पर्रीकर, मॉंसेरात, पण गोव्याचं काय?

पर्रीकर, मॉंसेरात, पण गोव्याचं काय?

गोव्यातल्या ४० मतदार संघापैकी पणजी हा एक मतदार संघ. पणजी ही गोव्याची राजधानी असल्यानं आणि ते शहर जगप्रसिद्ध असल्यानं तिथली निवडणूक लक्षवेधक असणं स्वाभ

मुस्लिम असल्याच्या संशयावरून वृद्धाचा कथित मारहाणीत मृत्यू
शिव्यांची नवी राजकीय संस्कृती
भाजपच्या एकाच म्यानात दोन तलवारी

गोव्यातल्या ४० मतदार संघापैकी पणजी हा एक मतदार संघ. पणजी ही गोव्याची राजधानी असल्यानं आणि ते शहर जगप्रसिद्ध असल्यानं तिथली निवडणूक लक्षवेधक असणं स्वाभाविक आहे.

पणजीत आता उत्पल पर्रीकर आणि बाबुश मॉंसेरात यांच्यात स्पर्धा आहे. उत्पल पर्रीकर अपक्ष आहेत, मॉंसेरात भाजपचे उमेदवार आहेत. शिवसेना, आप इत्यादी पक्ष उत्पल पर्रीकर यांना पाठिंबा देतायेत.

उत्पल पर्रीकर

उत्पल पर्रीकर

उत्पल पर्रीकर भाजपचे सदस्य होते, तिकीट न मिळाल्यानं नाराज झालेत आणि त्यांनी पक्ष सोडलाय.

उत्पल पर्रीकरांची नाराजी तशी जुनीच आहे. एकदा २०१५ साली त्यांनी तिकीट मागितलं होतं. तेव्हां मनोहर पर्रीकर हे त्यांचे वडील गोवा सोडून दिल्लीत संरक्षण मंत्री म्हणून गेल्यानंतर पणजीत पोट निवडणुक झाली होती. भाजपनं सिद्धार्थ कुंकळ्ळीकरांना तिकीट दिलं. नंतर २०१९ साली मनोहर पर्रीकरांचं निधन झालं. तेव्हां पुन्हा पोट निवडणुक झाली. तेव्हांही त्यांनी तिकीट मागितलं, पक्षानं ते नाकारलं. पुन्हा कुंकळ्ळीकरांनाच तिकीट दिलं.

निवडणूक जाहीर झाल्यावर भाजपचे अमीत शहा उत्पलना भेटले. त्यांच्या चर्चेत काय घडलं ते कळायला मार्ग नाही. उत्पल म्हणतात की त्यांना दोन मतदार संघ सुचवण्यात आले होते आणि इतरही काही पर्याय सुचवण्यात आले होते. नेमेकपणानं काय सुचवण्यात आलं होतं, ते ना शहा यांनी स्पष्ट केलं ना उत्पल पर्रीकरांनी.

पर्रीकरांनी उघडपणे नाराजी व्यक्त केल्यावर गोव्याच्या निवडणुकीची जबाबदारी असलेले देवेंद्र फडणवीस म्हणाले, की केवळ कोणाचा तरी मुलगा आहे म्हणून तिकीट दिलं जात नाही, तिकीट देतांना उमेदवाराचं काम आणि निवडून येण्याची शक्यता या दोन गोष्टींचा विचार केला जातो. नेमकी हीच कारणं २०१५ आणि २०१९ साली पुढं करण्यात आली होती. म्हणजे पाच सहा वर्षात उत्पल पर्रीकरांनी स्वतःची लायकी वाढवली नाही असं दिसतंय.

पर्रीकर नाराज असले तरी म्हणतात की त्यांच्या हृदयात भाजप आहे. ते बरं आहे. कल्याण सिंग नाराज झाले होते, त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आलं होतं, त्यांना पुन्हा पक्षात घेण्यात आलं. अशी ये जा चालू असते. कारण हृदय. पर्रीकर निवडून येवोत किंवा न येवोत, पक्षातली त्यांची बंद झालेली खोली पुन्हा कधीही उघडली जाऊ शकते.

पर्रीकर म्हणतात की ते काही मूल्यं मानतात आणि पणजीत त्यांच्या मतदारांचा बेस आहे. या दोन गोष्टींच्या जोरावर त्यांना मतं मिळतील आणि ते निवडून येतील.

पण फडणविसांचा हिशोब वेगळा दिसतो. पणजीतले आयात आमदार मॉंसेरात हे ख्रिस्ती आहेत. पणजीत २७ टक्के माणसं ख्रिस्ती आहेत. तेवढी मतं मिळाली की भाजपकडं कल असणाऱ्या हिंदू मतांच्या आधारे माँसेरात निवडून येतील असं गणित आहे. उत्पल पर्रीकर यांचं काम नसल्यानं आणि ते हिंदू असल्यामुळं ख्रिस्ती मतं मिळण्याची शक्यता नाही. आपण काय उद्योग करून ठेवलेत ते भाजपला माहित असल्यानं ख्रिस्ती मतं मिळवायची तर ख्रिस्ती उमेदवार हवा असं भाजपचं गणित आहे. त्यामुळं उत्पल पर्रीकर मनोहर पर्रीकरांचं चिरंजीव असण्याचा उपयोग होणार

बाबुश मॉंसेरात

बाबुश मॉंसेरात

नाही असं फडणविसांचं मत आहे. मनोहर पर्रीकरांचं एकूण व्यक्तिमत्व आणि वावर यामुळं काही ख्रिस्ती मतं त्याना मिळत असत, उत्पल पर्रीकरांचं व्यक्तिमत्व त्या पद्दतीनं विकसित झालेलं नाही.

एकूणात त्यामुळं उत्पल अपक्ष झालेत. आप, शिवसेना इत्यादी पक्ष त्याना पाठिंबा देत आहेत. ख्रिस्ती माणसं माँसेरात या व्यक्तीकडं दुर्लक्ष करून त्यांना तिकीट देणाऱ्या भाजपकडं पाहून, भाजपच्या एकूण वर्तणुकीकडं पाहून, माँसेरात यांना मतं नाकारण्याची शक्यता आहे. त्यामुळंच पर्रीकरांची निवडून येण्याची शक्यता जास्त आहे. भाजप, संघात नाराज माणसं आहेत. तीही पर्रीकरांना मदत करतीलच. या भरवशावर पर्रीकर निवडणुक लढवत आहेत.

आता मॉंसेरात यांच्याबद्दल.

मॉंसेरात मुळचे काँग्रेसमधले. एकदा त्यांना काँग्रेसनं हाकलून लावलं होतं तेव्हां त्यांनी स्वतःचा एक वेगळा पक्षही काढला होता. २०१९ साली ते काँग्रेसच्या तिकिटावर, भाजपचे कुंकळ्ळीकरांना हरवून पणजीतून निवडून आले होते. नंतर ते १० आमदारांना घेऊन भाजपच्या सरकारात सामिल झाले, भाजपचे सदस्य झाले. लोकांनी त्यांना कारण विचारलं. ते म्हणाले की विरोधी पक्षात राहून जनतेची कामं करता येत नाहीत, त्यामुळं सत्ताधारी पक्षात जाणं जनतेच्या हितासाठी आवश्यक असतं. गोव्यातलं सरकार स्थिर करण्यासाठी भाजपला आमदार हवे होते.

२०१९ साली मॉंसेरात यांच्यावर भाजपनं नाना आरोप केले होते. मॉंसेरात यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते. त्यांना पक्षात दाखल करून घेतल्यावर गेल्या दोन वर्षात भाजप किंवा उत्पल पर्रीकर मॉंसेरात यांच्यावरचा आरोपांचा उल्लेखही करायला तयार नाहीत.

मॉंसेरात यांचं तत्वज्ञान एकदम स्थिर आणि स्पष्ट आहे. सत्ता हवी. सत्ता नसेल तर जनतेची सेवा करता येत नाही. तेंव्हा उद्या सत्ताबदल झाला तर ते नव्या सत्तेत जातील. त्यानंतर भाजप त्यांची जुनी प्रकरणं उचकून काढेल. त्यावेळी केंद्रात भाजपची सत्ता असेल तर त्यांच्यावर नाना खटले भरले जातील. अर्थात हे त्यांनाही समजतंय. पण तेव्हांचं तेव्हा पाहून घेऊ असा विचार ते करणार.

मॉंसेरात यांना उभं केलं यावरून आपण ख्रिस्ती समाजाच्या विरोधात नाही असा प्रचार करायला भाजप मोकळा होणार. समजा ते निवडून आले आणि भाजपचं सरकार आलं तर ठीकच. मॉंसेरात सुखानं सत्तेत रहातील.

मॉंसेरात पडले तर कट्टर हिंदुत्ववादी आतून खुषच होतील. त्यांची खुषी दुप्पट. ख्रिस्ती पडला म्हणून आणि आपण ख्रिस्तींनाही तिकीट देत असल्यानं कसे खरे सेक्युलर हिंदू आहोत असं सांगता येईल म्हणून. मॉंसेरात पडणं म्हणजे पर्रीकर निवडून येणं. ते तर आतून भाजपचेच होते, तसं खुद्द पर्रीकरही हृदयाकडं बोट दाखवून म्हणतच होते. म्हणजे त्यांची घर वापसी.

काट पडो की छापा, काय फरक पडतो.

गोव्याचं काय? गोव्याच्या जनतेचं काय?

उत्पल पर्रीकरांची जमेची बाजू म्हणजे त्यांचे वडील. मॉंसेरात यांची जमेची बाजू म्हणजे त्यांचा धर्म आणि उपद्व्याप करून मतं गोळा करण्याची त्यांची क्षमता. गोव्याची आर्थिक आणि सामाजिक स्थिती बरी नाही वगैरे मुद्दे येतच नाहीत.

गोव्यात काय किंवा देशात काय.

गरीबी, विषमता, उत्पादन, शेती, शिक्षण अशा प्रत्येक मुद्द्यावर समाजाची स्थिती दिवसेंदिवस खालावताना दिसतेय. आणि ते तर्काला धरूनच आहे. कारण देवेंद्र फडणवीस म्हणतात तसं निवडून येण्याची क्षमता महत्वाची असते. उमेदवाराची लायकी, सचोटी, चरित्र, विचारधारा, क्षमता इत्यादी गोष्टी महत्वाच्या नसल्यावर विधीमंडळात लोकोपयोगी कामं होणं म्हणजे एक अपघातच ठरतो.

विहीर असते. रहाट असतो. रहाटाला गाडगी असतात. रहाट फिरला की पाण्यातलं गाडगं वर येतं आणि वरचं गाडगं पाण्यात जातं.या खटाटोपात गाडगं रिकामं होतं,त्यातलं पाणी पिकाला मिळतं.

भारतात गाडगी फिरतात पण पाणी पिकांना मिळत नाही कारण पाणी गाडग्यातच भरून रहातं.

रहाट बिघडला की गाडग्यातलं पाणी गाडग्यातच रहातं. फायदा गाडग्याला होतो, पिकाला नाही.

पर्रीकर, मॉंसेरात ही गाडगी. वर खाली होत रहातील.

पणजीतली निवडणुक त्या अर्थानं प्रातिनिधीकच म्हणायला हवी.

निळू दामले लेखक आणि पत्रकार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: