नांदेड स्फोटात उजव्या विचारसरणीच्या नेत्यांची भूमिका – माजी संघ स्वयंसेवकाचा दावा

नांदेड स्फोटात उजव्या विचारसरणीच्या नेत्यांची भूमिका – माजी संघ स्वयंसेवकाचा दावा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पंचवीस वर्षे स्वयंसेवक असलेले यशवंत शिंदे यांनी विशेष सीबीआय न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात दावा केला आहे, की २००६च्या नांदेड बॉम्बस्फोटाच्या तीन वर्षे अगोदर विहिंपच्या एका ज्येष्ठ नेत्याने त्यांना एका दहशतवादी प्रशिक्षण शिबिराबाबत सांगितले होते, जे देशभरात बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या उद्देशाने चालवले जात होते.

विहिंप, बजरंग दलाच्या धमकीमुळे कुणाल कामरांचा कार्यक्रम रद्द
वाराणसीत बिगर हिंदूंच्या प्रवेशास बंदीची पोस्टर
केरळमध्ये माकपा, कर्नाटकात बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या

मुंबई: नांदेडमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) कार्यकर्त्याच्या निवासस्थानी २००६ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाच्या सोळा वर्षांनंतर, संघाच्या एका माजी वरिष्ठ पदाधिकाऱ्याने विशेष सीबीआय न्यायालयात अर्ज दाखल केला असून त्यात दावा केला आहे, की उजव्या विचारसरणीचे अनेक वरिष्ठ नेते थेटपणे त्या घटनेत सामील होते.

एका वृत्त अहवालानुसार, अर्जदार यशवंत शिंदे हे जवळपास २५ वर्षे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते होते आणि विश्व हिंदू परिषद (VHP) आणि बजरंग दल यांसारख्या उजव्या विचारसरणीच्या गटांशी देखील संबंधित होते. त्यांनी दावा केला आहे, की स्फोटांच्या तीन वर्षांपूर्वी, व्हिएचपीच्या एका वरिष्ठ कार्यकर्त्याने त्याला देशभर स्फोट घडवून आणण्यासाठी दहशतवादी प्रशिक्षण शिबिर चालवण्यात येत असल्याबद्दल सांगितले होते.

४ आणि ५ एप्रिल २००६ च्या मध्यरात्री झालेला नांदेड बॉम्बस्फोट हा मराठवाड्यात काही वर्षांच्या कालावधीत झालेल्या तीन बॉम्बस्फोटांपैकी एक होता. इतर दोन स्फोट परभणी (२००३) आणि पूर्णा (२००४) येथे झाले होते. मशिदींमध्ये बॉम्ब फेकल्याचा आरोप असलेल्या सर्वांची न्यायालयाने यापूर्वीच निर्दोष मुक्तता केली आहे.

महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकानंतर (एटीएस) हे प्रकरण सीबीआयने या प्रकरणाचा तपास केला होता. त्यांनी असा दावा केला होता, की लक्ष्मण राजकोंडावार नावाच्या व्यक्तीच्या घरी हा स्फोट चुकून झाला होता, जो कथितपणे संघाचा (आरएसएसचा) कार्यकर्ता होता. राजकोंडावार यांचा मुलगा नरेश आणि विहिंप कार्यकर्ता हिमांशू पानसे हे बॉम्ब एकत्र करताना ठार झाले. हा बॉम्ब औरंगाबादमधील मशिदीला लक्ष्य करण्यासाठी वापरण्यात येणार होता, असा तपास यंत्रणांचा अंदाज आहे.

यशवंत शिंदे म्हणतात की पानसे यांना ते १९९९ पासून ओळखत होते. जेव्हा ते गोव्यात विहिंपचे कार्यकर्ता म्हणून काम करत होते. शिंदे यांचा दावा आहे, की १९९९ मध्ये झालेल्या बैठकीत पानसे आणि त्यांच्या सात मित्रांनी जम्मूमध्ये शस्त्र प्रशिक्षण घेण्याचे मान्य केले होते. हे प्रशिक्षण ‘भारतीय लष्कराच्या जवानांनी’ दिल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे.

शिंदे या खटल्यात फिर्यादी साक्षीदार नाहीत, पण “आता गप्प बसू शकत नाही” म्हणून ते शेवटी पुढे आले असल्याचा त्यांचा दावा आहे.

“मी गेली १६ वर्षे मोहन भागवत यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांनी, दहशतवादी कारवायांमध्ये सामील असलेल्यांवर कारवाई करावी यासाठी प्रयत्न करण्यात घालवली आहे. माझ्या तक्रारीची कोणीही दखल घेतली नाही. त्यामुळे मला इतक्या दिवसांपासून माहीत असलेल्या सर्व गोष्टी मी न्यायालयासमोर मांडण्यास तयार आहे,”असे त्यांनी द वायरला सांगितले.

शिंदे यांचे नांदेड न्यायालयातील वकील संगमेश्वर देलमाडे यांनी ‘द वायर’ला सांगितले की, शिंदे आता का हजर होत आहेत, याबाबत त्यांनाही सुरुवातीला शंका होती. ते म्हणाले, “खरं तर हा प्रश्न मी त्यांना विचारला होता. त्यांनी मला सांगितले की त्याच्या जीवाला नेहमीच धोका असतो. आणि आता ते अशा टप्प्यावर पोहोचले आहेत, की त्यांचा विवेक त्यांना यापुढे गप्प बसू देणार नाही.”

प्रतिज्ञापत्रानुसार, शिंदे यांनी वयाच्या १८ व्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रवेश केला. ते आता ४९ वर्षांचे आहेत. ते म्हणाले, “मला आता या सर्व हिंदू संघटनांपासून दूर राहावे लागेल. ते आता ‘हिंदू हिताचे’ काम करत नाहीत. ते केवळ सत्ताधारी पक्षाच्या हातातील बाहुले आहेत.”

शिंदे यांच्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या करकीर्दीचे वर्णन करण्यासाठी त्यांनी त्यांच्या तारुण्यात सहभागी झालेल्या घटनांची यादी दिली आहे. १९९५ मध्ये जम्मूतील राजौरी दौऱ्यावर असताना फारुख अब्दुल्ला यांच्यावर हल्ला केल्याच्या आरोपाखाली शिंदे यांना सार्वजनिक सुरक्षा कायद्यांतर्गत अटक करण्यात आली होती. शिंदे यांची नंतर न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली, परंतु त्यांनी आता नांदेड सीबीआय न्यायालयात केलेल्या अर्जात हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. या कृतीनंतर, शिंदे यांनी ‘प्रचारक’ होण्याचे प्रशिक्षण घेतले आणि अखेरीस १९९९ मध्ये त्यांना बजरंग दलाच्या मुंबई युनिटचे प्रमुख बनवण्यात आले.

शिंदे यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींसह तीन जणांची नावे दिली आहेत, ज्यांनी पुण्यातील सिंहगड येथे शस्त्रे हाताळणे आणि बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण घेतले होते. शिंदे यांचा दावा आहे, की “मला दहशतवादी कारवाया मान्य नव्हत्या. तरीही दहशतवादी प्रशिक्षणात कोणाचा हात आहे हे जाणून घेण्यासाठीच मी कटात भाग घेतला होता.”

२००० च्या दशकाच्या सुरुवातीस, महाराष्ट्रात बॉम्बस्फोटांची अशी काही प्रकरणे घडली होती, जिथे हिंदू समुदायाचे लोक दहशतवादी कारवायांशी संबंधित होते. नंतर हैदराबादच्या मक्का मशीद (२००७), अजमेर शरीफ दर्गा (२००७) आणि मालेगाव (२००८) मधील बॉम्बस्फोट देखील कट्टरपंथी उजव्या गटांच्या कार्यकर्त्यांनी घडवून आणले होते. २०१० मध्ये तत्कालीन गृहमंत्री पी. चिदंबरम यांनीही कट्टर हिंदुत्ववादी गटांच्या दहशतवादी कारवायांना ‘भगवा दहशतवाद’ असे नाव दिले होते.

परभणी बॉम्बस्फोट आणि २००४चा जालना मशीद स्फोट या दोन्ही घटनांमध्ये नांदेड पद्धत वापरण्यात आल्याचा दावा यशवंत शिंदे करतात, पण जाणीवपूर्वक त्यांनी केवळ नांदेड प्रकरणावर लक्ष केंद्रित केले आहे. “त्या प्रकरणांतील न्यायालयांनी आरोपीची आधीच निर्दोष मुक्तता केली आहे. मला फक्त कोर्टात सुरू असलेल्या केसवर लक्ष केंद्रित करायचे आहे,” असे ते म्हणाले.

त्याचे वकील देलमाडे म्हणतात की कोर्टाने सीबीआयचे वकील (सरकारी वकील) आणि आरोपी दोघांनाही २२ सप्टेंबरपर्यंत उत्तर मागितले आहे.

मूळ वृत्त

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0