गांधी विचार परीक्षा : कैद्यांच्या मानसिक पुनर्वसनाचा प्रयोग

गांधी विचार परीक्षा : कैद्यांच्या मानसिक पुनर्वसनाचा प्रयोग

ज्यांच्या हातून खुनासारखे माणुसकीविरोधी गुन्हे झाले आहेत व त्यांच्या हातून घडलेल्या हिंसेमुळे ज्यांचे जीवन काळवंडून गेले आहे, असे जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले येरवडा कारागृहातील कैदी २००२ साली जेव्हा महात्मा गांधींच्या अहिंसेचे धडे गिरवत होते, तेव्हा या घटनेने अनेकांचे लक्ष वेधून घेतले.

माझा शोध
मी आणि गांधीजी – ७
गांधी विचाराची विश्वव्यापकता

कैद्यांसोबत महात्मा गांधींचे सत्याचे प्रयोग, म्हणजे ‘गांधी विचार परीक्षा’, हा अभिनव प्रयोग विधिज्ञ असीम सरोदे यांनी २००२ मध्ये सुरु केला. अत्यंत गंभीरपणे कायद्याच्या क्षेत्रात नवनवीन प्रयोग करतांना गुन्हेगारी व्यवस्था आधुनिक व्हावी म्हणून विधिज्ञ असीम सरोदे यांनी एक नवीन प्रयोग केला. कैद्यांच्या विचारप्रक्रियेत सकारात्मकता यावी, या उद्देशाने कारागृहात गांधींच्या विचारांवर आधारित परिक्षा येरवडा कारागृह पुणे येथे सुरु केली. कैद्यांच्या मानसिक पुनर्वसनासाठी ‘गांधी विचार परिक्षा’ हा येरवडा कारागृहातील भारतातील पहिलाच प्रयोग ठरला. गांधी विचारांचा इतका परिणामकारक वापर केल्यामुळे ही परिक्षा दखलपात्र ठरली आहे.

सत्य व अहिंसेच्या जोरावर कोणतेही युद्ध न करता भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व गांधीजींनी केले. महात्मा गांधीजी हे प्रयोगवादी होते. माणूस म्हणून आपल्या हातून चुका होणे स्वाभाविक असते. परंतु, झालेली चूक मान्य करण्याचा मोठेपणा गांधीजींकडे होता, हे विशेष! ज्या गांधी तत्वज्ञानात परकीय सत्ता हाकलून लावण्याचे सामर्थ्य होते, त्या तत्वांना ‘कालबाह्य’ ठरविण्याचा सुनियोजित कार्यक्रम यशस्वी होतोय, ही  बाब दुर्दैवीच!  एकीकडे गांधी विचारसरणीचा पुरस्कार जगभर केला जातो तर दुसरीकडे त्या विचारांना तिलांजली देण्याचे काम प्रभावीपणे भारतात होताना दिसते. परंतु, आजही वेगवेगळ्या समस्यांना उत्तर हे गांधीचं  येत असल्याने त्यांना डावलून पुढे जाता येत नाही.

मानवी हक्कांवर काम करत असताना कैद्यांचे हक्क व जाणिवा महत्वाच्या असल्याने, या कैद्यांच्या मानसिक पुनर्वसनासाठी विधिज्ञ असीम सरोदे व रमा सरोदे यांनी ‘गांधीजींचा प्रयोगवादी’ उपयोग सुरु केला. बराच काळ राजकीय-सामाजिक आंदोलनांमुळे तुरुंगात कैदी म्हणून राहिलेले महात्मा गांधी यांनी ‘कारागृह हे सुधारणागृह’ व्हावे असा विचार मांडला. या विचारांची निकड लक्षात घेऊन ‘गांधी विचार परीक्षा’ पुण्यातील येरवडा तुरुंगात २००२ साली सुरु झाली. गांधीवादी वकील दाम्पत्यानी कारागृहात कैद्यांसाठी सुरु केलेली गांधी विचार परीक्षा अनुकरणीय(रिपब्लिकेबल) असणे ही कैद्यांसाठी गांधीविचार परीक्षेच्या योजनेतील महत्त्वाची ताकद आहे. नागपूर, वर्धा, अकोला, अमरावती, कोल्हापूर इत्यादी महाराष्ट्रातील जिल्ह्यात असलेल्या कारागृहात या परीक्षा यशस्वीपणे सुरु झाल्या. त्यांनतर, अनेक लोक पुढे येऊ लागले आणि मोठ्या प्रमाणात ही परीक्षा राज्यातील कारागृहात सुरु झाली. नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्मिता सिंगलकर व डॉ.रवींद्र भुसारी यांनी ही परिक्षा सातत्याने आजही सुरु ठेवली आहे.

आज तुरुंगातून शिक्षा भोगून आलेले कैदी सराईत गुन्हेगार होताना दिसतात. त्यावेळी ‘सुधारणा व पुनर्वसन’, हे कारागृह प्रशासनाचे ब्रीदवाक्य प्रत्यक्षात उतरताना दिसत नसल्याचे समोर येते. विविध गुन्ह्यांच्या आरोपाखाली तुरुंगात असलेले कैदी व गुन्हा सिद्ध झाल्याने तुरुंगात शिक्षा भोगत असलेले कैदी यांना मिळणाऱ्या वागणूकीचे मूल्यांकन झाले पाहिजे. माणूस बनण्याची सुरवात झाली पाहिजे, अशी शिक्षा असावी, ही मागणी असीम सरोदे यांनी सतत केली आहे.

सध्या सराईत गुन्हेगार व परिस्थितीमुळे गुन्हे करणाऱ्या लोकांचे वेगवेगळे कारागृह नसणे, ही चिंतेची बाब आहे. सराईत गुन्हेगारांसोबत इतर गुन्हेगारांना ठेवलं जात आणि गुन्हेगारांचे परिणामकारक पद्धतीने वर्गीकरण देखील केले जात नाही. प्रत्येक कैदी हा गुन्हेगार असतोच असे नाही. कैद्यांची गुन्हे करण्याची कारणे समजून घेणे आणि केवळ शारीरिक पुनर्वसन न करता त्यासोबतच कैद्यांचे मानसिक पुनर्वसन करणे गरजेचे आहे. कारागृह प्रशासनाच्या प्रक्रियेत सुधारणेला बराच वाव असून, त्यांनी ‘प्रक्रियावादी’ होण्याऐवजी ‘प्रयोगवादी’  व्हावे. कैद्यांच्या वागणुकीत सकारात्मक बदल होत असेल, तर त्याचे मूल्यांकन करून अशा कैद्यांना शिक्षेत सूट मिळाल्यास कैद्यांना चांगलं वागण्याची प्रेरणा मिळेल.

तुरुंगात बंदिस्त झालेला कैदी हा बरेचदा बदल्याच्या भावनेनी वावरत असतो. तुरुंगातून सुटल्यानंतर ज्या व्यक्तीमुळे तुरुंगाची हवा खावी लागली, त्या व्यक्तीला धडा शिकवण्याचे मनसुबे तुरुंगातच कैदी आखतात, असा अनुभव असीम सरोदे यांना कारागृहातील कैद्यांच्या प्रश्नाबाबत काम करताना येत होता. परंतु, ‘गांधी विचार परिक्षा’ महाराष्ट्रातील विविध कारागृहात यशस्वीपणे पार पडल्यानंतर कैद्यांतील सकारात्मक मानसिक बदल दिसू लागले. ‘गांधी विचार परीक्षा’ घेण्याआधी विधिज्ञ असीम सरोदे यांनी कैद्यांकडून काही प्रश्नावली भरून घेतल्या होत्या. त्यातून असे निदर्शनास आले की,  जवळ-जवळ ८०% गुन्हेगार असलेल्या कैद्यांना त्यांनी केलेल्या गुन्ह्याबाबत पश्चात्ताप वाटत होता आणि केलेल्या गुन्ह्यामुळे ज्यांना त्रास झाला असेल, अशा पीडितांना माफी मागण्याची भावना देखील त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या लक्षात आले, की कारागृह हे कोंडवाडे झाले असून, या बंदिस्त व्यवस्थेत काही प्रमाणात उघडल्या तर प्रकाशनाची किरणे नक्कीच विस्तारतील.

या परीक्षेनंतर, कैद्यांचे सद्गुणांचे व त्यांच्यातील मानसिक बदलांचे कौतुक करण्यासाठी काही प्रभावी लोकांना कारागृहात आमंत्रित करण्यात आले. डॉ. श्रीराम लागू, सदाशिव अमरापूरकर, तुषार गांधी, अमृता सुभाष, राम शेवाळकर अशा लोकांच्या हस्ते गांधी विचार परीक्षेत प्राविण्य मिळवलेल्या कैदी बांधवांचा सत्कार करण्यात आला. कैद्यांचे सद्गुणांचे व त्यांच्यातील मानसिक बदलांचे कौतुक करण्यासाठी काही प्रभावी लोकांना कारागृहात आमंत्रित करण्यात आले. डॉ. श्रीराम लागू, सदाशिव अमरापूरकर,तुषार गांधी, अमृता सुभाष, राम शेवाळकर अशा लोकांच्या हस्ते गांधी विचार परीक्षेत प्राविण्य मिळवलेल्या कैदी बांधवांचा सत्कार करण्यात आला.

एकदा कैद्यांच्या समोर बोलताना डॉ. श्रीराम लागू म्हणाले, “समाजात सर्वच चोर म्हणून फिरत असतात, आपण जे सापडतात त्यांना चोर म्हणतो.” तर, राम शेवाळकर यांनी प्रत्येकाचे आयुष्य तुरुंग झाले असताना सकारात्मक मानसिक बदल जीवनात गरजेचे असल्याचे सांगितले होते. ही प्रभावी माणसे जेव्हा कैद्यांचे प्रबोधन करतात तेव्हा त्याचे सकारात्मक पडसाद दिसून आले आहेत. बंदीवानांना सुधारण्यासाठी सुरु झालेल्या ‘गांधी विचार परिक्षे’चे सकारात्मक परिणाम दिसू लागले. गांधीजींचे ‘संक्षिप्त आत्मचरित्र’ व ‘बापू माझी आई’ हे दोन पुस्तक परीक्षार्थी कैद्यांना वाचवायला देण्यात आले आणि त्यानंतर त्या कैद्यांचे प्रशिक्षणवर्ग देखील असीम सरोदे यांनी घेतले. परीक्षार्थी आसाराम रासकर नामक कैद्यानी असे उद्गार काढले, “गांधीजींचे विचार वाचल्यानंतर हत्या घडल्याची चूक कबुल करण्याचे धाडस माझ्यात आले.”

एखाद्या अवचित क्षणी गुन्हा घडल्यानंतर गुन्हेगार इतरांसारखे हसतात, बोलतात आणि नॉर्मल होतात. कैद्यांना देखील भावना असतात हे कुणी लक्षातच घेत नाही. गुन्हा करणाऱ्याला थेट वाळीतच टाकण्याच्या सामाजिक वृत्तीमुळे गुन्हेगार सुधारण्याऐवजी अधिक बिघडताना दिसतात. जर केलेली चूक मान्य करून सुधारण्याची तयारी ‘गांधी विचार परिक्षे’नंतर कैद्यांमध्ये निर्माण होत असेल, तर यातून खऱ्या अर्थाने कैद्यांचे मानसिक पुनर्वसन होईल. गांधी विचार परिक्षेसारखे अभिनव प्रयोग यशस्वी होताना दिसतात. मात्र कारागृह प्रशासन व शासनाचे गृह खाते यांनी कैद्यांच्या मानसिक पुनर्वसनासाठी होत असलेल्या प्रयोगांना पाठबळ देणे गरजेचं आहे. तरच, कोंडवाडा झालेली कारागृहे, ही महात्मा गांधीजींच्या स्वप्नातील सुधारगृह होतील. गांधीजींच्या विचारांची ताकद आजच्या राज्यकर्त्यांनी समजून घेतल्यास कैद्यांच्या वागणुकीत सकारात्मक बदल नक्की दिसेल.

अ‍ॅड. दीपक चटप, हे सामाजिक न्याय व संविधानाचे अभ्यासक आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0