सुवेंदू अधिकारी यांना निवडणूक आयोगाची नोटीस

सुवेंदू अधिकारी यांना निवडणूक आयोगाची नोटीस

नवी दिल्लीः गेल्या महिन्यात नंदीग्राम मतदारसंघात प्रचारसभेत भाजपचे उमेदवार सुवेंदू अधिकारी यांनी चिथावणीखोर वक्तव्ये केल्या प्रकरणात निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस पाठवली आहे. या नोटीसीचे उत्तर येत्या २४ तासात द्यावे असे आयोगाने आदेश दिले आहेत.

गेल्या महिन्यात नंदीग्राम येथील प्रचार सभेत अधिकारी यांनी ‘बेगम’ असा उल्लेख करत विरोधकांना मते देणे म्हणजे ‘मिनी पाकिस्तान’ला मत देणे असे जाहीर विधान केले होते. अधिकारी यांनी नंदीग्राममधील आपला प्रचार हिंदू-मुस्लिम अशा स्वरुपाचा ठेवण्यासाठी, मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी आपल्या भाषणात पाकिस्तान, बेगम, ईद वगैरे शब्द वापरले होते.

सत्तेवर बेगम आल्यातर राज्य मिनी पाकिस्तान होईल असे त्यांचे वक्तव्य थेट ममता बॅनर्जी यांना उद्देशून होते. ममता बॅनर्जी ‘ईद मुबारक’च्या शुभेच्छा देत असतात. त्यांना अशा शुभेच्छा देण्याची सवय लागली असून त्या आता सर्वांना ‘होली मुबारक’ अशाही शुभेच्छा देत असल्याचे वक्तव्य त्यांनी केले होते.

२७ मार्चला एका सभेत अधिकारी यांनी आपण आजपर्यंत पाकिस्तान्यांना पाहिलेले नाही. पण सध्या नंदीग्राममधील जो धुडगूस पाहतोय ते पाहून नंदीग्रामच्या जनतेने आता आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. येथील मतदारांनी बेगमला मत दिले तर सुफियान अधिक प्रभावशाली होईल, असेही ते म्हणाले होते.

ममता बॅनर्जी यांना पुन्हा निवडणूक आयोगाची नोटीस

केंद्रीय निमलष्करी दलाविरुद्ध मत व्यक्त केल्यानंतर निवडणूक आयोगाने ममता बॅनर्जी यांना आणखी एक नोटीस पाठवली आहे. दोन दिवसांपूर्वी धार्मिक आधारावर मत व्यक्त केल्यानंतर त्यांना आयोगाने नोटीस पाठवली होती. त्यानंतर गुरुवारी आयोगाने केंद्रीय निमलष्करी दलाच्या कामावर ममता बॅनर्जी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करणे हे अत्यंत खेदजनक असून त्यांच्या अशा मतांमुळे जवानांच्या मनोधैर्यावर परिणाम होईल, अशी भीती व्यक्त केली आहे. आयोगाने शनिवारी त्यांना उत्तर देण्यास सांगितले आहे.

केंद्रीय निमलष्करी दलाच्या दहशतीचा महिला मतदारांनी सामना करावा असे विधान ममता बॅनर्जी यांनी केल्याचा आयोगाचा आरोप आहे.

मूळ बातमी

COMMENTS