बनावट चलनाचे भूत पाकिस्तानातून पुन्हा अवतीर्ण?

बनावट चलनाचे भूत पाकिस्तानातून पुन्हा अवतीर्ण?

२०१६ पूर्वी, नोटबंदीच्या आधी बनावट नोटा बनवणाऱ्यांचे स्वतःची एक आर्थिक व्यवस्था होती आणि त्यामार्फत ते खोट्या नोटा पसरवत असत. अलिकडच्या काही घटनांवरून हे रॅकेट पुन्हा पूर्ववत झाले असावे असे दिसते.

वर्षंभरात २ हजार रु.च्या एकाही नोटेची छपाई नाही
केवळ जानेवारीत १,२१३ कोटी रु. इलेक्शन बाँडची विक्री
परकीय चलनात २ वर्षांतील सर्वात मोठी घट

बनावट चलन हे कायमच जगभरातील दहशतवादाचे सरकारी पुरस्कर्ते, दहशतवादी संघटना, संघटित गुन्हेगारी टोळ्या तसेच पैशांचे गैरव्यवहार करणाऱ्यांच्या हातातले एक महत्त्वाचे शस्त्र राहिले आहे. भारताच्या सुरक्षा संस्थांनी नेहमीच हा दावा केला आहे, शत्रुदेशाला लक्ष्य करण्याच्या उद्देशाने त्या देशाच्या बनावट चलनाचा वापर करणाऱ्या देशांमध्ये पाकिस्तानचा समावेश आहे.

बनावट नोटांबरोबर मुकाबला नेहमीच महागात पडतो. त्यात दहशतवादाशी मुकाबला करावा लागतो हे एक कारण तर आहेच, पण शुद्ध आर्थिक बाबींचा विचार केला तरीही बनावट नोटांमुळेच दर पाच वर्षांनी नोटा पुन्हा डिझाईन कराव्या लागतात, हेही महत्त्वाचे कारण आहे. विशेषतः भारतामध्ये, खोट्या भारतीय चलनी नोटा हा दहशतवादाला पैसा पुरवण्याचा एक मार्ग आहे. दहशतवादाला पैसा पुरवणारे इतर काही महत्त्वाचेमार्ग म्हणजे हवाला, रोकड वाहतूक, घुसखोरी करणारे दहशतवादी वगैरेही आहेत. मात्र बनावट भारतीय चलनी नोटा तयार करणे हा कोड्याचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे.

आयएसआयने बनावट भारतीय चलनाचे उत्पादन करून बेकायदेशीर व्यवहार तसेच भारतातील दहशतवादी गटांना निधीसहाय्य केले आहे हे दाखवणारा काही पुरावा उपलब्ध आहे. या गटांमध्ये लष्कर-ए-तोयबा आणि त्याच्याशी संबंधित गट, जैश-ए-मोहम्मद, हिजबुल मुजाहिदीन आणि अल कायदा यांचा समावेश होतो. डेव्हिड हेडलीने २००७/२००८ मध्ये २६/११ पूर्वी रेकी करण्याकरिता अशा चलनाचा वापर केला होता.

८ नोव्हेंबर, २०१६ रोजी, ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद केल्यानंतर मोठ्या प्रमाणात या बनावट नोटा बाद झाल्या होत्या. त्यानंतरही भारतामध्ये बनावट चलन सापडल्याच्या अनेक बातम्या येत राहिल्या, मात्र या बनावट चलनाचा दर्जा चांगला नसे – या सरळसरळ छायाप्रती किंवा स्कॅन केलेल्या नोटा होत्या, त्यापैकी अनेकांचा सीरियल क्रमांकही सारखा असे.

मात्र गेल्या काही महिन्यांपासून पुन्हा पाकिस्तान येथे तयार होणाऱ्या अधिक चांगल्या दृश्य गुणवत्तेच्या बनावट भारतीय नोटा सापडल्या जाऊ लागल्या आहेत. त्याकरिता २०१६ पूर्वीचेच जाळे पुन्हा वापरले जात आहे – त्याच टोळ्या, तीच नेटवर्क, तीच साधने आणि मार्ग!

२०१६ नंतरच्या कारवाया

मागच्या तीन महिन्यांमध्ये, तीन महत्त्वाच्या छाप्यांमधून संभवतः आयएसआय एजंट आणि पाकिस्तानातील छापखाने पुन्हा एकदा या खेळात उतरले असल्याचे, आणि ते अधिक चांगल्या दर्जाच्या नोटा बनवत असल्याचे दिसून आले आहे.

मे २०१९ मध्ये काठमांडूच्या विमानतळावर दाऊद टोळीमधील युनुस अन्सारी याला तीन पाकिस्तानी नागरिकांसह अटक करण्यात आली. त्याच्याकडे ७.६७ कोटी रुपयांच्या खोट्या नोट्या होत्या. आणि या वाहकांची धृष्टता एवढी मोठी, की त्यांनी हा खजिना लपवण्याचाही प्रयत्न केला नव्हता. चेक-इन बॅगेजमध्ये अशाच सुट्या नोटा टाकून दिल्या होत्या. पाकिस्तानातील बनावट भारतीय नोटांचा कुप्रसिद्ध स्मगलर रझ्झाक मर्फानी याने त्या पाठवल्या होत्या असा संशय आहे.

२२ सप्टेंबर, २०१९ रोजी, पंजाब पोलिसांनी केझेडएफ केडर कडून १० लाख रुपयांच्या खोट्या नोटा हस्तगत केल्या. त्यांना पाच एके ४७ रायफली, ३० बोअर पिस्तुले, नऊ हँड ग्रेनेड, पाच सॅटेलाईट फोन, दोन मोबाईल फोन आणि दोन वायरलेस सेट हेही मिळाले होते. हे सर्व द्रोनच्या माध्यमातून पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय सीमेपलिकडून मिळाले होते असा संशय आहे.

पुन्हा, २५ सप्टेंबर रोजी, ढाकातील पोलिसांनी ४९.५ लाख रुपयांचे बनावट भारतीय चलन पकडले. दुबईस्थित ‘सलमान शेरा’ नावाच्या व्यक्तीने सिल्हेट, बांगलादेश इथे हे पार्सल पाठवले होते. ‘एसए पोरिबहन’ नावाच्या कूरियर सेवेद्वारे ते पाठवण्यात आले होते. सलमान शेरा हा पाकिस्तानातील कुप्रसिद्ध आयएसआय-होलसेलर अस्लम शेरा याचा मुलगा आहे.

स्वबळावर चालणारी अर्थव्यवस्था

या अत्यंत संघटित अशा बनावट भारतीय चलनांच्या व्यवहारांमधील व्यापार म्हणजे एक नफा मिळवून देणारी आणि म्हणून स्वबळावर उभी असणारी अर्थव्यवसथा आहे.

ही व्यवस्था कशी चालते? पहिल्या टप्प्यात, पाकिस्तानमधील छापखान्यात नोटा छापल्या जातात. त्यासाठी बहुतांश वेळा इस्लामाबादचे चलन छापण्यासाठी आयात करण्यात येणारा सीडब्ल्यूबीएन छपाई कागदच वापरला जातो. चलन सामग्री उत्पादित करणाऱ्या लोकांद्वारे पाकिस्तानात विक्रीसाठी मिळवण्यात येणाऱ्या परवान्यांच्या अंतर्गत मिळणारी शाई आणि डाय वापरून, सायमल्टन ड्युअल ऑफसेट प्रिंटिंग मशीनवर त्या छापल्या जातात.

तांत्रिकदृष्ट्या खऱ्या भारतीय नोटेवरील सर्व गुणवैशिष्ट्यांची हुबेहूब नक्कल यापैकी कशातही केली जात नाही. मात्र, दृश्य नक्कल अतिशय चांगली असते. सोप्या भाषेत सांगायचे, तर सामान्य माणूस सहज फसेल इतपत त्यांचा दर्जा उच्च असतो.

या गुंतागुंतीच्या स्मगलिंग नेटवर्कच्या पहिल्या भागात आयएसआय एजंटनी निर्धारित केलेल्या व पाकिस्तानमध्येच राहणाऱ्या होलसेलरना पुरवठा करणे याचा समावेश असतो.

त्यानंतर हे स्मगलर कराचीहून सहा मधल्या टप्प्यातील देशांना जाणाऱ्या विमानांवरून हा माल घेऊन जाण्यासाठी कूरियर शोधतात. हे मधले देश आहेत कतार, यूएई, मलेशिया, थायलंड, चीन आणि श्री लंका.

तिसऱ्या टप्प्यात या सहा देशांमधून काठमांडू, नेपाळ किंवा ढाका/चित्तागाँग, बांगलादेश इथे जाणारी कनेक्टिंग फ्लाईट शोधणे समाविष्ट असते.

या स्मगलिंग सिंडिकेटच्या चौथ्या टप्प्यामध्ये तिथपर्यंत पोहोचलेल्या साठ्याचे अगदी १ लाख रुपयांइतके लहान भाग करणे, जेणेकरून सापडले जाण्याची जोखीम कमी होईल, आणि मग हे लहान भाग भारतीय सीमारेषेवरून लहान होलसेल नेटवर्क्सपर्यंत पोहोचवणे याचा समावेश असतो.

पाचवा आणि अंतिम टप्पा म्हणजे ग्रामीण भागांमध्ये गुरांचे बाजार, रियल इस्टेटमधील काळ्या पैशांतील व्यवहार यांच्यामार्फत, तसेच सामान्य, बहुतांश वेळा शंका न घेणाऱ्या ग्राहकांपर्यंत पोहोचवणे समाविष्ट असते.

या संपूर्ण चक्रातील अर्थिक व्यवहार प्रत्येक टप्प्यावर १०% या बोलीवर चालतात. आयएसआय २०% ने बनावट चलन पुरवते (प्रत्येक १००० रुपयांच्या भारतीय चलनासाठी २०० भारतीय किंवा पाकिस्तानी रुपये, चलन विनिमयाच्या दरानुसार). मधल्या टप्प्यातील देशातील खरेदीदार ३०% देतो, नेपाळ बांगलादेशमधील ४०% आणि भारतातील होलसेलर ५०%. ८ नोव्हेंबर २०१६ पर्यंत ही सर्वमान्य व्यवस्था होती. नोटबंदीनंतर ५०० रुपये आणि १००० रुपयांच्या नोटा बंद झाल्यानंतर हे सर्व साठे एका क्षणात बाद ठरले.

मात्र तीन वर्षांनंतर, पाकिस्तानमधील या व्यापारात सामील असणाऱ्या लोकांनी पुन्हा एकदा तेच संपूर्ण जाळे, स्मगलर्स, परदेशी ठिकाणे वापरून बनावट भारतीय चलनाचे उत्पादन सुरू केले असावे असे दिसते.

वैशाली बसू शर्मा , नॅशनल सिक्युरिटी कौन्सिल सेक्रेटरियट ऑफ इंडियाच्या माजी सल्लागार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: