतकार आहेत चंद्रकांत कांबळे.

गांधी – आंबेडकर संवादाच्या वाटा
जातप्रथा आणि स्त्रीमुक्ती – डॉ. आंबेडकरांचे विचार
‘तुम्ही सेक्युलर नाही?’

प्रश्न: सिंबायोसिस ही एक गुणवत्तापूर्ण शैक्षणिक संस्था असल्याचे सर्वांना माहिती आहे, मात्र याच संस्थेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिगत आयुष्यातील वस्तूंचे एक संग्रहालय आहे याची फारशी माहिती नाही. या संग्रहालयाची सुरुवात कशी झाली?

संजीवनी मुजुमदारः सर्व प्रथम मी डॉ. बाबासाहेबांना जयंतीनिमित्ताने वंदन करते आणि सर्वांना शुभेच्छा देते. १९७८ साली सिंबायोसिस  संस्थेने ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च इन्स्टिट्यूट इन लॉ’ या नावाने संस्था स्थापन केली. या संस्थेचे उद्घाटन तत्कालिन सरन्यायाधीश वाय. वी. चंद्रचूड यांच्या हस्ते झाले होते. दरम्यानच्या काळात माईसाहेब डॉ. बाबासाहेबांच्या वैयक्तिक वस्तू कुठे तरी सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करत होत्या. तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना त्या भेटल्या, त्यांनी त्याला होकार दिला. पण पुढे काही झालं नाही. मुंबईत स्मारक होईल का यासाठी त्या महाराष्ट्राचे तत्कालिन मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले यांना भेटल्या. या दरम्यान माईसाहेबांच्या कानावर पुण्यात सिंबायोसिस डॉ. बाबासाहेबांच्या नावाने संस्था स्थापन करत असल्याची माहिती गेली. याच त्यांना फार आश्चर्य वाटलं आणि त्यांनी डॉ. एस. बी. मुजुमदारांना बोलावून घेतलं. बाबासाहेबांच्या स्मारकाचा प्रस्ताव त्यांनी डॉ. एस. बी. मुजुमदारांसमोर ठेवला. मुजुमदारांना ही कल्पना इतकी आवडली की, त्यांनी तिथेच होकार दिला. त्यानंतर बराच संघर्ष करत हे संग्रहालय उभे राहिले.

प्रश्न: डॉ. एस. बी. मुजुमदारांच्या होकारानंतर हे सामान कधी आणि कसे इथं पोचलं?

उत्तर: २६ अलीपूर रोड, दिल्ली येथून बाबासाहेबांच्या घरातून हे सगळं सामान सुरक्षितरित्या एका ट्रकमधून २२ फेब्रुवारी १९८२ साली सिंबायोसिसच्या आवारात आणले गेले. या घटनेला आता ४० वर्षे झाली आहेत. आम्ही ते सगळं सामान दोन खोल्यामध्ये भरून ठेवलं.

प्रश्न: लोकांमध्ये असा एक गैरसमज आहे की, माईसाहेब आणि डॉ. एस. बी. मुजुमदार यांचे काही तरी कौटुंबिक नातेसंबंध आहेत. आणि म्हणून त्यांनी सगळं सामान त्याच्या सुपूर्द केलं आहे. हे कितपत खर आहे?

उत्तर: असं काहीही नाहीये…अजिबात नाहीये.

डॉ. मुजुमदारांचे मोठे बंधू हे ठाण्यात न्यायाधीश होते. आणि माईसाहेबांचे ठाण्याचे एक वकील होते. यांच्या संबंधातूनच त्यांनी डॉ. मुजुमदारांना बोलावलं होत. त्याच एक कारण असं ही होत की, बाबासाहेबांच्या नावाने आम्ही इन्स्टिट्यूट काढली होती त्यामुळे सिंबायोसिसचे बाबासाहेबांवर प्रेम आहे, हे त्यांना जाणवलं असणार आणि म्हणून त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला.

प्रश्न: या कामासाठी तुम्हाला कोणाचे सहकार्य लाभले आणि विरोध कशाप्रकारचा झाला? कारण बाबासाहेबांचं वैयक्तिक सामान तेही मुजुमदारांकडे कसा प्रतिसाद होता. दोन्ही बाजूंचा?

उत्तर: जेव्हा आम्ही बोर्ड लावला, लगेच त्याला विरोध सुरू झाला. त्यांना वाटायला लागलं की, या वस्तूंचं मुजुमदार काय करणार आहेत. सेनापती बापट रोडवर बाबासाहेबांचं स्मारक होतंय हे काहींना रुचलं नाही, (नाव नाही मी घेत) त्यामुळे वृत्तपत्रातून टीका, वाटेल ते घाणेरडे फोन, धमकीचे फोन, आणि मोर्चे वगैरे मी गोड बोलून परतून लावायचे. मात्र डॉ. मुजुमदारांनी पाठपुरवठा करून तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील असताना स्मारकासाठी १९८५ साली दोन एकर जागा मिळवली. आम्हाला फक्त १५ टक्केच सरकारनी बांधकामासाठी परवानगी दिली, त्यात हे स्मारक उभं आहे. आणि १४ एप्रिल १९९० साली बाबासाहेबांच्या सुवर्ण महोत्सवी जयंती वर्षानिमित्त स्मारकाचा शिलान्यास तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या हस्ते झाला. आणि पहिली देणगी म्हणून पवार साहेबानी ४ लाख रु.ची मदत स्मारकासाठी दिली. स्मारकाच्या पायाभरणीच्या कार्यक्रमाला माईसाहेब उपस्थित राहू शकल्या नाहीत कारण त्याच वर्षी बाबासाहेबांना भारतरत्न पुरस्कार मिळाला होता. नंतर चार महिन्यांनी माईसाहेबानी भारतरत्न पुरस्कार आम्हाला सुपूर्द केला. दर १४ एप्रिल आणि ६ डिसेंबरला आम्ही हा पुरस्कार जनतेला पाहता यावा म्हणून बाहेर कडून ठेवतो. सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही तो इतरवेळी बाहेर ठेवत नाही.

प्रश्न: संग्रहालयाकडे पाहिल्यास असे वाटते की ज्या पद्धतीने दीक्षाभूमी, चैत्यभूमीसाठी सांचीच्या स्तूपापासून प्रेरित होऊन बुद्धिस्ट शिल्पशास्त्राचा वापर केला गेला आहे. अगदी तसेच संग्रहालय तुम्ही उभे केले आहे?

उत्तर: माईसाहेबांना असंच संग्रहालय हवे होतं. त्यांच्या इच्छेनुसार स्मारकाची उभारणी झाली आहे. त्यावेळी धनंजय दातार नावाचा एक तरुण मुलगा, तो म्हणाला मी असंच चांगलं उभं करतो त्याच ड्रॉईंग आम्हाला आवडलं आणि मग त्याप्रमाणे बांधकाम पूर्ण झालं. डॉ. मुजुमदारांना उद्घाटनाला दलाई लामा यांना आणायचं होत मात्र ते शक्य नाही झालं. तत्कालीन उपराष्ट्रपती के. आर. नारायण आणि मंगोलियाचे  राजदूत कुशक बकुला यांच्या हस्ते २६ नोव्हे १९९६ साली उद्घाटन झाले आणि यावेळी माईसाहेब उपस्थित होत्या. २६ नोव्हे १९४९ रोजी भारताचे संविधान स्वीकारले गेले म्हणून आम्ही हा दिवस निवडला होता, आज संविधान दिन म्हणून साजरा होतो.

प्रश्न: स्मारकाच्या रचनेपासून ते बाकी इतर अनेक गोष्टी तुम्ही आंबेडकरवादी दृष्टिकोनातूनच सगळ्या केल्या आहेत. हा बारकाईपणा कसा?

उत्तर: हा सगळा बारकाईपणा डॉ. मुजुमदारांचा आहे. मी फक्त काम करते. विरोध असल्याकारणाने कुणीही संचालक व्हायला तयार नव्हते मग मलाच नव्वद पासून सांभाळावं लागत आहे.

प्रश्न: तर मला सांगा… आपल्या संग्रहालयात बाबासाहेबांच्या कोणकोणत्या वस्तू आहेत आणि आपण त्या कशाप्रकारे जतन करत आहात?

उत्तर: आमच्याकडे एकंदर २८० वस्तू आहेत. ७४ हस्तलिखिते आहेत. ज्यात बाबासाहेबानी लिहिलेलं शेवटचं पुस्तक बुद्ध आणि त्याचा धम्म हे त्यांच्या स्वहस्ताक्षरातले पुस्तक आहे. त्यांनी वाचलेली, हाताळलेली ४९० पुस्तके आहेत. ती जीर्ण होऊ नयेत म्हणून आम्ही त्या पुस्तकांना डीऍसिडिक करून जतन करत आहोत. महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या पुस्तकांचे आम्ही डिजिटलायझेशन केलं आहे. प्रत्येक पान आम्ही स्कॅन करून ठेवलं आहे. आणि ही पुस्तक खूप जुनी आहेत. काही पुस्तके १९ व्या, २०शतकातील दुर्मीळ स्वरुपाची आहेत. त्यावर आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागली. शेवटी आम्ही कॉन्झर्वेशन लॅब सुद्धा इथेच निर्माण केली. कागद, कपडे, लाकडी फर्निचर, धातूच्या वस्तूवर वेगवेगळी प्रक्रिया करून त्या कशा जास्त काळ टिकून राहतील हाच हेतू आहे. आणि या बरोबरच भारतीय संविधानाची मूळ प्रत ही आपल्याकडे आहे. पहिल्या सव्वाशे प्रति छापल्या होत्या त्यातील ती एक आहे. जिचे वैशिष्ट्ये म्हणजे प्रत्येक पानावर वेगवेगळी चित्रे आहेत आणि संविधान सभेच्या सदस्यांच्या सह्या आहेत. आम्ही ती जनतेसाठी बाहेर काढून ठेवली आहेत.

प्रश्न: संग्रहालयात बाबासाहेब यांच्या दैनंदिन वापरातली भांडी, ग्लास, चमचे, वाट्या, अशा छोट्या छोट्या वस्तू आहेत.

उत्तर: होय.. रमाईचा सगळा संसार, पितळेची भांडी, जर्मनची भांडी आहेत. माईंचा पण सगळा संसार इथे आहे. जो बेड बाबासाहेबानी शेवटचा श्वास घेतला ती गादी आणि रजई, उशा, पांघरूणं अशा वस्तू आहेत. या सगळ्यांवर पण आम्ही प्रक्रिया केली आहे. या सोबतच पाच सहा चाकाच्या खुर्च्या आहेत. आजारपणामुळे बाबासाहेबाना चटकन उठून पुस्तक घेता येत नसे तर ते चाकाची खुर्चीचा उपयोग करायचे. ज्या टेबल खुर्चीवर बसून संविधान लिहिलं आहे त्या आहेत. बाबासाहेबांचं व्हायोलिन पण आहे. त्यासोबतच ट्रॅव्हलिंग किट आहे. बाबासाहेबांचं स्टँडर्ड ऑफ लिविंग खूपच उच्च दर्जाच होत. नेहमी सूट बूट कोटात राहणारा माणूस…आपल्याकडे टाय, सूट, वेगवेगळे चष्मे, अनेक बुटाच्या जोड्या आहेत. कोटावरील धूळ काढायचे ब्रश आहेत. महत्त्वाचे म्हणजे बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला उघड्या डोळ्याचा बुद्ध आहे. काठमांडू वरून आणलेल्या अशा दोन बुद्ध मूर्त्यांपैकी एक आपल्याकडे आणि दुसरी देहू रोडला आहे. बाबासाहेबानी बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर त्याला नवीदिशा दिली. त्याला नवयान म्हणतात.

प्रश्न: या स्मारकामध्ये उत्तम ग्रंथालय आणि सुसज्य अभ्यासिका आहे. तर ग्रंथालय आणि अभ्यासिका निर्माण करण्याचा काय उद्देश होता?

उत्तर: बाबासाहेबांना ग्रंथाचं वेड किती होतं हे तुम्हाला माहित आहे. अतिशय वाचनाची आवड… त्यामुळं स्मारकाच्या पहिल्या आराखड्यातच ग्रंथालयाची बिल्डिंग होती. मात्र बांधकामासाठी आम्हाला परवानगी नसल्यामुळे ते स्थगित होत, आत्ता २०१५ साली या ग्रंथालयाच उद्घाटन माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रामदास आठवले यांच्या हस्ते झालं. अभ्यासिकेसाठी आम्ही ग्रामीण भागातील मुलांना प्राधान्य देतो, याची सगळी प्रक्रिया ऑनलाईन केली आहे. अभ्यासिका सकाळी सात ते रात्री दहापर्यंत उघडी असते. मुलांना कमी दरात नाश्ता आणि जेवण आम्ही देतो. यातून पैसे कमावणे हा उद्देश नाहीय. जर म्युझिअमच बाबासाहेबांचं आहे तर समाज उपयोगी काही करावं हाच एक हेतू आहे. आणि रामदास आठवले सुरुवातीच्या काळात माईसाहेबांसोबत अनेकवेळा इथे आलेले आहेत. ते त्यांच्या सोबत राहायचे अगदी तरुण वयापासून मी त्यांना पाहिलं आहे. पुन्हा भालचंद्र मुणगेकरांच्या हस्ते आम्ही गार्डन लायब्ररीचे उद्घाटन केले होते.

प्रश्न: आंबेडकरवादी समाजाकडून आपणास कसं सहकार्य मिळालं?

उत्तर: समाजाच सहकार्य असं म्हणण्यापेक्षा…त्यांना प्रेम आहे या सगळ्या बद्दल. पाहायला येतात सगळे लोक. सिंबायोसिस संस्थेने याची सगळी जबाबदारी घेतली असल्यामुळे. प्रत्येक दिवसाचा सगळा खर्च, माळी, सुरक्षा, ऑफिसची कर्मचारी हे आम्हालाच पाहावं लागत. समाजाचे प्रेम आहे आमच्यावर. भीमा कोरेगांव दंगलीच्या वेळी हजारो लोक इथे होते. सगळं बंद झालं त्यांना जाता येत नव्हतं. मग आम्हीच जेवण पुरवलं. तेव्हा रोहित वेमुलाची आई इथेच होती. आत्ता १ जानेवारीला म्युझिअमला भेट देणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. स्तंभाला अभिवादन करून इथे भेट देतात बरेचसे बाहेरचे लोक असतात.

प्रश्न: सिंबायोसिस सोसायटी दरवर्षी काही तरी प्रकाशित करत असते, यावर्षी आपण काय प्रकशित केलं आहे?

उत्तर: आमच्याकडे जवळ जवळ बाबासाहेबांचे अडिचशे ओरिजिनल फोटोग्राफ आहेत. ते सगळे मुझियममध्ये पाहायला मिळतील. लोकांची अशी मागणी होती की, आम्हाला हे फोटो मिळतील का? संग्रहालयात थांबून सगळे फोटो नीट पाहून, त्याखालील मजकूर वाचणं शक्य होत नाही. म्हणून आम्ही त्या सगळ्या फोटोंचे पुस्तक रूपाने ‘चित्रमयचरित्र’ ६ डिसेंबरला प्रकाशित केलं आहे.

प्रश्न: सिंबायोसिस सोसायटीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक हे राष्ट्रीय स्मारकात समाविष्ट झाले आहे.

उत्तर: राष्ट्रीय स्मारक झालं असल्यामुळे आम्हाला केंद्र सरकारने काही प्रमाणात मदत केली आहे. अभ्यासिकेची बिल्डिंग त्यातूनच उभ्या झाल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे देशातील प्रमुख १० म्युझियममध्ये याचा समावेश आहे. त्या पोर्टलमध्ये आपल्या म्युझिअमची लिंक देण्यात आली आहे. आणि याहून अधिक जे पंचतीर्थ म्हणून बाबासाहेबांची महत्वाची ऐतिहासिक स्थळ केंद्राने घोषित केली त्यात ही या संग्रहालयाचा उल्लेख आहे.

प्रश्न: या म्युझिअमला व्हर्चुअल रियालिटीमध्ये रूपांतर करण्याचा तुमचा निश्चय आहे. कस करताय ते काम आणि कस असेल ते?

उत्तर: होय… काळानुरूप बदल गरजेचे असतात. सध्या आम्ही बाबासाहेबांचा एक होलोग्राम करतोय. आठ पंधरा दिवसात होईल तो केंद्रीय मंत्र्यांच्या तारखा वगैरे घेऊन त्याच्या हस्ते लाँच करायचा उद्देश आहे. त्यात बाबासाहेबांची संविधान सभेतील जी भाषणं आहेत यातील दोन ओरिजिनल भाषणं संग्रहालयात आहेत. ती दोन भाषणं आम्ही या होलोग्राममध्ये घेतली आहेत. बाबासाहेब प्रत्यक्ष आपल्यात बोलत आहेत असा भास निर्माण होईल या होलोग्राममधून होतो. तरुण पिढीला त्यांच्या माध्यमातून बाबासाहेब पोचले पाहिजेत, हा विचार आहे.

प्रश्न: माईसाहेबांच्या हस्ते इथे बोधीवृक्षाचे रोपण करण्यात आले आहे, आज तो महाकाय वृक्ष झाला आहे. माईसाहेबांचे आणि तुमचे भेटणे बोलणे कशा स्वरूपाचे होते?

उत्तर: माईचं माझ्यावर खूप प्रेम होते. त्यांनी दोनवेळा मला चिठ्ठीवर लिहून दिले की, माझे सगळे दागदागिने मी तुला देत आहे. मात्र मी त्यांच्या देखतच ती चिठ्ठी फाडून टाकली. आणि मी म्हणाले की, माई तुम्ही बाबासाहेबांचं इतकं सगळं आम्हाला दिलंय की अजून काही नको. माईसाहेब हमखास १४ एप्रिल आणि ६ डिसेंबरला इथे येत आणि आठ आठ दिवस राहत असत. शेवटच्या काळात त्या खुपच जवळच्या झाल्या होत्या. त्या शेवटचं इथं आल्या होत्या, तेव्हा आम्ही त्यांना खुर्चीत बसवून वर आणलं होत. त्यांना चालता येत नव्हतं. त्या म्हणाल्या, ‘जय भीम म्हणा’ मग आम्ही प्रत्येक पायरीला जय भीम म्हणत त्यांना स्मारकात घेऊन गेलो. बाबासाहेबांच्या पुतळ्याला धरून त्या रडत होत्या त्यांना पाहून आमच्याही डोळ्यात पाणी आलं. पुन्हा त्या नाही आल्या.

एके दिवशी रामदास आठवलेंचा फोन आला, माईसाहेबांचं निर्वाण झालं. मग आम्ही दोघेही गेलो मुंबईला. बाबासाहेबांच्या अस्थी सोबतच त्यांचाही अस्थी कलश इथेच ठेवला आहे.

(मुलाखतकार चंद्रकांत गौतम कांबळे हे सिंबायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी येथे वरिष्ठ संशोधक म्हणून कार्यरत आहेत.)

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0