मुस्लिम वृद्धावरील हल्ला धार्मिक द्वेषातूनच: कुटुंबियांचा आरोप

मुस्लिम वृद्धावरील हल्ला धार्मिक द्वेषातूनच: कुटुंबियांचा आरोप

बुलंदशहर, उत्तरप्रदेश: गाझियाबादमधील मुस्लिमधर्मीय ज्येष्ठ नागरिकावर झालेल्या हल्ल्याशी धार्मिक द्वेषाशी संबंध नाही हा उत्तरप्रदेश पोलिसांचा दावा पीडि

जंतरमंतर चिथावणीखोर घोषणा; ६ जणांना अटक
वाढत्या हिंदुत्वाबरोबर काश्मीरप्रश्न चिघळत गेला!
इंग्लंडमध्ये सांप्रदायिक संघर्ष: ४७ जणांना अटक

बुलंदशहर, उत्तरप्रदेश: गाझियाबादमधील मुस्लिमधर्मीय ज्येष्ठ नागरिकावर झालेल्या हल्ल्याशी धार्मिक द्वेषाशी संबंध नाही हा उत्तरप्रदेश पोलिसांचा दावा पीडिताच्या कुटुंबियांनी खोडून काढला आहे. अब्दुल समद सैफी यांच्यावरील हल्ला धार्मिक द्वेषातूनच झाला असे त्यांच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे.

सैफी यांच्यावर त्याच्या धर्मामुळे झालेल्या हल्ल्याचा व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल झाल्याच्या पार्श्वभूमीवर, उत्तरप्रदेश पोलिसांनी द वायर, ट्विटर, तीन पत्रकार आणि तीन काँग्रेस कार्यकर्त्यांवर धार्मिक तणाव निर्माण केल्याप्रकरणी फिर्याद नोंदवली आहे. या सर्वांनी हल्ल्याबद्दल ट्विट केले होते.

१५ जून रोजी दाखल फिर्यादीमध्ये भारतीय दंड संहितेची अनेक कलमे लावण्यात आली आहेत. यांमध्ये १५३ (दंगलीला चिथावणी देणे), १५३ अ (वेगवेगळ्या समूहांमध्ये शत्रुत्वाला चिथावणी देणे), २९५ अ (धार्मिक भावना दुखावणारी कृत्ये करणे), ५०५ (खोडसाळपणा) आणि १२० ब (गुन्हेगारी कट रचणे) आणि ३४ (सामाईक हेतू बाळगणे) आदींचा समावेश आहे.

अब्दुल समाद सैफी या ७२ वर्षीय व्यक्तीवर ५ जून रोजी झालेल्या हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये हल्लेखोर सैफी यांना “जय श्रीराम” म्हणण्यास सांगत होते. ७ जून रोजी गाझियाबाद पोलिसांनी सैफी यांचे अपहरण करून त्यांना मारहाण केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध फिर्याद तर दाखल केली पण त्यात केवळ ५०५ (हेतूपूर्वक अपमान) याच कलमाचा उल्लेख होता. धार्मिक गुन्ह्यांसाठी सामान्यपणे लावल्या जाणाऱ्या आयपीसीच्या कलमांचा उल्लेख नव्हता. सैफी यांनी दिलेल्या लेखी तक्रारीत मात्र धर्मावरून टोमणे तसेच धमकावले गेल्याचे तपशील आहेत, असे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले. समाजवादी पक्षाचे नेते उम्मीद पहलवान इद्रिसी यांनीही त्यांच्या म्हणण्याला दुजोरा दिला असून, त्या तक्रारीचा स्क्रीनशॉट ‘वायर’ला दिला आहे. हल्लेखोर सैफी यांना ‘जय श्रीराम’ म्हणण्यास सांगत होते हे पोलिसांच्या निदर्शनास फिर्याद दाखल होण्यापूर्वी आणून दिले होते हे यावरून स्पष्ट होते.

सैफी यांनी नकारात्मक परिणाम करणारा तावीज दिल्यावरून निर्माण झालेल्या वादातून त्यांना मारहाण झाल्याचे गाझियाबाद पोलिसांनी सांगितले. हल्लेखोरांना सैफी पूर्वीपासून ओळखत होते असेही पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र, सैफी त्यांना ओळखत नव्हते व त्यांनी कोणताही तावीज दिला नव्हता, असे त्यांच्या मुलाने सांगितले. आपले कुटुंब अनेक पिढ्यांपासून सुतारकामाच्या व्यवसायात असून, कोणीही तावीज वगैरे देत नाही, असे ते म्हणाले. पोलिसांनी या प्रकरणात एका मुस्लिम व्यक्तीलाच अटक केली आहे. मात्र, त्या व्यक्तीला यात गोवण्यात आल्याचा आरोपही सैफी कुटुंबाने केला आहे.

फिर्याद दाखल झाली तेव्हा सैफी यांनी ‘जय श्रीराम’ म्हणायला लावल्याचे सांगितले नाही, असे गाझियाबाद ग्रामीणचे पोलिस अधीक्षक इराज राजा यांनी मंगळवारी सांगितले. मात्र, ‘वायर’ने मिळवलेल्या तक्रारीच्या प्रतीवरून त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली होती.

या हल्ल्यामुळे सैफी यांच्यासह संपूर्ण कुटुंबियांवर आघात झाला आहे, असे त्यांच्या पत्नीने सांगितले. “माझा नवरा केवळ आमच्या लोनीतील एका नातेवाईकाला भेटायला गेला, यात काय चूक झाली. माझा रक्तदाब तेव्हापासून सतत कमीजास्त होत आहे,” असे त्या म्हणाल्या.

हा हल्ला धार्मिक वादातून झालेला नाही, असा पोलिसांचा दावा कायम आहे. गाझियाबादचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक अमित पाठक यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे: “या प्रकरणाचा तपास केला असता, यामध्ये धार्मिक बाबीचा संबंध नाही. हा हल्ला ताविजावरून निर्माण झालेल्या व्यक्तिगत वादाची परिणती होता. आम्ही त्यांना मारहाण केल्याप्रकरणी तिघांना अटक करून तुरुंगात टाकले आहे. आरोपींना अटक करण्यासाठी पथके कार्यरत आहेत.”

“यातील आरोपी एका धर्माचे नाहीत, तर वेगवेगळ्या धर्मांचे आहेत,” असेही त्यांनी नमूद केले.

एडिटर गिल्डतर्फे निषेध

दरम्यान, ‘द वायर’च्या पत्रकार आरफा, मुक्त पत्रकार राणा अयुब, ‘ऑल्ट न्यूज’चे पत्रकार मोहम्मद झुबैर, लेखक सबा नकवी यांच्यावर फिर्याद दाखल करण्याच्या उत्तरप्रदेश पोलिसांच्या कृत्याचा एडिटर्स गिल्ड ऑफ इंडियाने निषेध केला आहे. या पत्रकारांसोबत काँग्रेस नेते सलमान निजामी, मशकूर उस्मानी, शमा मोहम्मद तसेच ट्विटर इंक आणि ट्विटर कम्युनिकेशन्स इंडिया प्राइवेट लिमिटेड यांच्यावरही फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

“गंभीर घटनांचे वार्तांकन करण्यापासून पत्रकारांना परावृत्त करण्याच्या हेतूने त्यांच्यावर फिर्यादी दाखल करण्याची उत्तरप्रदेश पोलिसांची वृत्ती चिंताजनक आहे. पोलिसांनी यापूर्वी अनेकदा हे केले आहे. स्रोतांच्या आधारे वार्तांकन करणे हे पत्रकारांचे कर्तव्य आहे आणि तथ्यांना पुढे आव्हान दिले गेले तर घटनेच्या बदलत्या स्वरूपाचे, अंगांचे वार्तांकनही पत्रकारांनी केलेच पाहिजे. पत्रकारांच्या कामात पोलिसांनी दखल देणे आणि त्यांच्या कृत्यांवर धार्मिक विद्वेषाचा शिक्का मारणे हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या दृष्टीने विघातक आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे देशातील नागरिकांना राज्यघटनेने दिले आहे आणि त्यावर घाला घालणे हे बेकायदा आहे,” असे एडिटर्स गिल्ड ऑफ इंडियाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

उत्तरप्रदेश पोलिसांनी दाखल केलेल्या भेदभावपूर्ण व विशिष्ट व्यक्तींना लक्ष्य करणाऱ्या फिर्यादींची नोंद गिल्डने घेतली आहे. “उत्तरप्रदेश  पोलिसांनी फिर्याद दाखल केलेल्या माध्यम समूह व पत्रकारांव्यक्तिरिक्त अनेकांनी हा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया फीडवर शेअर केला होता. नंतर ही मारहाण तक्रारदार व्यक्तीने कथित हल्लेखोरांना विकलेल्या ताविजावरून झाली व त्यात धार्मिक मुद्दा नव्हता, असा दावा उत्तरप्रदेश पोलिसांनी केला होता. याचेही वार्तांकन माध्यमसमूह आणि पत्रकारांनी केलेच होते,” असे पत्रकात म्हटले आहे.

उत्तरप्रदेश पोलिसांची वर्तणूक भेदभावाची आणि ठराविक माध्यमसमूह व पत्रकारांना लक्ष्य करणारी आहे हे एडिटर्स गिल्ड ऑफ इंडियाने निदर्शनास आणून दिलेल्या या मुद्दयावरून स्पष्ट होते. हजारो लोकांनी हाच व्हिडिओ ट्विट केलेला असताना सरकार व सरकारी धोरणांवर टीका करणाऱ्या काही विशिष्ट पत्रकारांना व माध्यम समूहांना लक्ष्य केले गेले आहे. वार्तांकनाला गुन्हा ठरवण्यासाठी व स्वतंत्र वृत्तीच्या माध्यमांचा छळ करण्यासाठी कायद्याचा बेलगाम गैरवापर करणे अत्यंत निषेधार्ह आहे अशी भूमिका एडिटर्स गिल्डने घेतली आहे आणि पत्रकारांवरील फिर्यादी तत्काळ मागे घेतल्या जाव्या, अशी मागणीही केली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0