मुंबईः युक्रेनवर रशियाने हल्ला केल्यानंतर आंतरराष्ट्रीय तेलबाजारात कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या असून गुरुवारी ब्रेंट क्रूड ऑइलचा प्रती बॅरल दर १०० ड
मुंबईः युक्रेनवर रशियाने हल्ला केल्यानंतर आंतरराष्ट्रीय तेलबाजारात कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या असून गुरुवारी ब्रेंट क्रूड ऑइलचा प्रती बॅरल दर १०० डॉलरपर्यंत पोहचला. तेलाचे दर अचानक वाढल्याने देशात अन्नधान्याच्या किमती वाढतील, वाहतूक महाग होईल व सर्वसामान्यांच्या खिशावर बोजा पडणार आहे.
भारताची कच्च्या तेलाची आयात ८४ टक्के आहे व देशांतर्गत तेल उत्पादनाने देशाची गरज भागवली जात नाही हे स्पष्ट आहे. यात तेलाचे दर वाढल्याने भारताची वित्तीय तूट वेगाने वाढेल. सध्या ही वित्तीय तूट ९.६ अब्ज डॉलर इतकी असून ती एकूण जीडीपीच्या १.३ टक्के आहे. यात एक दिलासा देणारी बाब अशी की भारताकडे परकीय गंगाजळ चांगली आहे. ११ फेब्रुवारी २०२२ पर्यंत भारताकडे ६३० अब्ज डॉलरची (४७.५२ लाख कोटी रु.) परकीय गंगाजळ आहे. या गंगाजळीमुळे परकीय चलनाचे बदलणारे दर व मागणी यामध्ये काही काळ समतोल साधता येईल.
गुरुवारी कच्च्या तेलाचे दर १०३ डॉलर प्रती बॅरल गेल्याने भारताच्या तेल मागणीवर व पुरवठ्यावर एवढा परिणाम होणार नाही असे एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले. भारताला तेलाचा पुरवठा अरब देश, आफ्रिका व उ. अमेरिकेतून होत असल्याने तेल पुरवठ्याचा प्रश्न फारसा भेडसावणार नाही, असे या अधिकाऱ्याचे म्हणणे होते. भारताच्या एकूण तेल मागणीतील ६३.१ टक्के पुरवठा सौदी अरेबिया, इराक, प. आशियातील देशांकडून होतो. तर १४ टक्के पुरवठा आफ्रिकेतून व १३.२ टक्के पुरवठा उ. अमेरिकेतून होतो. रशियाकडे युरोपमधील सर्वात मोठा तेलसाठा असून जगाच्या एकूण उत्पादनापैकी १० टक्के उत्पादन रशिया करत आहे. रशियाचा भारताला होणारा तेलपुरवठाही नगण्य असा आहे. रशिया भारताला दररोज ४३,४०० बॅरल तेल पाठवतो. तसेच रशियाकडून भारत दरवर्षी १.८ दशलक्ष टन कोळसा व २.५ दशलक्ष नैसर्गिक वायू खरेदी करतो. या खरेदीवर भविष्यात रशियावर आंतरराष्ट्रीय निर्बंध आल्यास परिणाम होऊ शकतो. रशियाच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील अर्थव्यवहारावर निर्बंध आणले जात आहेत. याला अमेरिका, युरोपिय महासंघ, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जपान आदी देशांकडून मान्यता आहे. त्यामुळे काही पेच निर्माण होऊ शकतात.
गेले ११३ दिवस देशात पेट्रोलियम पदार्थाच्या किमती स्थिर ठेवण्यात आल्या आहेत. आजपर्यंत कच्च्या तेलाचे दर ८२-८३ डॉलर प्रती बॅरल इतक्या होत्या. पण आता दर वाढल्याने व ५ मार्चला पाच राज्याच्या निवडणुका संपल्यानंतर पेट्रोलियम पदार्थाच्या किमती वाढू शकतात.
मूळ बातमी
COMMENTS