पोलीस क्रौर्याविरोधात भारतीय रस्त्यावर का उतरत नाहीत?

पोलीस क्रौर्याविरोधात भारतीय रस्त्यावर का उतरत नाहीत?

अमेरिकेतल्या पोलिसांनी कृष्णवर्णीय नागरिक जॉर्ज फ्लॉइड यांना ज्या पद्धतीची वर्तणूक दिली ती भारतात आपल्याला नवीन नाही. तरीही आपल्याकडील उमटणाऱ्या प्रतिक्रियेत खूपच फरक आहे. पोलिसांचे विषारी क्रौर्य ( याचे स्वरूप बहुतेकदा धर्मांध असते) बघूनही आपण त्याच्या विरोधात रस्त्यावर उतरत नाही.

मराठवाड्यातल्या पाणीटंचाईकडे सर्व स्तरातून दुर्लक्ष
दुहीचे राजकारण अर्थव्यवस्थेला मारक: कौशिक बसू
शेतीपंप वीजवापर नावाखाली १२ हजार कोटींची चोरी

मिनिसोटा पोलिसांनी जॉर्ज फ्लॉइड यांची हत्या केल्याबद्दल निषेध व्यक्त करण्यासाठी लाखो अमेरिकन नागरिक कोरोनाची भीषण साथ आणि लॉकडाउनची तमा न बाळगता आपापल्या शहरांतील रस्त्यांवर उतरले आहेत. सोशल डिस्टन्सिंग आणि होम क्वारंटाइनचे नियम बाजूला ठेवून आपल्यातील दृढ ऐक्य दाखवत लक्षावधी नागरिक बाहेर आले. अमेरिकेत अन्य अमेरिकेत कोणत्याही आजाराहून कमी नसलेल्या पोलिसांच्या वंशवादाविरोधातील संताप, रोष व्यक्त करण्यासाठी कृष्णवर्णीय, श्वेतवर्णीय, आशियाई वंशाचे नागरिक एकत्र आले.

मिनीपोलिसमध्ये सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करणाऱ्या जॉर्ज फ्लॉइड या आफ्रिकन अमेरिकी नागरिकाचा पोलिसाने गुडघ्याने दाबून मारल्याने मृत्यू झाला. फ्लॉइड यांना काही कारणाने पोलिसांनी अटक केली होती. एका तगड्या पोलिसाने फ्लॉइड यांच्या मानेवर गुडघा काही मिनिटे कसा रोवला हे दाखवणाऱ्या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली. आपल्याला श्वास घेता येत नाही, असे फ्लॉइड पोलिसांना सांगत आहेत, हेही व्हिडिओत ऐकू येत होते. फ्लॉइड कारमध्ये असताना चार पोलिसांनी त्यांना अडवले आणि ते अटकेला प्रतिबंध करत होते असा दावा केला. फ्लॉइड यांच्या मानेवर गुडघा रोचणाऱ्या डेरेक शौव्हिन या पोलिसाला अटक झाली आहे आणि त्याच्यावर खुनाचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या आणि हा प्रसंग बघत उभ्या राहिलेल्या अन्य तीन पोलिसांवर अद्याप आरोप ठेवण्यात आलेले नाहीत पण त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.

त्यानंतर अनेक ठिकाणी लुटालूट आणि मालमत्ता जाळल्याचे प्रकार झाले आणि पोलिसांनी निषेध मोडून काढण्यासाठी हिंसेचा अवलंब केल्याच्याही बातम्या आल्या. भयप्रद वाटणारे पोलिस कर्मचारी दंगल करत असल्याचे फोटो माध्यमांमध्ये येऊ लागले. मिनिपोलिसमध्ये दंगल शमवण्यासाठी नॅशनल गार्ड्सना पाचारण करावे लागले अशाही बातम्या आहेत.

अमेरिकेच्या विविध भागांत पोलिस आफ्रिकन अमेरिकन्सविरोधात हिंसेचा वापर कसा प्रमाणाबाहेर करतात आणि हे त्यांच्या व्यवस्थेतच कसे रुजले आहे हा मुद्दा फ्लाइड यांच्या हत्येमुळे नव्याने चर्चेला आला.  #Ican’tbreathe हा हॅशटॅग व्हायरल झाला. दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निषेधकर्त्यांना ‘ठग्ज’ असे संबोधणारे ट्विट केले आणि त्यांना गोळ्या घालण्याची धमकी दिली.

भारतातही पोलिसांनी कोणत्याही कारणाशिवाय केलेली मारहाण, पोलिसांच्या ताब्यात होणारे मृत्यू आणि यंत्रणेकडून होणाऱ्या कठोर हिंसेकडे राजकीय नेते करत असलेले दुर्लक्ष हे सगळे आपल्याला माहीत आहे. अलीकडील काळात पोलिसांनी नागरिकांविरोधात हिंसेचा अवलंब केल्याच्या घटनांचे चित्रीकरण झाल्याचे आणि त्याचा प्रसार झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. यावरून सोशल मीडियावर लोक उद्रेकाने व्यक्तही होतात. जॉर्ज फ्लॉइड यांना ज्या पद्धतीची वर्तणूक देण्यात आली, ती भारतात आपल्याला नवीन नाही. तरीही आपल्याकडील उमटणाऱ्या प्रतिक्रियेत खूपच फरक आहे. पोलिसांचे विषारी क्रौर्य ( याचे स्वरूप बहुतेकदा धर्मांध असते) बघूनही आपण त्याच्या विरोधात रस्त्यावर उतरत नाही.

पोलिसांनी एका दुर्दैवी माणसाला निर्बुद्धपणे मारहाण केल्याचा परिणाम म्हणून अमेरिकेतील प्रमुख शहरांमध्ये नागरिक हजारोंच्या संख्येने रस्त्यावर आले. भारतात मात्र अशा घटनेचे पडसाद जेमतेमच उमटतात. कोणीही याविरोधात सार्वजनिक निषेधाचे हत्यार उपसत नाही.

दिल्ली दंगलींदरम्यान पोलिस चार मुस्लिम तरुणांना मारत असल्याचा एक व्हिडिओ याचे उदाहरण आहे. यातील एका तरुणाचा, फैझानचा नंतर मृत्यू झाला. ती क्लिप हृदय पिळवटून टाकणारी होती. मात्र, त्यावर ट्विटर व फेसबुकवर क्षणिक चर्चा झाल्या आणि काही काळातच सगळे काही विस्मृतीत गेले. राष्ट्रीय स्तरावर कोणतीही प्रतिक्रिया उमटली नाही. सध्या अमेरिकेत आपण बघत आहोत तशा प्रकारचा निषेध तर कुठेच दिसला नाही.

भारतातील पोलिस कर्मचारी स्वत:लाच कायद्याचा अवतार समजतो आणि त्याच्यासाठी, मग तो हवालदार असो किंवा अधिकारी, बेजबाबदारपणाने, बेडरपणाने कोणालाही मारहाण करणे ही नित्याची बाब असते. त्याला कोणताही वरिष्ठ अधिकारी जाब विचारणार नसतो, कोणीही राजकीय नेता त्याच्याकडे स्पष्टीकरण मागणार नसतो आणि नागरिकांना तर त्याच्याशी काही देणेघेणेच नसते. भारतीयांनी यात रस घेतलाच तर कित्येकांना पोलिसांचे टाळ्या वाजवून कौतुक करण्यात धन्यता वाटते. पोलिसांचे क्रौर्य ही अमेरिकेत समस्या समजली जाते, तशी भारतीयांना ती वाटत नाही. अमेरिकेतील अनेक शहरांमध्ये पोलिस खात्यातील ही कीड घालवून टाकण्यासाठी अनेक प्रयत्न झाले पण त्यांना यश आले नाही हे खरे. मात्र, पोलिसांच्या ताब्यात असताना एखाद्याचा मृत्यू झाला, तर सामान्य लोक त्याबद्दल आनंद व्यक्त करत नाहीत हे तर नक्की.

१९८०च्या दशकात मुंबईतील ‘एनकाउंटर स्पेशालिस्ट’ पोलिस अधिकारी जनतेच्या नजरेत हिरो ठरत होते. अनेक वर्षे चालणाऱ्या न्यायालयीन प्रक्रियेमधून गुन्हेगारांना नेण्यापेक्षा त्यांचा असा निकाल लावून टाकणे कौतुकास्पद समजले जात होते.

संशयित नक्षलवादी चकमकीत ठार झाल्याच्या बातमीचा लोकांवर काहीच परिणाम होत नाही, शहरी भागांतील लोकांवर तर अजिबातच परिणाम होत नाही.  सिमीच्या आठ संशयित सदस्यांना “तुरुंगातून निसटून जाताना” मध्य प्रदेश पोलिसांनी गोळ्या घातल्या. यातून अनेक गंभीर प्रश्न उभे राहिले होते. ही चकमक बनावट असावी अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, राज्याच्या गृहमंत्र्यांनी पोलिसांचे कौतुक केले.

यात लोकप्रिय सांस्कृतिक माध्यमेही हातभार लावतात. पोलिसांनी आपल्या ताब्यातील संशयितांचा, आरोपींचा छळ करणे नियमबाह्य असले तरी भारतीय चित्रपटांमध्ये अशी दृश्ये सर्रास दाखवली जातात. अमेरिकेत वास्तव आयुष्यात असे घडत असेलच पण एखाद्या हॉलिवूड चित्रपटात हे इतके सहज दाखवले जाणार नाही.

शहरातील मध्यमवर्गीयांना येणारा पोलिसांचा अनुभव गरीब अल्पसंख्याकांना येणाऱ्या अनुभवाहून वेगळा असतो. उच्चभ्रू वर्तुळात परिचय असलेल्या नागरिकाला पोलिसांच्या दुष्ट वर्तणुकीचा अनुभव क्वचितच येतो. निम्न आर्थिक स्तरातील नागरिकांना मात्र हा अनुभव वारंवार येतो.

म्हणूनच आपल्याकडे मध्यमवर्गीयांना रस्त्यावर उतरण्याची गरजच भासत नाही आणि गरीब लोक रस्त्यावर उतरले (शहरांकडून खेड्यांकडे नुकतीच झालेली स्थलांतरे आपण बघितली) तर त्यांना मारहाण सहन करावी लागते. अमेरिकेत पोलिसांच्या क्रूर मारहाणीच्या बातम्या मुख्य प्रवाहातील वृत्तपत्रांनी तपशीलवार प्रसिद्ध केल्या आहेत. भारतातील टीव्ही वाहिन्या निषेध करणाऱ्यांवरच राष्ट्रद्रोही असल्याचे शिक्के मारतात. आपण याचे उदाहरण नागरिकत्व (सुधारणा) कायद्याविरोधातील निषेध मोर्चांमध्ये नुकतेच बघितले आहे.

भारतातील तरुणवर्ग या बाबींकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघत असावा, असे सीएएविरोधी निदर्शनांदरम्यान वाटले. अमेरिकेतही निषेधासाठी उतरलेल्यांमध्ये तरुणांची संख्या प्रचंड आहे. यात कृष्णवर्णीय, श्वेतवर्णीय, लॅटिन अमेरिकी आणि अन्य वंशांचे तरुण होते.

भारतात सीएए संमत झाला तर त्याचा परिणाम केवळ मुस्लिमांवर नाही, तर अवघ्या देशावर होणार आहे असा दृष्टिकोन निषेध करणाऱ्यांचा होता. त्याचप्रमाणे पोलिसांच्या क्रौर्याचा चटका आपल्या व्यक्तिगत स्तरावर बसला नाही, तरी तो प्रत्येकाला हलवून सोडणारा आहे. हा आपल्या व्यवस्थेतील दोष आहे. तो दूर झाला पाहिजे आणि संयुक्तपणे तसेच दमदारपणे व्यक्त झालेले जनमतच हा दोष दूर करू शकते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: