पानसरे हत्या प्रकरण एटीएसकडे देण्याची मागणी

पानसरे हत्या प्रकरण एटीएसकडे देण्याची मागणी

मुंबईः ज्येष्ठ विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणाचा तपास अत्यंत दयनीय पद्धतीने सुरू असून हे प्रकरण एटीएसकडे द्यावी अशी

आरोपांना शोमा सेन यांचे उच्च न्यायालयात आव्हान
फादर मृदुभाषी होते, पण त्यांच्या उरात आग होती..
दंगल रोखू शकत नाही – सरन्यायाधीश बोबडे

मुंबईः ज्येष्ठ विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणाचा तपास अत्यंत दयनीय पद्धतीने सुरू असून हे प्रकरण एटीएसकडे द्यावी अशी मागणी पानसरे कुटुंबियांनी मुंबई उच्च न्यायालयाला केली आहे. न्यायालयाने पानसरे कुटुंबियांच्या या आरोपाची दखल घेत गेल्या दोन वर्षांत पानसरे हत्या प्रकरणाचा काय तपास केला हे स्पष्ट करावे असे आदेश राज्य सरकारला दिले आहेत.

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार पानसरे यांची मुलगी स्मिता पानसरे, सून मेघा पानसरे व सामाजिक कार्यकर्त्या मुक्ता दाभोलकर यांनी दोन याचिका उच्च न्यायालयात दाखल केल्या आहेत. या दोन याचिकांमध्ये न्यायालयाने पानसरे व नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात लक्ष घालावे अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.  या याचिकांमध्ये पानसरे, दाभोलकर, कन्नड विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते एमएम कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश या चौघांच्या हत्यांमागे मोठे षडयंत्र असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

दाभोलकर हत्या प्रकरणातील सुनावणी सुरू झाली असल्याने ते प्रकरण अन्य तपास यंत्रणांकडे देता येत नाही पण पानसरे हत्या प्रकरण हे एटीएसकडे देता येऊ शकते, या मुद्द्याकडे न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले आहे.

याचिकाकर्त्यांचे वकील अभय नेवगी यांनी न्यायालयात दावा केला की, पानसरे यांच्या हत्या झाल्यानंतर २०१५ नंतर तपासात कोणतीही प्रगती झालेली नाही, जो तपास झाला तो अत्यंत निराशजनक असून त्या प्रकरणी चौकशी झाली पाहिजे. यावर न्यायालयाने राज्याला नोटीस बजावून २१ जुलैपर्यंत माहिती मागवली आहे.

न्यायालयाने पानसरे हत्या प्रकरणाची २०२०नंतर आजपर्यंत जी प्रगती झाली आहे, त्याचा रिपोर्ट सीआयडीकडे मागितला आहे. सीआयडीने २०२०पर्यंतचा रिपोर्ट न्यायालयाकडे सोपवला होता. त्यानंतरचा सादर केलेला नाही.

षडयंत्र

२० व्या शतकात महाराष्ट्राच्या प्रबोधन चळवळीतील अग्रगण्य असलेल्यांमध्ये नरेंद्र दाभोलकर यांचे नाव घेतले जाते. त्यांची हत्या २० ऑगस्ट २०१३ मध्ये पुण्यात झाली. त्यानंतर ज्येष्ठ विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते गोविंद पानसरे यांच्यावर कोल्हापुरात १६ फेब्रुवारी २०१५मध्ये गोळ्या घालण्यात आल्या. जखमी अवस्थेतील पानसरे यांनी चार दिवस मृत्यूशी झुंज दिली पण उपचारादरम्यान त्यांचे २० फेब्रुवारी २०१५ रोजी निधन झाले.

त्यानंतर कर्नाटकातील प्रसिद्ध लेखक व विचारवंत एमएम कलबुर्गी यांची धारवाड येथे ३० ऑगस्ट २०१५मध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या तीनही हत्या प्रकरणातील साम्य पाहून व त्यामागचा सूत्रधार एकच असल्याचा तपास करावा अशी मागणी केली जात होती. ती आजही कायम आहे.

दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्येनंतर २०१७मध्ये पत्रकार गौरी लंकेश यांचीही हत्या करण्यात आली होती. या सर्व हत्यांप्रकरणात अनेक संशयितांना अटक करण्यात आली आहे. पण या प्रकरणांचा तपास पूर्णत्वास आलेला नाही वा न्यायालयात अंतिम निवाडा झालेला नाही.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: