नवी दिल्लीः राजधानीतील कोविड-१९ बाधित रुग्णांना गौतम गंभीर फाउंडेशनकडून पुरवण्यात आलेले फेबीफ्लू औषधाचे वितरण, या औषधाची खरेदी व साठवणूक अवैध असल्याचा
नवी दिल्लीः राजधानीतील कोविड-१९ बाधित रुग्णांना गौतम गंभीर फाउंडेशनकडून पुरवण्यात आलेले फेबीफ्लू औषधाचे वितरण, या औषधाची खरेदी व साठवणूक अवैध असल्याचा ठपका दिल्ली सरकारच्या औषध नियंत्रकने भाजपचे खासदार गौतम गंभीर यांच्यावर ठेवला आहे आणि तसे उत्तर दिल्ली औषध नियंत्रकांनी दिल्ली उच्च न्यायालयात गुरुवारी दिले.
आता न्यायालयाने या प्रकरणातील संपूर्ण चौकशी अहवाल औषध नियंत्रकांना येत्या ६ आठवड्यात दाखल करावा असे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी २९ जुलैला होणार आहे.
औषध नियंत्रकांनी दोषी ठरवल्यानंतर गौतम गंभीर यांनी आपण माणूस असून मानवजातीवर आलेल्या अरिष्टामुळे आपण काळजीत असल्याचे ट्विट केले.
या पूर्वी आम आदमी पार्टीचे आमदार प्रवीण कुमार यांनाही ड्रग्ज अँड कॉस्मॅटिक कायद्यांतर्गत औषध नियंत्रकांनी दोषी ठरवले होते. त्या नुसार गौतम गंभीर फाउंडेशनही दोषी असल्याचे औषध नियंत्रकांचे म्हणणे आहे.
गुरुवारी औषध नियंत्रकांनी न्यायालयात सांगितले की, गंभीर फाउंडेशन व त्यांना औषध पुरवणारे औषध व्यापारी यांच्यावरही त्वरित कारवाई केली जाणार असून हे फाउंडेशन व औषध व्यापारी या नियमांचा भंग करून फेबीफ्लू औषधाचे कोविड-१९ रुग्णांना वाटप करत होते. तसेच या औषधाची अवैध खरेदी व साठा करत होते.
काही दिवसांपूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाने गौतम गंभीर यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर फेबीफ्लू कसे खरेदी केले जात आहे, असा सवाल औषध नियंत्रक मंडळाला केला होता व या प्रकरणात औषध नियंत्रक मंडळ या करत आहे, अशी विचारणा केली होती. काही जण परिस्थितीचा फायदा घेत आपण मदत करत असल्याचा आव आणत असल्याकडे न्यायालयाने लक्ष वेधले होते.
न्यायालयाने गंभीर यांनाही कडक शब्दांत फटकावले. आपण कोविड रुग्णांना मदत म्हणून औषध देत असला तरी अशी औषध खरेदी करून आपण टंचाई निर्माण करत आहात आणि अनेक कोरोना रुग्णांना टंचाईमुळे वेळीच औषध मिळत नाही. लोकांना मदत करण्याचे अन्य पर्याय आहेत, असे न्यायालयाने म्हटले आहे.
दिल्लीत कोरोनाची दुसरी लाट वेगाने आल्यानंतर तेथे औषधे व अन्य आरोग्यसेवांची अभूतपूर्व टंचाई निर्माण झाली होती. त्यावेळी २१ एप्रिलला गौतम गंभीर यांनी आपल्या मतदारसंघात कोरोनाप्रतिबंधक औषध मोफत वाटण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यावर अनेकांनी आक्षेप घेतला होता. या आक्षेपावर प्रतिक्रिया देताना औषधांची खरेदी ही साठेबाजी नसून वेळप्रसंगी गरीबांना मदतीसाठी आपण औषध खरेदी करत असल्याचे गंभीर यांनी म्हटले होते.
मूळ बातमी
COMMENTS