महाविकास आघाडीचे फसलेले फ्लोअर मॅनेजमेंट

महाविकास आघाडीचे फसलेले फ्लोअर मॅनेजमेंट

महाराष्ट्रातल्या राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी झालेल्या निवडणुकांत देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यासह सर्वांना शह देत विजय खेचून आणला. मुळातच अनेक अपक्ष हे भाजपच्या बाजूचे होते. आणि त्यांना वळविण्यासाठी साम, दाम, भेद आणि दंड यांचा वापर भाजपने केला असणार यात शंकाच नाही. राष्ट्रवादीच्या हक्काच्या असलेल्या हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीच्या तीन आमदारांचे भाजपला होणारे मतदान हेही या पराभवाचे एक कारण मानले जाते. 

संबित पात्रांवर काँग्रेसच्या २ फिर्यादी दाखल
महाराष्ट्राच्या सत्तेचा चौकोन
जेडीयूत नेतृत्व बदल; अरुणाचलात भाजपचा धक्का

राजकारणामधील चाणक्य अशी ओळख असलेल्या शरद पवार यांच्यावर कडी करत देवेंद्र फडणवीस यांनी साम, दाम, भेद व दंड या  आयुधांच्या वापराने राज्यसभेसाठीची तिसरी जागा जिंकून यशस्वी खेळी केली. पण याच वेळी प्रत्यक्ष युद्धाच्या धामधुमीत चाणक्य आणि त्यांचे खास शिलेदार हे फारसे सक्रिय नसल्याचे जाणवत होते. अजित दादा यांची हुकमी असलेली राष्ट्रवादीची दोन मते फुटली आणि सहा अपक्षांनी ऐनवेळी मारलेली पलटी यामुळे एका सामान्य कार्यकर्त्याला नवी दिल्लीमध्ये पाठविण्यासाठी शिवसेनेने दिलेली एकाकी कडवी लढत अखेर अपयशी ठरली.

फ्लोअर मॅनेजमेंटमध्ये सपशेल अपयशी ठरलेल्या महाविकास आघाडीला थेट जमिनीवर आणणाऱ्या या पराभवाचे पडसाद येत्या काही काळात राज्याच्या राजकारणात उमटणार आहेत. विशेषतः सहकाराची आणि राष्ट्रवादी तसेच काँग्रेसची ताकद असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात भाजपने पुन्हा एकदा प्रवेश करत सर्वांसमोर आव्हान उभे केले आहे.

राज्यसभा निवडणुका जाहीर झाल्या आणि राज्यात विविध नाट्यमय राजकीय घडामोडींनी वेग घेतला. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभा अपक्ष लढणार असल्याची घोषणा करत इतर पक्षांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले. यावेळी राष्ट्रवादीने पाठिंबा देण्याचे कबूल केले मात्र ऐनवेळी त्यांनी शब्द फिरवला. त्याचवेळी शिवसेनेने संभाजी राजेंना पक्षप्रवेशाची अट घातली. परंतु राज्यसभा अपक्ष लढवण्यावर संभाजीराजे ठाम राहिले आणि त्यांनी या लढतीतून माघार घेतली. पण त्याच वेळी संजय पवार यांच्यासारख्या निष्ठावंत शिवसैनिकाला उमेदवारी देऊन शिवसेनेने कार्यकर्त्याचे सोने केले असल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात रंगली. त्याला शह देण्यासाठी भाजपाने धनंजय महाडिक यांना रिंगणात उतरवले. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे या राजकारणाकडे लक्ष लागले होते.

एका सामान्य आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांला दिलेली ही उमेदवारी त्यामुळे शिवसेनेची जागा निवडणून येणार अशी चर्चा असताना राज्यसभेच्या जागेवर भाजपाने बाजी मारली. धनंजय महाडिक यांनी पुन्हा एकदा विजयाचा गुलाल लावून कोल्हापूरच्या राजकारणात दमदार एंट्री केली. राज्यसभा निवडणुकीसाठी मविआची ६ मते फुटली. शिवसेनेचे  संजय राऊत, काँग्रेसचे इमरान प्रतापगढी, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, भाजपचे पियुष गोयल, अनिल बोंडे हे पहिल्या फेरीतच विजयी झाले. पहिल्या पसंतीची संजय पवार यांना ३३ आणि धनंजय महाडिक यांना २७ मते मिळाली. पहिल्या फेरीमध्ये भाजपचे पियुष गोयल आणि अनिल बोंडे यांना ४८-४८ मते मिळाली. त्यामुळे त्यांच्या मताचा फायदा हा धनंजय महाडिक यांना झाला. दुसऱ्या फेरीच्या मतमोजणीत ते विजयी झाले. भाजपने आपली खेळी यशस्वी करत आपला सहावा उमेदवार निवडून आणला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘गुडबुक’मध्ये पोहोचलेले संजय पवार यांना पुन्हा एकदा राजकारणाने हुलकावणी दिली. निष्ठावंत कार्यकर्ता असतानाही त्यांना पराभव स्वीकारावा लागला.

राज्यसभेची निवडणूक ही पसंती मतदानावर अवलंबून असते. पहिल्या पसंतीच्या मतांचा कोटा ज्या प्रमाणात आहे त्याचा फायदा दुसऱ्या पसंतीच्या जोरावर निवडून येणाऱ्या उमेदवारला होतो. आणि हेच सूत्र भाजपने वापरून दुसऱ्या पसंतीमध्ये महाडिक यांना विजयाचा रस्ता दाखविला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शरद पवार हे पहिल्या पसंतीचा कोटा ४२ वरून ४४ करण्यासाठी आग्रही होते पण त्याला शिवसेनेने विरोध केला होता. ज्या अपक्षांच्या जोरावर महाविकास आघाडी मतांची गोळाबेरीज करण्यात मग्न होती त्या १२ अपक्षांपैकी ६ जणांनी आपले दुसऱ्या पसंतीचे मत भाजप म्हणजे धनंजय महाडिक यांच्या पारड्यात टाकले आणि तिथेच आघाडीचा घात झाला. कारण भाजपने पहिल्या पसंतीचा कोटा हा ४८ केला होता. त्यामुळे त्यांच्याकडे १४ अतिरिक्त मते होती. आकडेवारीमध्ये फडणवीस यांनी शरद पवार यांच्यासह सर्वांना शह देत विजय खेचून आणला. मुळातच अनेक अपक्ष हे भाजपच्या बाजूचे होते. आणि त्यांना वळविण्यासाठी साम, दाम, भेद आणि दंड यांचा वापर भाजपने केला असणार यात शंकाच नाही. राष्ट्रवादीच्या हक्काच्या असलेल्या हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीच्या तीन आमदारांचे भाजपला होणारे मतदान हेही या पराभवाचे एक कारण मानले जाते.

निवडणुकीच्या या सर्व प्रक्रियेत राष्ट्रवादीचे नेते फारसे सक्रिय असल्याचे दिसले नाहीत. सर्व आमदार एकत्र ठेवलेल्या हॉटेलमध्ये शरद पवार यांनी केलेले मार्गदर्शन वगळता अन्य नेते फारसे धावपळ करताना दिसत नव्हते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मुरब्बी नेते जयंत पाटील तर कुटुंबासह राज्याबाहेर टुरवर होते तर अजित पवार हेही डावपेच अथवा आमदारांच्या भेटीगाठीमध्ये अग्रेसर असल्याचे जाणवले नाही. या संपूर्ण प्रक्रियेत जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादी’चा कोणताही बडा नेता हा फ्रंट लाईनवर काम करताना अपवादानाचे आढळला आहे. धक्कादायक बाब म्हणजे पुणे जिल्ह्यातील असलेल्या राष्ट्रवादीच्या दोन आमदारांनी ऐनवेळी रुसून मतदान न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी त्यांना मनवण्यासाठी सुरुवातीला फारसे प्रयत्न झाले नाहीत. पण शिवसेनेचे संकट मोचक मिलिंद नार्वेकर यांनी त्यांची कशीबशी समजूत काढली. पण या सर्व नाट्यात राष्ट्रवादीचे नेते सुशेगात होते. याच वेळी अजित दादा यांचा शब्द प्रमाण मानणाऱ्या दोन आमदारांनी दगाबाजी करीत भाजपला साथ दिली. यात करमाळ्याचे संजय शिंदे आणि नांदेडचे शाम सुंदर शिंगे याचा समावेश आहे. अन्य एक देवेंद्र भुयार यांनीही दगा दिल्याचे दस्तुरखुद्द संजय राऊत यांनीच जाहीर केले आहे. त्यामुळे फ्लोअर मॅनेजमेंटमध्ये राष्ट्रवादी सपशेल अपयशी ठरली आहे. राष्ट्रवादीमध्येच काही आलबेल नव्हते हे या निमित्ताने सिद्ध झाले. तर दुसरीकडे काँग्रेस आपल्या पद्धतीने व्यूहरचना करीत आपला एकमेव उमेदवार या सर्वांमध्ये धारातीर्थी पडू नये यासाठी प्रयत्नशील राहिला. त्यामुळे खऱ्या अर्थाने ही लढत शिवसेना आणि भाजप यांच्यातच झाली. शिवसेनेचे पहिल्या फळीपासून ते सर्व आघाड्यावरील नेते आणि कार्यकर्ते संजय पवार यांच्या विजयासाठी मेहनत करीत होते. पण ही लढत एकाकी होती.

भाजपने मात्र ही केवळ जिंकण्यासाठी लढवली. कोरोना असूनही देवेंद्र फडणवीस हे घरात असूनही राजकीय व्यूहरचना आखीत होते. अपक्ष आमदारांच्या ते सातत्याने संपर्कात होते. विशेष म्हणजे यातील अनेक अपक्ष आमदार हे महाविकास आघाडीचा पंचतारांकित पाहुणचार झोडत होते. संकट मोचक असलेले गिरीश महाजन हे पायाला भिंगरी बांधून अपक्षांच्या भेटीगाठी घेत मतांची बेगमी करीत होते. राष्ट्रवादीची हक्काची दोन मते म्हणजे अनिल देशमुख आणि नवाब मलिक ही जाऊ नयेत यासाठी सुद्धा भाजपने अप्रत्यक्ष खेळी करत राष्ट्रवादीच्या खांद्यावर बंदूक ठेवत शिवसेनेचा गेम केला. आणि त्याच वेळी केवळ एकट्या शिवसेनेचे सुहास कांदे यांचे मत बाद व्हावे यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे खेळी खेळली. मुरब्बी आणि परिपक्व राजकारणाचे दर्शन देवेंद्र फडणवीस यांनी या निमित्ताने दाखवून दिले. आपली चौथी जागाही धोक्यात असल्याची जाणीव महाविकास आघाडीला होती. त्यासाठी त्यांनी भाजपबरोबर बोलणी करत विधान परिषदेची एक जागा या बदल्यात देण्याचे सांगितले होते. पण देवेंद्र फडणवीस यांनी चाणाक्षपणे ही ऑफर नाकारत महाविकास आघाडीला धोबीपछाड दिला.

संजय पवार हे कोल्हापुरातील शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. जवळपास मागील २५ हून अधिक वर्षे त्यांनी शिवसेनेत काम केले आहे. ते सध्या कोल्हापूर जिल्हाप्रमुख म्हणून काम पाहत आहेत. कोल्हापूर शहरातून विधानसभा लढवण्यासाठी गेले २० वर्षे ते तयारी करत आहेत. प्रत्येकवेळी उमेदवारीची चर्चा होते मात्र प्रत्यक्षात निर्णयावेळी त्यांचे नाव खालच्या लिस्टला येत राहिले. ३३ वर्षापूर्वी म्हणजे १९८९ ला त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. तीन वेळा ते कोल्हापूर महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. एकदा विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांना संधी मिळाली होती. सर्वसामान्यांच्या प्रश्नावर लढणारा नगरसेवक अशी त्यांची महापालिकेत ओळख होती. यामुळे पवार हे तीन वेळा तीन वेगवेगळ्या प्रभागातून निवडून आले होते. युतीचे सरकार असताना अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचे उपाध्यक्षपदीही त्यांना संधी मिळाली होती. राज्यमंत्रिपदाच्या दर्जाचे हे पद होते. पण महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर त्यांचे हे पद गेले. यावेळी शिवसेनेने या कार्यकर्त्याला संधी दिली होती. मात्र राजकीय समीकरणांनी त्यांना साथ दिली नसल्याचे चित्र दिसत आहे. हातातोंडाशी आलेला राज्यसभेच्या जागेचा घास भाजपाने हिसकावून घेत बाजी मारली आहे. दरम्यान, कोल्हापूरच्या राजकारणात महाडिकांची पुन्हा एकदा दमदार एंट्री झाल्याने आता बंटी (सतेज पाटील) –मुन्ना (धनंजय महाडिक) संघर्ष उफाळून येणार का अशा चर्चांना उत आला आहे.

गेल्या पाच-सहा वर्षात केवळ पराभव या शब्दाने कोल्हापूर जिल्ह्यातील महाडिक गटाची पाठच धरली होती, त्या पराभवावर मात करत अखेर या गटाने विजयाचा झेंडा रोवला. राज्यसभेतील धनंजय महाडिक यांच्या विजयाने या गटाला मोठी उभारी तर मिळणार आहेच शिवाय पश्चिम महाराष्ट्रात भाजपला मोठे बळही मिळणार आहे. लोकसभा, विधानसभा, विधान परिषद, गोकुळ अशा अनेक निवडणुकीत महाडिक गटाला सहा वर्षात सतत पराभवाला सामोरे जावे लागले. लोकसभेत धनंजय महाडिक, विधानसभेला अमल महाडिक, विधान परिषदेला महादेवराव महाडिक, विधान सभेला सत्यजित कदम यांना पराभवाचा धक्का बसला. विधान परिषदेच्या निवडणुकीत या गटाला माघार घ्यावी लागली. २५ वर्षांची गोकुळ दूध संघातील सत्तेबरोबर महापालिका, जिल्हा परिषद यावरील सत्ता गेली. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्ह्यात एकीकडे पालकमंत्री सतेज पाटील यांचा विजयी वारू तर दुसरीकडे महाडिक गटाचा पराभव या शब्दाने धरलेला पिच्छा यामुळे महाडिक गटाची ताकद कमी होत होती. यामुळे या गटाला नव्याने उभारी मिळण्यासाठी एक मोठ्या विजयाची गरज होती. राज्यसभेतील विजयाने ही उभारी मिळाली असून महाडिक गटाच्या पराभवाची मालिका खंडित झाली आहे. आता पालकमंत्री सतेज पाटील आणि महाडिक यांच्यातील संघर्ष अधिक तापण्याची चिन्हे आहेत.

अतुल माने, ज्येष्ठ पत्रकार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: