‘राह्यनोसर्स’ – युजीन आयनेस्को

‘राह्यनोसर्स’ – युजीन आयनेस्को

युजीन आयनेस्को यांच्या ‘राह्यनोसर्स’या नाटकाला अर्थाचे अनेक पदर आहेत. एकच ठोस अर्थ त्यातून काढता येत नाही. मिथ्यावादी रंगभूमीच्या साऱ्याच कलाकृतींप्रमाणे हे नाटकही असंदिग्धता प्रकट करते. असे असले तरी त्यातून काहीएक बोध करून घेणे नक्कीच शक्य आहे. व्यक्तिवाद आणि नाझीवाद या दोन ठळक थीम्स या नाटकातून समोर येतात.

इन्शाअल्लाह
मुस्लिम पक्षकारांचा कोणत्याही मध्यस्थीला नकार
भुरा: ज्ञानलालसेचं एक संपृक्त द्रावण

युजीन आयनेस्को हे ‘The theatre of the absurd’ अर्थात ‘मिथ्यावादी रंगभूमी’च्या नाटककारांपैकी एक महत्त्वाचे नाटककार. सॅम्युएल बेकेटनंतर मिथ्यावादी रंगभूमीला तात्विक अधिष्ठान प्राप्त करून देण्यात आणि प्रयोगशीलतेच्या कक्षा रुंदावण्यात युजीन आयनेस्को आणि लुईजी पिरांदेल्लो या नाटककारांनी महत्त्वाचे योगदान दिले. पिरांदेल्लो यांचे ‘सिक्स कॅरॅक्टर्स इन सर्च ऑफ अन ऑथर’ हे नाटक तर आयनेस्को यांची ‘अमादी’, ‘राह्यनोसर्स’, ‘चेअर्स’, ‘लेसन’ ही नाटके रंगभूमीवर चिरस्थायी प्रभाव पाडण्यात यशस्वी झाली.

परंपरागत, अस्तित्ववादी आणि कथनबहुल नाटकांना छेद देत समोर आलेल्या या नाटकांनी मानवी जीवनातील असंबद्धता, दुसऱ्या महायुद्धानंतर फैलावलेले नैराश्य, देवावर, जीवनावर किंबहुना साऱ्याच कल्पना, तत्वांवरून ढासळत चाललेली श्रद्धा आणि विश्वाच्या अफाट पसाऱ्यात आपण एकटे पडलो आहोत, कुणीही नियंत्रक या विश्वावर अंमल करत नाही, जगण्याला काहीच अर्थ उरलेला नाही ही वाढीस लागलेली भावना अधोरेखित केली. तत्कालीन परिस्थितीत संवेदनशील युरोपियन मनात निर्माण झालेल्या या संस्कारांचे थेट प्रतिबिंब मिथ्यावादी नाटकांत उमटले. द्वितीय युद्धोत्तर कालखंडात निर्माण झालेल्या या नाटकांत त्या काळचा विशिष्ट स्वर गोठून राहिलेला दिसून येतो. त्या स्वराला मूर्त रूप देण्याचे अनेकविध आणि प्रत्ययकारी मार्ग बेकेट, आयनेस्को, पिरांदेल्लो यांसारख्या नाटककारांनी शोधून काढून जागतिक रंगभूमीला नवसंजीवनी दिली.

युजीन आयनेस्को

युजीन आयनेस्को

‘राह्यनोसर्स’ हे आयनेस्कोचे एक महत्त्वाचे आणि राजकीय भाष्य करणारे नाटक. या एकाच नाटकावरूनही त्याच्या क्षमतेची आणि कौशल्याची प्रचिती येते.

एका सामान्य सेटवर नाटकाच्या पहिल्या अंकाची सुरवात होते. गावातील एक सामान्य चौक. जाँ आणि बेरांजे हे दोघे अंतरबाह्य परस्परविरोधी स्वभावविशेष असणारे मित्र मंचावर येतात. बेरांजे अव्यवस्थित राहणारा, मद्यपान करणारा, गबाळा गृहस्थ आहे. जाँ नीटनेटकेपणाचा भोक्ता आहे. बेरांजेला नीटनेटके राहण्याचा सल्ला जाँ देतो. सुसंस्कृत होण्यासाठी म्युझियम्सला भेट देण्यास सांगतो. बेरांजे नाईलाज झाल्यासारखे जाँचे बोलणे ऐकत बसतो. दरम्यान इतरही पात्रं स्टेजवर येतात. दुकानदार, त्याची बायको, रेस्टॉरंटचा मालक आणि वेट्रेस. त्यांचेही संभाषण अगदी सामान्य आणि दैनंदिन जीवनातील घटनांपुरते मर्यादित असते. तेवढ्यात दुरून गेंड्याचा चित्कार ऐकू येतो आणि आवाज जवळ येत येत चौकातून निघून जातो. काय झाले हे समजण्याआधी गेंडा वेगाने स्टेजवरून निघूनही जातो. स्टेजवर भयाचे सामूहिक आवाज उमटतात. आता किरकोळ संभाषणाचा रोख गेंड्याकडे वळतो. तेवढ्यात परत एकदा गेंडा चौकात येतो. यावेळी गेंड्याने एका मांजराला चिरडलेले असते. गेंडा निघून गेल्यानंतर परत संभाषणाचा ओघ गेंड्याकडे वळतो. निघून गेलेला गेंडा एकशिंगी होता की दोन शिंगांचा यावर जाँ आणि बेरांजे यांचा मोठा वाद होतो. त्यांच्या सभोवती असणाऱ्या पात्रांचे संभाषण सुरूच असते. मात्र एकमेकांच्या संभाषणांची सरमिसळ होत राहते. असंबद्ध वळणावर नाट्य सुरू होते आणि पडदा पडतो.

दुसरा अंक बेरांजे काम करतो त्या ऑफिसात सुरू होतो. एका वर्तमानपत्रात आलेल्या गेंड्याच्या बातमीवर ऑफिसमध्ये चर्चा सुरू होते. बेरांजे आणि डेझी हे प्रत्यक्षदर्शी आणि द्यूदा गेंड्याच्या प्रवेशाची पुष्टी देत असतात तर बोटार्ड गेंड्याचे अस्तित्वच मान्य करायला तयार होत नाही. त्यांचा बॉस मि. पॅपिलॉन त्यांना परत कामाला सुरवात करण्याची वारंवार सूचना देऊनही असंबद्ध संभाषण सुरूच राहते. तेवढ्यात गेंड्याच्या चित्कारण्याचे आवाज येऊ लागतात आणि गेंडा थेट ऑफिसच्या पायऱ्यांवर धडक देऊन मोडून काढतो. ऑफिस मधील एक कर्मचारी मि. बफ आज अनुपस्थितीत असतो. त्या मि. बफचेच गेंड्यात रूपांतर झालेले असते.

दुसऱ्या अंकाचा दुसरा भाग. बेरांजेला जाँसोबत झालेल्या वादाचा पश्चाताप होऊन तो त्याला भेटायला घरी जातो. जाँ आजारी असतो आणि त्याच्या घशातून बर्र बर्र सारखे विचित्र आवाज येत असतात. कपाळावर टेंगुळ आलेले असते आणि रंग हळूहळू हिरवट होत जातो. जाँच्या आवाजाची तीव्रता वाढत जाते. रंग अधिकाधिक हिरवा होत जातो आणि टेंगळाच्या जागी शिंग उगवते. जाँचे गेंड्यात रूपांतर झालेले असते. बेरांजे घाबरून पळ काढतो. मात्र जाँच्या बिल्डिंगमधील साऱ्याच रहिवाशांचे गेंड्यात रूपांतर झालेले असते. रस्त्यावरूनही गेंड्यात रूपांतर झालेली माणसे झुंडीने फिरत असतात. गावात राह्यनोसरिटीसची जणू साथ पसरलेली असते. या रोगाने केवळ मनुष्याचे गेंड्यात रूपांतरच होत नाही तर त्यांच्या मनात गेंडा बनण्याची तीव्र उर्मी निर्माण होते.  इथे दुसरा अंक संपतो.

तिसरा अंक. बेरांजेची बेडरूम. अचानक लोकांचे गेंड्यात रूपांतर होताना पाहून बेरांजे हादरून गेलेला असतो. आपलेही रूपांतर गेंड्यात होईल की काय या भयाने हादरून गेलेला असतो. त्याला भेटायला द्यूदा आणि डेझी येतात. तोवर निम्म्या गावाचे गेंड्यात रूपांतर झालेले असते. गेंड्यांच्या झुंडी गावात फिरत असतात. बेरांजे, द्यूदा आणि डेझी मात्र स्वतःचं मनुष्यत्व जपण्याचा निर्धार करतात. तेवढ्यात द्यूदाचे गेंड्यात रूपांतर होते. द्यूदा गेंड्याच्या झुंडीत सामील होतो. डेझीवर बेरांजेचे प्रेम असते. दोघे एकत्र राहायच्या आणाभाका घेतात. मात्र हळूहळू डेझी असंबद्ध बोलू लागते आणि तिचेही गेंड्यात रूपांतर होते. आता बेरांजे वगळता साऱ्या गावाचेच गेंड्यात रूपांतर झालेले असते. बेरांजे हादरून जातो. आरशात पाहतो. स्वतःचे रूप त्याला कुरूप वाटते. गेंड्याचे रूप सुंदर वाटू लागते. सौंदर्याच्या कल्पना बदलून जातात. मात्र क्षणात बेरांजे स्वतःला सावरतो. आपले रूपांतर कधीही गेंड्यात होऊ द्यायचे नाही असा निर्धार करतो आणि नाटक संपते.

या नाटकाला अर्थाचे अनेक पदर आहेत. एकच ठोस अर्थ त्यातून काढता येत नाही. मिथ्यावादी रंगभूमीच्या साऱ्याच कलाकृतींप्रमाणे हे नाटकही असंदिग्धता प्रकट करते. असे असले तरी त्यातून काहीएक बोध करून घेणे नक्कीच शक्य आहे. व्यक्तिवाद आणि नाझीवाद या दोन ठळक थीम्स या नाटकातून समोर येतात.

व्यक्तिवाद

व्यक्तिवाद अथवा स्वतंत्र व्यक्तित्व ही ‘राह्यनोसर्स’मधील महत्त्वाची थीम आहे.  नाटकाच्या पहिल्या अंकात गेंडा शहरात प्रवेश करतो. दुसऱ्या अंकात आधी मिस्टर बफ आणि नंतर जाँचे गेंड्यात रूपांतर होते. बेरांजे जाँपासून दूर पळू लागतो मात्र तोवर शहरातील जवळपास अर्धे लोक गेंड्यात रूपांतरित झालेले असतात. आपलंही गेंड्यात रूपांतर होईल या भयाने बेरांजे हादरून जातो. जाँचे मनुष्यातून गेंड्यात झालेले रूपांतर त्याने प्रत्यक्ष पाहिलेले असते. त्याच्या खुणा आपल्या शरीरावरही दिसत नाहीत ना, या आशंकेने भयभीत होतो. तिसऱ्या अंकात बेरांजेला भेटायला त्याचे सहकारी द्यूदा आणि डेझी येतात. डेझीवर बेरांजेचे प्रेम असते. त्यांच्या संभाषणातून आख्खे शहरच गेंड्यात रूपांतरित झाले आहे हे उघड होते. मात्र आपण तिघे आपल्या मनुष्यत्वाचे अखेरपर्यंत रक्षण करू अशी ग्वाही देतात. मात्र संभाषण पुढे जाते तसे द्यूदा असंबद्ध बोलू लागतो. गेंड्याच्या रूपाचे, आवाजाचे कौतुक करू लागतो आणि खिडकीतून उडी मारून गेंड्याच्या समूहात  सामील होतो. आता डेझी आणि बेरांजे दोघेच केवळ उरतात. मात्र राह्यनोसरिटीसची लागण डेझीलाही होते आणि बेरांजे एकटाच उरतो. बेरांजे वगळता संपूर्ण शहराचे गेंड्याच्या समूहात रूपांतर होते. बेरांजे हतबल होतो. आरशात स्वतःच्या मानवी देहाकडे पाहत राहतो. आपला देह त्याला कुरूप वाटू लागतो. गेंड्याच्या शरीरात त्याला सौंदर्य वाटू लागते. आपलेही गेंड्यात रूपांतर व्हायला हवे होते असेही क्षणभर त्याला वाटते. मात्र लवकरच तो स्वतःला सावरतो. आपण कधीही स्वतःचं रूपांतर गेंड्यात होऊ देणार नाही असा निश्चय करतो. आपलं स्वत्व आणि मनुष्यत्व हे बाह्य गोष्टींवर अवलंबून नसून आपल्या आंतरिक जाणिवांवर अवलंबून असतं हे त्याच्या ध्यानी येतं. आणि गेंड्यांच्या विशाल समूहाशी आपण अखेरपर्यंत लढू असा निश्चय करतो.

सारे शहर गेंड्यात रूपांतर होत असताना बेरांजे निकराने आपलं मनुष्यत्व जपण्याचा प्रयत्न करतो. बेरांजेच्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाची अत्यंत स्पष्ट अशी ती खूण असते. बेरांजे आणि इतर शहरवासी यांच्यात हाच काय तो फरक असतो. एकमेकांहून भिन्न असणं खरंच इतकं महत्त्वाचं आहे का? हा केवळ ‘राह्यनोसर्स’ नाटकाच्याच नव्हे तर मिथ्यावादी रंगभूमीच्या गाभ्याशी असणारा प्रश्न आयनेस्कोने विलक्षण कौशल्याने हाताळला आहे.

नाझीवाद

‘राह्यनोसर्स’मधील दुसरी महत्त्वाची थीम आहे, नाझीवाद. संपूर्ण नाटक व्यापून राहिलेला गेंडा नाझीवादाचे प्रतीक म्हणून या नाटकातून समोर येतो. गेंड्याचे शहरात आगमन होण्याआधी केवळ सामान्य आणि दैनंदिन जीवनातील किरकोळ गोष्टींभोवती फिरणारे संभाषण लुप्त होते आणि सारे नागरिक चौकातून, ऑफिसमधून, घरांतून केवळ गेंड्याची चर्चा करू लागतात. एरव्ही साधीसुधी वाटणारी पापभिरू माणसं अचानक गेंड्यात रूपांतरित होऊ लागतात. हिटलरच्या आगमनानंतर सामान्य जीवन जगणारे जर्मन नागरिक हॉलोकॉस्टचं रहस्यमयरित्या समर्थन करू लागले होते. त्याचंच रूपक म्हणून नागरिकांचं गेंड्यात होणारं रूपांतर आयनेस्कोने सुचविलं आहे.

आयनेस्को १९३८ साली रुमानिया सोडण्याआधी त्याचे जवळपास सारे मित्र, परिचित आणि नातेवाईक हुकूमशाही प्रवृत्तीचं समर्थन करू लागले होते. त्याचंच प्रतिबिंब ‘राह्यनोसर्स’मध्ये पडल्याचं मानण्यात येतं. या नाटकासंबंधी बोलताना आयनेस्को म्हणाले होते, गेंडा हे नाझीवादाचं प्रतीक असल्याचं खुद्द आयनेस्कोने अनेकवार सुचविलं आहे. “लोक अचानक नवा धर्म, नवी तत्वप्रणाली, धर्मांधता या गोष्टींना सहजपणे स्वतःवर स्वार करून घेतात. अशावेळी बौद्धिक बदलाची परिणामकारक प्रचिती आपल्याला येते….तुमच्या हे लक्षात आलंय की नाही ते मला ठाऊक नाही, पण समोरचा मनुष्य जेव्हा तुमच्या मतांशी सहमती व्यक्त करत नाही आणि तुम्ही तुमचं म्हणणं त्याला पटवून देऊ शकत नाही तेव्हा तुम्ही एका गेंड्यासमोर उभे आहात असा तुम्हाला भास होतो. आणि गेल्या पाव शतकाचा इतिहास साक्ष आहे अशी माणसं केवळ गेंड्यासारखं वर्तनच करत नसतात तर त्यांचं अंतरबाह्य गेंड्यात रूपांतर झालेलं असतं.’

समकालात जगभर फॅसिस्ट प्रवृत्तींचा उदय होत असताना आणि नागरिकांचे त्याकडे वाढत जाणार आकर्षण पाहता ‘राह्यनोसर्स’चे वाचन समकाल आणि भवताल यासंबंधीची आपली जाण वाढविणारे असेच आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0