ख्रिसमस पार्टीत अडकले बोरिस जॉन्सन

ख्रिसमस पार्टीत अडकले बोरिस जॉन्सन

जॉन्सन जेव्हढा जेव्हढा नकार देत राहिले तेव्हढं तेव्हढं इतर अनेक पार्ट्या झाल्याचं सत्य बाहेर आलं. राणीचे पती वारल्यानंतर राणी व देश शोकात बुडालेला असतानाही जॉन्सनच्या सहकाऱ्यांनी पार्ट्या केल्या हेही उघडकीला आलं.

खोटारडे पंतप्रधान
जॉन्सन, पोस्ट ट्रुथ आणि बहुसांस्कृतिवाद
लोकशाहीचं मातेरं

बोरिस जॉन्सन यांच्या अधिकृत घरामधे, १० डाउनिंग स्ट्रीटमधे, गेल्या वर्षी ख्रिसमसची पार्टी झाली. पार्टीत चाळीस ते पन्नास माणसं हजर होती. पार्टी म्हटल्यावर जे काही होत असतं ते या पार्टीत झालं. सरकारी अधिकारी त्या पार्टीत होते. खुद्द बोरिस जॉन्सनही त्या पार्टीत काही वेळ सहभागी झाले होते.

ज्या दिवशी पार्टी झाली त्याच दिवशी इंग्लंडमधे पाचेकशे माणसं कोविडनं मेली होती. पार्टीच्या आधी दोनच दिवस सरकारनं जनतेला सांगितलं होतं की कोविडपासून सावध रहावं, समारंभ करू नयेत, पार्ट्या करू नयेत, लोकांनी एकत्र येऊ नये, ख्रिसमस साजरा करू नये.

पार्टीचं प्रकरण पेपरांनी, वाहिन्यांनी बाहेर काढलं.

विरोधी पक्षाच्या खासदारांनी सरकारचं बेकायदेशीर आणि अनैतिक वागणं सभागृहासमोर ठेवलं. बोरिस जॉन्सन यांनी पार्टी झाल्याचा इन्कार केला. खासदारांनी पुरावे मांडल्यावर जॉन्सननी ”समजा अशी पार्टी झाली असेल तर तिची चौकशी करण्यासाठी”,  एका सनदी अधिकाऱ्याला चौकशीसाठी नेमलं.

जॉन्सन जेव्हढा जेव्हढा नकार देत राहिले तेव्हढं तेव्हढं इतर अनेक पार्ट्या झाल्याचं सत्य बाहेर आलं. राणीचे पती वारल्यानंतर राणी व देश शोकात बुडालेला असतानाही जॉन्सनच्या सहकाऱ्यांनी पार्ट्या केल्या हेही उघडकीला आलं.

डाऊनिंग स्ट्रीटमधल्या पार्टीत भाग घेतलेल्या एका महिलेची आई पार्टीत झालेल्या संसर्गामुळं मेली होती हेही उघड झालं.

जॉन्सन सर्व घटना नाकारत राहिले. त्यांनी एकच पालुपद लावून धरलं, सरकारनं कोविडविषयक नियमांचं आणि निर्बंधांचं पालन केलं आहे.

लोकसभेत त्यांच्याही पक्षाच्या खासदारांनी आणि मंत्र्यानी जॉन्सन यांच्यावर ते खोटारडे आणि बेशरम आहेत असा आरोप केला, राजिनामा मागितला. जॉन्सननी समजा तसं घडलं असल्यास मी माफी मागतो अशी सशर्त माफी मागितली. जॉन्सन म्हणत राहिले “तुम्ही ज्याला पार्टी म्हणता ती पार्टी नव्हती ती एक मिटिंग होती.” या तथाकथित मीटिंगमधे दारू प्याले, खेळ खेळले, लोकांना ख्रिसमसच्या भेटवस्तू दिल्या गेल्या. कोणत्या मीटिंगमधे दारु आणि खेळ होतात?

ब्रिटनमधल्याच नव्हे युरोपातल्या तमाम पेपरांनी जॉन्सनना झोड झोड झोडलं. दांभीक, नालायक, बेफिकीर, खोटारडा, ब्रिटनला खड्ड्यात घालणारा अशी विशेषणं त्यांना लावली. जॉन्सन थंड. ढिम्म.

जॉन्सन पंतप्रधानपद सोडायला तयार नाहीत. पक्षाची पूर्ण वाट लावल्याशिवाय ते पदावरून उतरणार नाहीत हे निश्चित. लोकांनी अंगावर अंडी आणि टमाटे फेकायची ते वाट पहात आहेत.  त्यांचा पक्ष त्यांना हाकलेल एव्हढं निश्चित, फक्त दिवस निश्चित नाही.

सरकार चालवणं, लोकशाही अमलात आणणं याचा दीर्घ अनुभव ब्रिटनला आहे. राजकारणातल्या लोकांच्या वागण्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या यंत्रणा ब्रिटननं हजारभर वर्षात निर्माण केल्या आहेत. त्यांचा प्रत्यय ब्रिटनमधे नेहमी येत असतो. युद्ध जिंकणाऱ्या चर्चिलना ब्रिटननं युद्ध संपल्यानंतर सत्तेतून हाकलून दिलं. चर्चिल यांच्या गुणांबद्दल त्यांचं कौतुक केलं आणि त्यांच्यातल्या दुर्गुणांबद्दल त्यांना यथेच्छ झोडपलं. संस्था आणि नियम यांच्या पालनाची सवय लागल्यानं ब्रिटीश माणसं पुढाऱ्यांना, मंत्र्यांना, मापात ठेवतात (बरेच वेळा, नेहमीच नव्हे).

जॉन्सन यांनी नुकतंच एक लफडं केलं होतं. त्यांनी अधिकृत निवास स्थानाच्या शेजारी एक मोठा फ्लॅट घेतला. व्यक्तिगत उपयोगासाठी. तो फ्लॅट सजवणं, ठीकठाक करणं यासाठी लाख दीड लाख पाऊंड त्यांनी खर्च केले. ते पैसे त्यांनी स्वतःच्या खिशातून खर्च केले नाहीत. सरकारचे पैसे खर्च केले. बोंब झाली तेव्हां एका मित्राला ते पैसे पक्षाला दान करायला सांगितले, पक्षाने ते पैसे सरकारकडं जमा केले.नंतर ते पैसे त्यांनी स्वतः त्या मित्राला परत केले.

पण हा सारा उद्योग जेव्हां त्यांच्या उद्योगाची चौकशी झाली तेव्हां केला.

त्यांच्या या उद्योगाची चौकशी केली निवडणुक आयोगानं. निवडणुक आयोग मंत्री, पंतप्रधान यांना मिळणाऱ्या देणग्या इत्यादींवर लक्ष ठेवत असतो.

भानगड अशी होती की बोरिस जॉन्सन यांच्या एका मित्राला, तो मित्र ज्या संस्थेचा प्रमुख आहे अशा संस्थेला, लंडनमधे होऊ घातलेल्या सांस्कृतीक महोत्सवाचं यजमानपद हवं होतं. जॉन्सन यांच्या फ्लॅटच्या नूतनीकरणासाठी त्या मित्रानं पैसे दिले आणि त्याला यजमानपद मिळालं. या दोन घटनांचा अर्थ बोरीस जॉन्सन यांनी लाच घेतली असा होतो. स्वतःचं घर सजवलं आणि त्या बदल्यात एक उपक्रम बहाल केला. आयोगानं पंतप्रधान जॉन्सन यांचे टेलिफोन आणि व्हॉट्सअप मेसेजेस वगैरे तपासले, देणगी आणि यजमानपद यातला संबंध हुडकला.

आणखी एक गोष्ट. मंत्रीमंडळाच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी, मंत्रीमंडळ कायद्याला धरून वागतं की नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी एक स्वतंत्र (राजकीय पक्षाशी संबंध नसणारा) अधिकारी नेमला जातो. त्यानं कोणत्याही दबावाला बळी न पडता कारभारावर लक्ष ठेवावं अशी अपेक्षा असते. त्या अधिकाऱ्यानं जॉन्सन यांनी केलेल्या वरील उद्योगात लक्ष घातलं आणि जॉन्सन यांच्याकडून माहिती मागवली.

अशा रीतीनं दोन बाजूनी चाप लागल्यावर जॉन्सन यांनी मित्रानं दिलेले पैसे परत दिले, स्वतःच्या खिशातून.

या सगळ्या गोष्टी वेळोवेळी बीबीसी आणि इतर पेपर उघड करत होते.

पार्टी प्रकरणी चौकशी करण्यासाठी सू ग्रे या ज्येष्ठ सनदी अधिकारी महिलेची नेमणूक जॉन्सन यांनी केली. या अधिकारी तटस्थपणे चौकशी करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. जॉन्सन यांच्या आधी थेरेसा मे पंतप्रधान होत्या, त्यांच्या मंत्रीमंडळातले डेमियन ग्रीन हे मंत्री गैरवर्तनाच्या प्रकरणात सापडले होते. महिला पत्रकाराशी लैंगिक लगट करण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. ग्रे यांनी त्या प्रकरणाची चौकशी केली. सर्व पुरावे तपासले. पुराव्यांत संदिग्धता होती, विसंगती होत्या. ग्रे यांनी ती निरीक्षणं मांडली पण अहवाल देतांना मंत्र्यानं गैरवर्तन केलं असण्याची शक्यता आहे असं नोंदवलं. मंत्र्यानं राजीनामा दिला.

ब्रिटनमधली नोकरशाही स्वतंत्रपणे अस्तित्वात येते. परिक्षा घेऊन त्यांची निवड होते. पक्ष यंत्रणा, सरकार यांच्यापासून ती यंत्रणा अलिप्त असते. सरकार या यंत्रणेवर दबाव आणतं, यंत्रणा वाकवण्याचा प्रयत्न करतं. कधी यंत्रणा पक्षपाती होते, कधी होत नाही. संबंधित अधिकाऱ्याचा कणा कितपत ताठ आहे यावर यंत्रणेचा तटस्थपणा ठरतो. विधीमंडळ, न्यायव्यवस्था, वचक आणि तोल सांभाळण्यासाठी तयार केलेल्या यंत्रणा तटस्थ ठेवल्यानंच सत्तेचा गैरवापर टाळणं शक्य होतं. त्यामुळंच जरा वाच्यता झाली तरी मंत्री राजीनामे देतात कारण वरील लक्ष ठेवणाऱ्या यंत्रणा आपल्या चिंध्या करतील याची खात्री त्यांना असते.

नोकरशाही,न्याय व्यवस्था, स्वतंत्र विधी मंडळ इत्यादी परंपरा भारतानं ब्रिटिशांकडूनच घेतल्या आहेत.

मॅग्ना कार्टापासून, म्हणजे तेराव्या शतकापासून, ब्रिटन लोकशाही संस्था आणि परंपरा घडवत आलं आहे. भारतात तशा परंपरा घडवण्याला १९५० पासून सुरवात झालीय. सत्तेसाठी धडपणाऱ्याना नियम, परंपरा, बंधनं, नेहमीच जाचक वाटत असतात. भारतात पहिली निवडणूक, पहिली लोकसभा,  झाल्यापासून लोकशाही गुंडाळून ठेवण्याचे प्रयत्न झाले आणि लोकशाही जपण्याचेही प्रयत्न झाले.

लोकशाही भारताला नवी आहे. तिला धडका बसत असतात. नरेंद्र मोदी ही व्यक्ती आणि संघ-भाजप या संस्था लोकशाही त्यांच्या स्वार्थासाठी वाकवत आहेत. काँग्रेसनं नाही का लोकशाही धाब्यावर बसवली असं म्हणत ती लोकं स्वतःच्या वर्तनाचं समर्थन करत आहेत. हा भारतात लोकशाही रुजण्याच्या प्रक्रियेतला एक टप्पा आहे. असो.

तूर्तास बोरीस जॉन्सन या खोटारड्या, उद्धट माणसाचं काय चाललंय त्यावर लक्ष ठेवूया.

निळू दामले लेखक आणि पत्रकार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0