राज्यपाल कोश्यारी नमले, माफी मागितली

राज्यपाल कोश्यारी नमले, माफी मागितली

मुंबईः गेल्या आठवड्यात अंधेरी येथील एका कार्यक्रमात मराठी भाषिकांवर छद्मी टीका करणारे राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी सोमवारी अखेर समस्त महाराष्ट्राच

राज्यपाल कोश्यारींकडून मराठी भाषिकांवर अप्रत्यक्ष टीका
कोश्यारींच्या राजकीय महत्त्वाकांक्षा
‘वर्षा’ आणि ‘राजभवन’दरम्यान आणखी एक ठिणगी 

मुंबईः गेल्या आठवड्यात अंधेरी येथील एका कार्यक्रमात मराठी भाषिकांवर छद्मी टीका करणारे राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी सोमवारी अखेर समस्त महाराष्ट्राची माफी मागितली आहे.

दिनांक २९ जुलै रोजी अंधेरी येथे झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात मुंबईच्या विकासात देशातील काही समाज बांधवांच्या योगदानाचे कौतुक करताना माझ्याकडून कदाचित काही चूक झाली. महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशाच्या विकासात सर्वांचेच उल्लेखनीय असे योगदान आहे, असे पत्रक राजभवनाकडून काढण्यात आले आहे.

गेल्या आठवड्यात कोश्यारी यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात मुंबई आणि ठाण्याच्या विकासात आणि विशेषतः मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी-गुजराती समाजाचे योगदान असून महाराष्ट्रामध्ये विशेषतः मुंबई आणि ठाण्यामधून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढल्यास तुमच्याकडे पैसे राहणार नाहीत. मुंबईला आर्थिक राजधानी म्हटलं जाते ते आर्थिक राजधानी म्हटले जाणार नाही, असे वादग्रस्त विधान केले होते.

या विधानावर केवळ राजकीयच नव्हे तर महाराष्ट्राच्या सर्व थरातून तीव्र संताप व्यक्त झाला होता. सोशल मीडियावर कोश्यारी यांच्या एकूण कारकिर्दीचे वाभाडेही काढल्याचे दिसून आले होते. कोश्यारी यांना कोल्हापुरी जोडा भेट द्यावा लागेल असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले होते. भाजप व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोर गटाने राज्यपालांच्या वादग्रस्त टीकेवर किरकोळ शब्दांत प्रतिक्रिया दिली होती.

तरीही चार दिवस होऊनही कोश्यारी यांच्याविरोधातला मराठी भाषिकांचा संताप कमी झालेला नव्हता. अखेर सोमवारी राजभवनाने कोश्यारी यांच्या माफीचे पत्र जाहीर केले.

या पत्रात कोश्यारी म्हणतात,

दिनांक २९ जुलै रोजी अंधेरी येथे झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात मुंबईच्या विकासात देशातील काही समाज बांधवांच्या योगदानाचे कौतुक करताना माझ्याकडून कदाचित काही चूक झाली.

 महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशाच्या विकासात सर्वांचेच उल्लेखनीय असे योगदान आहे. विशेषतः संबंधित राज्याची सर्वसमावेशकता व सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करण्याची आपली उज्वल परंपरा यामुळेच आज आपला देश प्रगती पथावर अग्रेसर होत आहे.

 गेल्या जवळपास तीन वर्षांत मला राज्यातील जनतेचे अपार प्रेम मिळाले आहे. आपल्या वतीने मी महाराष्ट्र आणि मराठी भाषेचा गौरव वाढवण्याचा कसोशीने प्रयत्न केला.

 परंतु,  त्या दिवशीच्या भाषणात माझ्याकडून निर्हेतुकपणे काही चूक झाली असेल तर त्या चुकीला या थोर महाराष्ट्र राज्याचा अवमान समजला जाईल ही कल्पना देखील मला करवत नाही.

महाराष्ट्राच्या महान संतांच्या शिकवणीला अनुसरून राज्यातील जनता या विनम्र राज्यसेवकाला क्षमा करून आपल्या विशाल अंतःकरणाचा पुनर्प्रत्यय देईल असा विश्वास बाळगतो.

भगत सिंह कोश्यारी
राज्यपालमहाराष्ट्र

गेल्या शुक्रवारी कोश्यारी यांच्या हस्ते अंधेरी (प) येथील स्थानिक चौकाला दिवंगत श्रीमती शांतीदेवी चंपालालजी कोठारी यांचे नाव देण्यात आले, त्यावेळी राजस्थानी-गुजराती समाजाचे कौतुक करत त्यांनी मराठी समाजावर अप्रत्यक्ष टीका केली होती.

महत्त्वाचे म्हणजे राज्यपालांच्या भाषणावेळी खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा, नितेश राणे, अमित साटम, भारती लव्हेकर व पंकज भोयर, नृत्य दिग्दर्शक रेमो डिसुझा व उद्योजक विश्वस्त राकेश कोठारी प्रामुख्याने उपस्थित होते. पण या पैकी एकाही नेत्याने राज्यपालांच्या टिप्पण्णीवर भाष्य केले नव्हते. नितेश राणे यांनी उलट राज्यपालांची पाठराखण केली होती.

कोश्यारी यांच्या भाषणाचा व्हीडिओ जेव्हा ट्विटरवर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर सर्व थरातल्या मराठी भाषिकांकडून टीका सुरू झाली.

राजस्थानी मारवाडी समाजाचे कौतुक

आपल्या भाषणात कोश्यारी यांनी राजस्थानी समाजाच्या दातृत्वाचेही कौतुक केले होते. राजस्थानी मारवाडी समाजाने व्यवसाय करताना केवळ अर्थसंचय न करता शाळा, महाविद्यालये, इस्पितळे बांधली व गोरगरिबांची सेवा केली. राजस्थानी मारवाडी समाज देशात सर्वत्र तसेच नेपाळ, मॉरिशस आदी देशांमध्ये देखील आहे असे सांगून जेथे जेथे हा समाज जातो तेथे तो आपल्या स्वभाव व दातृत्वामुळे स्थानिक संस्कृतीशी एकरूप होतो असे ते म्हणाले होते.

भारत देश हा शूरवीरांच्या बलिदानामुळे तसेच दानशूर लोकांच्या दातृत्वामुळे मोठा आहे असे सांगताना त्याग, बलिदान व सेवा यामुळेच जनतेचे प्रेम मिळते आणि म्हणून सर्वांनी समाजासाठी आपले योगदान दिले पाहिजे असे कोश्यारी म्हणाले होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0