डॉ. बाबासाहेबांची व्यापक व सम्यक विचारसरणी

डॉ. बाबासाहेबांची व्यापक व सम्यक विचारसरणी

प्राचीन भारतीय लोकांना खगोलशास्त्र, फलज्योतिष, प्राणिशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, वैद्यकशास्त्र, खनिजशास्त्र, भौतिकशास्त्र, व काहींच्या मतानुसार विमानचालनाबद्दलही माहिती होती. बाबासाहेब म्हणतात या साऱ्या गोष्टी खऱ्या असतीलही. ते म्हणतात हा मुद्दा महत्वाचा आहेच. पण जास्त महत्वाचा मुद्दा हा आहे की इथे शास्त्र इतके विकसित होऊनसुद्धा त्याची या क्षेत्रातील प्रगती का खुंटली. त्यांच्या मते ती खुंटली नाही तर पूर्णपणे बंदच झाली. हे अनाकलनीय तर आहेच पण अव्वल दर्जाची शोकांतिका सुद्धा आहे.

तीन प्रकारच्या हुकूमशाहींविरुद्ध आंबेडकरांनी दिलेले इशारे
‘तुम्ही सेक्युलर नाही?’
बापू @ 150

मी कित्येक वर्ष सोप्या इंग्रजी व मराठी भाषेत वैज्ञानिक लेख लिहीत आहे, लिहिण्याचा प्रयत्न करतो आहे. वाचकांच्या प्रतिक्रियेवरून मी त्यात काही प्रमाणात यशस्वी झालो आहे असे मानायला भरपूर जागा आहे. मी कित्येक वर्ष डॉ. आंबेडकरांचे साहित्य सुद्धा वाचत आहे. त्यांचे सारेच साहित्य वाचले आहे असा माझा दावा नाही. पण काही थोड्या प्रमाणावर त्यांचे साहित्य मी निश्चितच वाचले आहे. बाबासाहेबांवर आजपर्यंत अनेक जाणकारांनी, त्यांच्या कार्यावर, तसेच त्यांच्या साहित्यावर भाष्य केले आहे. त्यांची आर्थिक विषयासंबंधी अभ्यासू मांडणी, सामाजिक अभिसरणाची गरज व उपाय, वैश्विक समता व बंधुता, तसेच कुशल संसदपटू व घटनाकार यासंबंधी अनेक गुणवान संशोधकांनी विपुल साहित्य जन्माला घातले आहे.

भारताच्या जडणघडणीत डॉ. बाबासाहेबांचे व्यापक योगदान

या महामानवाचे आधुनिक भारताच्या जडणघडणीत किती मोठे योगदान आहे याची प्रचिती आता सर्वांना होते आहे, येते आहे. काही दशकांपूर्वी बाबासाहेबांची ओळख कोण्या एका जनसमूहाशी हट्टाने केली जायची. ती आता आपोआप व नैसर्गिकरित्या थांबली आहे. त्यांची विचारसरणी किती व्यापक व सर्वसमावेशक होती हे आता लोकांना कळू लागले आहे. त्यांची ग्रंथसंपदा इतकी विशाल व विस्तृत होती की ती सांभाळून ठेवण्यासाठी त्यांनी राजगृहाची निर्मिती केली होती. मला आधी ही अतिशोयक्ती वाटायची पण जसजसे त्यांचे साहित्य वाचत गेलो तसतसे माझ्या मनातील ही भावना किती तकलादू होती हे पटत गेले. पण मी विज्ञान लेखक असल्याकारणाने त्यांनी विज्ञानावर काही लेखन केले आहे, किंवा त्यांच्या ग्रंथागारात विज्ञान पुस्तके होती का, याच्यावर त्यांचे लिखाण वाचताना माझा थोडा अधिकच कटाक्ष असायचा.

बाबासाहेबांचे वैज्ञानिक विचार 

सुरुवातीलाच मला स्पष्ट करावे लागेल की मी बाबासाहेबांचे पूर्ण साहित्य वाचले नाही. एकूण त्या वाचनात एकसंघपणाही नव्हता. माझ्या हाताला त्यांचे जे लिखाण लागले ते मी वाचत गेलो. आज जर त्यांचे एक पुस्तक वाचून संपवले तर दुसरे पुस्तक काही महिन्यानंतर किंवा वर्षांनंतरही वाचण्यासाठी हाती घेत असायचो. त्याच्यात कधीच व कोणताच सुसूत्रितपणा नव्हता. तो नसायचाच. पण जेव्हा मी त्यांचा ‘सिविलायझेशन ऑफ फेलनी’ वाचला तेव्हा जाणवले की प्राचीन भारतातील विज्ञान व तंत्रज्ञानाबद्दल बाबासाहेबांना फारशी आत्मीयता किंवा आदर वाटत नव्हता. त्याकाळचे विज्ञान व तंत्रज्ञान अतिशय सुमार व प्राथमिक दर्जाचे होते असे त्यांची मत होते. या मताला अनुसरून त्यांनी काही उदाहरणे दिली आहेत. हिंदू संस्कृतीशी निगडीत जी काही हत्यार किंवा अवजार आढळतात त्यात संशोधकवृत्ती व तांत्रिक ज्ञान वापरून ही अवजारं जन्माला घातल्याचे दाखले बाबासाहेबांना मिळाले नाहीत. जी काही उपकरणे इथे आढळतात ती त्याकाळच्या मापदंडानुसार एखाद्या आधुनिक संस्कृतीची नव्हती असा त्यांचा दावा होता.

हिंदू संस्कृती महान?

हिंदू संस्कृती ही जगातील इतर अनेक संस्कृतीत विशाल व आधुनिक मानली जाते. जगाच्या पाठीवर ज्या कोणत्या महत्वपूर्ण संस्कृती अस्तित्वात होत्या त्या सर्व कृषिप्रधान होत्या. त्यांनी कृषिक्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान व उपकरणे आणली व त्याकाळचे राहणीमान कसे सुखकारक होईल याकडे लक्ष पुरवले. पण भारतात मात्र तसे काही घडले नाही. जमिनीची कस व त्यानुषंगाने पडणारे दुष्काळ हा भारतीय उपखंडाला लागलेला शाप होता. यातून मुक्ती मिळवण्यासाठी त्याकाळातील तज्ज्ञ व जाणकार मिळून काहीतरी सकारात्मक उपाय शोधून काढणे अपेक्षित होते. पण तसे कधीच घडले नाही. यावर भाष्य करताना बाबासाहेबांनी म्हटले आहे, “अज्ञान, अंधश्रद्धा व रोगराई हे जसे मनाला ग्रासतात तसे हिवताप व प्लेग शरीराला ग्रासतात व ही मानसिकता युगेंयुगे इथल्या मातीत रुजलेली आहे.” ही बाबासाहेबांच्या मते इथली शोकांतिका आहे.

हिंदू शिक्षण पद्धती 

फिलॉसॉफी ऑफ हिंदूइझम या ग्रंथात बाबासाहेबांनी हिंदू शिक्षण पद्धतीसंबंधी थोडे विश्लेषण केले आहे. त्यांनी असे मांडले आहे की त्याकाळातील शिक्षणपद्धती फारच औपचारिक व सीमित होती. त्याकाळचे सर्वंकष व अंतिम शिक्षण हे वेद अभ्यासाशी जडले होते. त्यावेळची अशी अंतिम धारणा होती की जगात जे जे शिकण्यासारखे आहे ते ते वेद वाङ्मयात सापडते. त्यामुळे इतर कोणत्याही ग्रंथातील किंवा साहित्याची तोंडओळख असायला हवी ही इच्छा किंवा सक्ती नव्हती. गुरुकुलात त्यामुळे फक्त वेदांचेच अध्ययन होत राहिले. इतर कोणतेही विषय तिथे शिकविले जात नव्हते. त्यातच या गुरुकुलात फक्त ब्राह्मणांच्या मुलांनाच प्रवेश मिळत असे. नाही म्हणायला गेले तर तत्सम राजघराण्यातील काही निवडक मुलांना या गुरुकुलात प्रवेश दिला जात असे. त्यामुळे शिक्षणाचे फायदे व त्यामुळे वाढणारी व्यापक चौकस बुद्धी फक्त समाजाच्या काही लोकांपुरतीच मर्यादित राहिली.

अशा या निवडक शिक्षण पद्धतीमुळे समाजात वावरणाऱ्या व्यापारी व कारागीर समूहांना याचा कोणताच फायदा होत नव्हता. तात्कालिक प्रशासनाला या महत्वाच्या जनसमूहाकरता एखादी शिक्षणप्रणाली विकसित करावी किंवा त्यांच्यासाठी वेगळ्या गुरुकुलाची व्यवस्था करावी याचे कोणतेही सोयरसुतक नव्हते. शिक्षणाच्या अभावामुळे समाजाच्या या महत्वपूर्ण घटकाला स्वतःचा उद्धार स्वतःच करणे क्रमप्राप्त ठरले. त्यामुळे या समाजघटकातून कधीतरी एखादा गुणवान व्यापारी किंवा कारागीर स्वतःचे भले करताना दिसतो. पण त्यात त्याला कोणत्याही प्रकारची संस्थात्मक मदत मिळाली आहे हे कधीच नजरेस पडत नाही. संस्थात्मक मदत मिळाल्यामुळे कसा व किती फरक पडतो हे आपण स्वातंत्र्यानंतर पाहत व अनुभवत तर आहोतच. संस्था व व्यवस्थेचे पाठबळ मिळाल्यानंतर कशा प्रकारची किमया साधता येते हे एम्स व आयआयटी सारख्या संस्थेच्या कामगिरीने सहजी लक्षात येते.

संस्थात्मक मदत न मिळाल्यामुळे व्यापारी व कारागीर समूहाला आपल्या स्वतःच्या युक्त्या व क्लुप्त्या वापरून वाटचाल करावी लागत असे. व्यापारी वर्गाला कोणत्या गुणवैशिष्ट्याची गरज भासत होती? त्याला आपल्या व्यापारासाठी कोणत्या कुशल गुणांची आवश्यकता होती? त्याला आपल्या भोवतालच्या भूगोलाची जाणीव असावी लागायची, व्यापारासाठी लागणारे सामान कोणत्या भूभागातून त्याच्यापर्यंत पोहोचते, कुठे पोहोचवावे लागेल, येण्याजाण्याचा मार्ग, मिळालेले व देण्याचे पैसे मोजण्यासाठी अल्पसे गणिती ज्ञान व इतर व्यापारी व ग्राहकांशी मधाळ बोलणे. या साऱ्या गोष्टीची तोंडओळख वडीलधाऱ्या माणसांकडून केली जायची. कारागीर सुद्धा संग्रहित ज्ञान आपल्या पुढच्या पिढीला देत होते. त्यामुळे ज्या काही उत्क्रांती किंवा आधुनिक बदल या समूहात सहजपणे व नैसर्गिकपणे व्हायला हवे होते ते झाले नाहीत. एका पिढीतून दुसऱ्या पिढीत जेव्हा ज्ञान व माहिती पाझरते तेव्हा त्या ज्ञानाची धार प्रत्येक पिढीत बोथट होत जाते. नव्या सृजनशील दृष्टीच्या अभावामुळे जिज्ञासा व कुतूहलाची प्रवृत्तीच निर्माण होत नाही. मानवी उत्सुकता जरी अंगभूत असली तरी त्याचा वापरच जर होणार नसेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करणं सोपं होऊन जात. इथल्या शिक्षणपद्धतीनं अशी काही परिस्थिती बनवली होती की एका मोठ्या जनसमूहाची स्थिरता, त्याची अप्रवाहिता त्याला प्रिय होत गेली व त्याचाच उत्सव ते सातत्याने पार पाडू लागले. साक्षरता हा गुण बहुजनांमध्ये व त्यांच्या मानसिकतेतून कधी हद्दपार झाला हे त्यांनासुद्धा समजले नाही.

हिंदू विज्ञान 

बाबासाहेब म्हणतात की हिंदू संस्कृती ही सर्वाधिक प्राचीन आहे याचा गर्व अनेकांच्या बोलण्यातून प्रतीत होतो किंवा तो जाणवतो. खरेतर, सिंधू संस्कृती ही हिंदू संस्कृतिपूर्वीची आहे यात आता कोणताही वाद नाही. असो. पण काहींच्या मतानुसार हिंदू संस्कृती इतकी विकसित होती की कित्येक विद्याशाखांचा जन्म इथल्या मातीत त्यांच्या पूर्वजांकडून झाला होता. बाबासाहेबांनी दोन पुस्तकांचा उल्लेख केला आहे. एक आहे प्रो. बिनॉय कुमार सरकार यांचे ‘द पॉझिटिव्ह बॅकग्राऊंड ऑफ हिंदू सोसिओलॉजि’ व दुसरे आहे डॉ. ब्रजेन्द्रनाथ सील यांचे ‘द पॉझिटिव्ह सायन्सेस ऑफ ऍनशीयंत हिंदूस’. या पुस्तकांचा हवाला देत बाबासाहेब म्हणतात की ही पुस्तकं वाचली तर आपली खात्री पटते की प्राचीन भारतीय लोकांना खगोलशास्त्र, फलज्योतिष, प्राणिशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, वैद्यकशास्त्र, खनिजशास्त्र, भौतिकशास्त्र, व काहींच्या मतानुसार विमानचालनाबद्दलही माहिती होती. बाबासाहेब म्हणतात या साऱ्या गोष्टी खऱ्या असतीलही. ते म्हणतात हा मुद्दा महत्वाचा आहेच. पण जास्त महत्वाचा मुद्दा हा आहे की इथे शास्त्र इतके विकसित होऊनसुद्धा त्याची या क्षेत्रातील प्रगती का खुंटली. त्यांच्या मते ती खुंटली नाही तर पूर्णपणे बंदच झाली. हे अनाकलनीय तर आहेच पण अव्वल दर्जाची शोकांतिका सुद्धा आहे.

बुद्धाचा बुद्धीवर घाला

भारतीय उपखंडात प्राचीन काळात विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात फार मोठी प्रगती साध्य झाली होती. इतकी प्रगती होऊन सुद्धा आधुनिक काळात आपला देश वैज्ञानिक क्षेत्रात इतका मागासलेला का आहे हे न समजण्यासारखे कोडे आहे. जे कार्य त्यांनी हाती घेतले होते ते त्यांनी पूर्णत्वास का नेले नाही, यामागचे कारण काय असू शकेल यावर त्यांनी विचारमंथन सुरु केले. प्राचीन भारतात कोणते विज्ञान विकसित झाले होते हा प्रश्न न विचारता हे विज्ञान मागे का पडले, त्याची प्रगती का खुंटली याचे उत्तर शोधणे जास्त संयुक्तिक आहे असे बाबासाहेबांना वाटत होते.

त्यांनी या प्रश्नाचा उलगडा करण्यासाठी अनेक ग्रंथ चाळले व उत्तर शोधून काढले. बाबासाहेब म्हणतात, “प्राचीन भारतात मुख्यत्वे ब्राह्मणच साक्षर होते. त्यांचे स्वतःच्या श्रेष्ठत्वासंबंधी काही ठाम मतं होती. बुद्धाने त्यांच्या श्रेष्ठत्वासंबंधी त्यांना आव्हान दिले व समता प्रस्थापनेसाठी ब्राह्मणांविरुद्ध दंड थोपटले. या आव्हानाचा सामना ब्राह्मणांनी एका साक्षर समूहाप्रमाणे केला. त्यांनी एका ज्ञानी किंवा सुशिक्षित वर्गाप्रमाणे केला नाही. त्यांनी आपल्या हाती असणारे सारे कार्य बाजूला ठेऊन ब्राह्मणच कसे श्रेष्ठ आहेत, व त्यांचे स्वामित्व कसे सर्वांनी अंगिकारायला हवे, हे पटवून देण्यासाठी ब्राह्मणांनी साम, दाम दंड वापरण्यास सुरुवात केली. या साऱ्या जंजाळात विज्ञान मागे पडले व स्वतःच्या श्रेष्ठत्वाची पखाली वाहण्यासाठी त्यांनी स्मृतींची रचना सुरु केली. त्यामुळे विज्ञानाची प्रगती पूर्णपणे थंडावली. हे सारे बुद्धाला व त्यांच्या समतेच्या तत्वज्ञानाला इथल्या मातीत रुजू न देण्यासाठी विज्ञानाची तिलांजली देण्यात ब्राह्मणांनी धन्यता मानली. बुद्धाला शह देण्यासाठी त्यांनी जंगजंग पछाडले व त्यात प्रामुख्याने विज्ञानाची आहुती पडली.

डॉ. प्रवीण गवळी, भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या अधीन कार्यरत नवी मुंबई येथील भारतीय भूचुंबकत्व संस्थेत, वैज्ञानिक म्हणून कार्यरत आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0