पीपीई किट्सच्या खरेदीबाबत सरमा यांच्या खोट्या वल्गना?

पीपीई किट्सच्या खरेदीबाबत सरमा यांच्या खोट्या वल्गना?

आसाममधील कोविड संकटाचा सामना करण्यासाठी चीनकडून ५०,००० पीपीई किट्स खरेदी केल्याची घोषणा आसामचे मुख्यमंत्री तसेच तत्कालीन आरोग्यमंत्री हिमंतबिस्व सरमा

ट्विट प्रकरणी जिग्नेश मेवानी यांना आसाम पोलिसांकडून अटक
आसामात वधुवराला धर्म, उत्पन्न घोषित करण्याची सक्ती?
आसाम : दोनपेक्षा अधिक मुले असणाऱ्यांना सरकारी नोकरी नाही

आसाममधील कोविड संकटाचा सामना करण्यासाठी चीनकडून ५०,००० पीपीई किट्स खरेदी केल्याची घोषणा आसामचे मुख्यमंत्री तसेच तत्कालीन आरोग्यमंत्री हिमंतबिस्व सरमा यांनी एप्रिल २०२०मध्ये जोरात केली होती. हे पाऊल उचलणारे आसाम हे देशातील पहिले राज्य आहे, अशी वल्गनाही त्यांनी केली होती. मात्र, आसाम सरकारने अशी कोणती खरेदी केलेलीच नाही अशी धक्कादायक माहिती राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या (एनएचएम) आसाम शाखेने माहिती अधिकाराखाली करण्यात आलेल्या एका अर्जाच्या उत्तरादाखल दिली आहे. कोविड साथीशी निगडित सर्व आपत्कालीन खरेदी एनएचएममार्फत करण्यात आली होती आणि सरमा यांनी जाहीर केलेली चीनकडून ५०,००० पीपीई किट्सची झालीच नव्हती असे या यंत्रणेने स्पष्टपणे नमूद केले आहे.

सरमा यांच्या मुख्यमंत्रिपदाचे प्रथम वर्षपूर्ती साजरी करण्यासाठी १० मे रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुवाहाटीत नुकत्याच एका विशाल जनसभेपुढे भाषण केले. आसामचे यापूर्वीचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांना डावलून सरमा यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ घातली जाण्यामागील प्रमुख कारण सरमा यांची कोविड संकट यशस्वीपणे परतवणारे आरोग्यमंत्री म्हणून उभी राहिलेली प्रतिमा हे होते. आसाममधील कोविडची साथ आटोक्यात आणण्याचे श्रेय राज्यातील व राज्याबाहेरील अनेक टीव्ही वाहिन्या, ऑनलाइन व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स यांनी सरमा यांना दिले होते. सरमा यांनी १५ एप्रिल २०२० रोजी, चीनकडून पीपीई किट्स खरेदी केल्याची घोषणा, ट्विटरवरील पोस्टमार्फत केली, तेव्हापासून याची सुरुवात झाली. ‘बिग रीझन टू चीअर’ अशा शीर्षकाने सरमा यांनी हे ट्विट पोस्ट केले होते. शिवाय चीनमधील दोन मालवाहू विमाने गुवाहाटी विमानतळावर उतरली आहेत असे दोन फोटोही या ट्विटसोबत होते.

ही चीनमधून आलेली पीपीई किट्स स्वीकारण्यासाठी सरमा स्वत: रात्री गुवाहाटी विमानतळावर गेल्याची व्हिडिओ क्लिप प्रसारित झाली, तो माध्यमांद्वारे सरमा यांची प्रतिमा (सोनोवाल नव्हेत) राज्याचे नेते म्हणून उभी केली जाण्याचा कळसबिंदू होता. त्यावेळी सरमा यांनी वार्ताहरांना सांगितले होते, “भारत सरकारने चीनकडून १.७० लाख पीपीई किट्स खरेदी केली आहेत, तर आम्ही चीनमधील गुआंग्झोऊ येथून ५०,००० पीपीई किट्स खरेदी केली आहेत. देशातील एखाद्या राज्याने स्वत:हून अशी खरेदी करण्याची ही कदाचित पहिलीच वेळ आहे.”

आसाम सरकारच्या या कृतीचे कौतुक करत ‘इंडिया टुडे’ने लिहिले होते, “जागतिक मालवाहतूक मर्यादित असताना आणि पीपीई किट्सची मागणी वाढलेली असताना एखाद्या राज्याने थेट परदेशातून पीपीई किट्स खरेदी करण्यासाठी चाकोरीबाह्य विचाराची आणि सरकारी नियम बदलून घेण्याची गरज असते.”

तरीही चौकस वृत्ती ठेवल्यामुळे, द क्रॉस करंट या संस्थेच्या आरटीआय अर्जाला देण्यात आलेले उत्तर ‘द वायर’च्या बघण्यात आले. कोविड-१९ संकट हाताळण्यासाठी आवश्यक ती सर्व खरेदी ज्या एनएचएमच्या आसाम शाखेमार्फत झाली, त्या संस्थेने सरमा यांच्या दाव्यापासून स्पष्टपणे स्वत:ला दूर ठेवले होते. “एनएचएम आसामने कधीही चीनकडून पीपीई किट्स खरेदी केलेली नाहीत,” असे एनएचएमने म्हटले आहे.

राज्य एनएचएमने उत्तरादाखल म्हटले आहे, “आम्ही अनेक उद्योगांकडे पीपीई किट्सच्या ऑर्डर्स दिल्या होत्या पण ते सगळे देशांतर्गत उद्योग होते आणि म्हणूनच पीपीई किट्स खरेदी करण्यासाठी अन्य देशांत पैसा पाठवणाऱ्या व्यक्तींबाबत आम्हाला कोणतीही माहिती नाही.”

एप्रिल १७, २०२० रोजी ‘इंडिया टुडे’मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘हाऊ हिमंत बिस्व सरमा ब्रोक रुल्स टू बाय पीपीई किट्स फ्रॉम चायना’ या शीर्षकाखालील वृत्तांतात म्हटले आहे: “आसाम सरकारने २९ मार्च रोजी एका दिल्लीस्थित सप्लायरकडे ५०,००० पीपीई किट्सची ऑर्डर दिली होती.” मात्र, आरटीआयमार्फत एनएचएमने आम्हाला दिलेल्या यादीमध्ये राज्याच्या आरोग्यखात्याने १८ मार्च, २०२० ते जानेवारी २०२२ या काळात खरेदी केलेल्या पीपीई किट्सची संख्या समाविष्ट होती. या यादीत सरमा यांनी नमूद केलेल्या ऑर्डरचा उल्लेख कोठेही आढळला नाही. याशिवाय, २८ मार्च, २०२० रोजी १०,००० पीपीई किट्सची ऑर्डर एमबी ट्रेडर्सना दिल्याची एण्ट्री दिसत आहे. यातील प्रत्येक पीपीई किटची किंमत ९५१.०८ रुपये होती. मात्र, बातमीत नमूद केलेली २९ मार्चची एण्ट्री कोठेही सापडली नाही. ‘इंडिया टुडे’च्या बातमीत उल्लेख करण्यात आलेल्या त्या ‘दिल्लीच्या सप्लायर’च्या नावाने इश्यू झालेल्या ऑर्डरची प्रत मागितली असता, एनएचएम त्यावर काहीच उत्तर देऊ शकली नाही आणि एनएचएमनेच आरटीआय अर्जदार ‘द क्रॉस करंट’कडे त्या कंपनीचे नाव सांगण्याची मागणी केली. इंडिया टुडेच्या बातमीत त्या विशिष्ट खरेदीचा संपूर्ण लेखाजोखा देण्यात आला होता. सप्लायरने अॅडव्हान्स पेमेंटची मागणी केली. सरकारच्या नियमानुसार अॅडव्हान्स पेमेंट केले जात नाही, असे बातमीत म्हटले होते. त्यामुळे आरोग्यमंत्री सरमा यांनी अनेक कंत्राटदारांशी संपर्क साधून त्यांना दिल्लीस्थित सप्लायरला १५ कोटी रुपये देण्याची विनंती केली आणि आसाम सरकारने  बिल मंजूर केल्यानंतर ५०,००० पीपीई किट्सची डिलिव्हरी घेतली, असेही या बातमीत म्हटले होते.

राज्य सरकारने चीनकडून पीपीई किट्स खरेदी करण्यासाठी मोजलेल्या मोठ्या रकमेची पुष्टी करण्यासाठी विचारणा केली असता, एनएचएमने ‘चीनकडून कधीही पीपीई किट्स खरेदी केली नाहीत किंवा त्यासाठी पैसे दिले नाहीत’ असे स्पष्ट केले. ‘आसाम सरकारने चीनकडून ५०,००० पीपीई किट्स आयात केली असे आपण म्हणू शकतो का’ असा नेमका प्रश्न विचारला असता, ‘आम्हाला चीनकडून कोणतेही पीपीई किट मिळालेले नाही. त्यामुळे या संदर्भातील कोणतीही माहिती एनएचएम आसामकडे नाही’ असे उत्तर एनएचएमने दिले. २०२० या वर्षाच्या मध्यात, देशाबाहेरून पीपीई किट्स आयात करणारे एकमेव राज्यस्तरीय आरोग्यमंत्री म्हणून माध्यमांनी सरमा यांची प्रशंसा केली. त्यावेळी ही पीपीई किट्स निकृष्ट दर्जाची होती व त्यामुळे वैद्यकीय व्यावसायिकांना वापरता आली नाहीत, अशा बातम्याही पुढे येत होत्या.  भारत सरकारने चीनकडून खरेदी केलेल्या १.७० लाख पीपीई किट्सपैकी ५०,००० किट्स डीआरडीओच्या ग्वाल्हेर प्रयोगशाळेचे सुरक्षितता निकष पूर्ण करू शकली नाहीत अशा माध्यमांतील कुजबुजीचा हवाला या बातमीत देण्यात आला होता. चीनमधून येणारी भारत सरकारची कन्साइनमेंट सीई/एफडीए प्रमाणित नसल्यामुळे, उत्पादनांना डीआरडीओच्या तपासणीखालून जावे लागले असेही यात नमूद करण्यात आले होते. मात्र, नंतर डीआरडीओने असा दावा केला की, चाचणीसाठी आलेली किट्स ते मंजूर किंवा नामंजूर करतच नाहीत, ते केवळ संबंधित एजन्सींच्या मानकांनुसार उत्पादने आहेत की नाही हे तपासतात.

चीनमधून आलेल्या पीपीई किट्सच्या दर्जाबाबत राज्यातील डॉक्टरांनी शंका व्यक्त केल्यामुळे चीनमधून पीपीई किट्स आणणाऱ्या व्यक्तीला ती त्याच्या गुवाहाटीतील दुकानातच ठेवण्याची विनंती आपण केली आहे, असे सरमा यांनी १८ एप्रिल २०२० रोजी सांगितले.

“आम्हाला सध्याच्या काळात डॉक्टर व नर्सना चिंतेत टाकायचे नाही. त्यामुळे गरज पडेल तेव्हाच पीपीई किट्स घेऊ असे आम्ही संबंधित व्यक्तीला कळवले आहे. यात कोणाचे तरी आर्थिक नुकसान होणार आहे,” असे सरमा म्हणाले होते. त्यानंतर पूर्णपणे वेगळी भूमिका घेऊन सरमा यांनी स्वत:ला या खरेदीपासून दूर केले आणि राज्य सरकारने यासाठी काही बिल मंजूर केल्याचेही स्पष्टपणे नाकारले.

३ मार्च रोजी आरटीआय अर्जाच्या माध्यमातून एनएचएमला या किट्सच्या डिलिव्हरीबाबत तसेच सध्या ती कोठे आहेत याबाबत विचारले असता, एनएचएमने अशा प्रकारच्या खरेदीबाबत कोणतीही माहिती नाही असे स्पष्टपणे सांगितले.

‘द वायर’ आणि ‘द क्रॉस करंट’ यांनी आसामच्या आरोग्यखात्याला व अर्थखात्याला याबद्दल विचारणा करणारी मेल संयुक्तपणे पाठवली आहे. या दोन्ही खात्यांची जबाबदारी त्यावेळी सरमा यांच्याकडेच होती. माध्यमातील बातम्यांमध्ये म्हटले आहे त्याप्रमाणे या खात्यांनी २९ मार्च २०२० रोजी दिल्लीस्थित सप्लायरकडे ५०,००० पीपीई किट्सची ऑर्डर दिली होती का, असा प्रश्न यात विचारण्यात आला आहे. मंत्र्यांनी ज्याची प्रसिद्धी केली ती खरेदी आपण आपत्कालीन परिस्थितीत का केली नाही अशी विचारणा करणारी मेल एनएचएम संचालकांच्या कार्यालयालाही पाठवण्यात आली आहे.

या दोन्ही ठिकाणांहून उत्तरे आल्यानंतर हा वृत्तांत त्वरित अद्ययावत केला जाईल.

(हा वृत्तांत द वायर आणि गुवाहाटी येथील न्यूज पोर्टल द क्रॉस करंट यांनी संयुक्तपणे तयार केला आहे.)

(हा वृत्तांत संगीता बारुआ पिशारोती, अरूप कलिता आणि गौतम प्रतीम गोगोई यांनी संयुक्तपणे केला आहे.)

मूळ लेख:

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0