इंग्लंडचा भारत दौराः विजयाच्या अपेक्षा वाढल्या

इंग्लंडचा भारत दौराः विजयाच्या अपेक्षा वाढल्या

फेब्रुवारीत इंग्लंडचा संघ भारतात येत आहे. भारतीय खेळपट्ट्यांवर भारताला पराजित करणे जरी कठीण असले तरी प्रतिस्पर्ध्याला कमी लेखणे योग्य ठरणार नाही. ऑस्ट्रेलियात मिळवलेले यश इंग्लंडविरुद्धही तेवढेच जोरकसपणे दाखवणे गरजेचे आहे.

जामीनावरील प्रज्ञा ठाकूरांच्या हातात क्रिकेटची बॅट
‘चांगला मुस्लिम’ ठरण्याची व्यर्थ धडपड  
दिग्गज लेग स्पीनर शेन वॉर्नचे निधन

भारताने अभूतपूर्व खेळ करून ऑस्ट्रेलियाला गाबा स्टेडियमवर पराभूत केले आणि त्याचवेळी भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड इंग्लंडच्या भारत दौऱ्यासाठी टीम निवडत होते. विजयाचा जल्लोष सुरू असतांनाच काही खेळाडू खुश झाले असतील तर काही इंग्लंड दौऱ्यासाठी निवड न झाल्याने मनांतून खट्टू झाले असतील. दुखापतग्रस्त खेळाडू चांगली संधी गमावल्यामुळे निराश झाले असतील.

भारताच्या विजयाचे भरपूर विश्लेषण झाले, नवीन खेळाडूंचे भरपूर कौतुक झाले. काही उत्साही चाहत्यांनी या विजयाची तुलना १९८३, २०११च्या विश्वचषक स्पर्धेतील विजयाशी केली. १९७१च्या वेस्ट इंडिज, इंग्लंडमधील मालिका विजयाशी केली. विजय शेवटी विजय असतो. प्रत्येक विजयाच्या वेळची परिस्थिती वेगळी असते. खरंतर कुठल्याही विजयाची तुलना करणे गैरच असते. विजयाचा फक्त आनंद उपभोगायचा असतो. ऑस्ट्रेलियातील मालिका विजयाने भारतीय क्रिकेट चाहत्यांना जल्लोषाची भरपूर संधी दिली. ज्या क्रिकेट जाणकारांनी पहिल्या कसोटीतील भारताच्या दारुण पराभवानंतर उरलेल्या सामन्याचे भविष्य वर्तवले त्यांची बोटे त्यांच्याच घशात गेलीत.

परकीय देशाचे टीकाकार नेहमीच दौऱ्यावर आलेल्या चमूचे मनोबल सुरुवातीला आपल्या लेखणीने खच्ची करत असतात, नंतर मैदानावर स्लेजिंग करून आणि तरीही जमले नाहीतर उसळत्या चेंडूंनी फलंदाजांचे स्वागत करून, काहीही करून आपले पारडे कसे जड राहील याचाच विचार होत असतो. भारताच्या भीमकाय पराक्रमाने आता ऑस्ट्रेलिया मीडिया भारतीय कर्णधार अजिंक्य रहाणे आणि त्याच्या चमूवर स्तुतीसुमने उधळीत आहे. पाकिस्तान मीडिया सुद्धा अजिंक्यची आणि भारतीय चमूची वारेमाप स्तुती करीत आहेत. खरंच, असा अतुलनीय पराक्रम करून क्रिकेट क्षेत्रात भारताची मान गौरवाने उंचावली आहे. एखादे उंच शिखर काबीज करणे आणि तिथे टिकून राहणे या दोन भिन्न गोष्टी. ऑस्ट्रेलियात मिळविलेले अभूतपूर्व यश बराच काळ टिकवून ठेवण्यासाठी भारताला कसोशीने प्रयत्न करावे लागतील. मागील कसोटी मालिकेत दोन्ही संघाचे ढिसाळ क्षेत्ररक्षण ही महत्त्वाची बाब ठरली. भारतीय खेळाडूंनी क्षेत्ररक्षण सुधारणे अतिशय निकडीचे आहे.

उगवता सूर्य नेहमीच नवीन आव्हाने आणि संधी घेऊन येतो. असंच एक आव्हान भारतीय चमूसमोर उभं ठाकणार आहे. इंग्लंड चमू फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात भारतात येणार असून ४ कसोटी, ५ ट्वेण्टी-20 आणि ३ एक दिवसीय सामने खेळणार आहेत. चेन्नई, अहमदाबाद आणि पुणे येथील मैदानावर हे सामने होणार आहेत. पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी भारतीय चमूची निवड झाली असून त्यात दुखापतग्रस्त रवींद्र जडेजा, हनुमा विहारी, उमेश यादव नाहीत. पृथ्वी आणि नटराजनची वर्णी लागलेली नाही. चेन्नईची खेळपट्टी लक्षात घेता अक्षर पटेल निवडला गेला. बुमराह, ईशांत शर्मा, हार्दिक पांड्याची वापसी सुखावह आहे. सिराज, सुंदर आणि शार्दुल यांनी आपल्या उत्तम खेळाने स्थान टिकवून ठेवले. के. एल. राहुलची वापसी होणारच होती. विराट कोहलीला कर्णधार आणि प्रमुख फलंदाज अशी दुहेरी जबाबदारी नेहमीप्रमाणे सांभाळावी लागेल. सद्य परिस्थितीत भारतीय चमूचा समतोल बऱ्यापैकी राखला गेला आहे.

ऑस्ट्रेलियन दौऱ्यावर नवीन खेळाडूंनी उत्तम खेळ दाखवून जी विश्वासार्हता दाखवली, त्यामुळे निवड समिती समोर वेगळीच पण स्वागतार्ह अडचण निर्माण झाली आहे. तूर्तास दुखापतग्रस्त खेळाडूंची यादी लक्षात घेता बऱ्याच जागा रिकाम्या झाल्या आणि भरल्याही गेल्या. पण जेव्हा सर्व खेळाडू तंदुरुस्त होतील त्यावेळी भारतापाशी दोन टीम तयार होतील इतके खेळाडू असतील.

गेल्या दशकापासून आयपीएल सामने भारतात नियमितपणे खेळविले जातात. विदेशी खेळाडूंसोबत भरपूर सामने खेळण्याची संधी भारतातील तरुण खेळाडूंना मिळते आहे, त्यामुळे निश्चितच त्यांना मौलिक अनुभव, मार्गदर्शन, लढाऊ वृत्ती, परिस्थितीनुरूप खेळण्याची क्षमता उपलब्ध होऊ लागली.

Under 19 World Cup मधील भारताचे यश तरुण खेळाडूंना क्रिकेटकडे आकर्षित करण्यास पुरेसे ठरले आहे. क्रिकेटची करिअर म्हणून निवड करणे हे पालक सुद्धा मान्य करू लागलेले आहेत. सर्व खेळांपेक्षा क्रिकेटमध्ये होणारी आर्थिक उपलब्धी हे सुद्धा महत्त्वाचे कारण असेल कदाचित. क्रिकेट खेळासाठी आवश्यक असलेल्या संस्था, अकादमी गेल्या काही वर्षात खूप वाढल्या आहेत. त्यामुळे क्रिकेटचा स्तर आणि आकर्षण निश्चितच वाढले आहे. चांगले खेळाडू निवड समितीला उपलब्ध होऊ लागले ही समाधानाची आणि आनंदाची बाब आहे.

‘प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी ..’ या अर्थशास्त्राच्या नियमानुसार मागणी व पुरवठा यांच्यातील तफावत वस्तूची किंमत ठरविण्यास कारणीभूत ठरते. क्रिकेट हा खेळ आहे, तिथे हा अर्थशास्त्रीय नियम तंतोतंत लागू होणार नाही. एखाद्या योग्य खेळाडूला संधी न मिळणे हे त्याचे दुर्दैव. पण संधी मिळून तिचे चीज केले नाही तर त्याला तोच खेळाडू जबाबदार. आज भारतासमोर क्रिकेटमध्ये भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. एकेकाळी आघाडीचा फलंदाज, द्रुतगती गोलंदाज मिळणे ही भारताकरिता डोकेदुखी होती. फिरकी गोलंदाजी एवढे एकच भारताचे बलस्थान होते. सुनील गावस्कर आणि कपिलदेव या खेळाडूंनी ही त्रुटी भरून काढली. विक्रमवीर गावस्करने भारतीय खेळाडू द्रुतगती गोलंदाजी समर्थपणे खेळू शकतात हा आत्मविश्वास जागृत केला. कपिलदेवने उत्कृष्ट आऊट स्विंग सोबत भारत जगज्जेता पण होऊ शकतो हे १९८३चा विश्वचषक जिंकून सिद्ध करून दाखविले. गांगुलीची आक्रमकता, द्रविडचा पराकोटीचा संयम, लक्ष्मणची समयोचीत फलंदाजी यामुळे भारत सातत्याने सामने जिंकू शकतो हे जगाला दाखवून दिले. सचिन तेंडुलकरने फलंदाजीतील सर्व विक्रम मोडीस काढले. तो क्रिकेट चाहत्यांकरिता देव झाला. आज त्याच्या विक्रमाची बरोबरी कोणी करू शकेल असे वाटत नाही. विराट कोहलीमधे ती क्षमता आहे आणि तो सुद्धा भारतीयच आहे ही जमेची बाजू.

ऐन बहरात संधी मिळाल्यास नवीन खेळाडू काय करू शकतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे ऑस्ट्रेलियाचा दौरा. शुभमन गिल, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, नटराजन हे नवोदित खेळाडू क्रिकेट इतिहासात उत्तम उदाहरण ठरतील. हे सर्व खेळाडू मध्यमवर्गीय असून त्यांनी आपली स्वप्ने प्रत्यक्षात उतरवली आहेत. सध्या भारतीय क्रिकेट एक नवीन झेप घेऊ पाहते आहे. एखादा पराभव टीमचा आत्मविश्वास दोलायमान करून जाऊ शकतो तसाच एखादा पराक्रमाने मिळविलेला विजय टीममध्ये नवीन ऊर्जा संचारून जातो. क्रिकेट खेळात काहीही गृहीत धरणे अयोग्यच. प्रत्येक दिवस काहीतरी नवीन आव्हान टीमच्या पुढ्यात टाकू शकतो आणि ते पेलण्याकरिता संघातील प्रत्येक खेळाडूला योगदान देणे आवश्यक ठरते.

इंग्लंड संघात देखील जागतिक कीर्तीचे खेळाडू आहेत, स्टोक्स, वोक्स, अँडरसन, ब्रॉड, बेस्ट्रो, मोईन अली, करन इत्यादि. इंग्लंड नेहमीच आपल्या चमूत एखादा छुपा रुस्तम फिरकी गोलंदाज म्हणून आणत असतो. काही वर्षांपूर्वी मॉन्टी पानेसर असाच छुपा रुस्तम ठरला होता. भारतीय खेळपट्ट्यांवर भारताला पराजित करणे जरी कठीण असले तरी प्रतिस्पर्ध्याला कमी लेखणे योग्य ठरणार नाही. ऑस्ट्रेलियातील विजयामुळे चाहत्यांच्या अपेक्षा निश्चितच वाढल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर कोहली आणि कंपनीला ती विजयी परंपरा टिकविणे अनिवार्य राहील.

 

जयंत देशपांडे

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0