सरकारी कारवाईने फुंकले शेतकरी आंदोलनात नवीन प्राण

सरकारी कारवाईने फुंकले शेतकरी आंदोलनात नवीन प्राण

शेतकरी आंदोलनातील नेत्यांवर सरकारने कारवाईचा बडगा उगारल्यामुळे आंदोलन विरून जाईल हा अनेकांनी वर्तवलेला अंदाज साफ खोटा ठरला आहे. सरकारच्या कारवाईमुळे उ

काश्मीरातील पर्यटन व्यवसाय ठप्प
स्नूपगेट २०१३ : ‘साहेबां’साठी तरुण आर्किटेक्टवर हेरगिरी
दिल्ली हिंसाचाराबद्दल इतकं दीर्घ मौन का?

शेतकरी आंदोलनातील नेत्यांवर सरकारने कारवाईचा बडगा उगारल्यामुळे आंदोलन विरून जाईल हा अनेकांनी वर्तवलेला अंदाज साफ खोटा ठरला आहे. सरकारच्या कारवाईमुळे उलट या आंदोलनात नवीन प्राण फुंकले गेले आहेत. गाझीपूरमध्ये ठिय्या धरून बसलेल्या आंदोलकांना हटवण्यासाठी केंद्र सरकार कसून प्रयत्न करत असल्याबद्दल बोलताना भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांचा बांध फुटल्यामुळे उत्तर प्रदेश, हरयाणा आणि पूर्व राजस्थानातील आंदोलकांचा निर्धार अधिक पक्का झाला आहे.

नरेंद्र मोदी सरकार शेतकऱ्यांना ठार मारण्याचा कट रचत आहे हे सांगताना टिकैत यांना अश्रू अनावर झाल्याचे दाखवणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. “हे सरकार शेतकऱ्यांना नाहीसे करून टाकेल, भाजपचे गुंड येतील आणि पोलिसांसह शेतकऱ्यांवर हल्ला करतील,” असे टिकैत म्हणत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर आपण गोळ्या छातीवर झेलण्यास तयार आहोत किंवा आंदोलनस्थळी गळफास घेण्यास तयार आहोत, असेही टिकैत म्हणाले. दिल्ली/एनसीआर आणि मेरठ, बागपत, बिजनौर, मुझफ्फरनगर, मुरादाबाद आणि बुलंदशहर या लगतच्या जिल्ह्यांतील हजारो शेतकरी आंदोलक शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी गाझीपूर सीमेच्या दिशेने जात आहेत. २६ जानेवारी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्च्याला हिंसक वळण लागल्यामुळे आंदोलकांचे मनोधैर्य खालावल्यासारखे वाटत होते पण आता हे आंदोलन पुन्हा निश्चयाने सुरू झाल्यासारखे वाटत आहे. केंद्र सरकारने कारवाईचा धडाका लावूनही शेतकऱ्यांचे मनोधैर्य कायम आहे.

प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांनी काढलेला ट्रॅक्टर मोर्चा काही ठिकाणी हाताबाहेर गेल्यामुळे, तीन वादग्रस्त कृषी कायद्यांविरोधात गेल्या सहा महिन्यांपासून चाललेला निषेध मोडून काढण्याची, नामी संधी गवसल्यासारखे केंद्र सरकारला वाटले. हे आंदोलन बेकायदा आहे हे सांगण्यासाठी नियोजित मोहीम सरकारतर्फे राबवली जाऊ लागली. बहुसंख्य बोटचेप्या टीव्ही वाहिन्यांनी तर हे शेतकरी आंदोलन नसून “फुटीरतावाद्यांनी” घातलेला गोंधळ आहे असा धोशा लावला होता.

हिंसक घटना झाल्यानंतर काही तासांच्या आत दिल्ली पोलिसांनी, या आंदोलनाने शांततेत नेतृत्व करणाऱ्या २५हून अधिक नेत्यांविरोधात, दंगलखोरी, कट रचणे आणि यासारखे अनेक गंभीर गुन्हे लावून फिर्यादी दाखल केल्या. गुरुवार संध्याकाळपर्यंत उत्तर प्रदेश आणि दिल्ली पोलिसांनी टिकैत यांना अटक करण्यासाठी गाझीपूर ठिय्या आंदोलनस्थळ भल्यामोठ्या सुरक्षा यंत्रणेसह कडेकोट बंद केले होते. १४४वे कलम (जमावबंदी) लागू करण्यात आले होते आणि शेतकऱ्यांना जागा रिकामी करण्याचा इशारा देण्यात आला होता. शेतकऱ्यांना पळवून लावण्याच्या मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी या भागातील भाजप नेते त्यांच्या कार्यकर्त्यांसह जमले होते.

दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेवर गाझीपूर येथे तणाव कायम असताना, रात्रभरात ठिय्या देऊन बसलेल्या आंदोलकांची संख्या वाढली. आणखी हजारो शेतकरी दिल्ली-मेरठ महामार्गावरून आंदोलनस्थळी निघालेले दिसत होते. शुक्रवार दुपारपर्यंत गाझीपूर हे आंदोलक शेतकऱ्यांची सर्वाधिक संख्या असलेल्या स्थळांपैकी एक झाले.

टिकैत यांना पाठिंबा देणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे बघून, गुरुवारी रात्री पोलिसांना सुरक्षाव्यवस्था काढून घेणे भाग पडले. काही तासांतच राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष अजित सिंग यांनी बीकेयूला पाठिंबा जाहीर केला. राष्ट्रीय लोकदल आता आपला प्रभाव असलेल्या पश्चिम उत्तर प्रदेशातून शेतकऱ्यांना पाठिंबा मिळवण्याच्या कामाला लागले असल्याचे समजते. शेतकऱ्यांसाठी हा जीवन-मरणाचा प्रश्न झाला आहे पण चिंता करू नका. सर्वांनी एकत्र राहणे आवश्यक आहे, हा अजित साहेबांचा संदेश आहेअशा आशयाचे ट्विट आरएलडीच्या उपाध्यक्षांनी केले आहे. अजित सिंग यांचे पुत्र जयंत चौधरीही शुक्रवारी सकाळी शेतकऱ्यांना पाठिंबा म्हणून गाझीपूरला पोहोचले आहेत.

टिकैत यांना ज्या प्रकारे पाठिंबा मिळत आहे, ते भाजपची चिंता वाढवणारे आहे. बीकेयू नेते दिवंगत महेंद्रसिंह टिकैत यांचे धाकटे पुत्र राकेश टिकैत यांची पश्चिम उत्तर प्रदेशातील जाटांचे वर्चस्व असलेल्या भागांवर उत्तम पकड आहे. जाट व मुस्लिमांमध्ये खोल दरी निर्माण करणाऱ्या २०१३ मधील मुझफ्फरनगर दंगलीनंतर झालेल्या विविध निवडणुकांमध्ये राकेश टिकैत व त्यांचे थोरले बंधू नरेश टिकैत यांनी भाजपला व त्यांच्या हिंदुत्ववादी राजकारणाला पाठिंबा दिला आहे. पश्चिम उत्तर प्रदेश भाजपच्या प्रभावाखाली आणण्यात जाटांचा मुख्य वाटा आहे. जाटांच्या जोरावरच भाजपने राष्ट्रीय लोकदल, समाजवादी पार्टी व बहुजन समाज पार्टी यांसारख्या पारंपरिक पक्षांना या प्रदेशातील निवडणूक नकाशावरून साफ पुसून टाकले आहे.

पश्चिम उत्तर प्रदेशातून मोठ्या प्रमाणात आंदोलक जमलेल्या गाझीपूर येथील आंदोलन आत्तापर्यंत टिकरी व सिंघु सीमांवरील ठिय्या आंदोलनांच्या तुलनेत सौम्य होते. मात्र, गाझीपूरवर रात्री उशिरा कारवाई करण्याच्या योजनेचा परिणाम म्हणून आता पश्चिम उत्तर प्रदेशातील शेतकरी कृषी कायद्यांविरोधातील आंदोलनात आघाडीच्या स्थानी आले आहेत. गुरुवार संध्याकाळपर्यंत ज्या पद्धतीने घटना होत गेल्या ते बघता पश्चिम उत्तर प्रदेशातील शेतकरी भाजपच्या विरोधात एकत्र येतील अशी दाट शक्यता दिसत आहे. शेतीशी संबंधित अनेकविध मुद्दयांवरून महेंद्रसिंह टिकैत यांनी १९८८ साली राजीव गांधी सरकारच्या विरोधात लाखो शेतकरी राजधानीत एकत्र आणले होते. याच इतिहासाची पुनरावृत्ती त्यांचे पुत्र राकेश टिकैत करताना दिसत आहेत. माजी पंतप्रधान चरणसिंह यांनी १९७० आणि १९८०च्या दशकात ज्या पद्धतीचे कृषीआधारित राजकारण उभे केले होते, त्याच पद्धतीचे कृषीआधारित राजकारण पश्चिम उत्तर प्रदेशात उभे करण्याची संधी सरकारच्या कारवाईमुळे टिकैत यांच्या हाती लागली आहे.

मूळ लेख: 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0