‘पाषाण युगातून आधुनिक युगात आल्यासारखं वाटतंय’

‘पाषाण युगातून आधुनिक युगात आल्यासारखं वाटतंय’

जम्मू व काश्मीरमध्ये सोमवारी सुमारे ४० लाख पोस्टपेड ग्राहकांची मोबाइल सेवा सुरू करण्यात आली. दुपारी १२ वाजता ही सेवा सुरू झाल्यानंतर नोकरदारापासून, पत्रकार, विद्यार्थी, वकील, डॉक्टर, फेरीवाले, रिक्षावाले आपले मोबाइल तपासून आपला क्रमांक चालू आहे का याची खात्री करून नातेवाईकांना, मित्रांना फोन करत होते.

काँग्रेसला पुन्हा उभे राहण्यासाठीची संधी
काश्मीर आणि ३७०: दीर्घकाळ परिणाम करणारे सनदशीर कारस्थान
कलम३७० आणि नीच मानसिकता

श्रीनगर : गेले ७० दिवस जम्मू व काश्मीर अस्वस्थता व तणावाच्या अवस्थेतून जात आहे. सोमवारी काश्मीरमध्ये दुपारी १२ च्या सुमारास मोबाइल फोनच्या रिंग वाजण्यास सुरवात झाली आणि वातावरणात बदल झाला. मोबाइल फोनच्या रिंग सतत वाजत असल्याने काश्मीरी नागरिकांच्या चेहऱ्यावरचा आनंद, हास्य लपत नव्हते. फोनवर शुभेच्छांचे, ख्याली खुशालीचे संभाषण सुरू झाले होते.

अनंतनागमध्ये राहणाऱ्या २७ वर्षाचा झहूर अहमद भट याचा फोन दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी वाजला आणि हा रिंग वाजल्यानंतर त्याला काही क्षण आपण स्वप्नात असल्यासारखे वाटले. त्याचा मोठा भाऊ त्याच्याशी दोन महिन्यांनी बोलत होता. झहूर भट श्रीनगरमधील सोनवर येथील एका हॉटेलमध्ये काम करतो. तो गेले दोन महिने त्याच्या घरी गेलेला नाही.

दोघे भाऊ १५ मिनिटे बोलले. नंतर झहूरची आई, वडील, त्याच्या दोन बहिणी त्याच्याशी बोलल्या. झहूर घरी केव्हा येतोय याची त्या वाट पाहात होत्या.

‘माझ्यासाठी हा क्षण एखाद्या स्वप्नासारखा व मनाला हेलावून टाकणार होता. माझ्या आयुष्यात अशी कधी वेळ आली नाही की मी माझ्या कुटुंबाशी इतका दीर्घकाळ बोलू शकलो नाही. मी दुबईत तीन वर्षे काम करत होतो पण तब्येतीच्या कारणाने मी काश्मीरमध्ये आलो. पण दुबईतही असताना मी माझ्या कुटुंबापासून दूर गेलो नव्हतो,’ असे भट सांगतो.

५ ऑगस्टला जम्मू व काश्मीरला विशेष दर्जा असलेले ३७० कलम रद्द केल्यानंतर काश्मीरमध्ये मोठा जनक्षोभ उसळेल या भीतीपोटी केंद्र सरकारने तेथील इंटरनेट व मोबाइल सेवा पूर्णपणे बंद केली होती. ही सेवा सुरू ठेवली असती तर त्याचा फायदा दहशतवाद्यांना झाला असता असे सरकारचे म्हणणे होते. पण दूरसंपर्क सेवा बंद झाल्याने या प्रदेशातील सर्व व्यवहार ठप्प झाले. पर्यटन व्यवसाय बंद झाला, बाजारपेठा ठप्प झाल्या. जनजीवन विस्कळीत झाले. माणसेच एकमेकांपासून तोडली गेली. कुटुंबे तुटली गेली. नातेवाईक फार लांब राहिले.

जम्मू व काश्मीरमध्ये प्रीपेड व पोस्टपेड मोबाइल सेवेचे ६६ लाख ग्राहक असल्याची अधिकृत माहिती आहे. तेथे मोबाइल सेवा देणाऱ्या अनेक खासगी कंपन्याही आहेत. पण काश्मीरमध्ये पोस्टपेड सेवा घेणाऱ्या ग्राहकांची संख्या अन्य राज्यांच्या तुलनेत अधिक आहे.

सोमवारी सुमारे ४० लाख पोस्टपेड ग्राहकांची मोबाइल सेवा सुरू करण्यात आली. दुपारी १२ वाजता ही सेवा सुरू झाल्यानंतर नोकरदारापासून, पत्रकार, विद्यार्थी, वकील, डॉक्टर, फेरीवाले, रिक्षावाले आपले मोबाइल तपासून आपला क्रमांक चालू आहे का याची खात्री करून नातेवाईकांना, मित्रांना फोन करत होते.

थोरांपासून तरुणांपर्यंत सगळे मोबाइलवर बोलण्यात गर्क होते. काश्मीरच्या रस्त्यांवर, घरांमध्ये, कार्यालयांत फोन घणघणत होते. एकमेकांना शुभेच्छा देणे, प्रकृतीची विचारपूस सुरू होती.

श्रीनगरच्या बंड भागात राहणाऱ्या नादिराने मोबाइल सेवा सुरू होताच नेपाळमध्ये काम करणाऱ्या आपल्या मुलाला उझैरला फोन केला. उझैर नेपाळमध्ये काश्मीरी शालींचा व्यवसाय करतो. दोघे फोनवर एकमेकांची, कुटुंबातील सदस्यांची ख्यालीखुशाली विचारत होते.

राजबाग भागातील एका कँटिनमधून इंजिनिअर असलेल्या अब्दुल रशीदने आपल्या मित्राला नझीर अहमदला फोन केला. सरकार ही सेवा अचानक केव्हाही बंद करू शकते या भीतीपोटी दोघे एकमेकांशी भरभरून बोलत होते.

गेल्या सप्टेंबरमध्ये सरकारने खोऱ्यातील ५० हजार लँडलाइन ग्राहकांसाठी सेवा सुरू केली होती. पण त्याने फारसा फरक पडला नव्हता. आता सोमवारी पोस्टपेड ग्राहकांची सेवा सुरू झाल्याने हजारो कुटुंबांना त्याचा फायदा होताना दिसत आहे. ज्यांचे नातेवाईक काश्मीरच्या बाहेर अन्य राज्यांमध्ये, परदेशांमध्ये आहेत त्यांच्याशी आता बोलता येत असल्याने एकप्रकारचे आनंदाचे वातावरण दिसत होते. ज्यांचे नातेवाईक आजारी आहेत, कॅन्सरग्रस्त आहेत त्यांच्याशी संपर्क साधल्याने सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास टाकला होता.

सोमवारी सरकारने पोस्टपेड ग्राहकांची मोबाइल सेवा सुरू केली असली तरी प्रीपेड ग्राहकांची सेवा व इंटरनेट सेवा केव्हा सुरू करणार याबाबत अजूनही सरकारने मौन राखलेले आहे.

वास्तविक इंटरनेट बंद असल्याने खोऱ्यातील हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. विद्यार्थ्यांना आपले अभ्यासक्रम इंटरनेट बंद असल्याने पूर्ण करता आलेले नाहीत. शाळा-महाविद्यालयांना परीक्षा घेता आलेल्या नाहीत. बेरोजगारांना ऑनलाइनद्वारे अर्जही करता आलेले नाहीत. बँकिंग व्यवसायही विस्कळीत झालेले आहेत. त्यामुळे काश्मीरचे अर्थकारण ढासळले आहे.

जे काही युवक आयटी उद्योगात काम करत होते त्यांनाही इंटरनेट बंदचा फटका बसला. काहींच्या नोकऱ्याही गेल्या आहेत. उद्योजक, व्यापाऱ्याचे नुकसानही मोठ्या प्रमाणात झालेले आहे.

सोमवारी जेव्हा मोबाइल फोनची रिंग वाजली तेव्हा मला पाषाण युगातून आधुनिक युगात आल्यासारखे वाटले अशी प्रतिक्रिया आदिल हुसेन याने दिली. आदिल श्रीनगरमधील चानपोरा भागात राहतो तो महाविद्यालयीन शिक्षण घेतोय. पण मोबाइल सेवा पुन्हा बंद होईल व त्या ‘७०’ दिवसांसारखी शिक्षा भोगावी लागेल ही भीती त्याच्या मनात सतत डोकावत आहे.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: