भयमुक्तीचे आग्रही स्वगत

भयमुक्तीचे आग्रही स्वगत

“आवाज नसलेल्यांना आवाज देण्यासाठी पत्रकारितेचा वापर केला” असा गौरवास्पद उल्लेख करत ‘एनडीटीव्ही इंडिया’ या वृत्तवाहिनीचे पत्रकार रवीश कुमार यांना शुक्रवारी आशियातील नोबेल समजणारा प्रतिष्ठेचा रेमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला. हा पुरस्कार देऊन मॅगसेस पुरस्कार समितीने भारतातल्या मीडियाच्या खालावलेल्या दर्जाबद्दल एकप्रकारचे राजकीय भाष्यही केले आहे. रवीश कुमार यांचे दीड वर्षापूर्वी ‘दी फ्री व्हॉईस’ (The free voice) हे पुस्तक प्रकाशित झाले होते. या पुस्तकाचे परीक्षण ‘अनुभव’ मासिकाच्या मे २०१८च्या अंकात प्रसिद्ध झाले होते. हे परीक्षण ‘अनुभव’च्या सौजन्याने पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.

राज्य वाङ्मय पुरस्कारांची घोषणा : भारत सासणेंना जीवनगौरव
डॉ. प्रभा अत्रेंना ‘पद्मविभूषण’, पुनावालांना ‘पद्मभूषण’
‘द वायर’ला आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेचे ‘फ्री मीडिया पॉयोनिअर अॅवॉर्ड’

आपला एक मित्र असतो. दोन पावसाळे अधिक पाहिलेला. जीवावर उदार होऊन दडपशाही व्यवस्थेशी दोन हात करणारा. दडपशाही व्यवस्थेच्या समर्थकांकडून होणारे शाब्दिक आणि शारीरिक हल्ले धाडसाने परतवणारा. थेट सत्तेच्या प्रमुखाला सवाल करणारा. नीतिमत्तेनं निर्विवाद. स्वभावाने खूपसा समंजस, संयमी आणि बंडखोरही. एक दिवस हा मित्र खांद्यावर हात टाकतो. म्हणतो-चल दोस्ता, थोडं भटकून येऊया… आणि चालता चालता चार-दोन समजुतीच्या, युक्तीच्या गोष्टी सांगतो. त्याच्या बोलण्यात कधी सात्विक संताप असतो , कधी उद्वेग, त्रागा, उपरोध कधी निराशा तर कधी समाधान असते. असंच एका मित्रत्वाच्या नात्याने कोणताही अभिनिवेश वा आवेश न बाळगता टेलिव्हिजन पत्रकार- लेखक रवीशकुमारांचे ‘दी फ्री व्हॉइस’ (The free voice) हे ताजं पुस्तक आपल्याला समजुतीच्या गोष्टी सांगतं. अतिरेकी राष्ट्रवाद, बेपर्वा लोकशाही आणि अहंगंडाने पछाडलेल्या संस्कृतीरक्षकांमुळे उद्भवणारे धोके समजावून सांगत, रोजच्या मॅडनेसमधून बाहेर पडून सावध होत पुढल्या हाका ऐकायला भाग पाडतं…
एरवी, दिवस कोणताही असो, प्रहर कोणताही असो कुणाच्या तरी इशाऱ्यावरून ठिकठिकाणच्या झुंडी मोकाट सुटतात. झुंडीच्या हाती तलवारी, लाठ्या-काठ्या असतात, बंदुका, जळते पलिते, मोठाले दगडही असतात. या झुंडीला स्वत:चा असा चेहरा असतो. जात-धर्माधिष्ठित ओळखही. डोळ्यांत रक्त साकळलेल्या या झुंडी, कधी हाती तिरंगा घेऊन तर कधी भगवा-हिरवा झेंडा हाती घेऊन रस्त्यांवर येतात. राष्ट्राचं, धर्माचं, जातीचं, पंथांचं, देवाचं, तथाकथित अध्यात्मिक गुरु, संत-महंत-मौलवींचं नाव घेऊन हिंसक होतात. बिनदिक्कत माणूस मारतात. बलात्काऱ्याला पाठीशी घालतात. खुन्यांचा जाहीर गौरव करतात. सत्ता मूग गिळून बसते. कायद्याचे रक्षक पाठ फिरवून उभे राहतात. कायदा हतबल होतो. भयाचे साम्राज्य अक्राळविक्राळ फैलावत जाते. हिंदू विरुद्ध मुस्लिम, बहुसंख्य विरुद्ध अल्पसंख्य, गरीब विरुद्ध श्रीमंत अशी मांडणी करून जाणीवपूर्वक चर्चा-वाद-भांडणं उकरून काढली जातात. जनतेचे जगण्या-मरणाचे प्रश्न बेदखल केले जातात. पण म्हणून जगणं थोडंच खोळंबतं. लोक नटून-थटून घराबाहेर पडतात. अवाढव्य मॉलमध्ये रेंगाळतात. मल्टिप्लेक्सच्या गारव्यात विसावतात. खरेदी-विक्रीचे महोत्सव साजरे करतात. सण-उत्सवांना अतीव उत्साहाने हजेरी लावतात. मनोभावे व्रत-वैकल्ये पार पाडतात. वरकरणी सारे काही छान चालले असते. ते पाहून कुठेय भय, कुठेय असहिष्णूता असं म्हणत सत्तेचे समर्थक फेर धरतात. पण आत कुठेतरी भीतीने मनाचा ताबा घेतलेला असतो. सत्तेच्या फायदा-तोट्याचे हिशेब मांडणाऱ्यांनी जाती-जातीत, धर्मा-पंथात विखार पेरला असतो. जनतेला एकाच वेळी भयात आणि धाकात ठेवण्याचा सत्ताधारी आणि राजकारण्यांचा एक हेतू सफल झालेला असतो.

सत्ताधारी- राजकारण्यांच्या याच छुप्या हेतूंविरोधात पत्रकार-लेखक रवीशकुमार गेली काही वर्षे लेखन-निवेदनाच्या माध्यमातून अव्याहत लढताहेत. अनेक प्रसंगी एकहाती. एकाकीसुद्धा. ते ज्या टेलिव्हिजन माध्यमांत वावरताहेत, त्या माध्यमाने त्यांना ‘पब्लिक थिंकर’ अर्थात ‘जनचिंतक’ अशी ओळख मिळवून दिलीय. सत्ताधारी व्यवस्थेनेच नव्हे तर माध्यम व्यवस्थेनेही नाडलेला, नाकारलेला अगदी कुणीही त्यांच्या आस्थेचा, चिंतेचा विषय आहे. त्यांच्या नजरेला सौंदर्याची, चांगुलपणाची योग्य पारख आहे. व्यथा-वेदनेची बिनचूक ओळख आहे. रोजच्या जगण्यातल्या विसंगतींवर उपरोधिक शैलीत बोट ठेवण्यातलं त्यांचं कसब वादातीत आहे. न्यूज चॅनेल पाहणाऱ्या सुबुद्ध, संवेदनशील वर्गातली त्यांची लोकप्रियता एखाद्या सिनेस्टार वा क्रिकेटपटूच्या तोडीची आहे. त्यांच्या निवेदनशैलीच्या कधी कौतुकाने, कधी दुस्वासापोटी नकला केल्या जाताहेत. त्यांनी पायंडा पाडलेल्या सर्जनशील पत्रकारितेचं अनुकरण केलं जातंय.

मात्र, ते जितक्या बारकाईने वर्तमानातल्या खळबळजनक सामाजिक-राजकीय घडामोडींवर नजर ठेवून आहेत, तितक्यात विखारीपणे सत्ताधाऱ्यांचे बेलगाम समर्थक ऑनलाइन-ऑफलाइन पाळत ठेवून त्यांचा पाठलाग करताहेत. त्यांना खुलेआम धमकावताहेत. उ. भारतात कुणा अनाम ऑटोरिक्षा चालकाने प्रेमापोटी त्यांचे नाव स्वत:च्या रिक्षावर अभिमानाने मिरवले असले तरीही, याच्या कितीतरी पटीने अधिक तिरस्कार, द्वेष दररोजच त्यांच्या वाट्याला येतो आहे. परंतु,चहुबाजूंनी शाब्दिक हिंसेच्या छटा गडद होत चाललेल्या असताना रवीशकुमार यांची अन्याय्य व्यवस्थेविरोधात भूमिका घेण्यातली हिंमत कायम आहे. नित्याच्या लेखन-निवेदनातली धारही कायम आहे. अर्थातच या धारदारपणाला संयम आणि सुसंस्कृतपणाची जोड आहे. संयत नि समतोल हे त्यांच्या अभिव्यक्तीचे लक्षवेधी पैलू आहेत. उद्दाम (अॅरोगन्स) नव्हे, आग्रही (असर्टिव्ह) प्रतिपादनाकडे त्यांचा कल आहे. आक्रमकता आणि आक्रस्ताळेपणापेक्षा सात्विक संतापाची किनार असलेल्या पण सौहार्दपूर्ण संवादावर त्यांचा विश्वास आहे. या साऱ्याचे प्रतिबिंब त्यांच्या या पुस्तकातही उमटले आहे.
ठसठशीत शब्द आणि दृकश्राव्य माध्यमांत वावरणाऱ्या माध्यमकारांच्या अभिव्यक्तीचे साधन असलेला माइक वा बूम एवढ्यावरूनच आशय-विषयाचे महत्त्व अधोरेखित करणारे मुखपृष्ठ असलेल्या या पुस्तकाची प्रारंभालाच नजरेत भरणारी एक खासियत आहे. ती म्हणजे, पुस्तकलेखनाचा उद्देश नजरेपुढे ठेवून रवीशकुमार यांनी प्रस्तुत लेखन केलेलेच नाही, तर ब्लॉक, वेबपोर्टल आदी डिजिटल मीडिया प्रकारांत त्यांच्या मूळ हिंदी भाषेत प्रकाशित झालेल्या नैमित्तिक लेखांचा चित्रा पद्मनाभन, अनुराग बास्नेत आणि रवी सिंग यांनी केलेला हा इंग्लिश भाषेतला अनुवाद आहे. ही एकप्रकारे रवीशकुमार यांच्या सशक्त अभिव्यक्ती शैलीस मिळालेली दाद आहे.

देखना शौक है | घोर पारिवारिक | अंग्रेजी आती नही |

अशी ट्विटर अकाउंटवर स्वत:ची प्रांजळ ओळख करून देणाऱ्या हिंदी भाषक रवीशकुमार यांचा सन्मानही.

पुस्तकाला दिलेलं ‘दी फ्री व्हॉइस’ हे शीर्षक लोकशाही व्यवस्थेने देऊ केलेल्या भयमुक्त अभिव्यक्ती स्वातंत्र्याकडे लक्ष वेधणारं आहे. वर्तमानाच्या संदर्भात एका पातळीवर ही अभिव्यक्ती भयमुक्त नाही, हेही सुचित करणारं आहे. पुस्तकाची सुरुवात भयमुक्त अभिव्यक्तीची निकड अधोरेखित करणाऱ्या ‘स्पिकिंग आऊट’ (Speaking out ) प्रकरणाने झालेली आहे.

ए जज्ज डाइज. हिज सन अँड वाइफ आर अनेबल टु समन अप दी करेज टु स्पीक देअर माइंड्स. शुडण्ड द चीफ जस्टिस ऑफ इंडिया अशुअर देम ऑफ सेफ्टी, मेकिंग इट पॉसिबल फॉर देम टु स्पीक? इफ ए सिटिझन, आऊट ऑफ फिअर, लुजेस द करेज अँड विल टु लिव्ह, टु स्पीक, हु विल रिअशुअर हिम? इफ, अॅज दी अपहोल्डर्स ऑफ दी कॉन्स्टिट्युशन, दी चीफ जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्ट अँड दी प्राइम मिनिस्टर कॅनॉट प्रोव्हाइड धीस अशुअरन्स, हु कॅन?  (A Judge Dies. His Son and Wife Are Unable to Summon Up the Courage to Speak Their Minds. Should the Chief Justice of India Assure Them of Safety, Making It Possible for Them to Speak? If a Citizen, Out of Fear, Looses the Courage and Will to Live, to Speak, Who Will Reassure Him? If, as the upholders of the Constitution, the Chief Justice of the Supreme Court and the Prime Minister cannot provide this assurance, Who Can?)

असा जज्ज लोया यांच्या संशयात्मक मृत्यूप्रकरणाचा संदर्भ असलेला घेऊन अणकुचीदार सवाल र‌वीशकुमार यांनी प्रारंभालाच विचारलेला आहे. याच प्रकरणात सत्ताधारी व्यवस्थेने फेसबुक, ट्विटर, व्हॉट्स अॅप आदी संवादमाध्यमांच्या चालवलेल्या आक्रमक वापराचा, नियोजनपूर्वक तयार केलेल्या ऑनलाइन झुंडीचा आणि त्यातून निर्माण होणाऱ्या भयग्रस्त वातावरणाचा तपशील त्यांनी पुरवला आहे.

भयमुक्त होऊन बोलणे अवघड नाही, तर काहीही बोलण्याआधी भयाची गुहा पार करणे आहे, सर्वात अवघड आहे. तुम्ही मरणाच्या भीतीत जगत आहात याचा अर्थ तुम्ही जिवंत नाही आहात, या वास्तवाची जाणीवही त्यांनी आपले म्हणणे मांडताना या प्रकरणात करून दिली आहे. क्षणिक मोहापायी झुंडीचा भाग बनू नका, असं कळकळीचं आव्हान जेव्हा रवीशकुमार या प्रकरणात वाचकांना करतात, तेव्हा ‘स्वातंत्र्य आणि मुक्ती ही न संपणारी कार्ये आहेत, हे कधीही विसरू नका’, असं म्हणणाऱ्या इटालियन तत्वज्ञ उम्बेर्तो उकोची भावनाच ते नव्याने बोलून दाखवत असतात.

‘गोदी मीडिया’, ‘व्हाट्स अॅप युनिव्हर्सिटी’ हे जसे रवीशकुमार यांनी  वाचक-प्रेक्षकांच्या तोंडी रुळवलेले उपरोधपूर्ण असे शब्द आहेत. तसाच ‘रोबो पब्लिक’ हाही त्यांनी सतत वापरलेला शब्द आहे. ‘दी रोबो पब्लिक अँड दी बिल्डिंग ऑफ न्यू डेमोक्रसी’ (The Robo Public and the Building of New Democracy) या नावाचे एक प्रकरणच या पुस्तकात आहे. नेत्यांच्या प्रतिमेच्या प्रेमात पडून सारासार विचार न करता कृती करणाऱ्यांना रवीशकुमार यांनी ‘रोबो पब्लिक’ अशी ओळख दिली आहे. कोणत्या प्रसंगी सत्ताधाऱ्यांचे समर्थक रोबो पब्लिकप्रमाणे वागले याचा तपशील (उदा. गुजरात विधानसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधानांनी पाकिस्तान हस्तक्षेप करत असल्याची, आणि आपल्याविरोधात पाकिस्तानसोबत माजी पंतप्रधानांसह इतरही लोक एकत्र आले आहे आहे, अशी उठवलेली आवई) यांनी इथे उलगडला आहे. याच प्रकरणात विविध राजकीय पक्ष, नेते आणि समर्थकांच्यावतीने तयार केल्या जाणाऱ्या ‘फेक न्यूज’ अर्थात खोट्या बातम्यांमुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांचा जागतिक स्तरावरचा वेध घेताना, बदललेल्या सामाजिक चारित्र्याचा उहापोह करण्यात आला आहे. यालाच धरून ‘रोबो पब्लिक इज फेक पब्लिक, ए फेक पब्लिक मेक्स ए फेक रिपब्लिक, ए फेक पोलिटिकल कॉन्शियसनेस, ए फेक डेमोक्रसी’ (Robo Public Is Fake Public, A Fake Public Makes A Fake Republic, A Fake Political Consciousness, A Fake Democracy) असे उद्वेगी उद्गारही आले आहेत. खरं तर या प्रकरणात रवीशकुमार जेव्हा अभिव्यक्तीच्या गळचेपीमुळे निर्माण झालेले लोकशाहीपुढील धोके विषद करतात, तेव्हा ‘यू लॅक पॉलिटिकल लिबर्टी ऑर फ्रीडम ओन्ली इफ यू आर प्रिव्हेन्टेड फ्रॉम अटेनिंग ए गोल बाय ह्युमन बिइंग्ज’ (You Lack Political Liberty or Freedom Only If You Are Prevented From Attaining A Goal By Human Beings) अशी जाणीव करून देणाऱ्या इतिहासकार, तत्वज्ञ इसाया बर्लिनच्या इशाऱ्याचीच आठवण करून देत असतात. (संदर्भ : टू कन्सेप्ट ऑफ लिबर्टी – Two concept of liberty).  ‘ए नॅशनल प्रोजेक्ट फॉर इन्स्टॉलिंग फिअर ‘ (A National Project for Installing Fear) असे काहीसे तिरकस शैलीतले शीर्षक तिसऱ्या प्रकरणाला देण्यात आले आहे. यात शासकीय-प्रशासकीय व्यवस्थेच्या तळाला असलेले लोकसुद्धा भयाचे वातावरण कसे निर्माण करताहेत, याचे अस्वस्थ करणारे तपशील यात आले आहेत. बंगलोरच्या पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या झाल्यानंतर आपण कसे धास्तावलेल्या मन:स्थितीत घराबाहेर पडत होतो, जणू आपलीच गोळ्यांनी हत्या झालीय आणि लोक आपल्या मृतदेहाला ओलांडून पुढे निघून जाताहेत, अशी नैराश्यपूर्ण भावना मनात येत होती, हे इथे लेखकाने निवेदनाच्या ओघात सहज सांगितले असले तरीही ते हादरवून टाकणारे आहे. ‘व्हेअरएव्हर ए मॉब गॅदर्स इज हिटलर्स जर्मनी’ (Where ever a mob gathers is Hitlers Germany) या प्रकरणात हिटलरच्या नाझी राजवटीत झुंडी तयार करण्याचे तंत्र, झुंडीचा वापर करून जनतेत भय निर्माण करण्याची पद्धत याचा वर्तमानातल्या गांभीर्याकडे लक्ष वेधणारा संक्षिप्त इतिहास त्यांनी उलगडला आहे. ‘बिइंग दी पीपल’ (Being The People) हे प्रकरण सत्ताधारी आणि कॉर्पोरेट कंपन्यातले संबंध, सत्ताधाऱ्यांचा एकाधिकारशाहीकडे होणारा प्रवास यावर प्रकाशझोत टाकणारं आहे. नागरिक म्हणून असलेल्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून देणारं आहे. ‘एक नागरिक वा मतदार स्वत:ला नेत्याच्या प्रतिमेत विलीन करतो, तेव्हा तो नागरिक राहात नाही, मतदार तर नाहीच नाही. न पेक्षा तो वाऱ्यासरशी उडून जाणारा एक नाममात्र धुळीचा कण उरतो’, अशी टिप्पणी या प्रकरणात येते. “जसा गायकाला रियाज आवश्यक असतो, जसा लेखकाला वाचन-चिंतनाचा सराव आवश्यक असतो, तसाच लोकशाहीत राहणाऱ्या नागरिकालाही नित्याचा सराव आवश्यक असतो’, असं लेखक रवीशकुमारांचं अत्यंत महत्त्वाचं विधान या प्रकरणाचं जणू सार आहे.
इथे रवीशकुमार ज्या धाडसाने शोषितांची बाजू मांडतात, तेव्हा एका अर्थाने ते ‘टू क्रिएट टुडे इज टू क्रिएट डेंजरसली’(To Create Today Is To Create Dangerously) – हे अल्बेर काम्यूचं म्हणणं प्रत्यक्ष आचरणात आणत असतात. किंवा ते जेव्हा उत्तम नागरिकाची लक्षणं सांगतात, त्याच्या जबाबदाऱ्यांची ओळख करून देतात, तेव्हा ‘फ्रीडम इज नॉट ए गिफ्ट रिसिव्ह्ड फ्रॉम ए स्टेट ऑर लीडर बट ए पझेशन टू बी वन एव्हर बाय दी एफर्ट ऑफ इच अँड युनियन ऑफ ऑल’, (Freedom is not a gift received from a state or leader but a position to be one ever by the effort of it each and union of all) असं म्हणणाऱ्या काम्यूचे विचार ते आजच्या संदर्भात वाचकांपर्यंत पोहोचवत असतात. (संदर्भ : रेझिस्टन्स, रिबेलिअन अँड डेथ- Resistance, Rebellion and Death)

‘लेट्स ट्रीट अवरसेल्व्हज टू अॅन आइस्क्रिम धीस इंडिपेण्डंट डे’ (Let’s treat ourselves to an ice cream this Independence Day) असं रवीशकुमार शैलीतलं लक्षवेधी शीर्षक आणि त्याचा सघन आशय हे पुस्तकातल्या शेवटच्या प्रकरणाचं वैशिष्ट्य आहे. ‘तुम्ही जर कुणा समूहाचा, जातीचा, धर्माचा द्वेष करत नसाल तर यंदाच्या स्वातंत्र्यदिनी स्वत:ला आइस्क्रिम ट्रीट द्या, तुम्हाला जर भगतसिंगांच्या बलिदानाची जाणीव असेल, खुदीराम बोस केवळ तुमच्यासाठी फाशीच्या तख्तावर चढले याची जाणीव असेल, महात्मा गांधींनी तुमच्यासाठी छातीवर गोळ्या झेलल्या याची जाणीव असेल तर तुम्ही खरोखरच स्वातंत्र्यदिन साजरा करायला हवा,’ असं वाचकांच्या मनातले अपराधी जागवणारे, एकाच वेळी जाणीवा विस्तारणारे आवाहन लेखकाने यात केलं आहे.

जेमतेम पावणे-दोनशे पानं असलेल्या या पुस्तकाची मांडणी सुटसुटीत, एखाद्या गोष्टीच्या पुस्तकासारखी आहे. मजकुराचा फाँटसुद्धा ठसठशीत आहे. बाज मैत्रीपूर्ण परस्परसंवादाचा आहे. तर निवेदनातली धार आणि लय पुस्तकाला दीर्घ स्वगताच्या पातळीवर नेणारी आहे. मात्र हे स्वगत आत्मगौरवातून वा आत्मप्रौढीतून आलेलं नाही, तर त्यामागे उदारमतवादी, पुरोगामी, सहिष्णू विज्ञानवादी विचारांची पक्की बैठक असलेलं आत्मचिंतन आहे.

हे चिंतन स्वकेंद्री नव्हे, तर समाजकेंद्री आहे. लोकशाही राष्ट्राच्या संदर्भात समाजाच्या क्षमता आणि उणिवांवर बोट ठेवणं, व्यक्ती आणि समूूहांच्या जाणिवांना आव्हान करणं हा या स्वगताचा प्राथमिक आणि अंतिम उद्देश आहे. अर्थात, रवीशकुमारांच्या टीकाकारांना या पुस्तकाची मांडणी एकसुरी, एकांगीही वाटू शकते. सत्ताधारी व्यवस्थेच्या कार्यशैलीचं त्यांनी रेखाटलेलं चित्र निराशावाद पसरवणारंही वाटू शकतं. पण सत्ताधाऱ्यांच्या समर्थनार्थ होणारी हिंसा आणि त्यातून निर्माण होणारं भय हे सारंच कपोलकल्पित आहे, असं ते म्हणू शकत नाहीत. त्यांनी तसं छातीठोकपणे म्हणावं, असं वर्तमानातलं सामाजिक-राजकीय वातावरणही नाही.

न पेक्षा तुमचा मुलगा, तुमचा भाऊ, तुमचा नवरा, तुमचे वडील हिंसक झुंडीचा भाग बनू नयेत. त्यांनी प्रतिमा आणि प्रतिकांच्या फेऱ्यात न अडकता लोकशाहीचा, लोकशाहीतल्या नागरिकत्वाचा खरा अर्थ जाणावा ही लेखक रवीशकुमार यांची कळकळ प्रत्येक पानांतून प्रकर्षाने जाणवणारी आहे.

व्यक्ती आणि राष्ट्राच्या संदर्भात प्रेमाची महती सांगणारे ‘हाऊ वुई लव्ह’ हे तर खासच प्रकरण आहे. पुस्तकाचा हाय पॉइंटही. त्यातही “लव्ह मेक्स इस ह्युमन. दॅट इज इश्क. ऑल लव्हर्स आर नॉट आयडियल ह्युमन्स, नॉर ऑलवेज गुड, बट द वन हू इज इन लव्ह कॅन अॅट लिस्ट इमॅजिन ए बेटर वर्ल्ड…’ (Love makes is human.That  is Ishq. All Lovers Are Not Ideal Humans, Nor Always Good, But The One Who Is In Love Can Atleast Imagine A Better World …) हे आवाहन माणसातल्या प्रेमभावनेला हात घालत लोकशाही, राष्ट्र, संस्कृती या संकल्पनांकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन देणारं आहे. यात लेखक म्हणून रवीशकुमारांची  (नोंद : राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक संदर्भात प्रेमाचा अर्थ लावणारं ‘शहर इश्क में होना’ हे त्यांचं हिंदी भाषेतलं पुस्तक यापूर्वीच गाजलं आहे.) संवेदनशीलता, तरलता आणि सौंदर्यदृष्टी प्राधान्याने झळकते आहे. दुर्दम्य आशावादही झळकतो आहे. किंबहुना, रवीशकुमार जेव्हा परस्पर सौहार्दाची, प्रेमाची महती सांगतात. एखाद्याच्या प्रेमात पडणे म्हणजे काय असते, त्याने काय साधते वा साधता येते हे सुचवतात, “तेव्हा चांगुलपणा हा जसा कुठल्याही मताभिमानात बसत नाही, तसाच तो तत्वे व सिद्धांत यांच्याबद्दलच्या अहंकारातही बसत नाही. तत्वे, सिद्धांत हे प्रीतीचा अव्हेर करतात, तिला दूर लोटतात व चिंतन म्हणजे तर प्रीतीचा फुलोरा आहे, प्रीतीचा बहर आहे’, असं म्हणणाऱ्या तत्वज्ञ जे. कृष्णमूर्ती (संदर्भ : तेरा संवाद, जे. कृष्णमूर्ती) यांच्या विचारांनाच ते एकप्रकारे बळ देत असतात.

समस्येवर सरळसोपी उत्तरं देणं नव्हे तर वाचकांचे भाव आणि विचारविश्व ढवळून काढणारे प्रश्न उपस्थित करणं हे कुठल्याही यशस्वी साहित्यकृतीचं लक्षण मानलं जातं. त्या न्यायाने लेखक रवीशकुमार यांनी पुस्तकाद्वारे विचारलेले टोकदार प्रश्न आपला पिच्छा सोडत नाहीत. वाचक-नागरिकांच्या अहंकाराला त्यांनी दिलेलं आव्हान सहजासहजी विसरता येतं नाही.
या घटकेला दोन व्यक्तींत, दोन समूहांत आचार-विचारांवरून दुफळी माजलेली आहे. फॅसिस्ट कार्यशैली असलेल्या विद्यमान सत्ताधारी व्यवस्थेविरोधात आवाज उठवणाऱ्या रवीश कुमार यांचे प्रशंसक आणि टीकाकार यांच्यातही तशी दुफळी आहे. अर्थातच रवीश कुमारांचे समर्थक या पुस्तकाचं उत्स्फूर्तपणे स्वागत करतील हे उघड आहे. मात्र, टीकाकार या पुस्तकाची रटाळ कीर्तन, नैतिक गंड असलेलं चऱ्हाट, वाऱ्यावरची शब्दवरात अशी खिल्ली उडवत ते मोडीत काढतील हेही शक्य आहे. पण तसं करण्याने पुस्तकाची वर्तमानातली गरज अधिकच अधोरेखित झालेली असेल. लेखक-अनुवादक-प्रकाशकांचा परस्परसंवादातून मैत्रीपूर्ण प्रबोधनाचा उद्देशही सफल झालेला असेल.

दी फ्री व्हॉइस
लेखक – रवीशकुमार
प्रकाशक – स्पिकिंग टायगर
किंमत – ४९९ रुपये.

शेखर देशमुख

(पूर्वप्रसिद्धी ‘अनुभव’ मासिक मे २०१८)

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: