साधा आणि प्रामाणिक: उतरंडी मोडून टाकणारा ‘झुंड’

साधा आणि प्रामाणिक: उतरंडी मोडून टाकणारा ‘झुंड’

नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ चित्रपटाच्या सुरुवातीलाच एक विलक्षण दृश्य आहे. त्यात अमिताभ बच्चन एका चिंचोळ्या गल्लीतून चालताना दाखवले आहेत. गेल्या व

मुस्लिम स्वातंत्र्यवीरावरील चित्रपटावरून केरळमध्ये वाद
भारतीय चित्रपट विश्वाचे वासे फिरले
राज, दिलीप कुमार यांच्या वास्तू पाक सरकार खरेदी करणार

नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ चित्रपटाच्या सुरुवातीलाच एक विलक्षण दृश्य आहे. त्यात अमिताभ बच्चन एका चिंचोळ्या गल्लीतून चालताना दाखवले आहेत.

गेल्या वीसेक वर्षांत म्हणजेच अमिताभ यांच्या बॉलिवूडमधील पुनरागमनानंतर त्यांनी बहुतांशी उच्चभ्रू व्यक्तिरेखा केल्या आहेत, गरिबीच्या खाणाखुणांपासून पार लांब असलेल्या. याला अपवाद असेल ‘गुलाबो सिताबो’चा पण त्यातही ते प्रोस्थेटिक्सच्या आड लपलेले होते.

‘झुंड’मध्ये अमिताभ यांनी निवृत्तीच्या जवळ आलेल्या एका फूटबॉल प्रशिक्षकाची भूमिका केली आहे. ही व्यक्तिरेखा अपघातानेच या गल्लीत आलेली आहे. यातले साधर्म्य एवढे दुर्मीळ आहे की मला आर्थिक उदारीकरणापूर्वीचे बॉलिवूड आणि आर्थिक उदारीकरणानंतरचे बॉलिवूड यांचीच आठवण झाली. कारण, १९७०च्या दशकातील अमिताभचा अँग्री यंग मॅन असा गल्लीतच असायचा. त्यात साधर्म्याची संभाव्यता दुपटीने वाढली, कारण, त्याच्या व्यक्तिरेखेच्या नावातही हे साधर्म्य होते. व्यक्तिरेखेचे नाव होते ‘विजय’ (योगायोगाने ही व्यक्तिरेखा याच नावाच्या खऱ्या व्यक्तीवरून प्रेरित आहे).

नागपुरात घडणारा ‘झुंड’ विजय आणि १२-१३ दलित मुलांमधील (सगळ्याचा पहिला चित्रपट) नात्यावर बेतलेला आहे. ही धीर सुटलेली आणि दिशाहिन मुले, जगत नाही आहेत, फक्त तगून राहण्याचा प्रयत्न करत आहेत. कोळसा चोरत आहेत, हाणामारी करत आहेत, नशा करत आहेत. एका पावसाळी दुपारी विजय त्यांना प्लास्टिक ड्रमशी खेळताना बघतात. ते दुसऱ्या दिवशी त्यांच्याकडे फूटबॉल घेऊन जातात आणि एकत्र खेळले तर ५०० रुपये देण्याची लालूच दाखवतात. लवकरच ही प्रथा पडून जाते: विजय, फूटबॉल, मुले, ५०० रुपये.

या मुलांना तुमचे लक्ष वेधून घ्यायचे आहे: ती ताज्या दमाची आहेत, आयुष्यातले सगळे अन्याय सहन करत आहेत, दिग्गज अभिनेत्यासोबत काम करत आहेत- हेही दृश्य दुर्मीळच. चित्रपटाचा सुरुवातीचा भाग या समूहाबद्दलच आहे. हे सगळे समूहाने ये-जा करतात, मजा करतात, वाद घालतात, भांडतात, खेळतात आणि अभिनयही करतात.

ही दाटीवाटी हेतूत: केलेली आहे हे खरे, पण चित्रपटाची पहिली वीसेक मिनिटे फारशी पकड घेत नाहीत, काहीशी विस्कळीत आणि अस्वस्थ वाटतात.

सुमारे तीन तास लांबीचा हा चित्रपट आरामात स्वत:चा वेळ घेतो. अर्थात हा सूर गवसेपर्यंतच्या वेळातही कौतुकास्पद असे खूप काही आहे. कॅमेरा प्रबळ इच्छा आणि निराशा सोबत घेऊन इकडेतिकडे वावरतो आणि काही उत्तम ट्रॅकिंग शॉट्स बघायला मिळतात. विनोदाचा अगदी बेतशीर वापर आहे. फारशी खळखळ न करता मुख्य व्यक्तिरेखा आकार घेऊ लागते. ती असते डॉन नावाच्या एका तरुणाची (अंकुश गेडाम). तरीही चित्रपटाची पहिली ४० मिनिटे सारखा एक प्रश्न रुंजी घालत राहतो: नेमके काय दाखवायचे आहे या चित्रपटातून?

विजय त्यांच्या मुलांमध्ये आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या खेळाडूंमध्ये एक मॅच घेण्याचा प्रस्ताव ठेवतात, तेव्हा चित्र काहीसे स्पष्ट होऊ लागते. एक मॅच, संघ विरुद्ध झुंड. कॉलेजचे मैदान आणि झोपडपट्टीत केवळ एका भिंतीचे अंतर आहे, या भिंतीच्या दोन्ही बाजूंना दोन वेगवेगळी विश्व आहेत, दोन भविष्यकाळ आहेत, हाच ‘झुंड’चा विषय आहे.

विस्कळीत तुकडे आता सुसंगत भागांमध्ये जोडले जाऊ लागतात. सुरुवातीपासून असलेल्या काही व्यक्तिरेखांमधून, उदाहरणार्थ एक स्थानिक गुंड (आकाश ठोसर), कथा आकार घेऊ लागते. विनोद असतोच बांधून ठेवण्यासाठी. उदाहरणार्थ, मॅचसाठी येतात तेव्हा मुलांचे कपडे बघा- पिवळ्या पॅण्ट्स, भडक गॉगल्स, झकपक शर्ट्स, टोप्या, गळ्याभवती रुमाल, अगदी टायदेखील.

मंजुळेंना निरागसता व्यक्त कशी करायची ते बरोबर समजते. ही निरागसता हवीहवीशी वाटते आणि मर्माचा भेदही करते. भिंतीपलीकडील विश्वाने हिसकावून घेतली आहे, ती हीच निरागसता. पहिल्या मॅचमध्येच ‘झुंड’ टोकदार होऊ लागतो. मॅचच्या पहिल्या भागावर कॉलेजची टीम वर्चस्व गाजवते; झोपडपट्टीतील मुलांमध्ये समन्वय, एकी, एकाग्रता सगळ्याचाच अभाव असतो. ते वाद घालतात, भांडतात, मनमानी करतात. खऱ्या आयुष्याशी दोन हात करताना वापरतात त्या क्लृप्त्या खेळाच्या मैदानावरही आजमावतात.

तुम्हाला ‘झुंड’ला एखाद्या स्लॉटमध्ये टाकायचेच असेल, तर तुम्ही याला स्पोर्ट्स ड्रामा म्हणू शकता, ‘क्रीडानाट्य’.

मात्र, या प्रकारातील बहुतेक भारतीय चित्रपटांमध्ये स्पर्धा जिंकण्याचा भाग महत्त्वाचा असतो, मंजुळे यांच्या चित्रपटाचे तसे नाही. कारण, ‘सरपट्टा परांबराई’प्रमाणे यात अडथळे खूप आहेत, यातील अनेक अडथळ्यांना तर कोणी अडथळे समजणारही नाही.

फूटबॉल किंवा संघ बांधणे हे वारंवार वापरलेले रूपक आहे. मात्र, यातील पहिली मॅच ‘लगान’मधील मॅचहून फारशी वेगळी दिसत नाही ही बाब लक्षणीय आहे. एकमेकांहून पूर्णपणे वेगळे असलेल्या व्यक्तींचे दोन समूह, एकाच देशात राहत असूनही त्यांच्यात फारसे साम्य नाही. दोन्ही चित्रपटांमध्ये एक दृश्य अगदीच समांतर आहे. झोपडपट्टीतील मुले गोल करतात, तेव्हा स्कोअररच्या चेहऱ्यावर स्मित उमटल्याचे दाखवणारे. हिंदू जातिव्यवस्थेत लोकांना दोन वेगवेगळ्या प्रवर्गांमध्ये टाकले जाते. राज्य करणारे आणि ज्यांच्यावर राज्य केले जाते ते. विशेषत: भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तर ही वर्गवारी दिसतेच.

मंजुळे एक सुखद विचार मांडतात: ही मुले भांडणात आणि अमली पदार्थांच्या नशेत गुंतलेली असली, तरी ते गुन्हेगार नाहीत, ते पीडित आहेत. हे स्पष्ट आहे पण एकदा जगभरातील धोरणांकडे बघितले तर लक्षात येईल. अमली पदार्थ घेणाऱ्यांना, बेघरांना, सीमेवरील परिस्थितीत राहणाऱ्यांना शिक्षा करणारी ही धोरणे आहेत. मागे राहून गेलेल्यांशी वागण्यात एक विचित्र उदासीनता दिसते.

आणि हीच सुखद भावना पुढील उपकथानकाकडे घेऊन जाते- झोपडपट्टीतील खेळांडूमधील राष्ट्रव्यापी फूटबॉल स्पर्धा. यात जिंकणारे स्लम सॉकर या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेऊ शकतील (स्पोर्ट्स ड्रामा प्रकराला दिलेले हे अफलातून वळण).

बेताच्या परिस्थितीतील लोकांमध्ये स्वच्छता, सभ्यता, शिस्तीचा अभाव असतो किंवा ते ‘अनागर’ असतात वगैरे विध्वंसक गैरसमज मंजुळे दूर करत जातात. जर ‘फॅण्ड्री’चा पाया राग असेल आणि ‘सैराट’चा निराशा असेल, तर ‘झुंड’चा पाया आशावाद आहे.

तुम्हाला चित्रपटाच्या रचनेबद्दल नक्कीच प्रश्न पडतील. ही प्रचंड मोठी दुही भरून काढण्यासाठी क्रीडास्पर्धेहून अधिक अशा कशाची तरी आवश्यकता आहेच. पण चित्रपटाचा साधेपणा आणि निष्ठा कौतुकास्पद आहे. राष्ट्र या संकल्पनेबद्दल चित्रपट काही महत्त्वाचे प्रश्न विचारतो.

एका ठिकाणी, एक मुलगा विचारतो, “भारत मतलब?” यातून एक छोटा विनोद होतो पण त्याचा अंत:प्रवाह शिरशिरी आणणारा आहे. जातिव्यवस्थेमुळे राष्ट्राच्या आत आणखी कितीतरी राष्ट्रे तयार होतात; त्यामुळे माणसातील संभाव्यतेला मर्यादा पडतात, यातून केवळ व्यक्तीचे नाही, तर समाजाचे नुकसान होते. ‘भारता’चा हाही एक अर्थ आहेच.

स्लम सॉकरसाठी सज्ज झालेल्या खेळाडूंच्या माध्यमातून मंजुळे असे अनेक धागे तपासून बघतात. त्यातील एक मुलगी (रिंकू राजगुरू) दूरच्या खेड्यात राहते, पासपोर्ट मिळवण्यासाठी तिच्यापुढे मोठा संघर्ष आहे. असंख्य कागदपत्रे, असंख्य मंजुऱ्या. एका क्षणाला तिला एका पाटी शेजारून पुढे जाते, त्यावरील अक्षरे दिसतात- ‘डिजिटल इंडिया’. डॉनकडे पासपोर्ट नसतोच, तो त्याला मिळू नये याची काळजी पोलीस घेतात. दुष्टचक्र सुरूच राहते. त्याला सूड घ्यायचा असतो, त्याला पुन्हा रानटीपणाकडे ढकलणारा सूड. अर्थात ‘झुंड’मधील प्रत्येक काळ्या ढगाला एक रूपेरी किनार आहे. डॉनचा पासपोर्टचा प्रश्न तसाच सुटतो.

अर्थात अनेक बलस्थाने असूनही, झुंड हा चित्रपट मंजुळे यांच्या फॅण्ड्री व सैराट या आधीच्या दोन चित्रपटांएवढा प्रभावी व स्मरणीय होऊ शकत नाही. याची दोन महत्त्वाची कारणे आहेत- चित्रपटाची लांबी आणि विजय ही व्यक्तिरेखा.

चित्रपटात बऱ्यापैकी काढून टाकण्याजोगा ऐवज आहे, आणखी काही पुनर्लेखनांच्या माध्यमातून तो काढून टाकता आला असता. शिवाय, विजय या मुलांकडे आकर्षित का होतात हे आपल्याला अजिबात कळत नाही. त्यांची जवळ आलेली निवृत्ती, मुलाशी असलेले कोरडे नाते अशा काही सूचक बाबी आहेत, पण चित्रपट त्या नेमकेपणाने स्पष्ट करू शकत नाही. विजय या भागात नव्यानेच आले आहेत असेही नाही.

लेखन एकाग्र न झाल्यामुळे काही वेळा नको त्या ठिकाणी ऊर्जा वाया जाते आणि काही भाग अर्धकच्चे राहतात. फारशा प्रशिक्षणाशिवाय मुले कॉलेज टीमशी जिंकतात ही बाब तेवढी पटत नाही. नंतर अमिताभ चित्रपटाच्या विषयाचा सारांश मांडणारे एक छोटेखानी भाषणही देतात. आता हे एक आशावादी नाट्य असल्याने त्याचा सामाजिक-राजकीय संदर्भ लक्षात येतो, पण निव्वळ चित्रपट म्हणून विचार करायचा, तर हे पचनी पडत नाही.

अमिताभ आणि मुलांमधील उत्तम केमिस्ट्री प्रभावी आहे. विचार करा: त्यांची अभिनय कारकीर्द त्यांच्या वयाच्या तिप्पट असेल, तरीही हा भेद चित्रपटात जाणवत नाही. याचे कारण म्हणजे, मंजुळे यांच्या काळजीपूर्वक दिग्दर्शनाखाली अमिताभ मुलांना चमकण्याची मुभा देतात; अनेकदा ते अलगदपणे पार्श्वभूमीला जातात, त्यांना सहज जमत असल्या तरी पडदा व्यापून टाकण्याच्या क्लृप्त्या ते अजिबात वापरत नाहीत.

हीदेखील भविष्यकाळाचीच नांदी आहे, उतरंडी मोडून पडत आहेत, त्यात बॉलिवूडमधील उतरंडीही आल्याच. ही जगातील सर्वांत विषमतेवर आधारित इंडस्ट्रीजपैकी एक आहे. ‘जिंकणे’ या गोष्टीचे गारुड पडलेली इंडस्ट्री आणि देशही. यात बच्चन एका व्यक्तिरेखेला काहीतरी सांगतात, ते जे सांगतात ते अत्यंत साधे आणि सहज असते, पण एका नाट्यमय खेळाच्या पार्श्वभूमीवरही ते पराभूत मनोवृत्तीचे वाटत नाही, तर विजयी वृत्ती दर्शवते, आपल्या मूलभूत मानसिकतेचा शोध घेत जाते- ते म्हणतात: “हर बार जितना जरुरी नही होता”- (नेहमी जिंकणे आवश्यक नसते).

मूळ लेख:

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0