निवडणूक आयोगाची ममता बॅनर्जींना २४ तास प्रचारबंदी

निवडणूक आयोगाची ममता बॅनर्जींना २४ तास प्रचारबंदी

नवी दिल्लीः निवडणूक आयोगाने प. बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांना येत्या २४ तास प्रचार करण्यास बंदी घातली आहे. निवड

व्यंगचित्रकार मंजुलच्या ट्विटर खात्यावर केंद्राचा आक्षेप
कोविड-१९: तीन राज्यांत साडेतीन लाख अतिरिक्त मृत्यू, भरपाई मात्र अनेकांसाठी मृगजळ ठरणार
एक लाख एलआयसी कर्मचाऱ्यांचा वॉक आऊट

नवी दिल्लीः निवडणूक आयोगाने प. बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांना येत्या २४ तास प्रचार करण्यास बंदी घातली आहे. निवडणूक आचारसंहितेचा ममता बॅनर्जी यांनी भंग केल्याचे आयोगाचे म्हणणे असून सोमवारी मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांचा कामाचा अखेर दिवस होता. त्या दिवशी त्यांनी हा निर्णय घेतला.

ममता बॅनर्जी यांच्यावर मुस्लिम मते मिळावीत व निमलष्करी दलाच्या विरोधात ‘विद्रोह’ करावा असे आवाहन केल्याचा आरोप आहे. गेल्याच आठवड्यात त्यांच्याविरोधात कारणे दाखवा नोटीस निवडणूक आयोगाने बजावली होती.

दरम्यान, निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर मंगळवारी ममता बॅनर्जी यांनी धरणे आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले आहे. आयोगाचा निर्णय हा लोकशाही व घटनाविरोधी असल्याची टीका त्यांनी केली.

प. बंगालमध्ये ८ पैकी ४ टप्प्यांचे मतदान झाले आहे व अंतिम निकाल २ मे रोजी जाहीर होणार आहेत.

मंगळवारी मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून सुशील चंद्रा सूत्रे हाती घेत आहेत.

गेल्या आठवड्यात शनिवारी कुचबिहारमध्ये मतदानादरम्यान सीआरपीएफच्या गोळीबारात ४ जण ठार झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व ममता बॅनर्जी यांच्या आरोप-प्रत्यारोप झाले होते.  ममता बॅनर्जी यांनी सीआरपीएफ जवानांनी केलेला गोळीबार हा हत्याकांड असल्याचा आरोप केला होता तर अमित शहा यांनी सीआरपीएफच्या गोळीबाराला ममता बॅनर्जीच जबाबदार असल्याचा प्रत्यारोप केला होता.

ही घटना झाल्यानंतर या प्रकरणाचा अहवाल निवडणूक आयोगाने मागवला असून ७२ तास एकाही राजकीय नेत्याला कुचबिहारमध्ये येण्यास आयोगाने मनाई घातली होती.

४ नव्हे ८ जणांना गोळ्या मारायला हव्या होत्या…

कुचबिहारमध्ये सीआरपीएफच्या गोळीबारात ४ नव्हे तर ८ जण मरायला पाहिजे होते, असे वादग्रस्त वक्तव्य भाजपचे एक नेते राहुल सिन्हा यांनी केले आहे. सिन्हा हाबरा मतदारसंघातील उमेदवार असून त्यांनी सीतलकुची येथे ४ नव्हे तर ८ जणांना सीआरपीएफने ठार मारायला हवे होते, असे म्हटल्याने तृणमूलने त्यांच्यावर टीका केली आहे. भाजप ही अत्यंत हिंसक व विद्वेष करणारी पार्टी असून त्यांच्यावर निवडणूक आयोगाने बंदी घातली पाहिजे, अशी मागणी तृणमूलचे नेते ज्योती प्रिय मलिक यांनी केली आहे.

रविवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी कुचबिहारमधील घटनेत मरण पावलेले ४ जण गुंडप्रवृत्तीचे युवक असून त्यांनी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्याचे विधान केले होते.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: