गणेशोत्सवः कोकणात जाणाऱ्या वाहनांना पथकरातून सवलत

गणेशोत्सवः कोकणात जाणाऱ्या वाहनांना पथकरातून सवलत

मुंबई: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली असून कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांना

म. प्रदेश दंगलीतील संशयितांची घरे बुलडोझरद्वारे जमीनदोस्त
स्क्रिपालचा खून आणि बेलिंगकॅट
वाहन बाजारातील मंदीवरून बजाज पिता-पुत्राची सरकारवर टीका

मुंबई: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली असून कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांना पथकरातून सवलत देण्यात येत असल्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. या पथकर सवलतीसाठी गणेशभक्तांच्या वाहनांना स्टीकर्स तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही शिंदे यांनी दिल्या आहेत.

कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून कोकणात जाणारे सर्व रस्ते, महामार्ग सुस्थितीत असणे गरजेचे आहेत. भाविकांचा प्रवास सुलभ व्हावा यासाठी पनवेल, पेण, महाड रस्ता, सातारा, भुईंज, शेंद्रे तसेच कराड-पाटण चिपळूणमार्गे कोकणात जाणारा महामार्ग, मुंबई-गोवा महामार्ग, वाकण-पाली-खोपोली मार्ग,  सिंधुदुर्गातील वागदे-कुडाळ मार्ग, आंबेनळी घाट, ताम्हिणी घाट, रत्नागिरी-सावर्डे रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची उर्वरित कामे दोन दिवसांत युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देशही एकनाथ शिंदे यांनी दिले.

दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना पथकरात सवलत देण्याची घोषणा करतानाच या वाहनांसाठी स्टीकर्स तातडीने उपलब्ध करुन देण्याचे निर्देशही यावेळी शिंदे यांनी दिले.  मुंबई-पुणे, पुणे-सातारा, मुंबई-गोवा या महामार्गावरील पथकर नाक्यांवर अधिकचे मनुष्यबळ नेमणूक करून गणेशभक्तांच्या वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका ठेवल्यास वाहतूक कोंडी कमी होईल. सार्वजनिक बांधकाम विभाग, रस्ते विकास महामंडळ, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी समन्वयाने पथकर नाक्यांवर भाविकांची गैरसोय होणार नाही यासाठी विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

पथकर नाक्यांवर गणेशभक्तांशी वाद घालू नका, पथकर सवलतीचे स्टीकर्स उपलब्ध करून देण्याबरोबर पथकर नाक्यांवर रुग्णवाहिका, जलद प्रतिसाद वाहने, जेसीबीबरोबरच पुरेसे पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करा. कोविडचे संकट पाहता भाविकांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनाही शिंदे यांनी यावेळी दिल्या.

कोकणात जाणाऱ्या मार्गावर पोलीस तैनात

कोकणात जाणाऱ्या मार्गावर स्थानिक पोलिसांबरोबरच महामार्ग वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले असून भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये, वाहतूक खोळंबू नये यासाठी सर्व आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0