‘काली’च्या कॅनडास्थित दिग्दर्शिकेवर फिर्याद

‘काली’च्या कॅनडास्थित दिग्दर्शिकेवर फिर्याद

नवी दिल्ली: माहितीपट 'काली’ व त्याच्या दिग्दर्शक लीना मनिमेकलाई यांच्यावर, दिल्ली पोलिसांनी, धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली, फिर्याद नोंदवली आह

गरोदर भारतीय महिलेच्या मृत्यूप्रकरणी पोर्तुगालच्या आरोग्यमंत्र्यांचा राजीनामा
अमित शहा कुठे होते? ताहिर हुसैन, अंकित शर्माचे सत्य काय?
स्वदेशी की परदेशी ?

नवी दिल्ली: माहितीपट ‘काली’ व त्याच्या दिग्दर्शक लीना मनिमेकलाई यांच्यावर, दिल्ली पोलिसांनी, धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली, फिर्याद नोंदवली आहे. या माहितीपटाच्या पोस्टरवर हिंदू देवतेच्या वेषातील एका स्त्रीला सिगरेट ओढताना दाखवले होते व पार्श्वभूमीला प्राइड असा झेंडा होता. या पोस्टवरून मोठा वाद निर्माण झाला.

इंडियन एक्स्प्रेस या वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, पोलिसांना या पोस्टरविरोधात तसेच कॅनडास्थित मनिमेकलाई यांच्या विरोधात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या. यातील एक तक्रार भारतीय जनता पार्टीचे नेते शिवम छाब्रा यांनी केली होती. त्यांनी तक्रारीत म्हटले होते, “दिग्दर्शक लीना मेनिमेकलाई यांनी २ जुलै रोजी त्यांचा माहितीपट ‘काली’बद्दल ट्विट केले व त्याचे पोस्टर शेअर केले. हे पोस्टर कॅनडा चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाले आणि आपल्यासाठी हा रोमांचक अनुभव होता, असे मेनिमेकलाई यांच्या ट्विटमध्ये म्हटले होते. या पोस्टरमध्ये काली माँ (देवी) सिगरेट ओढताना दाखवली आहे. या देवतेने एका हातात त्रिशूळ धरले आहे, तर दुसऱ्या हातात एलजीबीटीक्यू समुदायाला पाठिंबा देणारा झेंडा घेतला आहे.”

गौ महासभा नावाच्या एका संघटनेच्या सदस्यानेही तक्रार केली आहे.

यापूर्वी ओटावामधील भारतीय उच्चायुक्ताललयाने कॅनडातील अधिकाऱ्यांना या फिल्मशी निगडित ‘प्रक्षोभक बाबी’ काढून टाकण्याचे आवाहन केले. मनिमेकलाई यांनी शनिवारी पोस्टर ट्विटरवर शेअर केले. हिंदू हक्क संघटनेच्या सदस्यांनी यावर आक्षेप घेत ‘अरेस्ट लीना मनिमेकलाई’ असा हॅशटॅग चालवला आणि दिग्दर्शक धार्मिक भावना दुखावत असल्याचा आरोप केला.

कॅनडातील हिंदूधर्मीयांच्या समुदायानेही याबाबत तक्रारी केल्या आहेत, असे ओटावामधील भारतीय उच्चायुक्तालयाने सोमवारी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात नमूद केले. हे भारतीय देवतेचे ‘अवमानकारक चित्रण’ असल्याचा आरोप त्यांनी केला. या माहितीपटाचे पोस्टर टोरंटोतील अगाखान म्युझियममध्ये ‘अंडर द टेण्ट’ प्रकल्पाचा भाग म्हणून दाखवण्यात आले.

“आमच्या उच्चायुक्तांनी कार्यक्रमांच्या आयोजकांकडे आक्षेप नोंदवला आहे. अनेक हिंदू संघटनांनी कॅनडातील यंत्रणेकडे कारवाईची मागणी केली आहे,” असे पत्रकात म्हटले आहे.

मनिमेकलाई यांचा जन्म तमीळनाडूतील मदुराई येथे झाला असून, जिवात जीव असेपर्यंत आपले म्हणणे निर्भयपणे मांडत राहणार असे त्यांनी म्हटले आहे.

“माझ्याकडे गमावण्याजोगे काहीच नाही. मी जिवंत आहे तोपर्यंत आपले म्हणणे निर्भयपणे मांडत राहीन. याची किंमत माझे आयुष्य असेल, तर तीही मी चुकती करेन,” असे त्यांनी तमीळ भाषेत ट्विट केले आहे.

“कालीमातेने टोरंटोच्या रस्त्यावरून एका संध्याकाळी मारलेल्या फेरीशी निगडित घटना या फिल्ममध्ये आहेत. त्यांनी फिल्म बघितली, तरी तेही, ‘अरेस्ट लीना मनिमेकलाई’ऐवजी ‘लव्ह यू लीना मनिमेकलाई’ असा हॅशटॅग चालवतील,” असे त्यांनी एका लेखाला दिलेल्या उत्तरात म्हटले आहे.

मनिमेकलाई यांनी २०२१ मध्ये माडथी-अॅन अनफेअर टेल या फिल्मद्वारे दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले होते. धार्मिक संदर्भावरून वादाला तोंड द्यावे लागलेल्या त्या पहिल्या दिग्दर्शक नाहीत. उदाहरणार्थ, २०१७ मध्ये सेक्सी दुर्गा या चित्रपटाच्या शीर्षकावरून चित्रपटकर्ते सनल कुमार शशीधरन यांना विरोधाचा सामना करावा लागला होता. नंतर हे शीर्षक बदलून एस दुर्गा करण्यात आले. गेल्या वर्षी प्राइम व्हिडिओच्या तांडव या मालिकेत कॉलेजमधील कार्यक्रमात भगवान शंकराच्या चित्रणावरून वाद निर्माण झाला होता.  अखेरीस हे दृष्य काढून टाकण्यात आले व स्ट्रीमरला माफी मागावी लागली.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: