परदेशी पैशांचा खोटा आरोप म्हणजे वेबसाईट बंद करण्याचा प्रयत्न : अल्ट न्यूज

परदेशी पैशांचा खोटा आरोप म्हणजे वेबसाईट बंद करण्याचा प्रयत्न : अल्ट न्यूज

२७ जून रोजी मोहम्मद जुबेरला अटक केल्यानंतर, अल्ट न्यूज या वेबसाइटवर परदेशी निधी मिळाल्याचा आरोप करण्यात आला. अल्ट न्यूजने एक निवेदन प्रसिद्ध करून आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे.

नवी दिल्ली: फॅक्ट चेक करणारी वेबसाइट अल्ट न्यूज आणि तिची मूळ संस्था प्रावदा मिडीया फाउंडेशन यांनी एक निवेदन प्रसिद्ध करून त्यांना परदेशी निधी मिळाल्याचे आरोप स्पष्टपणे नाकारले आहेत.

“आम्हाला ज्या संस्थेकडून देणग्या मिळतात, ते परदेशी स्त्रोतांकडून निधी घेण्यास परवानगी देत ​​​​नाही आणि आम्हाला फक्त भारतीय बँक खात्यांमधून देणग्या मिळाल्या आहेत,” असे निवेदनात म्हटले आहे.

पुढे लिहिले आहे, ‘या माध्यमातून जमा होणारी सर्व देणगी संस्थेच्या बँक खात्यात जाते.’

अल्ट न्यूजने काही ‘सुत्रांवर आधारित’ बातम्यानांही उत्तर दिले आहे. ज्यामध्ये देणग्यांचे पैसे थेट सह-संस्थापक मोहम्मद झुबेरच्या खात्यात जात असल्याचे पोलिसांना आढळल्याचा दावा करण्यात आला होता.

“संस्थेशी संबंधित व्यक्तींना त्यांच्या वैयक्तिक खात्यात निधी मिळाल्याचा हा खोटा आरोप आहे, कारण संस्थेशी संबंधित व्यक्तींना फक्त मासिक मानधन मिळते,” असे निवेदनात म्हटले आहे.

त्यांच्यावर बिनबुडाचे आरोप केले जात असून, “आमच्याकडून सुरू असलेले अत्यंत महत्त्वाचे काम बंद पाडण्याचा हा प्रयत्न असल्याचे संघटनेने म्हटले आहे. आम्हाला रोखण्याच्या या प्रयत्नाविरुद्ध आम्ही लढा देऊ आणि वर येऊ,” असे अल्ट न्यूजने म्हटले आहे

२ जुलै रोजी दिल्ली पोलिसांनी झुबेरविरुद्धच्या एफआयआरमध्ये गुन्हेगारी कट रचणे, पुरावे नष्ट करणे आणि विदेशी योगदान (नियमन) कायद्याचे कलम ३५ असे नवीन आरोप जोडले. या आरोपांमुळे अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) तपासात हस्तक्षेप करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मोहम्मद झुबेरला भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम २९५ (कोणत्याही वर्गाच्या धर्माचा किंवा धार्मिक श्रद्धांचा अपमान करून धार्मिक भावना दुखावण्याच्या हेतूने जाणूनबुजून आणि दुर्भावनापूर्ण कृत्ये) आणि १५३ (धर्म) अंतर्गत २७ जून रोजी आरोप ठेऊन अटक करण्यात आली होती.

झुबेरने २०१८ मध्ये ट्विटरवर १९८३ मध्ये आलेल्या ‘किसी से ना कहना’ चित्रपटाचा स्क्रीनशॉट शेअर केला होता. त्यानंतर त्याला आता अटक करण्यात आली आहे.

झुबेरविरुद्ध नोंदवलेल्या एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे की, ‘हनुमान भक्त (@balajikijaiin) या ट्विटर हँडलवरून मोहम्मद झुबेर (@zoo_bear) याच्या ट्विटर हँडलचे एक ट्विट शेअर करण्यात आले होते, ज्यामध्ये झुबेरने एक फोटो ट्विट केला होता, ज्यामध्ये साइनबोर्डवर हॉटेल ‘हनिमून हॉटेल’ वरून ‘हनुमान हॉटेल’ असे बदलल्याचे दिसत होते. फोटोसोबत झुबेरने लिहिले होते, ‘२०१४ पूर्वी हनीमून हॉटेल… २०१४ नंतर हनुमान हॉटेल…’.

या संदर्भात दिल्ली पोलिसांच्या एफआयआरनुसार, ट्विटर वापरकर्त्याने (@balajikijaiin) २०१८ मध्ये झुबेरने शेअर केलेल्या एका चित्रपटाचे स्क्रीनशॉट असलेल्या ट्विटबद्दल लिहिले होते की ‘आमचे भगवान हनुमान जी हनीमूनशी जोडले जात आहे, जो थेट हिंदूंचा अपमान आहे, कारण ते (भगवान हनुमान) ब्रह्मचारी आहेत. कृपया या व्यक्तीवर कारवाई करा.”

नंतर हे ट्विटर हँडल डिलीट करण्यात आले. आता हे हँडल पुन्हा सक्रिय झाले आहे, मात्र झुबेरशी संबंधित ट्विट डिलीट करण्यात आले आहे.

२ जुलै रोजी मोहम्मद जुबेरला हिंदू देवतेबद्दल “आक्षेपार्ह ट्विट” केल्याप्रकरणी न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

दरम्यान, ‘द वायर’ने केलेल्या तपासणीत उघड झाले आहे, की झुबेर विरुद्ध तक्रार दाखल करणारे ट्विटर खाते टेक फॉग अॅप आणि गुजरातमधील भारतीय जनता युवा मोर्चा (बीजेवायएम) नेत्याशी संबंधीत आहे.

झुबेरची अटक ही गुजरातमधील हिंदू युवा वाहिनीचे प्रदेशाध्यक्ष आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे सह-संयोजक विकास अहिर यांच्याशी निगडीत अज्ञात आणि खरी नावे नसलेल्या खात्यांच्या नेटवर्कच्या वर्षभर चाललेल्या मोहिमेचा परिणाम आहे.

COMMENTS