न्यायाधीशांवर टीका: माजी न्या. कर्णन यांना अटक

न्यायाधीशांवर टीका: माजी न्या. कर्णन यांना अटक

चेन्नईः सर्वोच्च न्यायालय व मद्रास उच्च न्यायालयातील काही न्यायाधीशांविरोधात, महिला कर्मचार्यांविरोधात अपशब्द वापरल्याप्रकरणी मद्रास उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती सीएस कर्णन यांना बुधवारी चेन्नईत अटक करण्यात आली. कर्णन त्यांचा राजकीय पक्ष अँटी करप्शन डायनॅमिक पार्टीच्या कार्यालयात होते तेथून त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती कर्णन यांचे वकील पीटर रमेश कुमार यांनी दिली.

कर्णन यांना जिल्हा न्यायदंडाधिकार्यांपुढे उद्या हजर केले जाणार असून सध्या त्यांना पुझल सेंट्रल जेलमध्ये ठेवण्यात आले आहे.

न्यायाधीशांवर व महिलांवर आरोप केल्यानंतर कर्णन यांच्याविरोधात चेन्नई पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. पण त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. या वरून तामिळनाडू-पुड्डूचेरी बार कॉन्सिलने न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर गेल्या आठवड्यात मद्रास उच्च न्यायालयाने पोलिस महानिरीक्षक व पोलिस आयुक्तांना या प्रकरणासंदर्भात ७ डिसेंबरला न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहण्यास सांगितले होते. त्यानंतर बुधवारी कर्णन यांना अटक करण्यात आली.

एक महिन्यांपूर्वी कर्णन यांनी सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयातील काही आजी-माजी न्यायाधिशांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते व त्यांच्याविरोधात अपशब्द उच्चारले होते. त्यावरून चेन्नईतील एका वकिलाने चेन्नई सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर कर्णन यांच्याविरोधात आयपीसी कलम १५३ व ५०९ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते.

कर्णन यांच्याविरोधातली ही तक्रार सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्याकडेही पाठवण्यात आली होती. या तक्रारीत एका व्हीडिओचा उल्लेख आहे. या व्हीडिओमध्ये कर्णन महिलांच्याविरोधात अपशब्द बोलत असून काही न्यायाधीश व अधिकार्यांच्या पत्नींनाही ते धमकावत आहेत. त्याचबरोबर न्यायालयातल्या महिला कर्मचारी व महिला न्यायाधीशांचा सर्वोच्च न्यायालय व मद्रास उच्च न्यायालयातील काही न्यायाधीश लैंगिक छळ करत आहेत, याचाही खुलासा करत असताना दिसत होते.

न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी यापूर्वी २०१७ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने माजी न्या. कर्णन यांना दोषी ठरवले होते व त्यांना ६ महिन्यांचा तुरुंगवास ठोठावला होता. देशाच्या न्यायालयीन इतिहासात पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला तुरुंगात पाठवण्याच्या घटनेची नोंद झाली होती.

मूळ बातमी

COMMENTS