भाजपचा राष्ट्रवाद पोकळ आणि घातकहीः मनमोहन सिंग

भाजपचा राष्ट्रवाद पोकळ आणि घातकहीः मनमोहन सिंग

नवी दिल्ली: भाजप सरकारचा राष्ट्रवाद जेवढा पोकळ आहे, तेवढाच घातकही आहे, असा आरोप माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केला आहे. पाच राज्यांतील विधानसभा निव

स्वातंत्र्याची विरूप व्याख्या
भाजप नेता कुलदीप सेंगर बलात्कार प्रकरणात दोषी
राणे कार्ड खेळून शिवसेनेला चेकमेट 

नवी दिल्ली: भाजप सरकारचा राष्ट्रवाद जेवढा पोकळ आहे, तेवढाच घातकही आहे, असा आरोप माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केला आहे. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, मनमोहन सिंग यांनी जनतेसाठी गुरुवारी एक व्हिडिओ संदेश प्रसिद्ध केला आहे. त्यात त्यांनी भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

“सध्याची परिस्थिती खूपच चिंताजनक आहे. कोरोना साथीदरम्यान सरकारची दुबळी धोरणे उघडी पडली आहेत. अर्थव्यवस्था घसरणीला लागली आहे, महागाई वाढत आहे, बेरोजगारीने कळस गाठला आहे आणि गेली साडेसात वर्षे सत्तेत असलेले भाजप सरकार आपल्या चुका कबूल करून सुधारण्याऐवजी त्या चुकांसाठी पंडित जवाहरलाल नेहरू यांना जबाबदार धरत आहे,” अशी टीका मनमोहन सिंग यांनी केली आहे.

“पंतप्रधानपदाची विशेष अशी प्रतिष्ठा असते आणि होऊन गेलेल्या गोष्टींवर दोषाचे खापर फोडून आपले गुन्हे लपवता येत नाहीत असे माझे स्पष्ट मत आहे. मी पंतप्रधान म्हणून दहा वर्षे काम केले. स्वत: बोलण्याऐवजी मी काम करण्याला प्राधान्य दिले,” असे मनमोहन सिंग म्हणाले.

“मला ‘मौनमोहन’ म्हणून हिणवणाऱ्या भाजपचे खरे रूप देशासमोर आले आहे याचे मला समाधान वाटते. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांच्यावर काही दिवसांपूर्वी भाजपने जे आरोप केले, त्याचे कोणत्याही पद्धतीने समर्थन होऊ शकत नाही. शेतकरी आंदोलनादरम्यानही पंजाबी जनतेला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. पंजाबी जनतेचे साहस, शौर्य, देशभक्ती व त्याग अवघ्या जगासाठी वंदनीय आहे,” असेही मनमोहन सिंग यांनी संदेशात नमूद केले आहे.

स्वत: जागतिक कीर्तीचे अर्थतज्ज्ञ असलेल्या मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारच्या अर्थकारणाचाही चांगलाच समाचार घेतला. सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे देश आर्थिक संकटात अडकला आहे, बेरोजगारीने कळस गाठला आहे, शेतकऱ्यांना दोन वेळचे अन्न मिळणे कठीण झाले आहे, कर्जाचा बोजा वाढत आहे, सामाजिक विषमता टोकाला गेली आहे, अशी टीका मनमोहन सिंग यांनी केली.

भाजप सरकारचे धोरण व वर्तन दोन्ही चुकीचे आहे. त्यांच्या धोरणात स्वार्थ आहे आणि वर्तनात द्वेष व दुही आहे. भाजपच्या स्वार्थासाठी देशाला जात-धर्म आणि प्रदेशाच्या नावाखाली विभागले जात आहे, लोकांना आपसात लढण्यास भाग पाडले जात आहे. या सरकारचा बनावट राष्ट्रवाद जेवढा पोकळ आहे, तेवढाच घातकही आहे, असा इशारा मनमोहन सिंग यांनी दिला. इंग्रजांच्या ‘फोडा आणि राज्य करा’ याच धोरणाची पुनरावृत्ती हे सरकार करत आहे. देशाच्या राज्यघटनेबद्दल सरकारला अजिबात आस्था नाही, असेही ते म्हणाले.

“परराष्ट्र धोरणाबाबतही मोदी सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. सत्य कोणत्या ना कोणत्या स्वरूपात समोर आल्याखेरीज राहत नाही. चीनने आपल्या भूमीवर ठाण मांडले आहे, जुने मित्र आपल्यापासून दूर जाऊ लागले आहेत, शेजारी राष्ट्रांशी संबंध बिघडत आहेत,” अशी टीका मनमोहन सिंग यांनी केली.

ही परिस्थिती बदलण्यासाठी जनतेने काँग्रेसला मतदान करावे, असे आवाहन त्यांनी अखेरीस केले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: