योगी सरकारमध्ये ब्राह्मण व ओबींसीना प्रतिनिधित्व

योगी सरकारमध्ये ब्राह्मण व ओबींसीना प्रतिनिधित्व

नवी दिल्लीः उ. प्रदेशाच्या मुख्यमंत्रीपदाची दुसऱ्यांदा सूत्रे योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी स्वीकारली. त्यांच्या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, के

अमित शाह यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाचा अन्वयार्थ
निवडणुकांच्या तोंडावर उ. प्रदेश, पंजाबात मंत्रिमंडळ विस्तार
मंत्रिमंडळात फेरबदल; मात्र चांगल्या प्रशासनाची ग्वाही नाहीच!

नवी दिल्लीः उ. प्रदेशाच्या मुख्यमंत्रीपदाची दुसऱ्यांदा सूत्रे योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी स्वीकारली. त्यांच्या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आदी नेते उपस्थित होते. राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी आदित्यनाथ यांना शपथ दिली.

गुरुवारी भाजपने आदित्यनाथ यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदासाठी निवडले. त्यानंतर आदित्यनाथ यांनी राज्यपालांकडे जाऊन सरकार स्थापन करण्याची विनंती केली होती.

आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळात ब्राह्मण, ओबीसी व दलित जातींना समाविष्ट करून घेण्याचा प्रयत्न दिसून आला. गेल्या मंत्रिमंडळात दलित जातींचे प्रतिनिधित्व कमी असल्याने त्याबद्दल नाराजी होती ती नाराजी दूर करण्याचा प्रयत्न दिसून आला.

यावेळी लखनौ कंटोनमेंटमधून निवडून आलेले ब्राह्मण आमदार ब्रिजेश पाठक यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली. उ. प्रदेशात ब्राह्मण समाजाची १० टक्के लोकसंख्या आहे.

या निवडणुकांत भाजपने एकाही मुस्लिम उमेदवाराला तिकीट दिले नव्हते. पण भाजपने मुस्लिम ओबीसीपर्यंत जाण्यासाठी दानिश आझाद अन्सारी यांना मंत्रिपद दिले. यासाठी त्यांनी शिया समुहाचे माजी मंत्री मोहसिन रजा यांच्या नावावर फुली मारली. अन्सारी हे उ. प्रदेशच्या राजकारणात तसे नवखे आहेत पण त्यांची राजकीय कारकीर्द अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून आकारास आली. त्यांनी भाजपच्या अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष म्हणूनही काम केले.

भाजपने नव्या मंत्रिमंडळात केशव प्रसाद मौर्य यांच्याकडे दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली. मौर्य हे ओबीसी समाजातील प्रभावशाली नेते आहे. ते सिराथू येथून निवडणूक हरले असले तरी संघपरिवाराशी त्यांचा अनेक वर्षांपासून संबंध आहेत. मौर्य यांच्या बरोबर सुरेश खन्ना, सूर्य प्रताप साही, स्वतंद्र देव सिंग, बेबी रानी मोर्य यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली.

मोदींच्या मदतनीस अधिकाऱ्यांना मंत्रीपद

आदित्यनाथ यांच्या नव्या मंत्रिमंडळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत प्रदीर्घ काळ राहिलेले आयएएस अधिकारी अरविंद कुमार शर्मा यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. शर्मा हे मोदींचे ते गुजरातचे मुख्यमंत्रीपदी असल्यापासून काम करत होते. मोदींची गुजरातमधील विकास पुरुष प्रतिमा (व्हायब्रंट गुजरात) सांभाळण्याचे काम त्यांनी केले होते. शर्मा हे २०१४ पर्यंत मोदींसोबत होते त्यानंतर ते मोदींसोबत पंतप्रधान कार्यालयात रुजू झाले. २०२१मध्ये त्यांनी स्वेच्छा निवृत्ती पत्करली व भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी विधान परिषदेवर आपली नियुक्ती करून घेतली होती.

शर्मा यांच्या प्रमाणे माजी आयपीएस अधिकारी असीम अरुण यांनाही मंत्रिपद मिळाले. असीम अरुण यांनी कनोज येथून निवडणूक जिंकली त्यांनी तीन वेळा विजयी झालेले सपाचे उमेदवार अनिल कुमार दोहारे यांचा पराभव केला.

आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळात भाजपचे मित्रपक्ष अपना दलचे आशिष पटेल व निषाद पार्टीचे अध्यक्ष संजय निषाद यांनाही कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले.

काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले जितीन प्रसाद यांना राज्यमंत्रीपद मिळाले. त्याच बरोबर दया शंकर सिंग, नितीन अग्रवाल व कल्याण सिंग यांचे नातू संदीप सिंग यांना राज्यमंत्रीपद मिळाले.

शुक्रवारी एकूण ५२ मंत्र्यांना शपथ देण्यात आली.

भाजपच्या निवडून आलेल्या २७३ आमदारांमध्ये ८९ आमदार ओबीसी व ६३ आमदार दलित समाजातील असून मंत्रिमंडळातील प्रमुख व प्रभावशाली मंत्रिपदे ब्राह्मण व ठाकूर समाजातील नेत्यांना देण्यात आली आहेत.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: