यंग इंडियन लिमिटेडचे कार्यालय सील

यंग इंडियन लिमिटेडचे कार्यालय सील

नवी दिल्लीः काँग्रेसच्या ताब्यातील नॅशनल हेराल्डचे कार्यालय असणाऱ्या परिसरातील डीने यंग इंडियनचे कार्यालय बुधवारी संध्याकाळी ईडीने सील केले. आर्थिक गैरव्यवहाराचे पुरावे गहाळ होऊ नयेत म्हणून ही पावले उचलली असल्याचे ईडीचे म्हणणे आहे.

मंगळवारी ईडीने नॅशनल हेराल्डच्या कार्यालयावर धाड टाकली होती. या धाडीवेळी हेराल्डचा कोणताही अधिकृत प्रतिनिधी उपस्थित नव्हता, त्यामुळे सर्व पुरावे एकत्र करता आले नव्हते. ते पुरावे राहावेत म्हणून सील करण्यात आले पण या कार्यालयातील अन्य भाग वापरता येईल, असे ईडीचे म्हणणे आहे.

ईडीने यंग इंडियन कार्यालयाच्या बाहेर नोटीस लावली आहे, त्यावर चौकशी अधिकाऱ्याची सही आहे.

बुधवारी कार्यालय सील करताना मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त काँग्रेसच्या मुख्यालयाबाहेर व काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या निवासस्थानाबाहेर तैनात करण्यात आला होता.

दरम्यान नॅशनल हेराल्डने आपल्या ट्विटमध्ये ईडीने कोणतेही कार्यालय सील केले नाही, असा दावा केला. आमचे कार्यालय चालूच असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

काँग्रेसचे ५ ऑगस्टला देशव्यापी आंदोलन

नॅशनल हेराल्डचे कार्यालय सील केल्यानंतर संतप्त झालेल्या काँग्रेसने पत्रकार परिषद घेत केंद्र सूडाचे राजकारण करत असल्याचा आरोप केला. ईडीच्या कारवाईविरोधात येत्या ५ ऑगस्टला देशव्यापी आंदोलन पुकारण्यात आल्याचे काँग्रेसने सांगितले. या दिवशी पंतप्रधानांच्या निवासस्थानापासून राष्ट्रपती निवासस्थानापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. पण या मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. बुधवारच्या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे नेते अजय माकन, प्रवक्ते जयराम रमेश, ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनु सिंघवी उपस्थित होते. या तिघांनी केंद्र सरकार सत्याचा आवाज द़डपत असल्याचा आरोप केला. महागाई, रोजगारी सारख्या जनतेच्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रश्नांना सरकार उत्तरे देण्यात असमर्थ ठरत आहेत. पोलिस राहुल व सोनिया गांधी यांच्या घराला वेढा घालत आहे, अशा दडपशाहीला आम्ही घाबरणार नाही असे हे नेते म्हणाले.

(छायाचित्र – पोलिसांच्या कारवाईनंतर कॉँग्रेसच्या दिल्लीमधील कार्यालयात कॉँग्रेस नेत्यांची बैठक.)

COMMENTS