‘गोदी मीडिया’ची ‘हायपोडेर्मिक नीडल थेरपी’

‘गोदी मीडिया’ची ‘हायपोडेर्मिक नीडल थेरपी’

समाजाने नेमका काय विचार करायचा हे माध्यमांना सांगता येत नाही, पण समाजाला काय विचार करायचा आहे हे सांगण्यात ते खूप यशस्वी झाले आहेत’. आजचा ‘गोदी मीडिया’ प्रचारकी झाल्याने लोकशाहीपुढे तो धोका निर्माण करत आहे.

पत्रकार रवीश कुमार यांना २०१९ चा रेमन मॅगसेसे पुरस्कार
मार्क्सवादी परंपरेतील साक्षेपी इतिहासकार
‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’, अण्णा आणि संघ

Hypodermic model uses the same idea of shooting paradigm. It suggests that the media injects its message straight into the passive audience.   

Croteau & Hoynes, 1997            

अमेरिकेचे वृत्तपत्र ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ने फेसबुकच्या नि:पक्षपातीपणावर सवाल केले आहेत. वृत्तपत्राने दावा केला आहे की, फेसबुकने भाजप नेते व काही गटाच्या ‘हेट स्पीच’ असणाऱ्या पोस्टविरोधातील कारवाईकडे मुद्दाम दुर्लक्ष केले. काँग्रेस प्रवक्ते राजीव त्यागी यांना न्यूज चॅनेलवरील चर्चेनंतर हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचे निधन झाले. या सध्याच्या दोन बातम्या भारतीय मीडियाच्या अलीकडच्या वाटचालीचे स्वरूप स्पष्ट करतात. खरेतर भारतीय मीडियाचे स्वरूप अलीकडच्या आठ – दहा वर्षामध्ये पूर्णपणे बदलून गेले आहे. आताच्या मीडियामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया आणि सोशल मीडिया यांचा विस्तार खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे. आताचा मीडिया विस्ताराने खूप मोठा असला तरीही विश्वसनीयतेने तो मात्र इतिहासात सर्वाधिक खालच्या स्तरावर पोहोचला आहे. ही बाब अलीकडच्या वर्षातील जागतिक मीडिया सूचकांकमध्ये भारतीय मीडियाच्या विश्वासार्हतेच्या घसरलेल्या स्थानावरून पुरेशी स्पष्ट होते.

भारतात मीडियाच्या स्वरुपात झालेला हा बदल अलीकडच्या काळात विशेषतः भारतात इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडियाच्या उदयाबरोबर झालेला आपणाला दिसून येतो. भारतात फेसबुक, व्हॉटसअप, ट्विटर, इन्स्टाग्राम, टेलिग्राम, यूट्यूब यासारख्या सोशल मीडियाचा प्रवेश हा गेल्या दशकातला आहे. याबरोबरच इलेक्ट्रॉनिक मीडियावरील १०० हून अधिक २४ तास न्यूज देणाऱ्या वाहिन्याचा प्रवेशही भारतात गेल्या दोन दशकातला आहे. २४ तास कोणत्या न्यूज द्यावयाच्या आणि या वृत्तवाहिन्या भारतात चालणार नाहीत अशी जी भविष्यवाणी सुरवातीला काही जाणकारांनी केली होती. त्या भविष्यवाणीला या न्यूज चॅनेलनी सध्यातरी खोटे ठरविले आहे.

जर हा मीडिया भारतात आज यशस्वी झाला आहे असे मानले तर तो भारतात कशाच्या जोरावर यशस्वी झालेला आहे? भारतीय प्रेक्षक बातम्या आणि त्यामागील पार्श्वभूमी समजण्यासाठी उत्सुक असतात त्यामध्ये रस घेतात त्या बदल्यात त्यांना कितपत आर्थिक परतावा करावा लागतो हे आपणाला पाहावे लागेल. जर भारतीय प्रेक्षक या बातम्या किंवा त्यामागील पार्श्वभूमी यासाठी पुरेशी आर्थिक जोखीम स्वीकारत नसतील तर अर्थातच या माध्यमांना जाहिरात आणि प्रायोजित बातम्या प्रसारित करण्यासाठी कार्पोरेट आणि सरकार यांच्या मर्जित किंवा अंकित जाणे अपरिहार्य ठरते. अशावेळी या सर्व मीडिया जगताचे नियंत्रण आपोआपच कार्पोरेट आणि सरकार यांच्याकडे जाणे अगदी स्वाभाविक आहे. यातूनच भारतात सरकार आणि सत्ताधारी पक्ष यांच्या कधी नव्हे तेवढा अंकित गेलेला मीडिया आज आपण पाहात आहोत. मीडियाच्या आर्थिक व अन्य समस्यामुळे तो कसा सरकारवर अवलंबून राहतो याचे विश्लेषण अरींदो चक्रवर्ती यांनी आपल्या Youtube चॅनेलवरील कार्यक्रमात स्पष्ट केले आहे. याच अंकित मीडियाला सध्या त्याच्या पक्षपाती पत्रकारितेमुळे ‘गोदी मीडिया’ म्हणून संबोधले जाते.

आजचा हा ‘गोदी मीडिया’ भारतीय जनतेला हायपोडेर्मिक नीडल थेरपी देत आहे.

हा सिद्धांत आधुनिक काळात खूप महत्त्वाचा आहे. हायपोडर्मिक एक ग्रीक शब्द आहे. ज्याचा अर्थ सीरिंज आहे आणि म्हणूनच या मॉडेलला हायपोडर्मिक असे नाव देण्यात आले आहे.

आपण काय विचार करू इच्छितो याचा आपण विचार करीत नाही, मीडिया आपल्याकडून काय इच्छिते असा आपण विचार करतो. खरं तर ‘समाजाने नेमका काय विचार करायचा हे माध्यमांना सांगता येत नाही, पण समाजाला काय विचार करायचा आहे हे सांगण्यात ते खूप यशस्वी झाले आहेत’. ‘पुछता है भारत’ सारख्या कार्यक्रमातून याचा प्रत्यय येतो. काय विचार करावा आणि काय विचार करावे यामध्ये बराच फरक आहे. कठोर विचार काय आहे हे समाजाने समजून घ्यावे, पण आपल्याला ते सांगतात की काय विचार करावे, मग समाज विचार करत नाही त्यामुळे ज्या प्रकारे मीडिया आपल्याला प्रेरित करतो त्याच प्रकारे आपण विचार करतो.

हायपोडेर्मिक नीडल मॉडेलचे तीन प्रमुख घटक आहेत:-

  • लिनियर कम्युनिकेशन : जे थेट माध्यमाद्वारे प्रेक्षकांपर्यंत पोहोचते. मीडिया आणि जनता यांच्यात दुसरा कोणताही टप्पा नाही, म्हणजे – डायरेक्ट प्रसारण ,जसे आपण कोणत्याही वृत्तवाहिनीवर लाईव्ह प्रसारण पाहतो तसे. ज्याप्रमाणे जनतेने रामजन्मभूमी मंदिराच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम पाहिला किंवा पंतप्रधानांचे १५ ऑगस्टचे भाषण पाहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अयोध्येत विमान उतरण्याच्या प्रसंगाची तुलना प्रभू रामचंद्र यांच्या पुष्पक विमानातून अयोध्येत येण्याच्या प्रसंगाशी मीडियाने करणे किंवा पंतप्रधानांच्या १५ ऑगस्टच्या भाषणावेळी परिधान केलेल्या विविध छटातील भगव्या रंगाच्या फेट्यावरून ते जनतेला आपला नेमका धार्मिक संदेश देतात हे सतत सांगणे. अशा प्रसारणातून जनतेला आपला राजकीय कार्यक्रम आणि आपली राजकीय व धार्मिक प्रतिमा जनतेच्या मनात बिंबविण्यात मीडिया ही कमालीची सहाय्यक ठरते. भाषणातील मुद्यांच्या आशयापेक्षा देहबोली आणि वेशभूषा यातून वेगळाच संदेश देण्याचा प्रयत्न मीडीयाच्या मदतीनेच यशस्वी केला जातो. विशेषतः यासाठी इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडियाची भूमिका अधिक महत्त्वपूर्ण ठरते.
  • पॅसिव्ह ऑडिएन्स (निष्क्रिय श्रोते) – मीडिया कोणताही संदेश श्रोत्यात पोहोचवते आणि कोणी त्याला विरोध करीत नाही. भारतीय समाज हा नेहमी सकारात्मक विचार करतो तो कधीही माहितीचे सर्व तथ्य समजून घेण्याचे कष्ट घेत नाही. भारतीय समाज तर्कनिष्ठ विचार करणाऱ्या लोकांना नकारात्मक ठरवितो. मीडियातील माहितीला आपण स्वीकारतोच शिवाय या माहितीस आपल्या अभ्यासाने किंवा तर्कपूर्ण मांडणीने चुकीचे ठरविणाऱ्या व्यक्तींना समाज स्वीकारत नाही. त्यांना पुस्तकी विद्वान संबोधून आपण त्याच्या आर्गुमेंटकडे दुर्लक्ष करतो. यातून अभ्यासू तर्कपूर्ण मांडणी करणार्या व्यक्तीला समाज आपल्यापासून दूर करतो. या प्रक्रियेतून भारतीय समाज मीडिया जी माहिती देईल तीच सत्य समजून ग्रहण करीत राहिला आहे. मीडियामुळेच उत्तर प्रदेशात विकास दुबे या गँगस्टरचा केलेला पोलिसांनी एन्काऊंटर असेल, हैदराबादमधील बलात्कार करणाऱ्या आरोपींचा पोलिसांनी केलेला एन्काऊंटर योग्य आहे असे समाज समजतो. समाजात मीडियाद्वारे गणपती दूध पितो यासारख्या अफवा पसरतात. सोशल मीडिया तर खूपच यात भर घालतो. केवळ फेसबुक वरील एका पोस्टमुळे बेंगळुरुला दंगल घडू शकते हे आपण पाहिले आहे. या फेसबुक पोस्टची सत्यता जाणण्याची कोणतीही तसदी या वेळी संतप्त जमावाने घेतलेली नव्हती हे आपणाला लक्षात येते.
  • ‘नो इंडिव्हिजुयल डिफ़रेन्स’ (श्रोत्यांची एकसमानता)- सर्व श्रोते एकसमान असतात. त्यांच्यात कोणतेही वैयक्तिक अंतर असत नाही. सर्वांनाच त्यामुळे दिलेला संदेश एकसारखा समजतो. यामुळे सर्वजण मीडिया जो संदेश देऊ इच्छितो तो तसाच ग्रहण करतो. यामुळे सर्वजण यातून एकसमान सारखेच प्रतिक्रिया देत राहतात. ज्या पद्धतीने बॉम्बस्फोटातील आरोपीला तुरुंगात बिर्याणी खायला दिली जाते याची चर्चा कोणतीही शहानिशा न करता पसरविली जाते. तबलिकी जमातच्या सदस्यांनी कोरोना झाल्यानंतर हॉस्पिटलमध्ये गैरवर्तन केले. (जसे की नर्सच्या तोंडावर थुंकणे, अर्धनग्न अवस्थेत फिरणे, उघड्यावर शौच करणे इत्यादी) या बातम्या कोणतीही शहानिशा न करता पसरवून समाजात एका विशिष्ट समुदायाविरोधात रोष उत्पन्न केला जातो. हेही देशातील प्रमुख समजल्या जाणाऱ्या वृत्त वाहिनीवरून आणि त्यास तसा सरकारी दुजोवाही मिळेल अशी व्यवस्था केली जाते हे विशेष.

हे मॉडेल आपणाला ज्या गोष्टी सुचविते ते आपल्या डोक्यात घुसवल्या (इंजेक्ट) जातात. त्याच बाबी मग आपला प्राधान्यक्रम बनतात. यामुळे आपला तसाच दृष्टीकोन बनतो. यातूनच मीडिया आपल्या एजेंड्यानुसार काही घटनांना अधिक प्राधान्य देतो तर काहींना कमी. राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक चर्चांचा एजेंडा ‘गोदी मीडिया’ सरकारच्या सोयीनुसार निश्चित करत राहतो आणि सामान्य जनता त्यामध्ये फसत रहाते. हा मीडिया जसा आपणाला मार्ग दाखवेल तसाच आपण विचार करीत राहतो. यातून समाजाला एक प्रकारच्या द्वेषी समूहात बदलण्याचा प्रायोजित कार्यक्रम मीडिया यशस्वी करते. सतत समाजाला आपणाला हवे तसे ड्राइव्ह करण्यात सध्याचा ‘गोदी मीडीया’ यशस्वी होताना दिसत आहे.

भारतीय मीडियातील सर्वच घटक यात समाविष्ट नाहीत मात्र जे याविरोधात आवाज उठवितात त्यांची संख्या नगण्य असते. या विरोधातील घटकाला सर्वबाजूने कसे अडचणीत आणता येईल याची तजवीज केली जाते. विरोधातील लोकांना  देशद्रोही, खान मार्केट गँग, टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्सली, सेक्युलर गँग, चीन एजेंट संबोधत हाच मीडिया समाजातून या निर्भीड आणि तटस्थ लोकांची विश्वसनीयता कशी संपविता येईल यासाठी सरकारी मदतीने सातत्याने प्रयत्नशील राहतो.

अलिकडच्या काळात सोशल मीडियाच्या वर उदयाला आलेल्या ट्रोल या महाभयंकर प्रायोजित प्रकाराने विरोधी मताच्या व्यक्तीला लक्ष केले जाते. त्याचा आवाज बंद केला जातो. त्याला प्रचंड बदनाम केले जाते. समाज ‘गोदी मीडिया’च्या या लबाडीला बळी पडत राहतो आणि एक प्रकारे आपली फसवणूक करीत जातो. हे मॉडेल ‘गोदी मीडिया’ला सरकार अडचणीत आले असताना सातत्याने वापरावे लागते. जर असे नसेल तर २०१५ साली राफेल विमान विकत घेणाऱ्या करारावर सह्या झाल्यावर या राफेलच्या गुणवत्तेची चर्चा जितकी मीडियाने केली नव्हती त्यापेक्षा या करारानुसार केवळ पाच विमाने भारतात आल्यावर करण्यात आली. यामागे राफेल खरेदीतील कथित गैरव्यवहार आणि चीनच्या लद्दाखमधील अतिक्रमणामुळे सरकारच्या प्रतिमेची झालेली हानी भारतीय जनतेच्या मनातून पुसून सरकारची (विशेषतः मोदींची) त्यांना हवी तशी प्रतिमा जनतेच्या मनात गडद करावयाची होती.

‘हायपोडेर्मिक नीडल मॉडेल’चा अलिकडच्या काळातील मोठा प्रयोग म्हणजे कोरोना काळातील लोकांच्या विचारात आणि वर्तणुकीत मीडियाच्या प्रभावानुसार झालेला असाधारण बदल आपणाला जाणवेल. भारतात मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात कोरोनाचा संसर्ग परदेशातून आलेल्या प्रवाशांमुळे सुरू झाला. २५ मार्चपासून देशभर कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला त्यावेळी भारतात केवळ ५७६ कोरोनाचे पॉझिटिव्ह पेशंट होते. आणि कोणताही सामुहिक संसर्ग सुरु झालेला नव्हता. जागतिक आरोग्य संघटना किंवा जगभरात सर्वत्र आरोग्य तज्ज्ञांनी सामुहिक संसर्ग सुरू झाल्यानंतर लॉकडाऊनची गरज सांगितली होती. भारतात प्रत्यक्षात कोरोनाचे सामुहिक संक्रमण जुलैच्या महिन्यात सुरू झाले असे भारत सरकारच्या ICMR चे म्हणणे आहे. पण हा सामुहिक संसर्ग सुरू झाल्यावर मात्र आपला देश अनलॉक होत आहे. ज्यावेळी देशात सामुहिक संसर्ग नव्हता त्यावेळी देशभरातील मीडियात एकूण प्रसारणाच्या ९०% पेक्षा जास्त बातम्या मात्र कोरोना संकटाच्या होत्या. आणि त्यातून देशभरातील जनता भयग्रस्त होत होती. या काळात मोठ्या शहरातून येणाऱ्या आपल्या नातेवाईक असणार्यानाही ग्रामीण भागातील लोक घरात प्रवेश देत नव्हते. आज कोरोनाचे संकट २८ लाख इतके देशभर पेशंट होऊन घराघरात पोहोचले आहे कोरोना भारतात कमी होत असल्याचे कोणतीही ठोस आकडेवारी नाही. तरीही देशभरातील कोरोनाचे भय कितीतरी कमी झाल्याचे आपणास प्रत्ययास येईल. याचे एकमेव कारण मीडियाने या विषयावर आता पूर्वीसारखे रिपोर्टिंग करणे बंद केले आहे. ‘हायपोडेर्मिक नीडल मॉडेल’चे काम जुन्या गोष्टी मधील ‘लांडगा आला रे आला’ या कथेप्रमाणे लोकांत संदेश पोहोचविण्याचे काम आहे.

भारतात निवडणुका अलिकडच्या काळात अशाच पद्धतीनेच मीडिया ज्या बाजूने राहील त्या बाजूने झुकताना दिसतात. किबहुना भारतातीलच नव्हे तर जगभरात गेल्या दशकात मीडियाच्या प्राबल्याचा निवडणुकात मोठ्या प्रमाणावर वापर होताना दिसत आहे. हा मीडियाचा दबावगट लोकशाहीच्या मूळ संकल्पनेलाच नष्ट करीत आहे.

२०१२च्या गुजरात विधानसभा निवडणुकात प्रथमतः या मीडियाचा भारतातील स्वैर वापर झाला. याच निवडणुकात मोदींनी एका जागेवरून भाषण करताना ते भाषण १८२ विधानसभा मतदारसंघात एकाचवेळी करीत असल्याचा आभास जनतेला झाला. या निवडणुकानंतर भारतात 2G, 3G आणि 4G चे वेगवान गती असणारे इंटरनेट घराघरात पोहोचले. फेसबुक, व्हॉटसअप, इंस्टाग्राम, ट्वीटर, टेलिग्राम, युट्यूब सारख्या सोशल मीडियाचा प्रसार अभूतपूर्व वेगाने कित्येक पटीने घराघरात पोहोचला. हा सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया अल्पावधीतच भारतीय जनतेच्या जीवनाचा एक भाग बनला. निवडणुकीत हा मीडिया जनतेत एखाद्या बाजूने लांडगा आला रे आला या गोष्टीमधील हाकाट्या करणाऱ्या वर्गासारखा वर्तन करून प्रतिपक्षाची अक्षरशः शिकार करत राहिला. भारतात सध्या जगात सर्वाधिक सोशल मीडिया वापरणारे ग्राहक आहेत. फेसबुक वापरणाऱ्या लोकांची भारतातील संख्या २८ कोटीच्या आसपास आहे. जवळपास भारतातातील ६० कोटीपेक्षा जास्त लोक कोणत्या ना कोणत्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कार्यरत आहेत. यातूनच निवडणुकात एखाद्या बाजूने कृत्रिमरीत्या लाट (Artificial Wave) तयार करण्यात मीडियाला यश मिळते. निवडणुकात मतदारांचे ब्रेन हॅकिंग (Brain Hacking) करण्यात मीडियाचा मोठा सहभाग असतो.

याचे उदाहरण द्यायचे झाल्यास आपणाला असे लक्षात येईल की २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी केवळ तीन महिने अगोदर पाच राज्यातील (८३ लोकसभा मतदारसंघात) विधानसभा निवडणुकीत सर्व राज्यात भाजपला पराभव पत्करावा लागला होता (मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, तेलंगना आणि मिझोराम). मात्र त्यानंतर केवळ तीन महिन्यातच या राज्यातील लोकसभेच्या ८३ पैकी ६६ लोकसभा मतदारसंघात भाजपला विजय मिळाला होता. विधानसभा निवडणुकात ८३ पैकी केवळ २६ मतदारसंघात पुढे असणारा भाजप केवळ तीन महिन्यातच लोकसभेला ६६ जागा जिंकतो. हे कशाचे यश आहे हे आपणाला डोळसपणे अभ्यासले पाहिजे.

ही आपल्या भारतीय प्रजासत्ताक देशाची सर्वात मोठी आव्हानात्मक गरज आहे. भारतात EVM हॅकिंग पेक्षा होणारे ब्रेन हॅकिंग ज्या मॉडेलने होते त्याचे आव्हान भारतीय लोकशाहीपुढे सर्वात मोठे आहे. आज भारतातील या ‘गोदी मीडिया’चे नरेंद्र मोदी हे अनभिषिक्त बेताज बादशाह आहेत. मोदींजवळ मजबूत सोशल मीडियावरील IT सेलची फौज आहे, सोबत त्यांच्या जवळच्या कार्पोरेट लॉबीच्या मालकीखाली गेलेला देशातील सर्वात मोठा इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे. भरभक्कम अशी या मीडियाची ही ताकद सर्वात अगोदर ओळखणारे देशातीलच नव्हे तर जगातील ते पहिले प्रमुख नेते आहेत.

डॉ. प्रा. प्रमोदकुमार ओलेकर, हे आष्टा येथील आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज येथे इतिहास विभागात सहाय्यक प्राध्यापक आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0