न्यायासाठी लढण्याची प्रेरणा देणारी गदर चळवळ

न्यायासाठी लढण्याची प्रेरणा देणारी गदर चळवळ

२८ व्या मेळ्यामध्ये जालियनवाला बाग हत्याकांडाला शंभर वर्षे झाल्याबद्दल त्याच्या स्मृती जागवल्या गेल्या. मात्र काश्मीरमधील लोकांचे दमन हासुद्धा अनेक भाषणे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमधील ठळक विषय होता.

शोपियन एन्काउंटरमधील मजूर गरीब : ग्रामस्थांचा दावा
‘सुल्ली डील्स’अॅप बनवणाऱ्याला मध्य प्रदेशातून अटक
कवितेला बौद्धिकता अजिबात चालत नाही, असा माझा अनुभव आहे!

जालंधर : दरवर्षी, नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी पंजाबमधील या शहरात पुरोगामी लेखक, विचारवंत आणि कार्यकर्ते – तरुण आणि वयस्करही – भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामाच्या काळात गदर चळवळीत सहभागी होऊन आपले तनमनधन त्यासाठी अर्पण केलेल्या क्रांतिकारकांना मानवंदना देण्यासाठी ‘मेला गदरी बाबेआंदा’या मेळ्यामध्ये एकत्र येतात.

या वर्षी, २८ व्या मेळ्यामध्ये जालियनवाला बाग हत्याकांडाला शंभर वर्षे झाल्याबद्दल त्याच्या स्मृती जागवल्या गेल्या.तीन दिवसांच्या ह्या कार्यक्रमाची सुरुवात अरुंधती रॉय यांची नवीन कादंबरी ‘The Ministry of Utmost Happiness’ च्या लेखक आणि पत्रकार दलजित अमी यांनी केलेल्या भाषांतराच्या प्रकाशनाने झाली.

त्यानंतर अरुंधती रॉय त्यांच्या पुस्तकावर बोलल्या आणि नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन वीमेनच्या (NFIW) सदस्यांनी संमेलनाला संबोधित केले. त्यांनी काश्मीरमध्ये अल्पवयीन मुलांवर शासनाकडून केल्या जाणाऱ्या अत्याचारांबाबतचा तथ्यशोधन अहवालही सादर केला.

त्यामुळे या तीन दिवसांच्या कार्यक्रमात काय वातावरण असेल ते तिथेच ठरून गेले. जालियनवाला बाग हत्याकांड आणि त्यानंतर ब्रिटिशांनी पंजाबमध्ये केलेली धरपकड ही काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेऊन तो विभाजित करण्यात आल्यानंतर तिथे जी प्रचंड दडपशाही होत आहे त्याच्याशी समांतर पाहिली गेली.

दर वर्षी ‘गदर दा गीत’ नावाची एक संगीतिका या उत्सवात सादर केली जाते.

या वर्षीच्या संगीतिकेत काश्मीरमधील परिस्थितीवर भाष्य करण्यात आले होते. तरुण मुलामुलींनी पेलेट गनच्या पीडितांची वेदना दर्शवण्यासाठी कापसाच्या तुकड्यांनी डोळे झाकले होते. हिंदुत्ववादी अतिरेक्यांनी ज्यांचा खून केला त्या मुक्तचिंतक डॉ. नरेंद्र दाभोळकर आणि गौरी लंकेश यांच्याबरोबरच तुरुंगात डांबलेल्या मानवाधिकार कार्यकर्त्या सुधा भारद्वाज यांचीही पोस्टर्स दाखवण्यात आली. झुंडशाही हत्येचाही प्रसंग सादर करण्यात आला.

आधुनिक भारतीय समाजातील दुष्ट गोष्टी या संगीतिकेत सादर करण्यात आल्या आणि त्यातील एक सर्वात प्रामुख्याने दाखवण्यात आली ती म्हणजे – जमातवाद.

गदर चळवळ

गदर’ – हा एक उर्दू शब्द आहे ज्याचा अर्थ आहे बंडखोरी. १९१३ मध्ये उत्तर अमेरिकेमध्ये स्थायिक झालेल्या भारतीय स्थलांतरितांद्वारे गदर पक्षाची स्थापना केली गेली. भारतातील ब्रिटिश वसाहतींच्या विरोधात एक देशपातळीवरचा सशस्त्र लढा उभारणे हे त्याचे उद्दिष्ट होते.

गदर पक्षाचे बहुतांश सदस्य हे शेतकरी होते, जे २० व्या शतकाच्या सुरुवातीला पंजाबमधून हाँग काँग, मनिला आणि सिंगापूर अशा आशियाई देशांमध्ये आणि नंतर कॅनडा आणि अमेरिकेमध्ये स्थलांतरित झाले. तिथे ते आर्थिकदृष्ट्या संपन्न झाले, मात्र त्यांना वंशवादालाही तोंड द्यावे लागले.

अग्रदूत

कॅनडा आणि अमेरिकेमध्ये जवळजवळ दशकभर वंशवादाच्या विरोधात लढा दिल्यानंतर सोहम सिंग बाखना आणि पंडित कांशी राम १९१३ मध्ये लाला हरदयाळ यांना भेटले आणि त्यांनी गदर पक्षाची स्थापना केली. भारतीयांना स्वतंत्र करण्याचे स्वप्न पाहणारा पक्ष. त्यांना न्यायही हवा होता आणि सूडही घ्यायचा होता.

हे तिघे आणि त्याबरोबर कर्तार सिंग सराभा सारखे तरुण बंडखोर सॅनफ्रान्सिस्कोमधील ४३६ हिल स्ट्रीटवर राहू लागले. या जागेचे नाव त्यांनी ‘युगांतर आश्रम’ असे ठेवले आणि तिथे त्यांनी पंजाबी आणि उर्दूमध्ये वर्तमानपत्रे प्रकाशित करण्यास सुरुवात केली. त्यांचा पक्ष हिंदू, मुस्लिम, शीख, पारशी असा सर्वांचा होता. अन्य कशाहीपेक्षा स्वातंत्र्यासाठीचा लढा महत्त्वाचा मानणाऱ्या संपूर्ण भारताच्या जनतेचे खरेखुरे प्रतिनिधित्व करणारी ती संघटना होती.

त्यांच्या वर्तमानपत्राचे नाव होते हिंदुस्तान गदर. त्याशिवाय गदर की गूँज नावाचे एक कविता आणि गाण्यांचे संकलनही ते दर आठवड्याला प्रकाशित करत. त्यांच्या वर्तमानपत्राच्या पहिल्याच अंकात त्यांनी जाहिरात छापली होती:

पाहिजे आहेत: भारतात क्रांतीची सुरुवात करण्यासाठी शूर सैनिक
पगार: मृत्यू
बक्षिस: हौतात्म्य
निवृत्तीवेतन: स्वातंत्र्य
लढाईची जागा: भारत

क्रांतिकार्याला सुरुवात

छापखान्याचे काम यशस्वीरित्या चालू झाल्यानंतर, लाला हरदयाळ आणि इतरांनी परदेशी असणाऱ्या हजारो भारतीयांना संघटित करण्यास सुरुवात केली. तरुण स्वयंसेवकांची भरती झाल्यानंतर त्यांनी भारतात जाऊन काम करण्याचे ठरवले. पहिल्या जागतिक महायुद्धाच्या वेळी ब्रिटनची परिस्थिती नाजूक झाल्याचा फायदा घेण्याचा त्यांचा इरादा होता. त्यासाठी अमेरिकेत काम करणाऱ्या जर्मन एजंटची मदत घेऊन, पैसे आणि शस्त्रास्त्रे गोळा करून ते लहान लहान तुकड्या करून भारतात आले.

ब्रिटिशांना या हालचालींची कुणकूण लागलीच होती. त्यामुळे भारतात परतणाऱ्यांवर काटेकोर निर्बंध लावण्यात आले होते. भारतीय बंदरात येणाऱ्या सर्व जहाजांची कसून तपासणी केली जात होती. त्यातून अनेक कार्यकर्त्यांना पकडण्यात आले.

अपयशी झालेली क्रांती

भारतीय मातीवर पाऊल टाकण्याआधीच गदरच्या अनेक नेत्यांना अटक करण्यात आली. अटकेपासून बचाव करण्यात यशस्वी झालेले लोक क्रांती करण्यासाठी पंजाबमध्ये जमा झाले. त्यामध्ये कर्तार सिंग सराभा, पंडित कांशी राम आणि जी. पिंगळे यांचा समावेश होता. त्या वेळी मायकेल ओ’डायर पंजाबचा लेफ्टनंट जनरल होता.

पंजाबमध्ये जनतेमधूनही गदर कार्यकर्त्यांना फार प्रतिसाद मिळत नव्हता. बरेच लोक त्यांना धर्मभ्रष्ट मानत. त्या वेळी शीख लोक ब्रिटिश लष्करात मोठ्या प्रमाणात होते. त्यातून त्यांचा बराच फायदा झाल्यामुळे ते निष्ठावान होते. गदर सदस्यांना त्यांच्या या निष्ठेचा तिरस्कार वाटत असे. त्यामुळे स्थानिक पंजाबी लोकांना आपल्या बाजूने वळवणे हे गदर कार्यकर्त्यांपुढचे मोठे आव्हान होते.

भारतात काम करण्यासाठी ब्रिटिश लष्करातील भारतीय सैनिकांना आपल्या बाजूला वळवून घ्यायचे अशी त्यांची एक रणनीती होती. ते देशभरच्या सैनिकांना आपली बाजू सांगत फिरत असत. १९ वर्षीय कर्तार सिंग सराभा या कामात सर्वात सक्रिय होते.

रावळपिंडी, झेलम आणि पेशावर येथील विविध तुकड्यांमधील सैनिकांनी उठावात सामील होण्यास मान्यता दिली आणि मियाँमिर आणि फिरोझपूर छावण्यांमध्ये बाँबिंगही करण्यात आले. मात्र हे सगळे करताना पुरेशी गुप्तता न बाळगली जाणे आणि स्थानिक पंजाबी लोकांचे सहकार्य नसणे ही गदर सदस्यांपुढची मोठी आव्हाने होती. बाँबिंगनंतर ओ’डायरही हात धुवून त्यांच्या मागे लागला होता व त्याने सर्व गदर सदस्यांच्या अटकेचा हुकूम दिला होता. त्यासाठी एक नवीन कायदा करण्यात आला – द डिफेन्स ऑफ इंडिया ऍक्ट, १९१५ – ज्याच्या अंतर्गत सर्व ‘क्रांतिकारी आणि राष्ट्रवादी’ कृत्यांना बंदी घालण्यात आली होती. लोकांनी बिना खटला तुरुंगात टाकले जात होते आणि कुठेही बांधलेल्या तुरुंगांमध्ये कितीही काळ बंद केले जात होते. त्या काळात गदर चळवळीचे अध्वर्यू असलेले राश बिहारी बोस घाबरून जपानला पळून गेले, व चळवळ दिशाहीन झाली.

क्रांतीला जनतेमधून पाठिंबा नव्हता आणि केंद्रीय नेतृत्वाचाही अभाव होता. अनेक अभ्यासकांनी लिहिले आहे त्यानुसार, गदर नेत्यांची विचारप्रणाली ‘मार्क्सवादापासून भरकटलेली’ होती, ज्यामध्ये एक पक्ष क्रांतीचे नेतृत्व करतो. त्याऐवजी रशियन अराज्यवादी हे लाला हरदयाळ यांच्यासारख्या लोकांचा आदर्श होते, ज्यांचा शौर्याच्या उत्स्फूर्त कृतींकडे ओढा असतो.

शौर्याच्या या उत्स्फूर्त कृती भारतातून ब्रिटिश राज्य उलथवून टाकण्यासाठी पुरेशा नव्हत्या. गदर नेते महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, दादाभाई नौरोजी यांच्यासारखे स्वराज्याची मागणीही करत नव्हते. त्यांना संपूर्ण स्वातंत्र्य हवे होते.

गदरचा वारसा

१९१३ च्या गदर पक्षाला आपली उद्दिष्टे साकार करता आली नाहीत. पण पंजाबमधील स्वातंत्र्य संग्रामाच्या इतिहासातील तो एक महत्त्वाचा टप्पा होता. गदर नेते आणि त्यांची ‘शौर्याची उत्स्फूर्त कृत्ये’ पंजाबमधील लोककथांचा भाग बनली. आजही ती पंजाबला प्रेरणा देतात.

उठाव यशस्वी ठरला नसला तरीही त्यामुळे भारताच्या ब्रिटिशविरोधी लढ्यात महत्त्वाच्या ठरलेल्या अनेक घटनांची सुरुवात झाली. अजित सिंगजी यांच्या नेतृत्वाखालील पगडी संबाल जट्टा चळवळ ही त्यातील एक. अजित सिंग हे गदर पक्षाशी जवळून संबंधित होते. १९०७ मध्ये, लैलापूरमधील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी त्यांनी दिलेला लढा हा ब्रिटिशांच्या कर धोरणाच्या विरोधातील उठावच होता.

भगत सिंगवरही गदर चळवळीचा मोठा प्रभाव होता. चळवळीतील सर्वात तरुण सदस्य कर्तार सिंग सराभा यांचे छायाचित्र ते नेहमी आपल्या जवळ बाळगत असत.

जालंधरमधील गदरी बाबांच्या मेळ्याला आलेले हरयाणातील दोन तरुण दरवर्षी या मेळ्याला येतात. भगत सिंग या तरुणांचे प्रेरणास्थान आहे. “गदरीही आम्हाला जवळचे वाटतात. आत्ताचे सरकारला तरुणांमधल्या बेकारीची, शेतकऱ्यांच्या हलाखीच्या परिस्थितीची काहीही पर्वा नाही. आम्ही या महान हुतात्म्यांसारखेच आमच्या अधिकारांसाठी लढत आहोत.”

गदरमधील स्त्रिया

गदर चळवळीतील महिलांच्या भूमिकेबद्दल फारसे काही लिहिले गेलेले नाही. जालंधरमधील देश भगत यादगार हॉलमधील छायाचित्रांच्या एका मोठ्या दालनात महिला क्रांतिकारकांची छायाचित्रे लावली आहेत. बिबी गुलाब कौर, माता जस कौर, मॅडम कामा, दुर्गा भाभी ही गदर चळवळीतील महिलांची काही ठळक नावे.

जालंधर येथील हा वार्षिक उत्सव केवळ गदर चळवळीचा उत्सव नाही. तो क्रांती या संकल्पनेचा उत्सव आहे. अमृतसर येथील गदर कमिटीचे जनरल सेक्रेटरी परमिंदर सिंग यांनी द वायरशी बोलताना सांगितले, “आपण गदर चळवळीची नेहमी आठवण केली पाहिजे याची दोन कारणे आहेत. एक म्हणजे ते कष्टकरी वर्गाच्या भविष्यासाठी उभी राहिली होती, आणि दुसरे म्हणजे ती धर्मनिरपेक्षतेच्या बाजूने उभी होती. गदरमधील लोक हे संपूर्णपणे धर्मनिरपेक्ष होते. त्यांच्या विचारात कुठेही धर्मावर आधारित कल्पनांचा लवलेशही नव्हता.”

भारतात सर्वत्र उजव्या शक्तींचा प्रभाव दिसत असताना मेला गदरी बाबेआं दा ठळकपणे उठून दिसतो. इथे लोक धर्मनिरपेक्षतेची गरज, मानवाधिकारांच्या उल्लंघनांच्या विरोधात आवाज उठवण्याची गरज आणि भारतातील कष्टकरी वर्गाच्या अधिकारांसाठी लढण्याची गरज यांच्याबाबत मोकळेपणाने बोलतात. ब्रिटिश राज्यातील अन्याय अत्याचारांची आज भारतात काश्मीरमध्ये चालू असलेल्या दडपशाहीशी तुलना करतात.

मेळ्यातील कॉम्रेड लोकांशी बोलताना, त्यांच्यापैकी एकजण म्हणाले, गदर लाटेबद्दल मुख्य प्रवाहातील संस्कृतीमध्ये काहीच सांगितले जात नाही. पण तरीही आज भारतातील राजकीय वातावरणात जगताना सर्वात अर्थपूर्ण विचार आपल्याला तिथेच मिळतात.

७८ वर्षीय कॉम्रेड सुरिंदर कौर म्हणाल्या, “आमचा [गदर नेत्यांचा]लढा भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात ठळकपणे नोंदवला जात नाही. गदर नेत्यांबद्दल कुठेही काही नोंदवले जाऊ नये याची काळजी ब्रिटिशांनीही घेतली. नंतर इंडियन नॅशनल काँग्रेसलाही त्यांच्या प्रयत्नांना फारसे महत्त्व द्यायचे नव्हते. त्यांच्यासाठी गांधीजींचा लढाच सर्वात महत्त्वाचा होता आणि नेहरू हेच प्रमुख क्रांतिकारी होते.”

“गदर चळवळीचा वारसा हा भारतातील धर्मांध राजकारणावरचा उतारा आहे आणि नेहमीच राहणार आहे,” परमिंदर सिंग म्हणतात.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0