मैत्रीचा निरागस उत्सव !

मैत्रीचा निरागस उत्सव !

निर्व्याज मैत्री बालपणात व्हायला हव्यात. या सुदृढ बालमैत्रीत सामाजिक स्वास्थाची बीजे रोवलेली जातात. मैत्रीदिनाच्या निमित्ताने खास लेख..

भारतीय रंगभूमीच्या सौंदर्यशास्त्राचा प्रणेता
लोकभ्रम नवे – जुने
निर्भया प्रकरण – ४ दोषींना २० मार्चला पहाटे फाशी

एका खजिन्याचा पत्ता असलेल्या नकाशाचे अर्धवट दोन भाग वेगवेगळ्या ठिकाणी असतात. अचानक ते तुकडे जुळतात आणि नकाशा पूर्ण होतो, त्याक्षणी एका मौल्यवान खजिन्याचा शोध लागतो…
तो खजिना असतो मैत्रीचा आणि ते नकाशाचे अर्धवट दोन भाग म्हणजे ह्युगो आणि जोसेफिन.
सहा वर्षाच्या जोसेफिनला शाळेत जायला मुळीच आवडत नसतं. कारणही अजब असत. एक तर तिचं शाळेत दाखल झालेलं नाव ॲना असतं, ते तिला स्वतःचे नावं वाटत नसतं. ते नाव दुसऱ्या कोणाचे असावे, मी मात्र ‘जोसेफिन’ आहे. त्यामुळे शाळेत वेगळी मुलगी म्हणजे ॲना बनून जावं लागत, हे तिच्या जीवावर यायचे. अभ्यास आणि शाळेतील उपक्रम तिला आवडत असले तरी सर्वात न आवडणारी गोष्ट म्हणजे तिच्या वर्गातील मुलंमुली. त्यांच्या यडचाप वागण्या- बोलण्याचा तिला अगदी वीट आलेला असतो. शाळेत दप्तर म्हणून मुली पेटी आणायच्या तर मुलं सॅक. जोसेफिनच्या मोठ्या भावाने न वापरलेली सॅक जोसेफिन वापरत असल्याने सर्व मुलमुली तिला येताजाता चिडवायचे. तसेच तिच्या ताडमाड उंच असलेल्या वडिलांवरून थट्टा करायचे. त्यामुळे लांब असलेली ही शाळा एकटीने रोज जाताना अधिक लांब वाटायची. शाळा हे जोसेफिनचे अगदी नावडत ठिकाण झालं होतं. घरी सुद्धा तिला खेळायला कोणी नव्हते. पण खेळायला कोणी नाही म्हणून जोसिफिनचं तस फारसं अडत नसे. आजूबाजूच्या झाडांशी, दगडांशी, फुलांशी तिची मैत्री झालेली. त्यांच्याबरोबर हसणे, खेळणे, बागडणे सुरू असते.

आणि एक दिवस शाळेच्या वाटेवर, झाडाच्याखाली तिच्यापेक्षा थोडासा मोठा असलेला एक तरतरीत, बोलक्या डोळ्याचा मुलगा तिला दिसतो. त्याचं नाव ह्यूगो. हा गडी भटक्या, स्वच्छंदी वृत्तीचा. त्याचा पत्ता म्हणजे मुक्काम पोस्ट जंगल. त्याचे वर्गमित्र म्हणजे झाडे, कुरणे, पक्षी.. जमिनीवर पडून आकाशाशी थेट गप्पा मारणारा. जोसेफिन त्याला बघून थांबते तेव्हा तो चाकूने लाकूड तासत असतो.

ती विचारते , “तू होडी करणार आहेस का? ”

तो बेफिकीरीने उत्तर देतो, “माहिती नाही, एखाद्यावेळी करेन सुद्धा!”
ह्युगोचा पेहेराव आणि एकंदर बोलण्याची पद्धत ही इतर यडचाप मुलांसारखी नसल्याने, जोसेफिनच्या मनात आनंदाचे कारंजे उडायला लागते. ह्युगोला सुद्धा ही इतरांसारखी नाक न मुरडणारी मैत्रीण आवडते. खजिन्याच्या शोध नकाशाचे हे दोन भाग जुळतात. त्या नकाशावर एक रंगीबेरंगी, तरल जग आपल्या समोर उलगडत जाते.

जोसेफिनला न आवडणाऱ्या शाळेत तिच्या मागोमाग एक दिवस ह्युगो येतो. जोसेफिनच्या शेजारी बसतो आणि वर्गाचा होऊन जातो. बाईंनाही हा वेगळा प्राणी आवडतो. त्याचं काय होत की बाई वर्गात पियानो शिकवत असतात. वर्ग त्या तालावर गाणं गात असतो. तितक्यात पियानो सोबत बाजाचे सूर मिसळले जातात. तो बाजा ह्युगो वाजवत असतो. एक वेगळी सुरेल जुगलबंदी बाई आणि ह्युगोत सुरू होते. सर्वच आवाक होतात. बाईंना हा मुलातील वेगळेपण जाणवते. ह्युगो वर्गाचा हिरो झालेला असतो. जोसेफिनची कॉलर ताठ होते. जोसेफिनला आता शाळा प्रचंड आवडायला लागते. तिचा भाव ह्युगोमुळे वधारला असतो. सर्वात खास गोष्ट अशी की ह्युगो तिला फक्त ‘जोसेफिन’ म्हणून ओळखत असतो.

ह्युगोला आई नसते. फक्त एक काका असतात. जोसेफिनला (आपल्यालाही) इतकीच माहिती असते. दिवसभर बागडत असताना, मध्येच भूक लागली की ह्युगो घरी जाऊन काकांनी बनवलेले जेवण करून परत आपल्या उद्योगात मश्गुल व्हायचा. त्याचे काका सुद्धा ह्युगोसारखे मस्तमौला. त्यामुळे काहीवेळा या त्रिकुटाची एकत्रित धमाल चालायची. ह्युगोबरोबर काका जोसेफिनसाठी हा मोठा बोनस मिळालेला असतो.

आता जोसेफिन आणि ह्युगोला जंगल, कुरणे, आकाश कमी पडायला लागतात. शाळेची वेळ सोडली तर या दोघांची जोरदार भटकंती  सुरू असते.

एक दिवस ह्युगो तिला एका खाणीच्या परिसरात नेतो. तिथल्या ढिगाऱ्यावर ते घसरगुंडी खेळतात, उड्या मारतात. ह्युगो तिला तिथल्या एका कंट्रोलरूममध्ये घेऊन जातो. भिंतीवर एक हॅट असते. ती काढून तिच्यावरून ह्युगो त्यावरून हळुवार हात फिरवतो. तो ओथंबलेल्या स्वरात सांगतो, “ही हॅट माझ्या डॅडीची आहे!” इथे जोसेफिनचे वागणे एखाद्या प्रगल्भ स्त्री प्रमाणे. ती समजूतदारपणे त्याला मूक साथ देते. मधे एकदा ह्युगो असाच आठ-दहा दिवस गायब झालेला असतो. (खेकड्याचा अभ्यास करण्यासाठी गेला असतो.) जोसेफिन कासावीस झालेली असते. तेव्हा त्यांचा एक वर्गमित्र तिला चिडवत सांगतो, “गेला असेल वडिलांना भेटायला तुरुंगात!” त्यावर जोसेफिन त्याला ‘खोटारडा’ म्हणते, त्याचा राग येऊन तो दांगट मुलगा तिला थप्पड मारतो. तरी देखील जोसेफिन ह्युगोला कधीही त्याच्या वडिलांबद्दल विचारत नाही. तशी तीही थोडी समदुःखी असतेच. तिचे वडील धर्मप्रचारक असल्याने बराच काळ घरापासून दूर असायचे. ह्युगोचे वडील खाणकामगार असतात. सैन्यात भरती होण्यास नकार दिल्या कारणाने त्यांना तुरुंगवास झाला असतो.

एकदा ही जोडगोळी एका बंद पडलेल्या कारखान्यात असलेल्या एका जुन्या सायकलच्या शोध मोहिमेवर जाते. त्यांना जी सायकल मिळते, ती सर्कशीतल्या प्रमाणे मोठ्या एका चाकाची, त्यावर उंच सीट असलेली. ह्युगोच्या अनेक करामतीत या सायकल चालवण्याची भर पडते. ती सायकल चालवण्याचा जणू रोजचा सराव आहे, अशा थाटात ह्युगो सायकल चालवतो. त्याचे हे कर्तब रस्त्यातले लोक कौतुकाने बघतात. जोसेफिन चिमुकल्या पायांनी, आडवळणाने पळत जाऊन त्याला गाठत असते. आपल्या जिवलग मित्राची ही कामगिरी अनिमिष नेत्रांनी पाहत असते.

मैत्रीचा हा निरागस उत्सव बहरत असतो. निसर्गसुद्धा आपले रंग मुक्त हस्ते उधळत असतो. निखळ हास्याने सारा परिसर ताजा टवटवीत होत असतो..

‘ह्युगो आणि जोसेफिन’ ही कादंबरी आणि त्यावरून घेतलेला चित्रपट (१९६७) म्हणजे रसिकांसाठी अक्षय ठेवा आहे. सर्वच अभिजात बालसाहित्यांची, चित्रपटांची शिदोरी कधीही उघडून त्याचा आस्वाद आपण घेऊ शकतो, हीच तर त्यांची खासियत आहे. जगण्यातील चव वाढवण्यासाठी हा रानमेवा अधून-मधून चाखायलाच हवा, असा आहे.

ह्युगो ही व्यक्तिरेखा नुसती स्वच्छंदी नाही. निसर्गाचा दांडगा अभ्यास असलेल्या या मुलाला जगण्याची चांगली समज-उमज असते. एकदा तो एका आजोबांचे केस सराईत न्हाव्यासारखे कापतांना दिसतो. आजोबा त्याला एक नाणे देतात. ते नाणे तो अगदी काळजीपूर्वक आपल्या धोपटीत ठेवतो. तेव्हा जोसेफिन विचारते, “सायकल घेण्यासाठी जमा करतो आहेस का? तो म्हणतो, “नाही जगण्यासाठी.” ते उत्तर आपल्याला ह्युगोबद्दल थांबून विचार करायला भाग पाडते. ह्युगो आपल्या मातीतला वाटतो. त्याला कारण म्हणजे पुढील ओळी.

‘बीज अंकुरे अंकुरे, ओल्या मातीच्या कुशीत
कसे रुजावे बियाणे, माळरानी खडकात..’

‘ह्युगो आणि जोसेफिन’चे कथानक ना. धों. ताम्हणकारांनी लिहिलेल्या ‘गोट्या’शी साधर्म्य सांगणारे. सुमाला खेळायला सवंगडी हवा म्हणून बिनआईच्या गोट्याला घरी आणले जाते, तो सुमाचा भाऊ बनतो. ह्युगो असाच बिनआईचा, जोसेफिनला सुद्धा खेळायला कोणी सवंगडी नसतो. गोट्या-सुमाचे नाते कोकणच्या हिरव्यागार वातावरणात घट्ट होत जातं तर ह्युगो आणि जोसेफिनचे स्वीडनच्या निसर्गरम्य परिसरात.

पण मोठा फरक हा आहे की गोट्या – सुमाचे नाते हे भावाबहिणीचे. तर ह्युगो आणि जोसेफिन यांचे निखळ मैत्रीचे. या निरागस मैत्रीच्या उत्सवाचे देनिस व आल्योन्का, तोत्तोचान आणि यासुकीचान व इतर वर्गमित्र, हे सुद्धा मानकरी.( लंपन-सुमीचा उल्लेख करण्याचा मोह टाळला आहे. कारण त्यांच्या मैत्रीला पुढे नात्याचे कोंदण लाभले) इथे फक्त निखालस मैत्रीचे दाखले घेतले आहेत.

अशा निर्व्याज मैत्री बालपणात व्हायला हव्यात. या सुदृढ बालमैत्रीत सामाजिक स्वास्थाची बीजे रोवलेली जातात. मुलांमुलींच्या एकत्रित वाढण्याने परस्परांबाबत निकोप दृष्टिकोन तयार होतो. सोबत वाढल्याने पुढे वाढत्या वयात भिन्न लिंगी शरीरांबद्दल फाजील कुतूहल वाटत नाही. त्याचे अप्रतिम उदाहरण ‘तोत्तोचान’ पुस्तकात दिले आहे. तोत्तोचानच्या पहिलीच्या वर्गातील मुलांमुलींना पोहण्याचा तासाच्या वेळी हे कुतूहल मोठ्या सहजतेने शमविले आहे. पोहतांना सर्व मुलांमुलींना कपडे काढून पाण्यात उतरायला सांगतात. त्याबाबत

तोत्तोचान लिहिते, मुख्यध्यापकांना असे वाटायचे की मुलांमुलींना एकमेकांच्या शरीरातील फरकाबद्दल विकृत कुतूहल असणं बरोबर नाही. तसेच काही मुलांना पोलिओ, तर काहीना व्यंग, काही बारीक, जाड होती. सगळी जण लपवाछपवी न करता एकत्रित खेळली तर कोणाला ही लाज, न्यूनगंड वाटणार नाही. पुढे मोठी झाल्यावर ही सर्व मंडळी एकत्रित झाली तेव्हा त्यांना जाणवलं की ‘तोमाई’तल्या (शाळेचे नाव) अनौपचारिक पद्धतीमुळे जगण्यातला मोकळा दृष्टिकोन त्यांच्यात सहज रुजला गेला.

या निमित्ताने मुलामुलींना उमजतं की, वेगवेगळ्या शरीररचनेप्रमाणेच विचार करण्याच्या पद्धतीवर या जैविक फरकाचा परिणाम होत असतो. यामुळे भावी जीवनातील अनेक संकुचित धारणांना कचऱ्याची टोपली दाखवता येते. मैत्रीचा असा मनमुराद अनुभव घेतलेल्या व्यक्ती पुढे आपल्या जोडीदारांच्या मित्रमैत्रिणीकडे निकोप दृष्टीने बघू शकतात. पण असे काही महाभाग असतात, जे स्त्रीपुरुषांच्या मैत्रीकडे भुवया उंचावून बघतात किंवा त्यांच्या मैत्रीला चटकन लैंगिकतेचे लेबल चिटकून मोकळे होतात. बहुदा निर्भेळ मैत्रीचा सहवास त्यांना लाभलेला नसतो. मग अशी मानसिकता असलेले लोक नकाशाच्या नकली प्रति जवळ बाळगून मैत्रीच्या आड भुक्कड मनसुबे रचत असतात. ‘फ्रेंड रिक्वेस्ट’च्या माध्यमातून जोडलेल्या बनावट नकाशाच्या तुकड्यात ‘कात्रजचा घाट’ आढळण्याची दाट शक्यता असते. मैत्रीच्या उत्सवाला इतके हीन स्वरूप देणे टाळायचे असेल तर लहान वयातच हा मोकळा, सकारात्मक दृष्टिकोन लाभायला हवा.

या बालमैत्रीतील काय, काय गवसत! शेअरिंगची भावना, समजूतदारपणा, खेळकर वृत्ती असे बरेच गोड-गोंडस आविष्कार आपल्याला हर्षभरित करतात. ह्युगो सायकल चालवत असतांना त्याच्या मागून पळणारी, त्याच्या वडिलांच्या तुरुंगवासाबद्दल मौन बाळगणारी आणि त्या पायी वर्गमित्राची थप्पड खाणारी जोसेफिन किती समजूतदार! स्वतःच्या नावाबद्दल आग्रही असणारी, इतर मुलांच्या वागणुकीबद्दल नाराज असलेल्या या मनस्वी मुलीचे ह्युगोबाबतचे वागणे किती प्रगल्भ. मग साहजिक आठवण येते, ती देनिसच्या बालमैत्रीण आल्योन्काची.

जत्रेचा मनमुराद आनंद घेऊन परत असतांना आल्योन्का उरलेल्या शेवटच्या पैशातून लाल रंगाचा फुगा घेते. देनिसला ही फुगा घेण्याची इच्छा असते, पण जवळ पैसे उरले नसतात. थोड्यावेळ स्वतःकडे फुगा ठेवून मग आपल्या मित्राला बरं वाटावं म्हणून तो फुगा देनिसला देते. देनिसला तो फुगा हातात पकडायचा नसतोच मुळी. त्याला फुगा सोडून द्यायचा असतो आणि तो बेधडक फुगा आकाशात सोडतो. निळ्या आकाशात बागडणारा तो लाल फुगा बघून देनिस जाम खुश होतो, उड्या मारतो नंतर त्याच्या लक्षात येत की हा फुगा आल्योन्काचा होता. दोघे गप्प घरापर्यंत येतात तेव्हा ती म्हणते मला वाईट वाटलं, माझ्याकडे अजून पैसे असते तर मी तुझ्यासाठी अजून फुगा घेतला असता…

ती बोलेपर्यंत आपल्याला वाटत की तिला फुगा गेल्याचे दुःख आहे. मग कळत की अरे, ही त्या पलीकडचे काही सांगते आहे. आपल्या मित्राचा आनंद द्विगुणीत न करता आल्याची खंत तिची आहे. आपण तिचा हा समजूतदारपणा बघून थक्क होतो. आणि त्यावेळी मनातून वाटत, धावत फुगेवाल्याकडून सर्व फुगे घ्यावेत आणि या दोन्ही मुलांना द्यावेत. तशीच जोसेफिन. प्रत्येक वेळा तिच्या निर्व्याज वागण्याने आपण मोहरतो, सुखावतो.

पुढे ह्युगोचे वडील जेलमधून सुटून घरी येणार असतात. आणि त्याच वेळी काकांना आता दुसरीकडे जावं लागणार असते. हिरव्यागार कुरणात पहुडलेल्या ह्युगोला जोसेफिनच्या हाका ऐकू येतात. “ह्युगो ss ह्युगो ss काका आपल्याला सोडून चालले आहेत. ह्युगो आपली सायकल जोरात पिटाळतो. काकांच्या लॉरीला अडवतो. काकांकडे तरी कुठे या दोन जीवाचा निरोप घ्यायची हिंमत असते ? आपले अश्रू आवरत काकांना निघावे लागते.. काकांच्या डोळ्यात पाणी का आले? हे त्या दोन चिमुरड्या जीवांना समजत नाही, हे ही केवढे भाग्य! पण आपल्याला ते अश्रू समजतात. आपण कळवळतो. अंधारात दूर जाणारी लॉरी बालपणाच्या या मुक्कामापासून दूर, दूर जाते..
जोसेफिन आणि ह्युगो एकमेकांकडे नुसते बघत असतात. त्याच वेळी काळ ‘स्टॅच्यु’ म्हणतो.

जीवनोत्सुक मुलांचे भावविश्व तिथल्या तिथे ‘फ्रीज’ होते.

काकांच्या लॉरीबरोबर आपण ही पुढे निघून आलेलो असतो….
मैत्रीचा उत्सव तिथेच थांबतो. म्हणून दुःख होत नाही. कारण रायनर रिल्के म्हणाला आहेच ना, आपल्याकडे सांगण्यासारखं काही उरत नाही असं वाटत तेव्हा सगळं संपलेले नसतं. तुमचं बालपण तर असतंच तिथे परतून जा आणि शोधा…

अस्सल नकाशाचा एक भाग आपण जवळ बाळगून असतो…

देवयानी पेठकर, या शॉर्टफिल्म दिग्दर्शक व निर्मात्या आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0