फादर मृदुभाषी होते, पण त्यांच्या उरात आग होती..

फादर मृदुभाषी होते, पण त्यांच्या उरात आग होती..

स्वामी यांनी त्यांचे आयुष्य आदिवासींच्या हक्कांसाठी समर्पित केले. आणि त्यामुळेच राज्यकर्त्यांच्या नजरेत ते इतके ‘धोकादायक’ ठरले.

फादर स्टेन स्वामी यांना अखेर स्ट्रॉ, सीपर मिळाले
फादर स्टेन स्वामी यांचे निधन
स्टॅन स्वामींच्या कार्याचा आदरः मुंबई हायकोर्टाकडून स्तुती

मी चांगला लढा दिला, मी शर्यत पूर्ण केली, मी श्रद्धा अढळ राखली.”
∼ २ टिमोथी ४:७

हे लिहिताना माझे रक्त उकळत आहे. जनतेवर प्रेम करणाऱ्या, त्यांच्यासाठी आयुष्यभर काम करणाऱ्या एका साध्या, निष्ठावान माणसाचा विनाकारण मृत्यू होताना जो अन्याय, क्रौर्य, आणि अमानवीपणा दिसून आला त्यामुळे माझ्या अंगाची लाही लाही होत आहे. माझा देश सावकाश पण निश्चितपणे एका बनाना रिपब्लिकमध्ये रुपांतरित होत आहे याची मला शरम वाटत आहे.

शेवटच्या श्वासापर्यंत फादर स्टॅन स्वामी लढले. अनेक महिने तुरुंगात काढल्यानंतर ५ जुलै, २०२१ ला त्यांचा मृत्यू झाला. गरीब आणि वंचितांसाठी त्यांनी आयुष्यभर दिलेला लढा वाया गेला नाही. सत्ता किंवा प्रसिद्धी मिळवणे हे त्यांच्या तत्त्वांच्या विरोधात होते. पण दैवदुर्विलास असा की या शांत विचारवंताच्या मृत्यूची देशातल्या जवळजवळ प्रत्येक मोठ्या वर्तमानपत्रात ठळक बातमी झाली. हे असे प्रकाशझोतात येणे त्यांना मुळीच आवडले नसते. त्यांचे जीवन झारखंडच्या आदिवासींसाठी समर्पित होते, ते स्वतःसाठी कधीच जगले नाहीत.

देशातल्या गरीब लोकांच्या भवितव्याबद्दल, मानवाधिकारांबद्दल किंवा अगदी मूलभूत स्वरूपाच्या न्यायाबद्दल ज्यांना चाड आहे अशा लोकांसाठी आतल्या आत काहीतरी मरून  गेले. एका ८४ वर्षे वयाच्या वृद्धाला फौजदारी खटल्यात तुरुंगात टाकले आणि तिथे त्याला अमानवी वागणूक दिली गेली तेव्हा त्याची सुरुवात झाली आणि या अत्यंत सभ्य, असामान्य चांगल्या माणसाच्या मृत्यूने त्याचा अंत झाला. “देवाकडून मिळालेली दुर्मिळ भेट” असे कुणीतरी त्यांचे यथार्थ वर्णन केले आहे. मी सहसा अती प्रशंसा करत नाही. पण हा माणूस खरोखर अत्यंत चांगला माणूस होता.

माझे पती स्टॅन यांच्यासाठी ते आणखी खूपच वैयक्तिक आहे. १९७४ साली, ते केवळ २१ वर्षांचे होते तेव्हा त्यांच्यासारखेच स्टॅन नाव असलेल्या फादरनी त्यांना झारखंडमध्ये बोलावले. फादर स्टॅननी त्यांची चाईबासाजवळच्या आदिवासींची ओळख करून दिली आणि त्यांची अन्न, निवारा व कामासाठी जागेची सोय केली. ते माझ्या पतीचे शिक्षक आणि मार्गदर्शक होते. त्यामुळे ही हानी फार मोठी आहे. पण त्यावेळी त्यांनी दिलेले धडे आयुष्यभरासाठी होते, त्यामुळे माझ्या पतींनी झारखंड सोडल्यानंतरही त्यांना आदिवासींमध्येच काम करत राहण्याची प्रेरणा मिळाली.

मी ४० वर्षांपूर्वी त्यावेळी बिहारमध्ये असलेल्या चाईबासा येथे फादर स्टॅन यांना भेटले. मी तेव्हा पत्रकार म्हणून उमेदवारी करत होते आणि एका विद्यार्थी मासिकाकरिता आदिवासींच्या शोषणाबाबत मला लेख लिहायचा होता. अगदी ४० वर्षांपूर्वीसुद्धा मला हे जाणवले, की मी आजवर भेटलेल्यांपैकी ते अत्यंत सौम्य, सर्वात मृदुभाषी व्यक्ती होते.

तर मग अशा एखाद्या व्यक्तीवर देशद्रोही, गुन्हेगार म्हणून आरोप कसे होऊ शकतात? त्यांच्या विरोधातले आरोप खूपच गंभीर होते. अटक करतानाच त्यांचे वय ८३ होते, शिवाय त्यांना पार्किन्सनचा गंभीर आजार होता, आणि तरीही त्यांना जामीन नाकारला गेला. त्यांचे हात सतत कंप पावत असत, त्यामुळे जेवण करणे, चहा पिणे या गोष्टीही अत्यंत कठीण होऊन बसल्या होत्या. तर हा असा ८३ वर्षे वयाचा, अत्यंत नाजूक तब्येतीचा माणूस इतका धोकादायक होता? की त्यांना तुरुंगात टाकले जावे आणि त्यांना चहा पिता यावा म्हणून एक स्ट्रॉ असलेला मग मिळवण्यासाठी त्यांच्या वकिलांना न्यायालयाकडे याचना करावी लागावी? ते धोकादायक होते कारण त्यांनी तरुण आदिवासींच्या अन्याय्य अटकांच्या विरोधात आव्हान देण्याची आणि त्यांच्या सुटकेची मागणी करण्याची हिंमत दाखवली.

त्यांनी अनेक पदव्या प्राप्त केल्या होत्या – धर्मशास्त्र, तत्त्वज्ञान आणि समाजशास्त्रात मास्टर्स. ते निश्चितच एक विद्वान मनुष्य होते आणि त्यांना शिकण्याची आवड होती. शैक्षणिक क्षेत्रातच चांगले यश मिळवणे त्यांना शक्य होते. मात्र त्याऐवजी त्यांनी देशातल्या सर्वात गरीब राज्यात – बिहारमध्ये जाण्याचा पर्याय निवडला. तिथे, चाईबासाजवळच्या बारैबिर नावाच्या एका छोट्या आदिवासी गावात ते हो जमातीच्या लोकांसोबत राहिले. त्यांची भाषा आणि चालीरीती शिकण्यासाठी. आदिवासींचे तत्त्वज्ञान आणि त्यांची जगण्याची पद्धत यांनी त्यांना भुरळ घातली. मात्र बनिया समुदाय त्यांचे जे भयानक शोषण करत होता त्याने ते व्यथितही झाले.

पण स्टॅन स्वामींनी असे काय केले होते? ते ‘कार्यकर्ता’ होते. पण ज्यांना या क्षेत्राबद्दल फारशी माहिती नाही, त्यांना हा फारच संदिग्ध, ढोबळ शब्द आहे. वास्तवात, स्टॅन स्वामी जे करत होते तेच काम हजारो कार्यकर्ते करत असतात. स्टॅन स्वामींनी रांचीमध्ये ते केले, ज्यामुळे त्यांना तुरुंगात जावे लागले आणि त्यांच्या विरोधात भयंकर आरोप करण्यात आले.

१९७० पासून, संपूर्ण देशभरात कार्यकर्त्यांनी आपल्या कामाचे स्वरूप हळूहळू बदलले होते. मदर तेरेसांसारखी दयाळू माणसे ज्या पद्धतीचे काम करत होती, म्हणजे अन्न, वस्त्र, आणि अन्य वस्तूंचे दान करणे, त्याऐवजी ते लोकांना त्यांच्या हक्कांबाबत शिक्षित करू लागले. त्यामुळे ७० च्या दशकानंतर कार्यकर्ते अधिकाधिक प्रमाणात अन्यायाविरुद्ध लढण्यावर भर देऊ लागले. अनेक व्यापारी आदिवासींना लहान लहान कर्जे किंवा उधारीवर अन्नधान्य देतात. हळूहळू ही कर्जे वाढत जातात आणि त्यानंतर हे लोक गिधाडासारखे येतात आणि आदिवासींची मौल्यवान जमीन हडपतात. ही कर्जे अत्यंत छोटी असतात पण खेड्यातल्या गरीब लोकांना धमकावता येते. त्यामुळे ते सगळे गमावून बसतात आणि गरिबीत ढकलले जातात. कार्यकर्ते खेड्यातल्या लोकांना शिक्षित करून, त्यांच्यामध्ये सामूहिक शेती, कृषी सहकारी संस्था, बियाणे बँका वगैरे सुरू करून हे शोषण थांबवण्याचा प्रयत्न करतात. हे सगळे निरुपद्रवी वाटते. खरे तर व्यापक विकास धोरणांचा हा एक भागच असला पाहिजे. पण जात आणि वर्ग यांची पकड फार घट्ट असते, त्यामुळे बहुतेक वेळा कायदा रक्षक शोषितांची नव्हे तर शोषकांचीच बाजू घेतात.

आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे पडेल भावात पीक विकण्याची वेळ येऊ नये म्हणून सहकारी संस्था स्थापन करून तरुण शेतकऱ्यांना त्यांचे बियाणे साठवायला शिकवण्यामुळे अशा पडेल भावात पीक विकत घेऊन प्रचंड नफा कमावणाऱ्या संपन्न व्यापाऱ्यांच्या नफ्यावर परिणाम होतो.

तरुण आदिवासींना शोषणाला विरोध करायला शिकवणारा आणि लोभी दुकानदारांच्या जमा होत जाणाऱ्या संपत्तीला खीळ घालणारा कार्यकर्ता हा या व्यवस्थेसाठी धोकादायक असतो. त्याच्यासारखे लोक अप्रिय असतात. त्यांचा तिरस्कार केला जातो.

स्टॅन स्वामी हे मृदुभाषी आणि सौम्य प्रकृतीचे होते. पण झारखंडमधल्या त्यांच्या प्रिय आदिवासी समाजाला न्याय मिळावा यासाठी त्यांच्या उरात आग होती, आणि ती शोषकांना जाळणारी होती. त्यामुळे हे शोषक त्यांचा मृत्यू पहायला आतुर होते.

एक सहकारी जेसुइट फादर वॉल्टर फर्नांडिस म्हणतात, “प्रेषित नेहमीच सत्ताधाऱ्यांना धोकादायक वाटतात. स्टॅन याचाच पुरावा आहेत. ते सत्ताधारी शासनासाठी आणि ज्यांना आदिवासींची जमीन तसेच वेठबिगार मजूर हवे होते अशा कॉर्पोरेट क्षेत्रासाठी धोकादायक होते. स्टॅन या आदिवासींच्या हक्कांसाठी लढत होते, त्यांना त्याची किंमत चुकवावी लागली.”

फादर सेड्रिक प्रकाश, जे स्वतःही जेसुइट धर्मगुरू आणि अधिकारांसाठी लढणारे कार्यकर्ता आहेत, ते म्हणाले, “तुमचा मृत्यू व्यर्थ जाणार नाही! आणखी अनेक स्टॅन आता उठून उभे राहतील…तुम्ही कधीच मरणार नाही. तुम्ही अमर आहात.”

मरी मार्सल तेकेकारा या गुदालुर, तमिळनाडू येथे मुक्त लेखक आहेत.

मूळ इंग्रजी लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0