डॉ. गेल ऑमव्हेट: नव्या युगाची दिशा

डॉ. गेल ऑमव्हेट: नव्या युगाची दिशा

प्रस्थापित वतनदारांची झुंडशाही, त्यातून आकाराला आलेला सांस्कृतिक दहशतवाद जगाच्या पाठीवर सारखाच असावा कमी जास्त प्रमाणात. त्याच्या स्वरूपाविषयी म्हणाल

नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि अहमदिया
‘काश्मीर स्वर्ग नव्हे नरक झालाय’
दविंदर सिंहचे प्रकरण एनआयए कसे हाताळेल?

प्रस्थापित वतनदारांची झुंडशाही, त्यातून आकाराला आलेला सांस्कृतिक दहशतवाद जगाच्या पाठीवर सारखाच असावा कमी जास्त प्रमाणात. त्याच्या स्वरूपाविषयी म्हणाल तर छळवादाचं मूळ समाजशास्त्रात सापडतं. वर्णविद्वेषातून निर्माण होणाऱ्या जातीय विद्वेषाचा इतिहास नवं वळण घेत असतो. पण तो संपत नाही. त्यात भिन्नताही नसते. जोपर्यंत समाजविभाजनाची मानसिकता बळ एकवटून बलदंड होण्याकडे कल असतो तोपर्यंत फुले, आंबेडकर विचारांचे संदर्भ समाजशास्त्रांच्या  अभ्यासकांना घ्यावे लागतील. त्यांचं अलौकिक कार्य केवळ दर्शकच नव्हे तर ब्राह्मणी धर्मकांडातून सातत्याने नव्या अवतारात जन्म घेत असताना डॉ. गेल ऑमव्हेटचं काम आणि संशोधन किती महत्त्वाचं आहे हे लक्षात येतं. अशा माणसांची भेट आणि विचार समजून घेणं ही एक उपलब्धी पत्रकार असल्याने घेता आली. मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या वेळी. सर्वसामान्य समाज आपल्या सत्तेखाली ठेवण्यासाठी त्यांना कर्मकांडात गुंतवून ठेवणं याला उच्चवर्णीयांनी प्राधान्य दिल्याचं म. फुले यांनी ध्यानात घेऊन त्याविरुद्ध विचार मांडायला सुरुवात केली, त्यावेळचे त्यांच्यावर गुदरलेले अनेक प्रसंग अंगावर काटा आणणारे आहेत.

‘माध्यमांमधून कर्मकांडाचा उदोउदो कसा होता’ यावर डॉ. गंगाधर पानतावणे यांच्या घरी डॉ. गेल ऑमव्हेट चर्चा करीत होत्या. ओघाने हिंदू-मुस्लिमांत भ्रामक तेढ निर्माण करून उच्चवर्णीय जे साधायचं ते कसं साध्य करतात हे समजून सांगत होत्या. त्यांचं सांगणं अमेरिकेच्या काळ्या-गोऱ्याच्या पार्श्वभूमीवर होतं, धनदांडगे, भांडवलदार यांच्या सनातनीवृत्तीचा प्रवास त्यातून कळत गेला. पूर्वी तो फुले, आंबेडकर यांच्या लेखनातून कळत गेला. परंतु डॉ. गेल ऑमव्हेट या अमेरिकन विदुषीच्या मुखातून ऐकण्यात नक्कीच वेगळेपण होतं. वेदपुराणाचा अन्वयार्थ लावताना अमेरिकन उच्चाराबरोबर मध्येच गमतीशीर येणारे मराठी उच्चार भारतीय माणसांना कुतुहलाचे होते. त्यातून कळून यायची ती चळवळीची भाषा. त्यातील तळमळ आणि ब्राह्मणी वर्चस्वाचा एक समाजशास्त्र म्हणून केलेला अभ्यास. देशभर भटकंती करून प्रत्येक प्रांतात बहुजन समाजावर असलेला वेदपुराणाचा प्रभाव आणि त्यातून सत्ता गाजवणं यावर त्या बोलत होत्या. त्यावर कोणाचा उदरनिर्वाह अवलंबून असतो याची आकडेवारी सांगत होत्या. त्यातील आर्थिक शुचितेचा आलेख मांडत होत्या. उपेक्षित वर्गाच्या चळवळीतील अनुभव सांगताना अधूनमधून डोळे पुसत होत्या. भाकरीचा प्रश्न सोडवायचा असेल तर म. फुले समग्र वाचला पाहिजे असं वाटणं आणि तेही समोरच्या माणसांना सांगताना त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता एका प्रकारचा आशावाद.

सत्ताधारी व्यवस्थेला बदल नको असतो. मत मागण्याची पंचवार्षिक योजना डोळ्यासमोर ठेवून त्या चळवळी दाबत असतात. त्यांचा पिळवणूक साधनांचा अभ्यास झालेला असतो. हे डॉ. गेल यांचं विधान नवं नसलं तरी पुन्हापुन्हा विचार करायला लावणारं होतं. आमच्या लेखी ते नव्याने जाणीवजागृती करणारं होतं. ते त्यांचे संघटनात्मक विचार होते म्हणून पटणंही स्वाभाविक होतं.

जन्मानं अमेरिकन असलेल्या डॉ. गेल ऑमव्हेट अभ्यासानिमित्त भारतात आल्या आणि भारतीय मातीच्या झाल्या. कासेगाव म्हटलं की क्रांतिकारक बाबूजी पाटणकर आठवतात. बंडखोर चळवळीतील इंदूताई पाटणकर आठवतात. त्या घराण्याची त्या सून झाल्या. अमेरिकेतील अनेक चळवळीत त्यांचा सहभाग होता. साम्राज्यवादी अमेरिकेतील नागरिकांच्या मानसिकतेचा त्यांचा असलेला सखोल अभ्यास श्रमिक मुक्ती दलाच्या स्थापनेला प्रेरणा देणारा ठरला. वेगळीवेगळी मांडणी करीत राहिल्या, फिरत राहिल्या, झिजत राहिल्या. एखाद्या प्रवृत्तीचा इतका सखोल अभ्यास ग्रंथातून देत राहिल्या. तरुणाई वाचत राहिल्या.

अमेरिकेतील शिक्षण पूर्ण करून भारतातील चळवळीचा अभ्यास करण्यासाठी पहिल्यांदा त्या भारतात आल्या, त्यातही त्या महाराष्ट्रात आल्या. डॉ. भारत पाटणकर यांच्या भेटीनंतर श्रमिक क्रांती दलाच्या उभारणीत सहभागी होत होत स्त्रीमुक्ती विचाराला प्राधान्य देत राहिल्या. बहुजन समाज पक्षाच्या प्रारंभी त्यांच्या सखोल अभ्यासाचा उपयोग होत असल्याचा अनेकदा उल्लेख काशिराम करीत असत.

कुठं कॅलिफोर्निया, कुठं कासेगाव. कुठं बर्कले विद्यापीठ,कुठं भारतीय विद्यापीठं. तसा काही अर्थाअर्थी संबंध नाही. महात्मा फुले यांनी केलेल्या संघर्षाने भारतीय मातीवर पाऊल ठेवण्याची त्यांना प्रेरणा मिळाली ही गोष्ट खरीच होती. महाराष्ट्रातील स्त्रीमुक्तीच्या संदर्भाने अभ्यास करीत असताना पहिल्याच भेटी भारत पाटणकर यांच्या मातोश्री इंदूताईंचा प्रभाव पडणे आणि जन्मदात्या मायभूमीला अलविदा करणे ही गोष्ट मुळातच कठीण असते. आपली अक्कल गुंग करणारी वाटते. कारण आपली झेप तिथपर्यंत जाणं शक्य नसतं. मतलबी जीवन तसं होऊ देत नाही. या पार्श्वभूमीवर ही विदुषी कितीतरी थोर म्हणायची. एकदा, दोनदा कासेगावला जाणं झालं. त्या गावचा आराखडा समोर आणला तर अमेरिकेत वाढलेली, शिकलेली बाई कासेगावात कसं राहू शकते हा डॉ. गेल ऑमव्हेट यांच्या मनाला स्पर्श न करणारा विचार माझ्या मनात कसा येत राहिला हे कळलंदेखील नाही.

जनसामान्यांच्या जगण्याला हिरवे अर्थ यावेत या एकाच ध्यासातून हे झालेलं होतं. जगण्यातील एक महत्त्वाचा संकल्प म्हणून. ‘आमच्या देशीचे अतूल स्वामी वीर होते, रणधीर याचा विचारही म. फुले तितक्याच तडफेनं करीत होते. ही तडफ ज्या पद्धतीने त्यांचं वेगळेपण सांगते, त्याच पद्धतीने डॉ. गेल यांनी वारकरी संप्रदायाचा अभ्यास केला. पायी वारी करून. संतसाहित्य समजून घेतलं. हे विचारधन मन बदलासाठी उपयोगी पडतं का हेही ताडलं. नित्यनेमाने अंधश्रद्धेची पूजा बांधणाऱ्या वर्गाविषयी वेळोवेळी काळजी व्यक्त केली.

उत्तर पेशवाईत वाईला आलेलं महत्त्व, धर्ममार्तडांनी मांडलेला बाजार, सावकारशाहीचं प्रस्थ, त्यातून अस्तित्वात आलेली गुलामगिरी, पुरुषसत्ताक पद्धतीला पेशव्याने दिलेलं समर्थन आणि पाठिंबा, त्यातून बळकट झालेली पुरुषांची मिरासदारी या गोष्टींचा अभ्यास केल्याशिवाय स्त्रीमुक्ती चळवळीची दिशा नक्की करता येत नाही. सत्यशोधक परंपरेची खरी सुरुवात कदाचित ती असावी. भावनिक ऐक्यापेक्षा पहिली बाजू त्यांना अधिक विचार करायला लावत असावी. तळागाळातील समाजघटकाचा अभ्यास भारतीय समूहासमूहांच्या वेगवेगळ्या संस्कृतींचा अभ्यास. त्यातही जाणवलेला पराकोटीचा फरक. विशेषत: स्त्रियांबद्दल, कष्टकरी कामगारांविषयी समजून घेणं डॉ. ऑमव्हेट यांच्या संवेदनशील मनाची व्याप्ती सांगून जाणारा वाटतो. तेही संघर्षतुल्य समजून केलेला सतत वाटतो. तणावविरहित राहणं त्यांना जमून गेलं होतं. मनाच्या पाकळ्या कळीसारखं उमलत नेणं हा त्यांचा अभ्यासक म्हणून महत्त्वाचा गुण वाटतो. साताऱ्यातील वास्तव्यात ते अधिक जाणून घेता आलं, २००३च्या काळात. सिद्धांतांच्या आहारी न जाता वर्तमान तपासण्यासाठी सामाजिक प्रश्न व त्यांचे संदर्भ हाताशी यावे लागतात, तसे त्यांच्या हाती आलेले होते. वर्चस्ववादी वर्तनाने मध्यमवर्गीय जाणिवांचं झालेलं पोषण हा मोठा अडथळा पार करून काम करीत राहणं हा त्यांचा नियम असावा. त्यासाठी असावी लागते ती समाजनिष्ठ मूल्यांची गरज. ती गरज ओळखून त्यांचं चळवळीतलं एक एक पाऊल पडत होतं, पक्कं होत होतं. मातीची अचूकता त्यात होती. अभिजनी संस्काराची ओळख जन्मजात असल्याने मूळ संशोधनात बाधा येऊ दिली नाही. पारंपरिक मौनवादाची खरी ओळख त्यांना भारतात आल्यावर अधिक झाली. या म्हणण्याला पुष्टी देणारे अनेक संदर्भ त्यांनी केलेल्या संशोधनातून हाती लागतात.

महाराष्ट्रातली परित्यक्ता चळवळ, बळीराजा धर्माची निर्मिती, विशेषत: दुष्काळी प्रदेशातील अल्पभूधारिकांसाठी काम जवळपास अठ्ठावीस वर्षं सातत्याने करताना ना प्रदेश आडवा आला ना देश. मग तो पश्चिम महाराष्ट्र असो नाहीतर अन्य भूभाग. चळवळीत जितका जीव ओतला तितकाच देशातील विद्यापीठांतून व्याख्यानं देताना. या सर्वातून निर्माण झालेले ग्रंथ हे चळवळीतल्या कार्यक्रर्त्याचं संचित समजलं जावं इतकं ते महत्त्वाचं वाटतं. मग ते लोकपरंपरा, संत साहित्याच्या दृष्टीने महत्त्वाचं ठरतं. समानतेसाठीचं तत्त्वचिंतन त्यात आहे. जातिअंताच्या लढाईचं महत्त्व, महिलांच्या सबलीकरणासाठी हाताला काम मिळवून देण्यासाठीचा आग्रह आणि त्यातून त्यांच्या बलसमृद्धीला मिळणारी दिशा हा डॉ. ऑमव्हेट यांनी अनेक चळवळींना दिलेला ठेवा आहे. वारंवार आपलीच उजळणी करण्यासाठीचा. म्हणूनच त्या खऱ्याखुऱ्या भारतीय नागरिक ठरतात.  या पार्श्वभूमीवर आपणही तेवढे ठरत नाही हे प्रामाणिकपणे कबूल केलं पाहिजे. त्यात आपल्या, समाजाचाही तेवढाच फायदा आहे.

बुवा होण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या शिक्षणाची गरज लागत नाही. बुवा म्हणजे भूमिगत गुंड असतात. या गुंडांनी पोखरलेली समाजव्यवस्था त्यांनी अमेरिकेपेक्षा भारतात अधिक पाहिली आणि त्याच्या दुष्परिणामाचा वेध घेतला. हा मनोविकाराचा एक भाग समजून त्यावर त्या विचार मांडत राहिल्या. या निमित्ताने डॉ. गेल यांनी हाताळलेल्या प्रश्नाकडे जरी पाहिलं तरी त्यांच्यांतल्या समाजशास्त्र्याचा आवाका लक्षात येईल. तोही नवा प्रवाह घेऊन. चळवळीला बलस्थान देण्यासाठी. त्याविषयी कार्यकर्त्याची नेमकी भूमिका काय होती, काय आहे हे समजून घ्यावं लागेल. एक जरुरीचा भाग म्हणून. कारण प्रत्येक घटनेचा अपरिहार्य परिणाम असतो. त्याशिवाय  वेगळं काही हाती येत नसतं. चळवळीने निर्माण केलेल्या नवीन परिस्थितीचं आकलन त्याविषयी होणार कसं? पत्रकार म्हणून मला ते समजून घेणं गरजेचं वाटलं. त्याविषयी आपली वाट आपल्या पद्धतीने चालणं सोपं जात नाही. केवळ भावना तीव्र असून चालत नाही. पूर्वपक्ष आणि उत्तरपक्ष याची ओळख पटण्यासाठी क्षणकाळाचा विचार न करता अशा माणसांना भेटण्याची संधी घेतली पाहिजे. ती मी घेतली. काळाच्या ओघात काय उपयोगी पडेल ते सांगता येत नाही म्हणून. तसे आपण मूळ मुद्दा कधीच सांगत नाही हेच खरं नाही का?

आभासात ठेवणं आणि कायम राहणं ज्यांना आवडतं त्यांच्यासाठी डॉ. गेल ऑमव्हेट यांचं संशोधन हेच खरं बुद्धिवर्धक औषध असावं. पतनाचं ज्यांना ज्यांना भय वाटतं त्यांनी ते आधी घ्यावं. स्वत:ची वैचारिक वाट लागण्याच्या आधी.

सध्याचा काळ तलवारीचा लोभ वाढवणारा आहे. अगदी सुखवस्तू समाजातल्या तरुणांनाही. या मानसिकतेचं स्कॅनिंग केल्यावर असं वाटतं की, गेल ऑमव्हेट यांनी केलेला बुद्धिझमचा विचार त्यांच्या समोर ठेवणं गरजेचं आहे. नाहीतर जे नको त्या वेळी तलवार हातात घेऊन ‘वतनपरस्त शहिदों की खाक लाएंगे, हम अपनी आँख का सुरमा उसे बनाएंगे’. म्हणून बुद्धाविषयीचं तत्त्वज्ञान आज ना उद्या स्वीकारावं लागेल. त्याचा काय प्रत्यय येतो ते बघणं क्रमप्राप्त ठरेल. आणि विकासाची संधी प्रत्येकाला घेता येईल. यानिमित्ताने ती घेऊया!

(सर्व छायाचित्रे प्राची पाटणकर यांच्या फेसबुकवरून साभार )

महावीर जोंधळे, ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: