एका ‘पॅन्थर’चे मनोगत

एका ‘पॅन्थर’चे मनोगत

राजा ढाले यांनी लिहिलेली, ही पोस्टर कविता मूळ लोकवाङ्मय गृहाने प्रकाशित केली. ती कविता ‘खेळ’च्या अंकामध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती. ती इथे प्रसिध्द करीत आहोत.

पाठींब्याबाबत काँग्रेसचा अद्याप निर्णय नाही
राज्य सहकारी बँक घोटाळा : सर्वपक्षीय बडे नेते अडचणीत
२४ महिला आमदारांचा फेसबुकवरचा वावर सोहळ्यांपुरताच

अरे रडता कशाला?
अजून आपल्यातला अखेरचा पुरुष मेलेला नाही
आपला वंशविच्छेद झालेला नाही
मी एवढं बोललो आणि मला भोवळ आली.
माझ्यापुढं एक शून्य पसरलं.
त्या शून्यात आमच्यापैकी प्रत्येकजण अखेरचा सूर्य होता.
आम्ही अंग मोडून पाहिलं
आमच्या मागं कोणीच नव्हतं, रडायलाही कुणीच नव्हतं.

तसं पाहिलं तर प्रत्येक माणूस अखेरचाच असतो
म्हणूनच तो प्रत्येक लढाई ही अखेरचीच निकराची लढाई
समजून का लढत नाही, हेच मला कळत नाही
कारण शेवट हा ठरलेला असतो
एकतर लढाई संपेल, एकतर आपण संपू…

बंधूनो, ही लढाई संपण्यासाठीच आपण संपत आहोत
कारण ही लढाई आपल्या अस्तित्त्वासाठी लढली आहे.
म्हणूनच प्रत्येक अखेरच्या सैनिकानं पहिल्या आघाडीतल्या
सैनिकाच्या आवेशात लढलं पाहिजे.
पराभवाला विजयात परावर्तित केले पाहिजे.

मित्रांनो, हा समतेचा लढा आहे.
अखेरचा एक जरी माणूस उरला, तरी त्यानं समतेसाठी लढलं पाहिजे.
शेवटी माणूसच उरला नाही, तर समता कुणासाठी?
म्हणूनच आपण समतेसाठी जगलं पाहिजे, लढलं पाहिजे.
अन्यथा आपण विषमतेत मरणारच आहोत.
मरण जर अटळ असेल तर लढा का अटळ असू नये समतेचा?

मित्रांनो ! पराभवाचं दुःख फार भयंकर असतं
पण त्यातूनही भयंकर विजयाचं दुःख असतं.
कारण दुःख हेच कोणत्याही परिस्थितीत अटळ आहे.
विजयातसुद्धा मेलेल्यांची बोच मनाला असते.
ज्यांच्यासाठी विजय मिळवलेला असतो
तेच धारातीर्थी पडलेले असतात.
म्हणून पराभवाच्या खुणेगाठी बांधूनच लढा.
विजयासाठी लढू नका तुमच्याही अथवा त्यांच्याही
पराभवासाठी फक्त तुंबळ लढा त्यांचा विजय अटळ आहे.

एवढं बोलूनही त्यांच्या चेहऱ्यावरच्या रेषा हलल्या नाहीत.
कदाचित त्यांचा भूतकाळ त्यांच्या पुढ्यात उभा असावा.
कदाचित भूतकाळाची तटबंदी त्यांना भविष्यात डोकावू देत नसावी.
तेंव्हा मी विजेसारखा कडाडलो : अरे तुम्ही गप्पा का?
तेंव्हा ते म्हणाले : आम्हाला शस्त्र द्या!
अरे, मरणाच्या भयानं शास्त्र हातात धरणार असाल तर
तुम्ही आधीच मेलेले आहात मग शस्त्राचा काय उपयोग?
आणि मरणाच्या तयारीनंच तुम्ही लढणार असाल तर शस्त्राची गरजच काय?
कारण, जो भ्यालेला असतो तो आधीच मेलेला असतो.
आणि जो मार्नालाही भीत नसतो, त्यालाच सगळे भीत असतात.
म्हणून मेलेल्यांना शस्त्राचा उपयोग नसतो
आणि मरावयाला ठाकलेला स्वतःच शस्त्र झालेला असतो.
अरे, स्वतःच एक शस्त्र होऊन शत्रूवर कोसळा
त्यांच्या हातातल्या तलवारी गळून पडतील!

आता मी त्या उध्वस्त खेड्याकडं पाठ फिरवली आहे
कारण मला माहित आहे, आता त्यांच्या पावलांनी जमीन दणदणार आहे
आता त्यांच्या स्वाभीमानशून्यतेचा खून झाला आहे
आता ते स्वाभिमानाचंच जिणं जगणार आहेत
आता ते लाथ मारतील तिथं पाणी काढणार आहेत
आणि एका बुक्कीत शत्रूला पाताळात गाडणार आहेत.

(‘खेळ’ आणि लोकवाङ्मय गृहाचे आभार )

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: