आठवणींच्या जुन्या पुलावरून

आठवणींच्या जुन्या पुलावरून

ज्येष्ठ पत्रकार, संपादक व राज्यसभेचे खासदार कुमार केतकर यांच्या पंचाहत्तरीनिमित्त ग्रंथाली वाचक चळवळीचे मासिक ‘शब्द रुची’ने त्यांच्या जीवनपटावर विविध मान्यवरांच्या आठवणींचा एक विशेष अंक ७ जानेवारी २०२१ रोजी प्रसिद्ध केला होता. या मासिकात कुमार केतकर यांच्या आयुष्यपटाचा अंजली कीर्तने यांनी घेतलेला वेध ‘द वायर मराठी’च्या वाचकांसाठी प्रसिद्ध करत आहोत.

‘इंडिया’ने लॉक डाऊन उठवला नाही, तर ‘भारतीय’ रस्त्यावर येतील…
प्लेटोची गुहा आणि आंखो देखी
वयोमर्यादा ओलांडलेल्यांना स्पर्धा परीक्षेची एक संधी

प्रिय  कुमार,

७ जानेवारी हा तुझा वाढदिवस. पंचाहत्तरीनिमित्त तुला हार्दिक शुभेच्छा. कॉ. अहिल्याताई रांगणेकर जेव्हा पंचाहत्तरीच्या झाल्या, तेव्हा परळच्या ‘दामोदर सभागृहा’त कोणी तरी त्यांचा सत्कार केला होता. तेव्हा त्यांना ७५ लाल गुलाब दिले गेले. मला ती कल्पना खूप आवडली. ‘हार्दिक शुभेच्छा’ या सांकेतिक शब्दांत ७५ लाल गुलाब बहरले आहेत, हे तू लक्षात घे. तुझ्या पंचाहत्तरीच्या निमित्तानं तुला पत्र लिहायला बसले आहे. खरं तर हे पत्र मी मनातल्या मनात अनेक वर्षं लिहिते आहे. आज त्या पत्राला मनाच्या तळातून पृष्ठभागावर यायची संधी मिळाली इतकंच. एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला काय वाटतं ते आपण बोलून दाखवतोच असं नाही. ते सारं मनातल्या मनात पडून असतं. आज ते तुला सांगावंसं वाटतं आहे.

मी कॉलेजात असल्यापासून तुला दुरून ओळखत होते, की हा ‘ग्रंथाली’चा कुमार केतकर. दिनकर गांगल, अरुण साधू यांचा जानी दोस्त. रुइया कॉलेजात ‘ग्रंथाली’ची पहिली बैठक झाली होती तेव्हा आणि ‘कऱ्हाड साहित्य संमेलना’त तुला पाहिल्याचं आठवतं. दादरला ‘ग्रंथाली’च्या गच्चीत बैठका भरायच्या. तिथेही तू असायचास. तू इंग्रजीत पत्रकारिता करतोस, असं ऐकलं होतं. पण ‘ग्रंथाली’च्याच संदर्भचौकटीत मी तुला ओळखत होते. त्या पलीकडचा तू  मला ठाऊक नव्हतास. केव्हा तरी विनिता लागूनं सांगितलं की कुमार केतकर म्हणजे शारदा साठेचा नवरा. तेवढीच ज्ञानात भर पडली. तुझा आणि माझा परिचय झाला तो तू ‘महाराष्ट्र टाईम्स’चा संपादक झाल्यानंतर. ते सुद्धा माझ्या नवऱ्याच्या, सतीशच्या प्रेरणेनं. आम्ही तुझे अग्रलेख वाचायचो. त्यावर चर्चा करायचो. त्यातला ताजेपणा, चिंतनशीलता आणि खास तुझी अशी बहुढंगी लेखनशैली आम्हाला आवडत होती. तुझ्या अग्रलेखांनी अनेकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. आमच्याकडे एकदा बडोद्याचे निशिगंध देशपांडे आले होते. ते म्हणाले, “तुमचे ते कुमार केतकर कम्युनिस्ट आहेत ना? पण ते हळूहळू टोपी फिरवताहेत.” आम्ही म्हटलं, “चांगलं आहे ना मग. वाईट काय त्यात.”

‘भांडवलशाहीचा वेध’ हा अग्रलेख वाचून सतीश मला म्हणाला, “अंजू, तुमचा अग्रलेख आवडला म्हणून केतकरांना कळवू या का?” मी उत्साहानं म्हटलं, “हो, जरूर. आत्ता फोन लाव. केतकर आपल्याला थोडंसं ओळखत असतील. मुंबई विद्यापीठातल्या एका चर्चासत्रात आपली भेट झाली होती.” सतीशनं फोन लावला आणि त्याला अग्रलेखातलं काय आवडलं ते त्यानं तुला सांगितलं. तुझा प्रतिसाद उत्साहवर्धक होता. तू म्हणालास, “आपण एकदा भेटायला हवं. एकदा कशाला, परवा काय करताय?” ‘महाराष्ट्र टाईम्स’सारख्या विख्यात दैनिकाचा संपादक इतक्या साधेपणी फोनवर बोलतो आणि भेटीचं आमंत्रण देतो! तेही लगेच! नवलच होतं. ठरलेल्या दिवशी आपण एकत्र जेवायला गेलो. म्युझियमजवळच्या ‘गोल्डन गेट’मध्ये रोज दुपारी सॅलेड बुफे असायचा. गप्पा मारायला जागा निवांत आणि प्रसन्न. आम्ही टाइम्सच्या कार्यालयात आलो आणि तेथून आपण एकत्र गेलो. त्या दिवशी आपल्या ओळखीला सुरुवात झाली. इंग्रजी पत्रकारिता सोडून तू मराठीत आला होतास. आम्हाला तुझ्याबद्दल कुतूहल होतं. इंग्रजीतला तुझा अनुभव, तुझं म.टा.मधलं आगमन, आणीबाणीचा काळ, तुझा आणीबाणीला असलेला पाठिंबा; त्यामागची कारणं यांविषयी तू मोकळेपणी बोललास. गंमत म्हणजे आणीबाणीचा समर्थक असूनही तू स्वातंत्र्यवादी होतास. व्यक्तिस्वातंत्र्य हे मूल्य मानवी जीवनात तू महत्त्वाचं मानत होतास. सतीश आणि मी आईन रँड या अमेरिकन तत्त्वज्ञ लेखिकेचे आणि तिच्या ‘ऑब्जेक्टिव्हिझम’ या तत्त्वज्ञानाचे खंदे समर्थक. भांडवलशाहीचे पुरस्कर्ते. त्यावरही बोलणं झालं. तुला याची थोडीशी कल्पना होती, असं वाटतं. “पूर्वी मी केवळ साम्यवादीच नव्हे तर पक्का स्टॅलिनिस्ट होतो.” असं तू म्हणालास, पण तरीही तुला आईन रँडबद्दलही उत्सुकता होती. तूही आमची भूमिका जाणून घेऊ इच्छित होतास.

मला सगळ्यात काय आवडलं सांगू? तू लांब चेहरा करून, अतिगंभीरपणे बोलणारा विचारवंत नव्हतास. बोलताना तू आम्हा पामरांसारखाच खळखळून हसत होतास. विनोद करत होतास. तुझ्यात एक खट्याळ आणि उत्साही मूल होतं. त्यामुळे परकेपणा विरून गेला. मी तुला विचारलं, “ऑब्जेक्टिव्हिझम’च्या संदर्भात वर्तमान घटनांवर आम्ही दोघांनी मिळून म.टा.त काही लिहिलं तर चालेल का?” तू म्हणालात, “लिहा ना. जरूर लिहा.” मी म.टा.चीच लेखिका होते. ललित लेखन करत होते. पुस्तक परीक्षणं लिहीत होते. परंतु आता वाटत होतं की सामाजिक, आर्थिक प्रश्नांवर वैचारिक लेखन करावं. परंतु वृत्तपत्रीय क्षेत्रात समाजवादाचा इतका दबदबा होता की भांडवलशाहीचा पुरस्कार करणारं लेखन कोणी छापेल का, याविषयी आम्ही साशंक होता. पहिल्याच भेटीत हिरवा बावटा दाखवून तू तो प्रश्न सोडवून टाकलास. मी आणि सतीश त्वरित कामाला लागलो. पहिलाच लेख आम्ही लिहिला तो मुक्त अर्थव्यवस्थेवर. तो तुला देण्यासाठी चारपाच दिवसांनी आम्ही म. टा.च्या कार्यालयात आलो. तू झर्रकन लेखावरून नजर फिरवलीस. आमच्याकडे रोखून पाहात तू विचारलंस, “मुक्त का खुली?” सतीश म्हणाला,

“नाही नाही, खुली नाही. मुक्तच!”

“अर्थात माझी काही हरकत नाही.”

‘मुक्त का खुली?’ असा प्रश्न तू का विचारलास, असा प्रश्न आम्हाला पडला. त्याचं उत्तर तुझा परिचय वाढल्यावर मिळालं, की पं.नेहरूंनी भारतात रुजवलेल्या खुल्या अथवा मिश्र अर्थव्यवस्थेचा तू समर्थक होतास. संपूर्ण खाजगीकरण आणि संपूर्ण सरकारी नियंत्रण यांच्या मधोमध तिचं स्थान होतं. लेख दिल्यानंतर अवघ्या चार दिवसांत तू लेख छापलास. मुख्य म्हणजे आमच्या कोणत्याही मुद्यांना धक्का लागला नव्हता. ‘मुक्त अर्थव्यवस्था एक: चिंतन’ या आमच्या साध्यासुध्या शीर्षकाला तू आकर्षक रूप दिलंस: ‘मुक्त अर्थव्यवस्थेतच फुलणारी सर्जनशीलता.’ लेख, अग्रलेख, पत्रं, सदरं यांना चपखल शीर्षकं देण्याची खास संपादकीय नजर तुझ्यापाशी होती, हे नंतरही अनेकदा जाणवलं. त्यानंतर लगेचच, म्हणजे २६ जानेवारी १९९८ रोजी प्रजासत्ताकदिनाच्या खास पुरवणीत ‘सरकार कशासाठी, कोणासाठी?’ हाही आमचा लेख तू छापलास. आम्ही तुझे आभार मानले तेव्हा तू आवर्जून सांगितलंस, “Keep writing.” हे  अद्भुतच घडत होतं.

“Keep writing.” हे तुझं वाक्य आमच्या दृष्टीनं प्रेरक होतं. तू तुझा शब्द पाळलास. वाहतूकदारांचा संप, स्पर्धाकायदा, सेवाकर, चलनफुगवटा, खाजगीकरण, उद्योजकांच्या समस्या यांसारख्या विषयांवरील आमच्या लेखांना तू ‘अर्थव्यवहारा’च्या मातब्बर पानावर स्थान दिलंस. ‘बदलती नाती’ हे सदर तर मला इतकं आवडलं, की मी त्यात तीन लेख लिहिले ‘शतकाचे शिल्पकार’ या सदरात तू माझा आईन रँडवरचा प्रदीर्घ लेख छापलास. एखादा लेख लगेच टाकणं शक्य नसेल, तर तू तो पत्र म्हणून छापायचास. त्या काळी इमेलवरून लेख पाठवायची प्रथा नव्हती. लेख देण्यासाठी आम्ही तुझ्या कार्यालयात यायचो. त्या निमित्त विचारांची देवाणघेवाण व्हायची. वैचारिकदृष्ट्या आपण दोन ध्रुवांवर होतो. तरीही तू सातत्यानं आमचे लेख छापत होतास. विरुद्ध विचारांना प्रकट व्हायला वाव देत होतास. तुझी ती वैचारिक सहिष्णूता आणि औदार्य मला आजही फार मोलाचं वाटतं. ती ज्याच्याकडे असते तो जातिवंत संपादक म्हणून ओळखावा.

तू आमच्या लेखनाला वाव देत असल्यामुळे आम्ही अधिक सजग बनलो. जाणीवपूर्वक लेखन करू लागलो. तुझा प्रतिसादही तितकाच तत्पर असायचा. “लगेच आणून दे. उद्याच.” त्यामुळे जास्त वेळ दळण न दळता, आपले विचार थोडक्यात पण मुद्देसूदपणे मांडायची वृत्तपत्रीय सवय आम्हाला लागली. सामाजिक प्रश्नांव्यतिरिक्त मला साहित्यिक आणि सांस्कृतिक विषयांवर लिहायचीही ओढ होती. मी आणि सतीश युरोपच्या दौऱ्यावर जाणार होतो. जर्मनीतील ‘अनुगा’ शहरी ‘इंटरनॅशनल फूड फेस्टिव्हल’ होणार होता. पत्रकार म्हणून जर मी तिथे गेले असते तर तिथलं प्रेस मटिरियल मला मिळालं असतं. तू मला म. टा. ची प्रतिनिधी असल्याचं पत्र दिलंस. परतल्यावर मी या महोत्सवावर दोन प्रदीर्घ लेख लिहिले. रंगीबेरंगी फोटो टाकून तू मोठ्या कौतुकानं ते छापलेस. तू ‘महाराष्ट्र टाईम्स’मधून ‘लोकसत्ता’त गेलास तेव्हा आम्हीही ‘लोकसत्ता’त लिहू लागलो.

आमची विचारसरणी मान्य नसतानाही तू आमचे इतके लेख छापलेस, यामागचं कारण मला २०१८ साली तुझ्याच तोंडून ऐकायला मिळालं आणि आनंद झाला. ‘बहुरूपिणी दुर्गा भागवत’ या माझ्या पुस्तकाचं पुण्यात प्रकाशन तुझ्या हस्ते झालं. तेव्हा तू तुझ्या भाषणात म्हणालास, “मी कम्युनिस्ट. अंजली आणि सतीश कॅपिटॅलिस्ट. आमच्या विचारधारा अगदी भिन्न असूनही मी इथं आलो, कारण ही माणसं प्रामाणिक आहेत. सच्चेपणी त्यांचे विचार मांडतात. आजवर अंजलीच्या कोणत्याही कार्यक्रमांना मी कधी नाही म्हटलेलं नाही.”  हे अगदी खरं आहे. कार्यक्रम कोणताही असो, प्रा. म. वा. धोंडांची नव्वदी असो, विंदा करंदीकरांच्या सत्काराचा कार्यक्रम असो, पुस्तक प्रकाशन असो वा माझ्या लघुपटाच्या निधिसंकलनासाठी आयोजित केलेला कार्यक्रम असो, मला पहिली आठवण तुझी यायची. आजही येते. तुझं प्रवाही आणि दिलखुलास भाषण ऐकायची ती संधी असते. बोलता बोलता मी खूप पुढच्या काळात पोहोचले. मी तुला सांगणार होते एक वेगळीच आठवण.

तुला आईन रँडविषयी औत्सुक्य असल्यानं आमच्या ग्रुपमध्ये तुला घेऊन जावं असं आम्हाला वाटत होतं. आपली ओळख झाल्यानंतर लौकरच ती संधी आली. १९९७च्या फेब्रुवारीचा सुमार. आमचा दिल्लीतला मित्र बरूण मित्रा यानं देवळालीच्या ‘लेस्ली सॉवनी सेंटर’मध्ये दोन दिवसांचं चर्चासत्र आयोजित केलं होतं. ‘आईन रँड’च्या ‘ऑब्जेक्टिव्हिझम’चा बरूण आमच्यासारखाच एक पुरस्कर्ता. त्याला मी आणि सतीश आयोजनात मदत करत होतो. या चर्चासत्रात त्यानं तुला बोलवावं असं आम्ही त्याला सुचवलं. तो म्हणाला, “काहीच हरकत नाही. तुम्ही त्यांना विचारा. त्यांना कोणता विषय आवडेल तेही विचारा.” तू आनंदानं तयार झालास. तू विषय निवडलास, ‘राजकारणाचं उदारीकरण’ (Liberalisation of Politics) तुला मुंबईहून आणण्याची जबाबदारी बरूणनं आमच्यावर सोपवली. गाडीतून देवळालीला जाताना आपल्या निवांत गप्पा झाल्या. त्या वेळी जाणवलं की, कॉ. डांगे, एम. एन. रॉय, जे. कृष्णमूर्ती यांसारख्या अनेक विचारवंतांचा प्रभाव तुझ्यावर होता. ते सर्व प्रभाव पचवूनही तुझा तू स्वतंत्र होतास. ‘रंगुनि रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा!’ इतकंच नव्हे तर कोणत्याही कंपूत जाऊन त्यांच्या विरुद्ध मतं मांडण्याचं धाडसही तुझ्यापाशी होतं. वेगवेगळे विचारप्रवाह जाणून घ्यायच्या प्रक्रियेचाच एक भाग म्हणजे तुझं आईन रँडबद्दलचं औत्सुक्य. त्यामुळेच या व्यासपीठावर येऊन बोलायला तू तयार झालास. नंतर केव्हा तरी आईन रँडची ‘ऍटलस श्रग्ड’ ही जाडजूड कादंबरी तुला आम्ही वाचायला दिली आणि तुझ्या एवढ्या व्यापांच्या धबडग्यातही तू ती वाचून पूर्ण केलीस.

देवळालीला सकाळच्या चर्चासत्रात तुझ्याबरोबरच शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशीही बोलणार होते. त्यांचा विषय ठाऊक नव्हता. बरूण  हसत हसत म्हणाला, “आम्हाला जोशींनी केतकरांचा विषय विचारला. तो सांगताच ते म्हणाले, ‘आय सी! मग मी उदारीकरणाचं राजकारण (Politics of Liberalisation) या विषयावर बोलेन.’ आता चर्चा चांगलीच रंगणार आहे.’’ झालंही तसंच. तुम्ही दोघं उत्तम वक्ते. दोघांचंही इंग्रजीवर प्रभुत्व. मिस्किलपणे प्रतिस्पर्ध्याला कोपरखळ्या मारण्यात दोघं वाकबगार. राजकारण, अर्थकारण, आर्थिक सुधारणांचे नवे वारे, भारतीय उद्योगजगत, समाज व्यवस्थेतील बदल इत्यादी मुद्यांवर तू आणि जोशी हिरीहिरीनं बोललात. तू तुझ्या भाषणातून नेहरूप्रणित मिश्र अर्थव्यवस्थेचा पुरस्कार केलास. बोलताना तू सतत ‘Quote-Unquote; Quote-Unquote’ म्हणत होतास आणि हातांनी अवतरण चिन्हांची खूणही करत होतास. जोशींनी ही लकब नेमकी हेरली. तीच शैली स्वीकारून त्यांनी मुक्त अर्थव्यवस्थेची बाजू मांडली. जाता जाता तुझ्या नेहरूप्रेमावरूनही त्यांनी तुला बरेच रेशमी चिमटे काढले.

ते दोन दिवस छान गेले. पहाटे आपण जवळच्या टेकडीवर फिरायला गेलो. मुंबईला परतताना गाडीतही परत गप्पा झाल्या. मी तुला म्हटलंसुद्धा, “केतकर, तुमच्याशी पोटभर बोलायचं असेल तर अधूनमधून तुम्हाला असं किडनॅप करायला हवं.” तुझ्याशी जुळलेल्या नात्यामुळे आमच्या जीवनाचं रूपांतर ‘सुहाना सफर’मध्ये झालं. परिचयाच्या अगदी प्रारंभीच तू स्वत:हून तुझ्या घरचा फोन नंबर आम्हाला दिलास आणि सांगितलंस, “कधीही फोन करा. मी फोन घेतो. एखाद्या वाचकानं सकाळी सातला फोन केला तरी मी घेतो. त्यानं बिचाऱ्यानं कुठून तरी माझा नंबर शोधून काढलेला असतो. त्याला बोलायची उत्सुकता असते. माझे लेख कसे पोहोचतात हे मलाही त्यातून कळतं.” तुला एक गंमत सांगते. एका पत्रकारानं (बहुधा प्रवीण टोकेकर) मला एकदा सांगितलं, “केतकर सदैव जागे असतात. रात्री दोन वाजता जरी फोन केला तरी लगेच फोन उचलतात. तुम्ही करून बघा.” मी म्हटलं, “करून काय बघा!  रात्री दोन वाजता फोन करून मी बोलू काय?” पण त्यातून मला जाणवली ती तुझी अखंड जागरुकता, चैतन्य आणि  कार्यनिष्ठा.

संपादक म्हणून मला जाणवलेली तुझी किती वैशिष्ट्यं सांगू! तू सदरांसाठी कल्पकपणे विषय निवडायचास. आमच्याप्रमाणेच अनेकांना तू लिहितं केलंस आणि ‘एडिटर्स चॉईस,’ ‘बदलत्या विश्वाचे अंतरंग,’ ‘त्रिकालवेध’ यांसारख्या सदरांतून स्वत:ही भरघोस लेखन केलंस. संपादकपदाची व्यवधानं सांभाळून, गंभीर तात्त्विक विषयांची तयारी करायला तुला वेळ कसा मिळायचा, हे कोडं मला उलगडलेलं नाही. असली आव्हानं स्वीकारण्यात तुला प्रचंड बौद्धिक आनंद मिळत असावा. यालाच मी संपादकाची सर्जनशीलता म्हणेन. म. वा. धोंडांचा शब्द वापरायचा तर तू ‘विपुलपर्णी संपादक’ होतास. तुला एकाच वेळी अनेकविध गोष्टींविषयी कुतूहल असतं. दांडग्या स्मरणशक्तीचं वरदान असल्यानं सनावळ्यांसकट सारे तपशील तुझ्या मस्तकात योग्य त्या जागी चपखल बसलेले असतात. हव्या त्या प्रसंगी ते तुझ्या मन:पटलावर सहज प्रकाशमान होतात. मानसशास्त्र, इतिहास, तत्वज्ञान, विज्ञान, समाजशास्त्र यांसारख्या ‘अवजड’ विषयांत तुला कमालीचा रस आहे. त्यावरचं तुझं वाचनही जबरदस्त आणि अद्ययावत. स्नेही म्हणून आम्हाला तुझा अभिमान वाटतो.

संपादक बनण्यासाठी जे अष्टपैलू, बहुआयामी, बहुश्रुत, दक्ष आणि प्रज्ञावंत व्यक्तिमत्त्व आवश्यक असतं ते तुझ्याकडे आहेच; परंतु त्यापलीकडची एक विलोभनीय गोष्ट तुझ्यापाशी आहे. ती म्हणजे माणसांच्यातला तुझा उत्कट रस. तुझी लोकाभिमुखता. तू हस्तिदंती मनोऱ्यावर राहून जीवनचिंतन करणारा ‘विजनवासी विचारवंत’ नव्हेस. सामान्य माणसांनाही मनाच्या नकाशात स्थान देण्याचा साधेपणा तुझ्यापाशी आहे. संपादकपदाचे व्यापताप आणि ताणतणाव पेलत असतानाही,तू वेगवेगळ्या क्षेत्रातील माणसांसाठी वेळ द्यायचास. सामाजिक, सांस्कृतिक चळवळींत सहभागी व्हायचास. माणसांच्या भेटींतून तुला ऊर्जा आणि समाधान मिळत असावं. बुद्धिमान माणसांचं तर तुला प्रचंड आकर्षण वाटतं. एक आठवण सांगते.

परमिटराज कमी करून डॉ. मनमोहन सिंग यांनी आर्थिक सुधारणांचा पाया घातला, त्याला काही वर्षं झाली होती. हे परिवर्तन भारतात कितपत रुजलं, सद्य परिस्थितीबाबत अर्थतज्ज्ञ, राजकारणी, पत्रकार, उद्योजक यांना काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी १९९८च्या सुमारास मी आणि सतीशनं ‘बदलतं जग बदलती मनं’ नावाची मुलाखतमाला आयोजित केली होती. पुण्याच्या ‘युनिक फीचर्स’नं ती महाराष्ट्रातल्या विविध वृत्तपत्रांतून प्रसिद्ध केली होती. टाटांचे आर्थिक सल्लागार द.रा. पेंडसे, सुवर्णतज्ज्ञ मधुसूदन डागा, ‘ईस्ट इंडिया शिपिंग कार्पोरेशन’चे मालक सुधीर मुळजी, उद्योजक वीरेन शहा, इंग्रजी पत्रकार स्वामिनाथन् अंकलेसरीया अय्यर, जागतिक बँकेचे अधिकारी दीना खटखटे यांसारख्या दिग्ग्जांच्या मुलाखती आम्ही घेतल्या होत्या. एकदा बोलता बोलता आम्ही तुला सांगितलं, “दीना खटखटे मुंबईत आले असता त्यांनी आम्हाला ‘बॉम्बे जिमखान्या’त जेवायला बोलावलं होतं. मुलाखतीत त्यांनी मुक्त अर्थव्यवस्थेचं महत्त्व जागतिक संदर्भ देऊन फार सुंदर मांडलं.” तू आश्चर्यानं म्हणालास “अरे व्वा ! दीना खटखटेंना तुम्ही भेटलात? अत्यंत बुद्धिमान माणूस आहे तो. मला त्यांच्याबद्दल फार आदर आहे. परत ते आले, तर मला सांगा. मला त्यांना भेटायला आवडेल.” त्यानंतर काही महिन्यांनी ते अमेरिकेहून आले आणि आपण त्यांना भेटायला ‘बॉम्बे जिमखान्या’त गेलो. जेवणाच्या टेबलावर जागतिक अर्थकारण-राजकारण रंगलं. त्यांची तिखट जीभ, संदर्भसमृद्धता आणि मूलभत विचार यांमुळे त्यांच्या बोलण्याला न्यारीच लज्जत होती. गप्पा मारताना ते सहजच त्यांच्या काही लेखांविषयी बोलले. तू तत्परतेनं म्हणालास, “तुमचे लेख म.टा.त छापायला मला आवडतील.” खटखटे मला म्हणाले, “तुम्ही कराल का त्यांचं मराठीत भाषांतर?” मी म्हटलं, “हो, आनंदानं.” त्यानंतर त्यांचे चारपाच लेख मी भाषांतरित केले. इंग्रजी अर्थशास्त्रीय लेखांचं भाषांतर करताना लेखणीला वेगळा रियाझ झाला.

‘बदलतं जग बदलती मनं’ या मुलाखतमालेत आम्ही तुझीही मुलाखत घेतली होती. तुझं म.टा.तलं काम आटोपल्यावर संध्याकाळी आम्ही तुला आमच्या घरी जेवायला बोलावलं होतं. बदलत्या जगात तूही बदलला होतास. त्याचा वेध घेण्यास आम्ही उत्सुक होतो. मुलाखतीतला एक प्रश्न  असा होता :-

“एके काळी तुम्ही स्टॅलिनिस्ट होतात. परंतु आज तुम्ही साम्यवादाचा त्याग केलेला दिसतो. हा बदल तुमच्यात कशामुळे झाला?” तू उत्तरलास, “आज मी स्टॅलिनिस्ट उरलेलो नाही, हे तर खरंच आहे. रशियातील वा अन्य देशातील साम्यवाद ढासळण्यापूर्वी मी रशियात गेलो होतो. तेथील समाजाची दुरवस्था, माणसांचं दबलेपण, तुटवड्याचं, तुटपुंजेपणाचं अर्थकारण, व्यक्तिस्वातंत्र्य नाकारल्यानं निर्माण झालेल्या समस्या, उद्योगधंद्यांची परिस्थिती हे सर्व प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहताना माझा भ्रमनिरास झाला. बाजारपेठ हा घटक पूर्णत दुर्लक्षिला गेला तर एखाद्या देशाचा आर्थिक पाया किती ढासळू शकतो हे रशियातील परिस्थितीवरून स्पष्ट झालं होतं.”

त्या दिवशी तुझ्याबद्दल काही गोष्टी नव्यानं कळल्या. तुझे शाळकरी दिवस; तरुण वयात वडिलांनी तुला दिलेला ‘Earn and learn’ चा संदेश; तू पोटापाण्यासाठी केलेलं रेडियो दुरुस्तीचं काम; इत्यादी. तुला आठवतं का, त्या दिवशी आणखी एक गंमत घडली होती. तुला ‘चिंतामणराव देशमुख पुरस्कार’ मिळाल्यानिमित्त, ‘वृत्तमानस’ मध्ये ‘विनम्र बालक’ या टोपण नावानं तुझ्यावर एक मजेदार लेख आला होता. तुझ्या मित्रांच्या यादीत बालकानं माझा आणि सतीशचा उल्लेख केलेला पाहून तू म्हणालास, “या बालकानं सॉलिड संशोधन केलेलं दिसतं आहे!” लेखातली काही भन्नाट वाक्यं ऐक, “पत्रकारितेच्या व्यवसायाला न शोभणारा असा, स्वखर्चानं पुस्तकं घेऊन वाचण्याचा वाईट नाद आपणांस आहे….आपण…अद्यापही पूर्वीप्रमाणे चळवळीतल्या गरीब दोस्तांबरोबर मुंबई…ते ठाणे असा (फर्स्ट क्लासचा पास खिशात असूनही) सेकंड क्लासचा लोकल प्रवास करता….म.टा.च्या कार्यालयात निवांतपपणे संपादकपदी विराजमान न राहता… सारखे इकडून तिकडे फिरत असता. मध्येच विनोद करता. मध्येच तंब्या देता. हे दृश्यही वैभवशाली तळवलकरी परंपरेला छेद देणारं आहे.” हे वाचताना आपण तिघं मनमुराद हसत होतं. एकंदरच ती संध्याकाळ मोठ्या मजेत गेली. शारदाचा फोन आला, तेव्हा तू घड्याळाकडे बघितलंस आणि पटकन् उठलास. “अरे बापरे, किती वाजलेत कल्पना आहे का सतीश? बारा वाजले बारा ! आता मला पळायलाच हवं.”

मुलाखत लिहून काढताना लक्षात आलं, की काही मुद्यांची उत्तरं मिळालेली नाहीत. त्यासाठी परत भेटायला हवं. सतीशनं तुला फोनवरून सांगितलं, “अंजूला काही शंका आहेत. तिला परत भेटायचंय.” वाटलं तू आता वैतागणार. (वैतागलाही असशील!) एका मुलाखतीसाठी किती वेळ घालवायचा! पण तरीही तू वेळ दिलास. संध्याकाळी तू मला म.टा.च्या कार्यालयात बोलावलंस. मात्र तू म्हणालास, “गाडीतून घरी जाताना मी बोलीन. कुठे तरी थांबून बोलण्याइतका वेळ नाही. पाहिजे तर गाडी लांबून लांबून नेऊ.” त्या दिवशी मला तुझं आगळंवेगळं रूप बघायला मिळालं. नेहरूंच्या संदर्भात कोणी तरी केलेलं एक विधान मी उच्चारलं की नेहरूंनी शेतीची वाट लावली. तू रागानं लालेलाल झालास. कसंबंसं स्वत:वर नियंत्रण ठेवत तू विचारलंस, “तुला कोणी सांगितलं?” मी सांगणाऱ्याचं नाव उच्चारताच तू संतापून म्हणालास, “जा आणि त्याच्या दोन थोबाडीत देऊन ये.” वैचारिक चर्चेत असं बोलताना मी तुला कधी पाहिलं नव्हतं. तुझं रौद्र रूप मला अपरिचित होतं. मात्र एकाद्या बेसावध क्षणी झालेल्या उद्रेकातूनच ‘माणूस’ दिसतो. त्यामुळे माणसाची भ्रामक प्रतिमा मनात जोपासली जाण्यापासून आपण बचावतो. तात्कालिक मुलाखतीपेक्षाही मला तुझं ‘माणूसपण’ अभ्यासणं जास्त रोचक वाटलं.

तुझ्या व्यक्तिमत्त्वाचा विचार अनेक अंगांनी करता येईल. तू उत्तम वक्ता आहेस. बाबूराव अर्नाळकरांच्या कादंबऱ्यांपासून ते अर्थशास्त्रीय प्रश्नापर्यंत कोणत्याही विषयावर तू सहजपणे बोलू शकतोस. परदेशी विद्यापीठांत जाऊन तू व्याख्यानं देतोस. साहित्य, अभिजात संगीत, समाजशास्त्र, राजकारण, अर्थकारण, विज्ञान अशा अनेक विषयांत तुला उत्कट रस आहे. पत्रकार म्हणून जगभर भ्रमंती केल्यानं तुझ्या अनुभवांचं क्षितिज व्यापक आहे. वेगवेगळ्या संस्थांशी तू संबंधित आहेस. आता तर तू राजकीय क्षेत्रात कार्यरत झाला आहेस. मात्र तुझा आणि आमचा स्नेह जुळला तो संपादक-लेखक नात्यातून. त्यामुळे तुझ्या अनेक प्रतिमांपैकी तीच प्रतिमा माझ्या मनात झळाळते आहे. पत्र संपविण्यापूर्वी तुला एक प्रश्न विचारावासा वाटतो आहे.

तू जेव्हा वृत्तपत्राचा संपादक होतास तेव्हा तू कम्युनिस्टांपासून ते काँग्रेस पक्षापर्यंत कोणावरही तुझ्या अग्रलेखातून मोकळेपणी टीका करायचास. मनानं तू तेव्हाही काँग्रेसचाच असलास, तरी त्या पक्षाच्या मतांचं वा भूमिकेचं समर्थन करायचं बंधन तुझ्यावर नव्हतं. आता तू काँग्रेसचा खासदार झाला आहेस. माणसानं एखाद्या पक्षाची बांधिलकी स्वीकारली की त्याच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर, अभिव्यक्तीवर मर्यादा येतातच. तो पक्षाविरुद्ध जाहीर भूमिका घेऊ शकत नाही. पक्षाला मान्य असेल, तीच भूमिका त्याला धारण करावी लागते. मग ती स्वत:ला पटो वा न पटो. उलट्या अर्थी तुझा बेकेट झाला आहे. बेकेट राजाचा मित्र होता. तो राजाच्याच आग्रहानं धर्माध्यक्ष झाला. तो राजाला सांगत होता, “मी जर धर्माध्यक्ष झालो तर तुमचा मित्र राहू शकणार नाही. ईश्वराची आणि तुमची, दोघांची सेवा करणं मला शक्य नाही.” धर्माध्यक्ष झाल्यामुळे देवाशी बांधिलकी स्वीकारून आपला ‘धर्म’ त्यानं पाळला. वेळ प्रसंगी राजाशीही वैर पत्करलं. तुझ्याबाबतीत नेमकं उलटं झालं. संपादक म्हणून तू तुझा धर्म पाळतच होतास. तुझी निष्ठा तुझ्या विचारांशी होती. त्याबाबत तू तडजोड केली नाहीस. तशीच वेळ आली तेव्हा तू संपादकपदांचा राजीनामा देऊन मोकळा झालास आणि आत्मनिष्ठा जपलीस. आता तुझी निष्ठा एका राजकीय पक्षाशी बांधलेली आहे. संपादक म्हणून असलेलं स्वातंत्र्य आता तुला नाही. तुझ्यासारख्या स्वातंत्र्यप्रेमी माणसाला हे बंधन स्वीकारावंसं का वाटलं? एक चिंतनशील, संवेदनाक्षम माणूस म्हणून तुला याचा त्रास होतो का? या बंधनाचा जाच वाटतो का? पुन्हा बेकेटचंच एक वाक्य आठवतं आहे. राजा जाणून घेऊ इच्छित होता की बेकेटला काय करायचं आहे; त्याच्या मनात काय आहे. तेव्हा बेकेट राजाला सांगतो, “मला फक्त तुम्हाला नाही म्हणायचं आहे.”  पंचाहत्तरीच्या टप्प्यावर तुला असं वाटतं का की हे बंधन झुगारून द्यावं आणि नव्यानं जगायला प्रारंभ करावा?

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0