फेक न्यूजः इतिहास, सिद्धांत आणि भवितव्य

फेक न्यूजः इतिहास, सिद्धांत आणि भवितव्य

अश्वत्थामा मेला अशी अफवा युद्धभूमीवर पसरते. द्रोणाचार्यांना कळेना कुणाला विचारावं. त्यांचा विश्वास असतो युधिष्ठीरावर. तो कधीही असत्य भाषण करणार नाह

आनंद तेलतुंबडेंमुळे कोण भयभीत झाले आहे?
टीआरपी घोटाळाः अर्णवचा आरोपपत्रात आरोपी म्हणून समावेश
केंद्र सरकार प्रचारात मग्नः राकेशसिंह

अश्वत्थामा मेला अशी अफवा युद्धभूमीवर पसरते.

द्रोणाचार्यांना कळेना कुणाला विचारावं. त्यांचा विश्वास असतो युधिष्ठीरावर. तो कधीही असत्य भाषण करणार नाही. त्याला ते विचारतात. युधिष्ठीराला धर्मसंकटातून सोडवण्यासाठी भीमाने अश्वत्थामा नावाचा हत्ती मारलेला असतो.

युधिष्ठीर उत्तरतो—हो अश्वत्थामा मेला. आणि द्रोणाचार्यांना ऐकू येणार नाही अशा आवाजात पुटपुटतो—नरो वा कुंजरोवा. माणूस की हत्ती हे माहीत नाही.

युधिष्ठीराचं उत्तर ऐकल्यावर पुत्रवियोगाने खचलेले द्रोणाचार्य शस्त्रत्याग करतात आणि दृष्टद्युम्न त्यांची हत्या करतो.

भारतीय संस्कृतीतील ही पहिली फेक न्यूज म्हणता येईल. कपटाचा, फेक न्यूजचा आधार घेऊन कृष्णाने पांडवांना महाभारत युद्धात विजय मिळवून दिला.

असत्य, अर्धवट सत्य, अफवा यांचा प्रसार करण्यामागचे हेतू कुटील, कपटी आणि राजकीय असतात. मुखी संस्कृती, लिपी संस्कृती, छापखाना संस्कृती आणि सध्याची इंटरनेट वा ईलेक्ट्रॉनिक संस्कृती या प्रत्येक संस्कृतीमध्ये म्हणजे तंत्रज्ञानाच्या विकासाबरोबर फेक न्यूजची व्याप्ती, वेग आणि परिणाम वाढत जाताना दिसतो. येत्या काही महिन्यात फेक न्यूजच्या आजच्या रुपात क्रांतीकारी बदल होऊ घातले आहेत. त्यामुळे सत्य आणि असत्य यातला फरक आपल्याला सहजपणे करता येणार नाही. आपण जे पाहतो, ऐकतो त्याची सत्यासत्यता पडताळणं कमालीचं अवघड होऊन बसेल. व्यक्तीच्या धारणा आणि भावना यानुसार जनमत घडवलं जाईल. वास्तव परिस्थिती, वस्तुनिष्ठ माहीती, घटना वा घडामोडींशी त्यांचा संबंध असेलच असं नाही. या स्थितीला पोस्ट-ट्रुथ वा सत्योत्तर अशी संज्ञा आहे. 2016 साली ऑक्सफर्ड डिक्शनरी या इंग्रजी भाषेच्या प्रतिष्ठीत शब्दकोशाने पोस्ट-ट्रुथ ह्या शब्दाला अधिकृत मान्यता दिली. फेक न्यूजचा संबंध या सत्योत्तर काळाशी, या काळातील अर्थ-राजकीय हितसंबंधांशी आणि त्या हितसंबंधांचं रक्षण करण्यार्‍या अर्थ-राजकीय व्यवस्थेशी आहे. त्याचा आढावा घेण्यासाठी या लेखाचा पसारा मांडला आहे.

एकमेकांशी बोलून ज्ञान व माहिती जमा करण्याची अवस्था म्हणजे मौखिक संस्कृती. लिपी नव्हती. त्यामुळे लेखन वा वाचनाचा प्रश्न नव्हता. या युगामध्ये बोलणारा आणि ऐकणारे वा ऐकणारा आमने-सामने असत. जे काही बोललं वा ऐकलं गेलं आहे, ते एकमेकांना समजलं आहे याची पक्की खात्री करून घेता येई. त्यामुळे बोलण्याचे, ऐकण्याचे नियम होते. ही संस्कृती समूहजीवनाला पोषक होती. आजही समाजात मिळून-मिसळून वागण्याचा कल असलेली व्यक्ती मौखिक संस्कृती पसंत करते. साक्षरता, उत्पादन-वितरण-उपभोग यांची केंद्रीय व्यवस्था (औद्योगीकरण), वर्तमानपत्रं-उपग्रह वाहिन्या, रेडीयो या लोंढा प्रसारमाध्यमांची पोहोच, इंटरनेट जोडणी—यू ट्यूब, फेसबुक, ट्विटर, व्हॉटस् एप, इत्यादी यांची पोहोच इत्यादी घटक विचारात घेतले तरिही भारतात मुखी संस्कृती आजही बर्‍यापैकी दृढमूल आहे. यू ट्यूब, फेसबुक, ट्विटर, व्हॉटस् एप मुखी संस्कृतीच्या भक्कम पायामुळेच विलक्षण परिणामकारी ठरली आहे.

लिपीचा शोध लागल्यावर लिखाण करणारी व्यक्ती एकटी व अंतर्मुख बनली. मात्र या संस्कृतीत साक्षरता मर्यादीत होती. त्यामुळे वाचन जाहीरपणे करण्याची प्रथा होती. अखंड हरिनाम सप्ताह, वेदांची पारायणं, भजन, कीर्तन इत्यादी कार्यक्रम आजही सुरू असतात. मुखी आणि लिपी संस्कृतीचे ते अवशेष आहेत.

मुद्रण संस्कृतीचा जन्म युरोपातला. त्याला गुटेनबर्ग क्रांती असंही म्हणतात. पुस्तकांची छपाई सुरू झाल्यावर लेखक आणि वाचक एकमेकांपासून अलग झाले. मुखी संस्कृतीत ज्ञान देणारा व घेणारा माणसांच्या घोळक्यात ज्ञान संपादन करत असे. मुद्रण संस्कृतीत वाचक आपल्या घरी वा पुस्तकघरात, एकांतात वाचन करतो. वाचक जो मजकूर वाचतो तो अमूर्त खुणांनी बनलेला असतो. त्या मजकूराचा अर्थ लावण्याची क्षमता वाचकाच्या अंगी असावी लागते. इलेक्ट्रॉनिक वा इंटरनेट संस्कृतीत लेखन-वाचनासाठी कागदाची गरज उरली नाही. स्मार्टफोन, कंप्युटर वा किंडल यावर माणसं मजकूर वाचतात, लिहीतात, गाणी ऐकतात, चित्रपट पाहतात. समाजात मुखी, लिपी, मुद्रण आणि ईलेक्ट्रॉनिक तिन्ही संस्कृती नांदत असतात. म्हणून तर स्मार्टफोन, कंप्युटर व किंडल सोबत पुस्तकांची बाजारपेठही वाढत असते. समाजातील व्यक्ती वेगवेगळ्या संस्कृतीशी जोडल्या गेलेल्या असतात. मुखी संस्कृतीशी जवळीक असणार्‍या व्यक्ती समाजात अधिक मिसळणार्‍या, गप्पाटप्पा करणार्‍या, मोकळ्याढाकळ्या, अघळपघळ असतात. मुद्रण संस्कृतीतील व्यक्ती काहीशा एकलकोंड्या, समाजापासून तुटलेल्या असतात. ईलेक्ट्रॉनिक संस्कृतीतल्या व्यक्तींना आपलं म्हणणं—मतं, दृष्टीकोन, माहिती, तात्काळ प्रसारीत करण्याची हौस असते. उदाहरणार्थ फेसबुक, ट्विटर व व्हॉटस् एप.

छपाई यंत्राचा शोध लागण्यापूर्वी युरोपमध्ये अंधार युग होतं. कॅथॉलिक धर्माची निरंकुश सत्ता होती. इटलीमधील ट्रेन्ट या शहरात योहानस हिंडरबाख हा प्रिन्स बिशप होता. तो शहराचा धर्मप्रमुखही होता आणि राजाही. 1475 साली मार्च महिन्यामध्ये चर्चमध्ये केलेल्या एका प्रवचनात, प्रिन्स बिशपने असा आरोप केला की ट्रेन्ट शहरातल्या ज्यू धर्मीयांनी ईस्टर साजरा करण्यासाठी एका कॅथॉलिक बालकाचा बळी घेऊन त्याचं रक्त प्राशन केलं. वस्तुतः या बातमीला कोणताही आधार नव्हता. मात्र ज्यू धर्मीयांबद्दलचे पूर्वग्रह, त्यांची धार्मिक कर्मकांडं व विधि याबाबत असलेले गैरसमज व चुकीची माहिती यामुळे ही बातमी कर्णोपकर्णी वेगाने पसरली. संतापलेल्या कॅथॉलिकांनी शहरातल्या ज्यू वस्त्यांवर हल्ले केले, त्यांची घर-दारं जाळली, अनेकांना कंठस्नान घालण्यात आलं. ट्रेन्ट शहरातून ही बातमी इटलीतील अनेक शहरांमध्ये पसरली. तिथेही ज्यू धर्मीयांच्या वस्त्यांवर हल्ले झाले. कॅथॉलिक धर्माचा सर्वोच्च धर्मगुरु, पोप. त्याची राजधानी रोम. त्याच्यापर्यंत ही बातमी पोचली. त्याला हा वेडाचार पसंत नव्हता. या प्रकरणात हस्तक्षेप करून हा हिंसाचार थांबवायला हवा असं त्याने प्रिन्स बिशपला कळवलं. पण प्रिन्स बिशपला आपली सत्ता भक्कम करण्यासाठी ज्यू धर्मीयांच्या विरोधात वातावरण तापवण्याची गरज वाटत होती. त्यामुळे त्याने पोपला धुडकावून लावलं. परिणामी ट्रेन्ट शहरातून ज्यूंची हकालपट्टी झाली. इटलीतील अनेक शहरांतून हाच कित्ता गिरवला गेला. राजकीय फायद्यासाठी फेक न्यूजचा वापर करून हिंसाचार युरोपमध्येही केला जात होता.

गुटेनबर्गने छपाई यंत्राचा शोध लावल्यावर युरोपातील परिस्थिती हळू हळू बदलू लागली. बायबल लॅटिन भाषेत होतं. धर्मगुरू आणि राजघराण्यातील मोजक्या व्यक्ती सोडल्या तर ख्रिश्चन लोकांनाही बायबल वाचता येत नव्हतं. छपाई यंत्राचा शोध लागल्यावर इंग्रजी, इटालियन, फ्रेंच, जर्मन इत्यादी सर्व युरोपियन भाषांमध्ये बायबलची भाषांतरं झाली. आपल्या धर्माचे ग्रंथ लोकांना वाचता येऊ लागले. पोपच्या निरंकुश सत्तेला मार्टिन ल्यूथर किंगने आव्हान दिलं. ख्रिश्चन धर्मियांच्या श्रद्धेची विश्वस्त हे चर्चचं स्वरुप होतं. म्हणजे बायबलमध्ये काय लिहीलं आहे, त्याचा अर्थ कसा लावायचा हे निश्चित करण्याचा अधिकार फक्त चर्चला म्हणजेच त्यांचा सर्वोच्च धर्मगुरु—पोप, याला हा अधिकार होता. धर्माची निरकुंश सत्ता होती. अनेक कॅथॉलिक धर्मगुरु लोकांना नाडत होते, भ्रष्ट होते, बदफैलीही होते. या विरोधात मार्टिन ल्यूथर किंगने बंड केलं. बायबलचा अर्थ लावण्याचा अधिकार प्रत्येक ख्रिश्चन व्यक्तीला आहे अशी घोषणा त्याने केली. प्रॉटेस्टंट धर्माचा पाया त्याने घातला. युरोपियन संस्कृतीमध्ये व्यक्तीवादाचा प्रवेश या मार्गानेही झाला. आपले निबंध कागदावर लिहून तो चर्चच्या दारावर डकवत असे. त्याच्या अनुयायांचा, पाठिराख्यांचा, चाहत्यांचा गट वाढू लागला. छपाई यंत्राचा शोध लागल्याने मार्टिन ल्यूथरचं साहित्य प्रकाशित झालं. उघड वा चोरट्या मार्गाने ते युरोपात प्रसारित होऊ लागलं. माहिती लोकांपर्यंत पोहोचू लागली. धर्म सुधारणेच्या चळवळीला बळ मिळालं आणि फेक न्यूजलाही वेगळं वळण मिळालं.

चेटकिणी, समुद्री राक्षस आणि अशा अनेक काल्पनिक प्राण्यांची तपशीलवार माहिती देणारी पत्रकं, पुस्तिका प्रसिद्ध होऊ लागल्या. या लिखाणाच्या सत्यासत्यतेची जबाबदारी छापखान्याचे मालक घेईनात. आम्ही फक्त छपाई करतो आणि पुस्तिका वा पत्रकांचं वितरण करतो असा त्यांचा दावा होता. जे छापलं आहे ते सत्य आहे की नाही ही जबाबदारी लेखकाची, अशी भूमिका त्यांनी घेतली. फेक न्यूज, असत्य व दिशाभूल करणारा मजकूर (चित्र, चित्रफीती व अन्य) यासंबंधात मार्क झुकेरबर्ग, गुगुल इत्यादींनी नेमका हाच पवित्रा घेतला आहे.

1755 साली पोर्तुगालच्या लिस्बन शहरात भीषण भूकंप झाला. हा भूकंप कॅथॉलिक धर्माच्या सणाच्या दिवशी झाला होता. कॅथॉलिक धर्मगुरूंनी असं जाहीर केलं की माणसांनी केलेल्या पापांची शिक्षा म्हणून ईश्वराने हा भूकंप घडवला आहे. मात्र तोपावेतो युरोपमध्ये धर्मक्रांतीनंतरची ज्ञानोदयाची (एन्लायटन्मेंट) सुरु झाली होती. या विद्वानांनी धर्मगुरुंच्या दाव्याला आव्हान दिलं आणि भूकंपाची वस्तुनिष्ठ वा कारणमीमांसा प्रसिद्ध करायला सुरुवात केली. धर्मगुरू म्हणत होते की या अस्मानी संकटातून जे वाचले आहेत त्यांनी सर्वशक्तीमान ईश्वराच्या सेवेसाठी आपलं जीवन अर्पण करायला हवं. व्हॉल्तेअरसारख्या विचारवंतांनी धर्मगुरुंवर टीकेची झोड उठवली. सत्य कोणत्या बाजूला आहे धर्मगुरुंच्या की विचारवंतांच्या? ह्या प्रश्नाने युरोपियन समाजात वैचारिक घुसळण सुरु झाली. त्यातून विवेकनिष्ठ विचाराची, विज्ञानाची परंपरा अधिक गतीमान झाली. 1761 मध्ये फ्रान्समधील एका शहरात ज्यां कला या श्रीमंत प्रॉटेस्टंट माणसाच्या तरुण मुलाने आत्महत्या केली. शहरातल्या कॅथॉलिक धर्मगुरुंनी अफवा पसरवली की त्या मुलाला कॅथॉलिक धर्म स्वीकारायचा होता म्हणून बापाने त्याला ठार मारला. त्यावेळी फ्रान्समध्ये कॅथॉलिक धर्म आणि राजा यांची सत्ता होती. कॅथॉलिक सत्ताधार्‍यांनी ज्यां कलाचा छळ केला. त्याला एका अवाढव्य चाकाला बांधण्यात आलं. चाकाच्या वर्तुळाकार धावेवर बांधण्यासाठी त्याचे हात आणि पाय मोडण्यात आले. या छळाने ज्यां कला मेला. परंतु असह्य वेदना सहन करत, शेवटच्या श्वासापर्यंत आपण निरपराध असल्याचं तो सांगत होता. ह्या घटनेने व्हॉल्तेअर खवळला. कॅथॉलिक चर्च, धर्मवेडाने पसरवल्या जाणार्‍या अफवा, धर्मगुरू ठोठावत असलेल्या शिक्षा यावर त्याने सडकून टीका केली.

या सुमारास फ्रेंच राजेशाहीची इमारत डगमगू लागली होती. राजाची विलासी राहणी आणि अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धाला केलेली मदत यामुळे फ्रान्सच्या राजाचा खजिना रिता झाला होता. कर्ज वाढलं होतं. त्याची परतफेड करायची तर जनतेवर अधिक कर लादण्याशिवाय  अन्य उपाय नव्हता. उमरावांना कधीही कोणताही कर द्यावा लागला नव्हता. उमरावांचा हा विशेषाधिकार संकुचित करणं खुद्द राजाला मान्य नव्हतं कारण त्याची सत्ता त्यांच्या आधारावरच टिकून होती. यावेळी फ्रान्समध्ये क्रांतिकारकांचे अनेक गट कार्यरत होते. प्रत्येक गट आपआपली पत्रकं व पुस्तिका छापून आपली भूमिका लोकांमध्ये प्रसारित करत होता. राज्याच्या खजिन्यात नेमकी किती तूट आहे याचे आकडे प्रत्येक पुस्तिकेत वेगळे होते. या राजकीय पत्रक-पुस्तिकांनी नकळतपणे पक्षपाती माहिती प्रसिद्ध करण्याचा पायंडा पाडला. दुसर्‍या गटाला नामोहरम करण्यासाठी असत्य, अर्धीकच्ची, दिशाभूल करणारी माहिती आपल्या मुखपत्रातून प्रसिद्ध करू लागले.  बेंजामिन फ्रँकलीन हा युरोपातील ज्ञानोदयाच्या (एन्लायटन्मेंट) सांस्कृतिक आंदोलनाचा बिनीचा शिलेदार, शास्त्रज्ञ, अर्थतज्ज्ञ, मुत्सद्दी व लेखकही. पण वर्तमानपत्रात टोपण नावाने लिहीण्याची त्याला हौस होती. अमेरिकेचा फ्रान्समधील राजदूत म्हणून काम करताना बॉस्टन इंडिपेंडन्ट क्रॉनिकल या वर्तमानपत्राची खोटी पुरवणी त्याने छापून घेतली. अमेरिकेतील मूळ रहिवासी (रेड इंडियन्स) ब्रिटीश साम्राज्यशाहीचे हस्तक आहेत, अमेरिकन लोकांवर अत्याचार करत आहेत अशी फेक न्यूज वा वृत्तांत त्याने लिहीला होता. उद्देश हा की ब्रिटीशांच्या राजकीय वर्तनात त्यामुळे सुधारणा व्हावी. बॉस्टन इंडिपेन्डंट क्रॉनिकल या वर्तमानपत्राची ह्या फेक पुरवणीच्या प्रती त्याने अनेक युरोपियन राज्यकर्ते, राजदूत यांना पाठवल्या. बेंजामिन फ्रँकलीनच्या लेखाचं पुनर्मुद्रण इंग्लड व अमेरिकेतल्या वर्तमानपत्रांनी केलं. त्यामुळे फेक न्यूज प्रदीर्घकाळपर्यंत वस्तुनिष्ठ इतिहास आहे अशीच अमेरिकनांची समजूत होती.

त्याकाळात विविध राजकीय गट ज्या पुस्तिका व पत्रकं छापून प्रसिद्ध करत त्यामध्ये आफ्रिकन गुलामांनी केलेले गुन्हे, त्यांची बंडं याबाबत अशाच प्रकारच्या दिशाभूल करणार्‍या प्रचारकी बातम्या येत. त्यामुळे आफ्रिकन-अमेरिकन लोक दहशतीच्या सावटाखाली राहात होते. राजकारणातही फेक न्यूज या अस्त्राचा वापर केला जाऊ लागला. अमेरिकन स्वातंत्र्याचा जाहिरनामा लिहीणार्‍या थॉमस जेफरसनची सन 1800 मध्ये अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवड झाली. या निवडणुकीत जेफरसनला पाडण्यासाठी काही वर्तमानपत्रांनी त्याच्या निधनाची बातमी छापली होती. जेणेकरून जेफरसनला मतं देणारे मतदार मतदानासाठी घराबाहेर पडू नयेत.

या काळात वर्तमानपत्रं वर्गणीवर चालवली जात. ही वर्तमानपत्रं म्हणजे कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षांची वा गटांची मुखपत्रं होती. राजकारणाच्या बातम्या, राजकारणावरील लेख, पुस्तक आणि नाटकांची परिक्षणं त्यामध्ये छापून यायची. 1833 मध्ये न्यूयॉर्क या शहरातून द सन हे वर्तमानपत्रं प्रसिद्ध होऊ लागलं. त्याचा संपादक होता बेंजामिन डे. या वर्तमानपत्राची किंमत होती एक पेनी. त्यावेळच्या वर्तमानपत्रांच्या तुलनेत द सन स्वस्त होता. रस्त्यावर, नाक्यावर विकलं जाणारं द सन हे पहिलं वर्तमानपत्र होतं. या वर्तमानपत्राने सर्वप्रथम वार्ताहर नेमले. सामान्य वाचकांना नाट्यामध्ये रस असतो हे अचूक हेरून बेंजामिन डे गुन्हेगारी जगताच्या बातम्या प्रसिद्ध करू लागला. एका आत्महत्येचा तपशीलवार वृत्तांत त्याने छापला. सामान्य नागरिकाची बातमी पहिल्यांदाच वर्तमानपत्रात छापून आली. वर्तमानपत्राचा खप वाढवण्यासाठी बेंजामिन डे काही ना काही नवी शक्कल लढवत असे. त्यातूनच त्याने चंद्रावरील प्रतिसृष्टीची लेखमाला प्रसिद्ध केली. या लेखमालेमध्ये चंद्रावरील विविध प्राणी, पक्षी, वनस्पती यांची वर्णनं होती. वटवाघळासारखे पंख असलेले मानवी प्राणी उघड्यावर समागम करतात इत्यादी वर्णनं होती. या वृत्तांतामध्ये या प्रतिसृष्टीची रेखाटनंही होती. या लेखमालेमुळे वर्तमानपत्राचा खप 8000 प्रतींवरून एकोणीस हजार प्रतींवर गेला. जाहिरातीचं उत्पन्न अर्थातच वाढलं. त्यानंतर या वर्तमानपत्राने बलूनमधून अटलांटिक पार केलेल्या वीराची गाथाही छापली. या फेक न्यूज होत्या. पण तशी कबुली या वर्तमानपत्राने कधीही दिली नाही. वर्तमानपत्राचा खप आणि जाहिरातींचं उत्पन्न वाढणं हेच संपादकीय धोरण होतं. या वर्तमानपत्राचा कित्ता नंतर अनेक अमेरिकन वर्तमानपत्रं गिरवू लागली.

रुडॉल्फ हर्स्ट हा अमेरिकन उद्योजक आणि राजकारणी होता. त्याची माध्यम कंपनीही होती. 1887 सालात त्याने न्यूयॉर्क जर्नल हे वर्तमानपत्र विकत घेतलं. त्याची स्पर्धा होती जोसेफ पुलित्झर (या संपादकाच्या नावाने दिला जाणार पुलित्झर पुरस्कार पत्रकारितेमध्ये अतिशय प्रतिष्ठेचा मानला जातो) या संपादकाच्या न्यूयॉर्क वर्ल्ड या वर्तमानपत्राशी. अतिशय बटबटीत मथळे, गुन्हेगारी, सेक्स, मनोरंजन या विषयांवरील बातम्या छापणं ही हर्स्टची व्यूहरचना होती. अमेरिकेतील पीत पत्रकारितेचा तो जनक समजला जातो. अमेरिकेतील सर्व महत्वाच्या शहरांमधील अनेक वर्तमानपत्रं त्याने विकत घेतली. आपले राजकीय हेतू साधले जातील अशाच बातम्या या वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध व्हाव्यात यावर त्याचा कटाक्ष होता.  क्यूबामधील अमेरिकन नागरीकांना स्पॅनिश सरकार सापत्न भावाची वागणूक देत आहे. स्पॅनिश सरकार अमेरिकेच्या विरोधात युद्धाची तयारी करत आहे अशा बातम्या त्याला छापायच्या होत्या. तिथल्या वार्ताहराने त्याला कळवलं की इथे युद्धाची तयारी वगैरे काहीही नाही. त्यावर हर्स्टने उलटा निरोप धाडला—तू फक्त फोटो पाठव, आम्ही युद्ध घडवतो. अमेरिकन महिलांचे कपडे उतरवून स्पॅनिश पोलीस त्यांची झडती घेतात असे बोगस फोटो हर्स्टने छापले. हे प्रक्षोभक फोटो पाह्यल्यावर अमेरिकन जनमताचा क्षोभ झाला. त्याचीच परिणीती अमेरिकन-स्पॅनिश युद्धात झाली. वर्तमानपत्रं पक्षपाती होतीच पण त्यांचं रुपांतर उद्योगामध्ये झालं. ही कृपा रुडॉल्फ हर्स्टची.

तोपावेतो रेडीयो हे माध्यम अवतरलं. बातम्या, माहिती, मनोरंजन करणारं हे नवं माध्यम होतं. बातमी असो की माहिती, लोकांना नाट्य हवं असतं हे अचूक ओळखलं अडॉल्फ ओक्स या संपादकाने. वर्तमानपत्रं विकणारा पोर्‍या होता तो. त्याशिवाय अनेक छोटी-मोठी कामं करून तो बापाच्या उत्पन्नात भर घालत होता. एक तोट्यातलं वर्तमानपत्र त्याने कर्ज काढून विकत घेतलं. त्यानंतर दिवाळखोरीत गेलेलं न्यूयॉर्क टाइम्स हे वर्तमानपत्र त्याने विकत घेतलं. 1896 सालात. स्पष्ट, प्रतिष्ठीत, विश्वासार्ह आणि निष्पक्षपाती वर्तमानपत्र सुरु करण्याचा निर्धार त्याने वयाच्या विशीमध्येच केला होता. न्यूयॉर्क टाइम्सची सूत्रं हाती आल्यानंतर, आपली आकांक्षा पूर्ण करण्याच्या दिशेने त्याची पावलं पडू लागली. वार्ताहरांनी केवळ बातम्या मिळवण्याच्या नाहीत तर बातम्या देण्यासाठी संपूर्ण माहिती मिळवायची, तिची सत्यासत्यता पडताळून पाह्यची, हाती येणारी आकडेवारी वा माहिती शंभर टक्के सत्य आहे असं मानायचं नाही, तिच्याकडे शंकित नजरेनेच पाह्यचं आणि त्यानुसारच ती सादर करायची. बातमी विश्वासार्ह असायची तर बातमीदाराने वास्तव काय आणि चुकीचं काय याचा निवाडा करायचा नाही, बातमी कुठून मिळाली म्हणजे बातमीचा स्त्रोत कोण आहे हे नमूद करायचं तरच बातमी निष्पक्षपाती असते, अशी शिस्त त्याने बातमीदारीला लावली. अडॉल्फ ओक्सने न्यूयॉर्क टाइम्स ताब्यात घेतला त्यावेळी त्या वर्तमानपत्राचा खप केवळ 9000 प्रती होता. 1920 सालात न्यूयॉर्क टाइम्सचा खप 7 लाख 80 हजार प्रतींवर गेला. ताजी, अचूक, संपूर्ण, निष्पक्षपाती बातमीदारी करूनही वर्तमानपत्राचा खप वाढतो, जाहिरातींचं उत्पन्नही वाढतं हे अडॉल्फ ओक्सने करून दाखवलं. अमेरिकेतील मांस उद्योग, रॉकफेलर कंपनीने केलेली हेराफेरी असे अनेक घोटाळे न्यूयॉर्क टाइम्सने उघडकीस आणले. न्यूयॉर्क टाइम्स अनेक वर्तमानपत्रं आणि प्रसारमाध्यमांचा आदर्श बनला. किंबहुना अँग्लो-सॅक्सन पत्रकारितेचा तो मानबिंदू ठरला. अँग्लो-सॅक्सन पत्रकारितेची मूल्यं आजही प्रमाण मानली जातात. किंबहुना त्या मापदंडाच्या आधारे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं मूल्यमापन केलं जातं.

बंगाल गॅझेटीयर हे भारतातलं पहिलं वर्तमानपत्र कोलकत्यात एका गोर्‍या माणसाने सुरू केलं. प्लासीच्या लढाईनंतर म्हणजे अठराव्या शतकाच्या मध्यावर, ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य गंगा-यमुना खोर्‍यामध्ये सुरू झालं. कोलकता ही ब्रिटीश इंडियाची राजधानी होती. जेम्स हिकी या आयरीश माणसाने हिकीज् बेंगॉल गॅझेट वा कलकत्ता जनरल अडव्हर्टायझर हे साप्ताहिक वर्तमानपत्र सुरू केलं. 1780 ते 1782 अशी दोन वर्षं हे साप्ताहिक सुरू होतं. या साप्ताहिकात हिकीने अनेक वृत्तांत प्रसिद्ध केले. ताडी-माडी काढणार्‍या इसमाचा झाडावरून पडून झालेला मृत्यू, रस्त्यावर कुजणारी प्रेतं, कोलकत्यातील झोपडपट्टीला लागलेली आग अशा अनेक विषयांवर त्याने वृत्तांत प्रसिद्ध केले. सुईणीचं पुरुषांनी करावं का, या विषयावर चर्चाही या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्या. शहराच्या पायाभूत सुविधांवर या वर्तमानपत्राने विशेष भर दिला होता. त्यावेळी ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य होतं. कंपनीचे अधिकारी, कर्मचारी भ्रष्टाचार, लाचखोरी करणारे होते. हिकीकडेही लांच मागण्यात आली होती. त्याने लांच दिली नाहीच आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभारावर सडकून टीका केली. कंपनीच्या वसाहतवादी धोरणांचाही या वर्तमानपत्राने समाचार घेतला. हे वर्तमानपत्र अँग्लोइंडियन, ब्रिटीश आणि उच्च वर्गीय भारतीयांमध्ये लोकप्रिय झालं होतं. हिकीच्या बेंगॉल गॅझेटला शह देण्यासाठी द इंडिया गॅझेट हे वर्तमानपत्र सुरू करण्यात आलं. वॉरन हेस्टिंग हा ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातला सर्वोच्च अधिकारी होता. त्याला लांच दिली नाही म्हणून बेंगॉल गॅझेटला शह देण्यासाठी द इंडिया गॅझेट हे वर्तमानपत्र सुरू करण्यात आलं, असा आरोप हिकीने केला. या प्रकरणात हिकीला अटकही झाली. तुरुंगातूनही तो वर्तमानपत्र प्रसिद्ध करत होता. अखेरीस कंपनी सरकारने त्याचा छापखाना बंद केला आणि भारतातलं पहिलं वर्तमानपत्र दोन वर्षांत बंद पडलं.

त्यानंतर भारतात प्रसिद्ध होणारी बहुतेक वर्तमानपत्रं मतपत्रं होती. ना. भि. परुळेकर यांनी केलेल्या नोंदीप्रमाणे—“वृत्तपत्र म्हणजे चार शिकलेल्या माणसांतील वादाचे आणि चर्चेचे क्षेत्र, त्यातील किंवा त्याशी संबंधित चारचौघा मंडळींनी जमावे, गावातील कुटाळ विषयांवर चर्चा करावी, ज्यांचा संबंध सर्व जनतेच्या जीवनाशी नाही, त्यावर लिहावे; ‘राजकारण’ हा शब्द इतका उथळ झाला आहे की, तो हातात धरवत नाही, अशा विषयावर मल्लिनाथी करावी आणि मग वृत्तपत्रासाठी येणार्‍या आयत्या बातम्यांवर आपला नित्याचा चरितार्थ भागवावा; ही परंपरा मी मोडून काढली.” ना. भि. परुळेकर यांनी अमेरिकेत पत्रकारितेचं शिक्षण घेतलं होतं. अमेरिकेतील वर्तमानपत्रांत त्यांची वार्तापत्रे व लेख प्रसिद्ध होत असत. परदेशी वर्तमानपत्रांचे हिंदुस्थानातील बातमीदार म्हणून ते काम करत होते. स्वातंत्र्यलढ्यात सर्वस्व अर्पण करावं या विचाराने ते भारलेले होते. त्यांचा आणि गांधीजींचा वैयक्तीक परिचय होता. साबरमतीच्या सत्याग्रह आश्रमाला त्यांनी अनेकदा भेटी दिल्या होत्या. मिठाचा सत्याग्रह सुरू झाल्यावर परुळेकरांना स्वस्थ बसवेना. “आपल्या ऐंशी स्वयंसेवकांत माझे नांव नोंदवा. मी शेवटपर्यंत सत्याग्रहात राहीन” असं पत्र त्यांनी गांधीजींना लिहीलं. “आय वुड नॉट लाईक यू टू कम टू जॉईन सत्याग्रह, बट हेल्प अस फ्रॉम व्हेअर यू आर” असं उत्तर गांधीजींनी दिलं. 1 जानेवारी 1932 रोजी ‘सकाळ’ चा पहिला अंक प्रसिद्ध झाला. या वर्तमानपत्राने सामान्य नागरिकाला अग्रस्थान देऊन बातमीदारी केली. पुण्याच्या मंडईत मटारचे ढीग येऊन पडले त्यावेळी सकाळ पहिल्या पानावर मोठ्या मथळ्याची बातमी छापली. हजारो लोक पिशव्या घेऊन आले आणि सर्व माल विकला गेला. शहरातील पायाभूत सुविधा, म्युनिसिपाल्टीचा कारभार, त्यांचे प्रश्न अशा अनेक दैनंदिन जीवनातील विषयांवर सकाळ मध्ये बातम्या प्रसिद्ध होऊ लागल्या. परदेशी राजकारण असो की राष्ट्रीय राजकारण वा स्थानिक प्रश्न, प्रत्येक बाब तपासून त्यावर बातम्या वा लेख वा अन्य मजकूर प्रसिद्ध करण्याचं ना. भि. परुळेकरांचं धोरण होतं.

वर्तमानपत्र हे मतपत्र असू द्या की जनहिताला सर्वोच्च प्राधान्य देणारे असू द्या किंवा पीत पत्रकारिता करणारं वा निष्पक्षपाती बातमीदारी करणारं अथवा सरकारच्या विरोधात उभं राहणारं वा सरकारची तरफदारी करणारं, मुद्दा असा की माध्यमं जो मजकूर (लेखन, फोटो, चित्र, ध्वनी, चित्रफिती, इत्यादी) प्रसारीत करतात त्याचा लोकांवर नेमका काय परिणाम होतो? म्हणजे माध्यमांतून दिला जाणारा संदेश जनमानसामध्ये कसा शोषला जातो? याचा अभ्यास मास कम्युनिकेशन वा जनसंज्ञापन शास्त्रामध्ये केला जातो. जगातले सर्व आदिवासी तीरकमठा वापरतात. स्थितिज ऊर्जेचं रुपांतर गतीज ऊर्जेत करणं या वैज्ञानिक नियमावर तीरकमठा कार्य करतो. ज्यांना वैज्ञानिक नियम समजतो ते अग्नीबाण विकसीत करतात. त्यांचा वेग, अचूकता आणि संहारकता धनुष्यबाणापेक्षा कित्येक पटींनी अधिक असते. जनसंज्ञापन शास्त्राचे नियम निसर्गनियमांप्रमाणे त्रिकालाबाधित नसतात कारण प्रसारमाध्यमं आणि त्यांच्यामार्फत प्रसारित केलेले संदेश तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था, राजकीय-सामाजिक व्यवस्था या चौकटीत असतात. हे घटक अनित्य असतात त्यामुळे जनसंज्ञापनाच्या नियमांचा वेळोवेळी नव्याने शोध घ्यावा लागतो.

हायपोडर्मिक नीडल वा इंजेक्शनचा सिद्धांत

प्रसारमाध्यमं संदेश प्रसारीत करतात. वाचक वा श्रोता निष्क्रीय असतो. प्रसारीत केलेल्या संदेशाच्या रचनेत वा प्रसारणात वाचक वा श्रोत्याचा काहीही सहभाग नसतो. तो केवळ संदेश ग्रहण करतो. सुईने एखादं इंजेक्शन द्यावं त्याप्रमाणे हा संदेश वाचक वा श्रोत्यांच्या मेंदूमध्ये भिनतो. वाचक वा श्रोते यांच्या वर्तनावर त्याचा परिणाम होतो. हॅरॉल्ड लासवेल या शास्त्रज्ञाने हा सिद्धांत 1927 साली मांडला. या सिद्धांताचा पडताळा आला 1938 साली. ऑर्सन वेल्स या दिग्दर्शकाने सीबीएस रेडीयोसाठी एक मालिका तयार केली. एच. जी. वेल्स या लेखकाच्या एका विज्ञानकथेवर – द वॉर ऑफ वर्ल्डस, ही मालिका आधारित होती. बुध ग्रहावरील प्रगत मानवजात पृथ्वीवर आक्रमण करते हे या कादंबरीचं आशयसूत्र होतं. ऑर्सन वेल्सने सादर केलेल्या कार्यक्रमात या युद्धाची हकीकत बातमीपत्रातून उलगडत जाणारी होती. या बातमीपत्रांमध्ये संगीताचे काही तुकडे होते. मालिकेचा हा भाग जेव्हा प्रसारीत झाला त्यावेळी अमेरिकेत हलकल्लोळ माजला. कारण श्रोत्यांना ते खरोखरच बातमीपत्र वाटलं. या गोंधळाच्या बातम्या वर्तमानपत्रांनी प्रसिद्ध केल्या.

हिंसा, क्रोर्य, सेक्स, गुन्हेगारी यांचं चित्रण करणार्‍या कलाकृतींमुळे समाजात हिंसाचार व गुन्हेगारी वाढते अशी चर्चा दर पिढीमध्ये होत असते. प्रसारमाध्यमं सर्वशक्तीशाली आहेत हे यामागचं गृहितक आहे. इंजेक्शनच्या सिद्धांतात एक महत्वाची उणिव वा त्रुटी आहे. त्यामध्ये श्रोते वा वाचक ही एक झुंड आहे असं गृहित धरण्यात आलंय. दोन व्यक्तींमध्ये हा सिद्धांत फरक करत नाही.

टू-स्टेप फ्लो अर्थात दोन पायर्‍यांनी वाहणारा प्रवाह

हा सिद्धांत 1945 साली मांडण्यात आला. प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र वा स्वायत्तपणे समाजव्यवहारात सहभागी होते. व्यक्तीने केलेलं बातमीचं स्पष्टीकरण वा विश्लेषण वा आकलन याचा परिणाम अन्य व्यक्तींवर होतो. परिणामांची ही साखळी प्रसारमाध्यमांवरही परिणाम करते. सारांशाने सांगायचं तर बहुतेक लोक वा व्यक्तींवर नेत्याच्या मतांनुसार बातमीचा वा माहितीचा अर्थ लावतात. राजकारणी, धर्मगुरू वा बाबा, लोकप्रिय लेखक वा तज्ज्ञ, चित्रपटाचा नट वा नटी यापैकी कुणीही नेता असू शकतो. प्रसारमाध्यमांनी प्रसारीत केलेल्या बातमीचा या नेत्यांनी लावलेला अर्थ कोणता आहे, त्यांच या बातमीवर काय मत आहे याकडे त्यांच्या अनुयायांचं लक्ष असतं. ओपिनीयन लीडर वा मतनेते आणि त्यांना अनुसरणारी सामान्य जनता अशा प्रकारे प्रसारमाध्यमांच्या संदेशाचं संश्लेषण समाजामध्ये होतं.

जाहिराती, लोकप्रिय चित्रपटांची निर्मिती यामध्ये या सिद्धांताचा वापर करण्यात आला. कोलगेटची जाहिरात करणारं मॉडेल डॉक्टरचा एप्रन घालून, गळ्यात स्टेथॉस्कोप लावणारं असे. टु-स्टेप फ्लो ही रोजच्या अनुभवाची बाब होती पण या सिद्धांताचा पडताळा करणारा डेटा मात्र उपलब्ध नव्हता. ट्विटर हे माध्यम लोकप्रिय झाल्यावर या सिद्धांताचा पडताळा घेण्यासाठी ट्विटरद्वारे प्रसारीत केलेल्या संदेशांचं वितरण आणि ग्रहण कसं करण्यात आलं याचा शोध घेण्यात आला. करोडो संदेश ट्विटरवरून प्रसारीत होत असतात. मात्र त्यापैकी 50 टक्के संदेश केवळ वीस-पंचवीस हजार ओपिनीयन मेकर्सनी बनवलेले असतात, असा निष्कर्ष या अभ्यासाअंती निघाला.

रामदेव बाबा, अण्णा हजारे हे आपल्या देशातील ओपिनीयन लीडर्स आहेत असं 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये दिसून आलं.

इंजेक्शनचा सिद्धांत असं मानतो की श्रोता वा वाचक निष्क्रीयपणे प्रसारमाध्यमांचे सिद्धांत ग्रहण करतो. टू-स्टेप फ्लो या सिद्धांतानुसार प्रसारमाध्यमांमधील संदेशावर ओपिनीयन लीडर्स प्रक्रिया करतात आणि त्यानंतर त्यांचे अनुयायी त्या संदेशाचं ग्रहण करतात. म्हणजे संदेशाचा अर्थ लावणं आणि त्याचं वितरण यामध्ये वाचक वा श्रोते यांचा सक्रीय सहभाग असतो.

रिएन्फोर्समेंट वा मजबूतीकरणाचा सिद्धांत

1950 साली टेलिव्हीजन आला. वर्तमानपत्रं, रेडीयो आणि टेलिव्हीजन ही प्रसारमाध्यमं एकमेकांशी स्पर्धा करू लागली. अनेक वर्तमानपत्रं, रेडीयो व टेलिव्हीजन चॅनेल्स एकमेकांशी स्पर्धा करू लागले. वाचक, श्रोते व प्रेक्षक यांना निवडीचं स्वातंत्र्य मिळालं. लोक एक विशिष्ट वर्तमानपत्र वा रेडीयो वा टेलिव्हीजन चॅनेलला पसंती का देतात असा प्रश्न निर्माण झाला. प्रत्येक व्यक्तीच्या काही धारणा असतात, विश्वास असतात, पूर्वग्रहही असतात. आपल्या धारणा, विश्वास वा पूर्वग्रहांशी मिळती-जुळती, त्यांना मजबूत करणारी माहिती, दृष्टिकोन, मतं लोक शोधत असतात. कारण प्रत्येक व्यक्तीला ज्ञानाचं आकलन करून घेण्याची आस असते. याला म्हणतात रिएन्फोर्समेंट वा मजबूतीकरणाचा सिद्धांत.

आपण चुकीच्या वा गैर बाजूचा पक्ष उचलून धरतो आहोत हे कुणालाही अनिष्ट वाटतं. त्यांचे विश्वास, धारणा, पूर्वग्रह यांना कोणी आव्हान दिलं की लोक अस्वस्थ होतात. त्यामुळे लोक अशा नेत्यांचं म्हणजे ओपिनियन लीडर्सना अनुसरतात जे त्यांच्या धारणा व विश्वासांना बळ पुरवतात.

ह्या सिद्धांताची पुष्टी 2017 साली अमेरिकेतील नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सने सुमारे पाच लाख ट्विटसचा अभ्यास केला. हे सर्व ट्विट्स वादग्रस्त विषयांवर होते. या ट्विट्सची विभागणी उदारमतवादी (लिबरल) आणि यथास्थितीवादी (काँन्झर्वेटिव) या दोन भागात करण्यात आली. दोन्ही गटातील भावनिक ट्विट्स सर्वाधिक रिट्विट होतात असं या अभ्यासामध्ये आढळलं.

आपल्या धारणा, विश्वास, पूर्वग्रह यांना बळकटी देणारी माहिती, मतं, विश्लेषण व्यक्ती शोधत असतात. विविध प्रसारमाध्यमांना बाधा झाल्यावर ही प्रक्रिया वेग पडकते. विशेषतः आधुनिक ऑलगॅरिदमच्या काळात. गुगुल असो की अमेझॉन वा फेसबुक वा अन्य सोशल नेटवर्किंग साईटस् प्रत्येक व्यक्तीने कशाचा शोध घेतला आहे, कोणत्या वेबसाईटवर किती काळ रेंगाळली आहे, कशाला लाईक केलं आहे इत्यादी सर्व डेटाच्या आधारे या वेबसाईट आपल्याला मित्र, मैत्रीणी, पुस्तकं, कपडे, जोडे, झाडू सर्व काही सुचवतात. माझ्याशी सुसंगत धारणा, विश्वास, पूर्वग्रह असणार्‍या मोठ्या गटाशी मी जोडला जातो. सोशल नेटवर्किंग साइटसवर मी त्याच गटांमध्ये हिंडत राहतो, त्यांची मतं, त्यांनी दिलेली माहिती वाचत राहातो. अन्य गटांमध्ये काय चाललंय याची खबर मला मिळणं दुरापस्त होतं. अमेरिकेतील 60 टक्के लोक, सोशल मिडिया प्लॅटफॉर्म्सवरून बातम्या मिळवतात. या बातम्या अर्थातच त्यांच्या धारणा, विश्वास यांच्याशी जुळणार्‍या असतात.

फेक न्यूज आणि आपला काळ

दिनांक 9 डिसेंबर 2017 रोजी, गुजरात विधानसभा निवडणुक प्रचाराच्या दौर्‍यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पलानपूर येथे केलेल्या भाषणाच्या बातम्या दुसर्‍या दिवशी वर्तमानपत्रात छापून आल्या. त्यांचे मथळे पाहा.

Gujarat Polls: Why Pakistan Army Ex-DG wants  Ahmed Patel as CM, Ask Narendra Modi (Mint on Sunday)

Narendra Modi alleges Pakistan is interfering in Gujarat polls; seeks explanation from Congress over its top party members meeting leaders from Pakistan (Mid-Day)

Narendra Modi accuses Pakistan of interfering in Gujarat Polls, claims it wants Ahmed Patel as Chief Minister (First Post)

Pakistan trying to influence Gujarat polls, claims PM Narendra Modi at Palanpur Rally (New Indian Express)

या बातम्यांनुसार नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणात पुढील मांडणी केली–

पाकिस्तानचे उच्चायुक्त, पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री, भारताचे माजी उपराष्ट्रपती आणि माजी पंतप्रधान, मनमोहन सिंग यांची एक बैठक दिल्लीला मणिशंकर अय्यर यांच्या घरी झाली….दुसर्‍या दिवशी मणिशंकर अय्यर म्हणाले—मोदी ‘नीच’ आहेत….माझ्या भावांनो आणि बहिणींनो हा अतिशय गंभीर मामला आहे. पाकिस्तान हा नाजूक विषय आहे. गुजरातमध्ये निवडणुका होत असताना, ही गुप्त बैठक होण्यामागची कारणं कोणती असतील? आणि दुसरी बाब, पाकिस्तानी लष्कराचे माजी महासंचालक, अर्शद रफीक म्हणाले की अहमद पटेल गुजरातचे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी पाठिंबा द्यायला हवा.

या विधानातील एकच बाब सत्य आहे. काँग्रेस नेते, मणिशंकर अय्यर यांच्या नवी दिल्ली येथील घरी एक बैठक झाली होती. बाकी सर्व बाबी अर्धवट वा असत्य आहेत. बैठक गोपनीय नव्हती. रात्रीच्या जेवणाला काही मंडळी एकत्र आली होती. सदर बैठकीची निमंत्रण रितसर ईमेलने अनेकांना पाठवली होती. त्यामध्ये पत्रकारांचाही समावेश होता. काही व्यक्तींची नावं पंतप्रधानांनी अचूक सांगितली. पण सर्व पाहुण्यांची यादी त्यांनी वाचून दाखवली नाही. पंतप्रधानांच्या भाषणानंतर काही वर्तमानपत्रांनी यासंबंधातील वृत्त प्रसिद्ध केलं. त्यामुळे आम्हाला जे समजलं ते पंतप्रधानांनीही ठाऊक होतंच. सदर बैठकीला भारताचे माजी लष्कर प्रमुख, दीपक कपूर उपस्थित होते. त्याशिवाय माजी परराष्ट्र सचिव व वरिष्ठ राजनैतिक अधिकारीही होते. त्यांच्या राष्ट्रनिष्ठेबद्दल शंका घेता येणार नाही. या सर्वांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं की सदर बैठकीत गुजरातवर अजिबात चर्चा झाली नाही. परंतु तरिही पंतप्रधानांनी त्यांना जे म्हणायचं होतं ते म्हटल्यावर संपूर्ण गुजरातमध्ये या जेवणावर चर्चा झाली.

एक-दोन अपवाद वगळता एकाही माध्यम कंपनीने पंतप्रधानांच्या विधानाची खातरजमा केली नाही. पंतप्रधानांच्या विधानाचा आधार घेऊन मिडियाने मथळ्यांचा खेळ मांडला. पंतप्रधान चुकीचं बोलले होते मात्र ते चुकीचं बोलले, त्यांनी वस्तुस्थितीचा अपलाप केला ह्याची नोंद वा चर्चा बातमीत नव्हती. पूर्वीपासूनच दिशाभूल करणारी विधानं नरेंद्र मोदी माहीर आहेत. ते निष्पाप असतात, स्वतःहून चूड लावत नाहीत. या प्रकरणात त्यांनी संकेत दिला मिडियाने पंतप्रधानांना सोयीस्कर अशा कथानकाची रचना केली. पलानपूरच्या सभेत पंतप्रधानांनी लोकांना गुप्त बैठकीची माहिती दिली, बैठकीच्या काळ-वेळेकडे लोकांचं लक्ष वेधलं आणि त्यानंतर पुस्ती जोडली की पाकिस्तानी लष्कराला काँग्रेसचा मुस्लिम नेता गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी हवा आहे. त्यांनी उघडपणे काहीच म्हटलेलं नाही. त्याची गरजही नव्हती. थुंकी झेलणार्‍या मिडियाने मात्र गावभर बोभाटा केला की गुजरातच्या निवडणुकांमध्ये पाकिस्तान हस्तक्षेप करतो आहे आणि काँग्रेसने त्याच्याशी हातमिळवणी केली आहे.

इराकचा हुकूमशहा, सद्दाम हुसेन याने महासंहारक अस्त्रांची निर्मिती केली आहे, हा शोध अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी लावला. ही फेक न्यूज होती. जगातल्या एकाही प्रसारमाध्यमाने या बातमीची पुष्टी केली नव्हती. अमेरिका आणि इंग्लड दोन्ही देश लोकशाहीवादी.  मात्र या फेक न्यूजची खातरजमा न करता या दोन्ही देशांनी इराकमध्ये फौजा घुसवल्या. या युद्धात पाच लाख इराकी नागरीक ठार झाले. दहा लाख नागरीक बेघर झाले.

इराक युद्धावर इंग्लडने 12 अब्ज डॉलर्स खर्च केले. 453 ब्रिटीश सैनिक ठार झाले. तीस हजार सैनिक जखमी झाले. साठ हजार सैनिकांच्या मनावर युद्धाचे विपरीत परिणाम झाले. त्यांना वैद्यकीय उपचार घ्यावे लागले. इराक युद्धासंबंधात इंग्लडच्या मंत्रिमंडळाच्या 21 बैठका झाल्या होत्या, त्यानंतर इराकवर आक्रमण करण्यात आलं. ब्रिटीश सरकारने नेमलेल्या चिलकॉट समितीच्या अहवालातून या बाबी पुढे आल्या.

या युद्धावर अमेरिकेचा खर्च एका टप्प्यावर दोन ट्रिलीयन डॉलर्स होता. एकूण साडे आठ हजार अमेरिकन सैनिक या युद्धात ठार झाले.  लढाईत ठार झालेल्या सैनिकांच्या नातेवाईकांना पुढची काही वर्षं पेन्शनचा खर्च, सैनिकांच्या मानसोपचारांवरचा खर्च जमेस धरला तर अमेरिकेचा इराक युद्धावरचा एकूण खर्च सहा ट्रिलियन डॉलर्सच्या घरात जाईल. द सिक्रेट वॉर विदीन, अ सिक्रेट व्हाईट हाऊस हिस्ट्री ह्या बॉब वुडवर्डच्या पुस्तकात अमेरिकन अध्यक्षाच्या कारभाराची झाडाझडती घेण्यात आली आहे.

बुश हट्टी व दुराग्रही होते. आपल्याला जे वाटतं तेच सत्य अशी त्यांची ठाम धारणा होती. इराकमध्ये काम केलेले लष्करी अधिकारी बुश सरकारला सांगत होते की युद्ध फसलं आहे. ताबडतोब सैन्य मागे घ्या. अमेरिकन संसद सदस्य, लष्करी अधिकारी, माजी सेक्रेटरी ऑफ स्टे इत्यादींचं शिष्टमंडळ इराकला गेलं. विविध गटांना भेटलं. त्यांनीही बुशना अहवाल दिला की अमेरिका या युद्धात फसली आहे, अमेरिकेचं नुकसान होतं आहे, लढाई थांबवा. तरीही बुश इराकमध्ये सैन्य पाठवत होते, युद्ध अधिक तीव्र करण्याचे निर्णय घेत होते.

अमेरिकन राष्ट्राध्यक्षाचं मंत्रिमंडळ, त्यातले मंत्री, त्यांचा स्टाफ, विविध खाती त्यांचे अहवाल, लष्कर, गुप्तचर संस्थांचे अहवाल, शिफारसी, बैठका असा जगड्व्याळ कारभार असतो. इराक युद्धासंबंधात या सर्वांमध्ये कमालीचे मतभेद होते, गोंधळ होता. बैठकींचं इतिवृत्त नसायचं. मागच्या बैठकीत काय निर्णय झाले, त्यांची अंमलबजावणी झाली का, त्यांचे काय परिणाम झाले कशावरही चर्चा होत नसे. मनमानीपणे निर्णय घेतले जात होते. भारताची अर्थव्यवस्था सुमारे अडीच ट्रिलियन डॉलर्सची आहे. इराक युद्धाचा अमेरिकेचा एकूण खर्च सहा ट्रिलियन डॉलर्सचा आहे. आधुनिक शासनसंस्थेच्या कारभाराची झलक बॉब वुडवर्डच्या ग्रंथातून मिळते.

भारतातील फेक न्यूज संबंधात बीबीसीने केलेला अभ्यास अलीकडचे प्रसिद्ध झाला. भारतातील फेक न्यूजच्या प्रसारणामध्ये राष्ट्रवाद ही शक्तीशाली प्रेरणा आहे असा या अभ्यासाचा निष्कर्ष आहे. वर्तमानपत्रं, रेडियो आणि टेलिव्हीजन या तीन माध्यमांवरचा लोकांचा विश्वास ढासळत चालला आहे. त्यामुळे सोशल मिडिया – ट्विटर, व्हॉटस् एप, फेसबुक, इत्यादीद्वारे फेक न्यूजचा प्रसार झपाट्याने होतो आहे. त्यामध्ये उजव्या शक्ती म्हणजे अर्थातच हिंदुत्ववादी शक्ती अधिक सुसंघटीत आहेत. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सात दशकांनी भारतीयांना राष्ट्रवादाचा उमाळा का येतो आहे, हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे.

पोस्ट ट्रुथ वा सत्योत्तर काळ

मुखी, लिपी आणि मुद्रण या तिन्ही संस्कृतीत फेक न्यूजची पाळमुळं आहेत. मात्र फेक न्यूजचं महासंहारक रूप एकविसाव्या शतकात आपल्या अनुभवाला येत आहे. मुखी, लिपी आणि मुद्रण संस्कृतीत बातमी वा माहितीच्या प्रसारणाचे स्त्रोत मर्यादीत होते. सत्य काय असत्य काय याची खातरजमा करणं त्यामुळे शक्य होतं. ईलेक्ट्रॉनिक संस्कृतीत प्रत्येक व्यक्ती माहितीचं, बातमीचं प्रसारण करू लागली आहे. हे तंत्रज्ञान केंद्रीभूत आहे मात्र त्याचा वापर विकेंद्रीत आहे. आपल्या इच्छेनुसार आपल्या वृत्तीला साजेसी उत्पादनं व सेवा प्रत्येक व्यक्ती मिळवू शकते अशी परिस्थिती नव्या तंत्रज्ञानामुळे निर्माण झाली आहे. लँण्ड लाईन फोनचं उदाहण घ्या. देशाचा पंतप्रधान असो की एखाद्या उद्योगसमूहाचा मालक वा गावातला वाणी किंवा ग्रामपंचायत सदस्य, सर्वांकडे एकाच प्रकारचा फोन होता. त्या फोनवर मिळणार्‍या सेवा सर्वांसाठी सारख्याच होत्या. मोबाईल फोन, स्मार्ट फोन वेगळे आहेत. तुम्ही किती पैसे खर्च करता यावर त्या फोनच्या सेवा-सुविधा अवलंबून असतात. ह्या फोनचे ब्रँण्डस ग्लोबल आहेत. फोनची संकल्पना एका देशात तयार होते, सुटे भाग दुसर्‍या देशात बनतात, जुळणी तिसर्‍या देशात होते आणि अनेक देशांमध्ये त्यांची विक्री होते. दूरसंचार तंत्रज्ञानातील क्रांतीमुळे देशांच्या अर्थव्यवस्था एकमेकांना जोडल्या गेल्या. त्यामुळे एका देशातील शेअर्स वा बँकांमधले पैसे प्रकाशाच्या वेगाने दुसर्‍या देशात वा बँकेत पाठवणं शक्य झालं. भांडवल, वस्तू व सेवा यांचा अनिर्बंध मुक्त संचार म्हणजे अर्थव्यवस्थेचं जागतिकीकरण. दूरसंचार तंत्रज्ञानातील क्रांतीमुळे भांडवल आणि सेवा यांचा जागतिक संचार सुरू झाला.  ट्विटर, व्हॉटस् एप, फेसबुक वैश्विक आहे. त्यांचा वापर करणार्‍या प्रत्येकाला आपआपल्या अनुयायांचा गट तयार करता येतो. त्यांच्याशी सदासर्वकाळ संपर्कात राहता येतं. हे केवळ अभिव्यक्तीचे मंच नाहीत तर माहितीच्या वा बातमीच्या उत्पादनाचे आणि प्रसारणाचेही मंच आहेत.

प्रत्येक राजकीय पक्षाची वेबसाईट असते, त्याचे सोशल मिडिया सेल असतात, नेत्यांचे ट्विटर अकौंट, फेसबुक अकौंट असतात. ते थेट लोकांशी संवाद साधतात. विविध संघटना, संस्थाही सोशल मिडियावर सक्रीय आहेत. दहा दिशांनी, हजार मुखांनी माहिती व बातम्यांची निर्मिती व वितरण सुरू झालं आहे. माहितीचा प्रस्फोट काही मूठभर कंपन्यांचे आर्थिक हितसंबंध सांभाळत असतो. या कंपन्यांना देशाची बंधनं नसतात. फेसबुक, ट्विटर, व्हॉटस् एप, यू ट्यूब इत्यादी सर्व फलाट भारतीय राज्यघटनेच्या कक्षेत येत नाहीत. भारतीय संसदेने केलेले कायदे या फलाटांना लागू होत नाहीत. आम्ही फक्त फलाट वा मंच निर्माण केला आहे, या मंचावर कोणी, कोणती माहिती टाकावी, प्रसारीत करावी यावर आमचं नियंत्रण नाही, अशी या फलाटांच्या प्रवर्तकांची अधिकृत भूमिका आहे. फेक न्यूजच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी ह्या कंपन्या काही उपाययोजना करत असल्याच्या बातम्या अधून-मधून येत असतात, एवढंच. एका केंद्रीय व्यवस्थेमधूनच बातम्या व माहितीच्या प्रसारणाची विकेंद्रीत व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. या व्यवस्थेमुळे रिएन्फोर्समेंट वा मजबूतीकरणाचा सिद्धांत अधिक सूक्ष्म पातळीवर काम करू लागला आहे. सामाजिक माध्यमांचे प्लॅटफॉर्म वा फलाट अभिव्यक्तीला वाव द्यावा म्हणून निर्माण झालेले नाहीत. उत्पादनं आणि सेवांच्या जाहिरातींचे संदेश व्यक्तीच्या धारणा, आकांक्षा यांना अनुरुप देता यावेत यासाठी उभारण्यात आले आहेत.

फ्लिप कार्ट, अमेझॉन या ई-कॉमर्स कंपन्या आहेत. फ्लिपकार्ट ही मूळची भारतीय कंपनी. तिची सत्तर टक्के मालकी आता वॉलमार्ट या अमेरिकन कंपनीकडे आहे. फ्लीप कार्ट दर महिन्याला 80 लाख डॉलर्सचा तोटा सहन करते तर अमेझॉन दर महिन्याला 150 दशलक्ष डॉलर्स जाळत असते. एवढा तोटा सहन करून या कंपन्या चालतात कशा? कंपन्यांचे प्रवर्तक मोठ्या प्रमाणावर आपल्या खिशातून भागभांडवल आणि अल्पमुदतीची कर्जे उभारतात. मध्यमवर्गीय तरुण या कंपन्यांकडे ओढला गेला आहे. कृत्रिम क्रयशक्ती निर्माण करण्यासाठी या कंपन्या एक्सेंज ऑफर्स आणि डिस्काऊंट देतात. एखाद्या कंपनीच्या टेलिव्हीजनची किंमत आपल्या गावातल्या दुकानात 20 हजार रुपये असेल तर ई-कॉमर्स कंपन्या तो टेलिव्हीजन 15 वा 16 हजार रुपयांत घरपोच पोहोचवतात. चार वा पाच हजार रुपयांचा हा डिस्काउंट या ई-कॉमर्स कंपन्यांनी त्यांच्या खिशातून दिलेला असतो. त्याचा परिणाम असा होतो की गावातल्या दुकानदाराची विक्री कमी होते. ई-कॉमर्स कंपन्या ग्राहकांना डिस्काउंट देण्यासाठी जो पैसा जाळत असतात त्यातून हजारो दुकानदारांची विक्री कमी होते. सारांशाने सांगायचं तर हजारो कोटी डॉलर्सचा तोटा, ई-कॉमर्स कंपन्या गुंतवणूक म्हणून करत असतात. कारण काही दिवसांत हजारो दुकानदारांना धंदा बंद करावा लागणार आहे, साहजिकच ग्राहक या कंपन्यांकडे विविध उत्पादनांसाठी ई-कॉमर्स कंपन्यांकडेच वळणार आहे. गावातल्या वा शहरातल्या बाजारपेठेत दिसत नाहीत अशा उत्पादनांची विक्रीही या कंपन्या करत असतात.

थंडा मतलब कोकाकोला, ही जाहिरात अनेकांना आवडणार नाही. कारण ही जाहिरात करोडो ग्राहकांसाठी आहे. ज्यांना ही जाहिरात आवडणार नाही, त्यांच्यापर्यंत कोकाकोला पोहोचवायचा असेल तर ग्राहकाच्या आवडी-निवडी, आकांक्षा, त्याच्या मित्रांचं, कुटुंबाचं वर्तुळ, त्यांच्या धारणा इत्यादी सर्व माहिती अलगोरिदमद्वारे मिळते. या ग्राहकांसाठी वेगळे, त्यांना रुचणारे वा आवडणारे वा पटणारे संदेश बनवणं शक्य होतं. ग्राहकाची ही माहिती वा डेटा कंपन्यांना पुरवण्यासाठी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म निर्माण झाले आहेत.

व्यक्ती वा समाजाला अचूक माहिती देणं, शासनाचे निर्णय, धोरण व कार्यक्रम यासंबंधात त्यांच्यामध्ये जागृती निर्माण करणं, थोडक्यात लोकशिक्षण करणं, जनहितासाठी प्रयत्नशील असणं, सत्याचा शोध घेणं यासाठी कोणतंही प्रसारमाध्यम चालवलं जात नाही. वृत्तपत्र असो की उपग्रह वाहिनी वा रेडीयो या सर्व लोंढा प्रसारमाध्यमांची मालकी छोट्या-मोठ्या कंपन्यांकडे आहे. काही कंपन्या तर आंतरराष्ट्रीय आहेत. कंपनीला नफा व्हावा, उत्पन्न मिळावं या उद्देशाने प्रसारमाध्यमं चालवली जातात. त्यामुळे त्यांच्यामार्फक प्रसारीत होणार्‍या मजकूरावर नियंत्रण आणणं शासनसंस्था वा उद्योगसमूहांना शक्य असतं. अब्रू नुकसानीचा दावा ठोकणं हा मार्गही अनुसरला जातो.

इंटरनेट रिसर्च एजन्सी रशियातल्या सेंट पीटसबर्ग शहरात आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत या संस्थेने फेसबुकवर 180 तोतया पानं तयार केली. त्यावरून 80 हजार पोस्टचं प्रसारण करण्यात आलं. हे संदेश 29 दशलक्ष अमेरिकन नागरीकांपर्यंत पोचले. लाखो लोकांनी ह्या पोस्ट आपआपल्या भिंतीवर डकवल्या. त्यामुळे या पोस्टी 150 दशलक्ष अमेरिकन नागरिकांपर्यंत पोचल्या. या प्रचाराचा मतदानावर परिणाम झाला का, यावर संशोधन सुरू आहे. इथे एक बाब ध्यानी घेतली पाहीजे की रशियामधून नवराष्ट्रवादाच्या आक्रमक भूमिकेचा प्रचार केला जातो आहे. अनेक युरोपियन देशांमध्येही इंटरनेट रिसर्च एजन्सीने या मार्गाने शिरकाव केला आहे. आपआपल्या देशातील अर्थ-राजकीय परिस्थितीने निराश झालेल्या लोकांना आक्रमक नवराष्ट्रवादाची दीक्षा देऊन भू-राजकीय राजकारण आपल्याला अनुकूल बनवणं हा रशियाचा हेतू आहे. अर्थात हा स्वतंत्र विषय आहे. परंतु केवळ रशियाच नाही तर विविध जिहादी गट, इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँण्ड सिरीया यासारखे गटही याच मार्गाचा वापर करत आहेत.

माहितीचं उत्पादन अनेक व्यक्ती, संस्था व कंपन्या करू लागल्यामुळे सत्याचा शोध विलक्षण जिकीरीचा बनला आहे. अमेरीकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंम्प यांच्या पत्रकार परिषदेत सीएनएनच्या वार्ताहराने काही प्रश्न विचारले. त्या प्रश्नांनी ट्रंम्प संतापले. त्या वार्ताहराला अद्वातद्वा उत्तरं दिली. तरिही तो वार्ताहर शांतपणे प्रश्न विचारत राह्यला. त्याच्या हातातला माईक काढून घेण्यासाठी महिला कर्मचारी पुढे आली. वार्ताहर माईक हातात धरून प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करत राह्यला. या घटनेचा व्हिडीयो सर्वदूर पसरला आहे. अमेरिकन सरकारने मात्र याच घटनेचं असं चित्रण केलं की वार्ताहर त्या महिला कर्मचार्‍याशी झटापट करतो आहे असं दिसतं. म्हणून त्या वार्ताहराला रोखण्यात आलं असं स्पष्टीकरण सरकारतर्फे देण्यात आलं.

मुद्दा असा की कोणत्याही वार्ताहराला संपूर्ण सत्य कधीही सांगता येणार नाही. कॅमेरा असो की लेखणी तुम्ही कोणत्या कोनातून घटनेचं चित्रण करता वा वृत्तांकन करता त्यानुसार ती घटना वाचक, श्रोते वा प्रेक्षक यांना दिसते. आपण जे वाचतो, पाहातो वा ऐकतो ते संपूर्ण सत्य असेलच असं नाही याची पक्की खूणगाठ मनाशी बाळगायला हवी. अर्थात प्रामाणिक, प्रशिक्षित वार्ताहर घटनेचं वार्तांकन करताना सत्याच्या अधिकाधिक निकट जाण्याचा तो प्रयत्न करतो. निकटच्या सत्याचं प्रतिनिधीत्व करणं हे वार्ताहराचं काम असतं.

वैयक्तीक धारणा, आकांक्षा, इच्छा यानुसार प्रत्येक व्यक्ती बातमीची निवड करू लागली आहे. ही बाब ईलेक्ट्रॉनिक संस्कृतीमध्येच शक्य बनली आहे. माहिती वा बातमी ही एक क्रय वस्तू बनल्याने वाचक त्यांच्या पसंतीनुसार बातम्या वाचतात. त्यांनी काय वाचणं गरजेचं आहे, कोणती माहिती त्यांच्यासाठी महत्वाची आहे वा लोककल्याणासाठी गरजेची आहे यानुसार बातम्यांची निवड करत नाहीत. अलगोरिदमने ही प्रक्रिया कमालीची वेगवान केली आहे.

आता अधिक प्रगत आज्ञाप्रणाली वा सॉफ्टवेअर तयार होत आहेत. एखाद्या व्यक्तीचा फोटो आणि आवाजाचा नमुना मिळाला की तुम्ही त्या व्यक्तीचा व्हिडीयो बनवू शकता. त्या व्यक्तीलाही हे सिद्ध करता येणार नाही की ही चित्रफीत तिची नाही, ती व्यक्ती मी नाही वा तो आवाज माझा नाही. या सॉफ्टवेअरच्या चांचण्या सुरू झाल्या आहेत. त्यामुळे वृत्तनिवेदन करणार्‍य़ा व्यक्तींच्या नोकर्‍या जाण्याची शक्यता आहे. कारण या सॉफ्टवेअरद्वारे वृत्तनिवेदकाचा हुबेहूब आभास निर्माण करता येईल. मात्र त्याचा फेक न्यूजसाठीही उपयोग करता येईल. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि दूरसंचार तंत्रज्ञान व कंप्युटेशन यांच्या संयोगातून निर्माण झालेल्या फेक न्यूजला आळा घालणं अशक्य आहे.

यावर उपाय काय? असा प्रश्न साहजिकच निर्माण होतो. मुखी संस्कृतीत बोलणारा आणि ऐकणारा समोरासमोर होते. त्यामुळे सत्यासत्यतेची पडताळणी सोपी होती. लिपी संस्कृतीत लेखक आणि वाचक यांच्यातलं अंतर वाढलं. लेखकाने काय लिहीलं आहे त्याचा अर्थ लावण्याचं, सत्याचा शोध घेण्याचं काम वाचकावर आलं. मुद्रण संस्कृतीमध्ये वाचकाला त्यासाठी अनेक संदर्भ मिळू लागले. टेलिव्हीजन संस्कृतीत प्रेक्षक निष्क्रीय होता तर ईलेक्ट्रॉनिक संस्कृतीत प्रत्येक व्यक्ती जनसंज्ञापनामध्ये सक्रीय झाली. सत्योत्तर काळामध्ये प्रत्येक व्यक्तीला अधिक सतर्क राहावं लागेल. संशय व शंकेला जागा ठेवूनच कोणतीही बातमी वा माहिती स्वीकारायला हवी. त्यासाठी फेक न्यूजचा पर्दाफाश करणार्‍या वेबसाईटसना भेटी द्याव्या लागतील. माहितीचा स्त्रोत कोणता हे तपासून घ्यावं लागेल. आधुनिक शासनाचं दमनकारी रूप ध्यानी घेऊन राष्ट्रवाद वा अन्य कोणत्याही सामूहिक विचारधारेच्या आहारी जाणं टाळण्याचा आटोकाट प्रयत्न करावा लागेल. कृत्रिम बुद्धिमत्ता, दूरसंचार तंत्रज्ञान यामुळे आभासी जग आणि वास्तव जग यांच्यातील फरक कळेनासा होतो. आभासी जगाची भुरळ पडते, वास्तवापासून आपण तुटतो. त्यामुळे मूठभरांचे आर्थिक-राजकीय हितसंबंध साधले जातात.

अभिमन्यूची विटंबना करून हत्या करणार्‍या जयद्रथाचा सूर्यास्तापूर्वी वध करेन अन्यथा अग्नीप्रवेश करेन अशी शपथ अर्जुनाने घेतली होती. जयद्रथ लपून बसला. दिवसभर शोधाशोध करूनही युद्धभूमीवर अर्जुनाला जयद्रथ सापडला नाही. अखेरीस सूर्यास्ताची वेळ झाली. काही क्षणात सूर्यास्त होणार होता. अर्जुनाने चिता रचली आणि अग्नीप्रवेशाची तयारी केली. अर्जुनाची आत्महत्या पाह्यला जयद्रथही आला. त्यावेळी श्रीकृष्णाने सूर्याच्या समोर ठेवलेलं आपलं सुदर्शनचक्र काढून घेतलं आणि तो अर्जुनाला म्हणाला—हा सूर्य आणि हा जयद्रथ! अर्जुना, उचल धनुष्य सोड बाण आणि पूर्ण कर तुझी शपथ.

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि दूरसंचार तंत्रज्ञान महाभारतातील कृष्णासारखा चमत्कार करणारं आहे. त्या चमत्काराला बळी पडायचं की नाही हा निर्णय प्रत्येक व्यक्तीला करायचा आहे.

सुनील तांबे, हे ज्येष्ठ पत्रकार आहेत.

संदर्भः

फ्री व्हॉईस—रविश कुमार,  स्पिकिंग टायगर पब्लिशिंग, नवी दिल्ली. 2018

निरोप घेता—ना. भि. परुळेकर, सकाळ प्रकाशन

https://littlevillagemag.com/a-true-history-of-fake-news-part-one/

https://www.nypl.org/blog/2017/08/23/fake-news-isnt-new

https://www.press.jhu.edu/news/blog/hoax-franklins-forgery

https://courses.lumenlearning.com/suny-introductiontocommunication/chapter/grounding-theories-of-mass-communication/

https://archive.nytimes.com/www.nytimes.com/learning/general/onthisday/bday/0312.html?scp=1&sq=Adolph%2520S.%2520Ochs%2520Dead%2520at%252077&st=cse

https://economictimes.indiatimes.com/small-biz/startups/newsbuzz/indian-e-commerce-firms-douse-cash-burn-catch-up-with-global-peers/articleshow/65346785.cms

https://www.wired.com/story/facebook-may-have-more-russian-troll-farms-to-worry-about/

https://www.buzzfeednews.com/article/maxseddon/documents-show-how-russias-troll-army-hit-america

https://share.america.gov/trolls-everything-you-wanted-to-know/

https://www.jpost.com/International/Historian-gives-credence-to-blood-libel

http://www.newadvent.org/cathen/15035a.htm

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0