वसुंधरा दिवस आणि महाराष्ट्रातील किनारी पाणथळ क्षेत्र

वसुंधरा दिवस आणि महाराष्ट्रातील किनारी पाणथळ क्षेत्र

२२ एप्रिल हा दिवस जगभरात ‘वसुंधरा दिवस’ म्हणून साजरा होतो. या निमित्ताने महाराष्ट्रातील पाणथळ परिसंस्थेचा घेतलेला आढावा.

यूएपीएचा इशारा देत पर्यावरण मोहीम वेबसाइट ब्लॉक
स्वच्छ पर्यावरण, स्वच्छ हवा हा मूलभूत अधिकार
दोन दिवसांत मान्सूनच्या आगमनाची शक्यता

दिनांक २८ जानेवारी १९६९ मध्ये अमेरिकेतील सांता बार्बरा या समुद्र किनाऱ्यालगत चालू असलेल्या खनिज तेल विहीर योजनेमध्ये अचानक काही बिघाड झाला आणि समुद्रात साधारण तीन दशलक्ष गॅलन इतकं तेल सर्वत्र पसरलं. या तेल गळतीमुळे १०,००० पेक्षा अधिक समुद्री पक्षी आणि सागरी सस्तन प्राणी (डॉल्फिन, सील, सीलायन) मृत पावले. या दुर्घटनेनंतर पृथ्वीवरील वरील सर्व प्रजाती आणि नैसर्गिक अधिवास याबाबत संवर्धन आणि रक्षण करण्यासाठी एक साखळी प्रक्रिया सुरू झाली. याची परिणीती म्हणून सर्वप्रथम अमेरिकेतील सिनेटचे सदस्य गेलॉर्ड नेल्सन यांनी पर्यावरण रक्षण आणि जागरूकता व्हावी म्हणून ‘वसुंधरा दिवस’ साजरा करण्यास सुरवात केली. दरवर्षी २२ एप्रिल हा दिवस जगभरात ‘वसुंधरा दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो.

किनारी पाणथळ क्षेत्र हा एक अतिशय दुर्लक्षित परंतु तेवढाच संवेदनशील असा नैसर्गिक अधिवास आहे. यंदाच्या वसुंधरा दिनी या लेखाच्या माध्यमातून ‘महाराष्ट्रातील किनारी पाणथळ क्षेत्र आणि पक्षी विविधता’ समजून घेण्याचा प्रयत्न करू.

२०१५ हे ते वर्ष असेल जेव्हा मी छापील अभ्यासक्रमाव्यतिरिक्त महाविद्यालयीन शिक्षणात जीवनाशी संबंधित काहीतरी चांगले, अधिकाधिक सुसंगत शिकलो. ज्याची सुरुवात ‘वेटलँड हॅबिटॅट’ या संशोधन विषयापासून झाली. मला पहिल्यांदाच मुंबईच्या आजूबाजूच्या पाणथळ प्रदेशांबद्दल अधिक माहिती मिळाली. या परिसंस्थेची सद्यस्थिती, ज्याला इंग्रजीत ‘वेटलँड’ असे म्हणतात, ती बहुधा सर्वत्र ‘वेस्टलँड’ सारखीच आहे. पाणथळ जागा ही असा नैसर्गिक अधिवास आहे जो पाण्याने आच्छादित असतो, कधी पूर्णवेळ तर कधी काही विशिष्ठ वेळ विशिष्ट ऋतु किंवा दिवसाच्या विशिष्ठ वेळी पाण्याने आच्छादित असतो. त्यामुळे तुम्हाला असे वाटेल की ह्या जागेची व्याख्या करताना याला एखादा जलभाग वा पाणवठा म्हणावा किंवा जमीन. पाणथळ अधिवास किंवा पाणथळ क्षेत्र हे जगातील सर्वात जैवविविधता-समृद्ध परिसंस्थांपैकी एक म्हणता येईल, कारण पाणी आणि जमीन येथे सतत संक्रमण स्थितीत असतात यांमुळे कित्येक जैविक घटकांना हे एक पोषक अधिवास पुरवतात. वर्ष १९९५ मध्ये  दोन पर्यावरणशास्त्रज्ञ लुईस एम. कॉवार्डिन आणि फ्रान्सिस सी. गोलेट यांनी विशिष्ट ठिकाणच्या जलविज्ञान, पर्यावरणीय आणि भूगर्भशास्त्राच्या आधारे पाणथळ अधिवासची व्याख्या आणि प्रकार यांचा आढावा घेतला. ज्यामध्ये किनारी पाणथळ प्रदेश (किना-याची भरती ओहटी यामध्ये असलेला भाग), नदी मुखांवरील प्रदेश (खाडी, डेल्टा, भरती-ओहोटी आणि खारफुटी), नदीकिनारी (नद्या आणि नाले) तलाव, दलदलीचा प्रदेश आणि कायमस्वरूपी किंवा तात्पुरता पाणवठा यांचा समावेश होतो. रामसार कन्व्हेन्शन अंतर्गत किनाऱ्यावरील पाणथळ प्रदेशांचा समावेश करण्यासाठी विस्तृतपणे परिभाषित करण्यात आले की “समुद्री पाण्याचे क्षेत्र ज्याची खोली ओहोटीच्यावेळी सहा मीटीरपेक्षा जास्त नसते” अशी जागा. १९९५ पासून ते आतापर्यंत अनेक ठिकाणी पाणथळ जागा म्हणजे काय असं म्हणून यात अनेक नवीन प्रदेशाची भर पडली आहे.

वर्ष २००७-२०१० या कालावधीत पर्यावरण आणि वन मंत्रालय (MoEF), भारत सरकार यांच्या अथक प्रयत्नाने  नॅशनल वेटलँड इन्व्हेंटरी अँड असेसमेंट (NWIA) प्रकल्प पूर्ण केला गेला ज्याचे अहवाल हे वर्ष २०१३ मध्ये प्रकाशित नॅशनल वेटलँड अॅटलस: रामसर अधिवेशन अंतर्गत आंतरराष्ट्रीय महत्त्वाची पाणथळ प्रदेशमध्ये प्रसिद्ध करण्यात आले. संपूर्ण भारत देशात असलेल्या पाणथळ क्षेत्राचा यात पुन्हा एकदा मूल्यांकन आणि वर्गीकरण करण्यात आले. किनारी पाणथळ (Coastal Wetlands) क्षेत्र आणि अंतर्गत पाणथळ क्षेत्र (Inland Wetlands) हे यातील दोन मुख्य प्रकार. किनारी पाणथळ क्षेत्र वा प्रदेश याला नैसर्गिक आणि मानवनिर्मित किनारी पाणथळ क्षेत्र या दोन उप-प्रकारात विभागण्यात येतं. नैसर्गिक किनारी पाणथळ क्षेत्र ज्या मध्ये नदी मुख, खाडी, समुद्र किनारे, खाजण, दलदलीचे क्षेत्र, कांदळवन आणि प्रवाळ भिंतीका अर्थात कोरल रीफ याचा समावेश होतो. मानवनिर्मित किनारी पाणथळ क्षेत्र ज्या मध्ये मीठागरे आणि मत्स्य उत्पादनासाठी असलेली मत्स्यशेती क्षेत्र याचं समावेश होतो. अखंड भारतात जवळपास १३०३३ विविध किनारी पाणथळ क्षेत्र आहेत जे एकूण ४,१४,०११६ हेक्टर क्षेत्रात विस्तारलेली आहेत. यामधील एकूण भारतीय पाणथळ प्रकारातील २४% क्षेत्र हे नैसर्गिक किनारी पाणथळ क्षेत्रात मोडतात तर ३% हे मानवनिर्मित सागरी पाणथळ क्षेत्र आहे. वर्ष २०११ मध्ये भारतीय पाणथळ क्षेत्र नकाशा पुस्तिका प्रकाशित करण्यात आली होती ज्या मध्ये संपूर्ण भारतातील विविधता संपन्न पाणथळ क्षेत्राचा विवरण मांडण्यात आलं आहे.

महाराष्ट्रातील पाणथळ क्षेत्राबाबत बोलायचं झालं तर जैवविविधतेने परिपूर्ण असे २,८२७ विविध किनारी पाणथळ क्षेत्र आहेत जे संपूर्ण महाराष्ट्रात १,०६,७०६ हेक्टर भागात पसरलेले आहेत. महाराष्ट्रातील एकूण पाणथळ क्षेत्रापैकी १०.५२% क्षेत्र किनारी पाणथळ क्षेत्र या प्रकारात आहे. ज्यात समावेश होतो १६२ खाड्या, ४०० समुद्र किनारे, ७५२ खाजण, ३२ दलदलीच्या जागा, १,२७० कांदळवन क्षेत्र या नैसर्गिक किनारी पाणथळ क्षेत्राचा. त्याच बरोबर २०५ मीठागरे आणि ६ नोंदणीकृत मत्स्यशेती क्षेत्राचा ज्याला आपण मानवनिर्मित किनारी पाणथळ क्षेत्र म्हणू असे आहेत.

महाराष्ट्रातील माहुल-शिवडीचे खाजण क्षेत्र आणि ठाणे खाडी कांदळवन आणि खाजण हे महत्त्वाचे पक्षी क्षेत्र (IBA) म्हणून विशेष उलेखन्नीय आहे. कित्येक पक्षी हे त्याच्या अन्न, निवारा, प्रजनन, विणीचा काळ या साठी संपूर्णपणे किनारी पाणथळ क्षेत्रांवर अवलंबून आहेत. बदके, पाणकावळे, पाणकोंबड्या, अडई, तुतारी, चिखल्या, टिलवा, धीवर, सुरय, बगळे, शराटी, करकोचे, रोहित असे विविध प्रकारचे पक्षी प्रामुख्याने किनारी पाणथळ क्षेत्रात आपल्याला नक्कीच दिसून येतात. विशेष बाब म्हणजे “मध्य आशियाई फ्लायवे’ आणि “पूर्व ऑस्ट्रेलियन फ्लायवे” हे स्थलांतरित पक्षासाठी महत्त्वाचे मार्ग हे या किनारी पाणथळ क्षेत्रातून जातात. जवळपास १२,००० किमी इतकं अंतर पार करून काही स्थलांतरीत पक्षी आपल्या किनारी पाणथळ क्षेत्रात अन्न, निवारा आणि प्रचंड थंडी आणि ऊन या पासून रक्षण मिळावं म्हणून येतात. जवळपास ३०६ विविध पक्षी प्रजातीची नोंद आतापर्यंत किनारी पाणथळ क्षेत्रात महाराष्ट्रात करण्यात आली आहे.

वाढते प्रदूषण, समुद्र किनारे आणि खाजण जमीन येथे वाढत जाणारे अनधिकृत बांधकामे आणि विकास कार्य, कांदळवनांची सरपणांसाठी होणारी तोड, प्लॅस्टिक ही काही महत्त्वाची कारणे आहेत ज्यामुळे सागरी पाणथळ क्षेत्राला धोका आहे. परंतु आनंदाची गोष्ट आहे की गेल्या दोन वर्षात या किनारी पाणथळ क्षेत्रात संवर्धन आणि रोजगार योजना या धर्तीवर कित्येक ठिकाणी विविध उत्तम कार्ये चालू आहेत. आपल्याला ही किनारी पाणथळ क्षेत्र आणि पक्षी या बाबत काही सकारात्मक गोष्ट करण्याची उर्मी असेल तर आपण आपल्या पक्षी निरीक्षणाच्या नोंदी https://www.inaturalist.org/home आणि https://ebird.org/india/home या संकेत स्थळांवर जाऊन नोंदवू शकता. भारतातील पाणथळ क्षेत्रा बद्दल अधिक समजून घेण्यासाठी https://indianwetlands.in/ येथे भेट देता येईल.

प्रदीप नामदेव चोगले, कोचीन येथे केंद्रीय सागरी मत्स्य संशोधन संस्थेमध्ये वरिष्ठ संशोधन फेलो म्हणून कार्यरत आहेत.

पक्षी आणि निसर्गाविषयी लिहिण्याची तुमची इच्छा असल्यास हा फॉर्म (bit.ly/naturewriters) भरता येईल.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0